Author : Soumya Bhowmick

Published on Dec 07, 2020 Commentaries 0 Hours ago

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या दहा वर्षात दीडशे पटीने वाढली आहे. त्यामुळे ते अमेरिकेतील ५० राज्यात एक राजकीय शक्ती म्हणून उदयास आले आहेत.

अमेरिकन निवडणुकीवरील ‘भारतीय’ प्रभाव

अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक हा भारतीयांसाठी नेहमीच औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेतील स्थलांतरित भारतीय हे त्याचे कारण आहे. अमेरिकेतील एकूण स्थलांतरितांमध्ये संख्येच्या दृष्टीने भारतीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मतदानाच्या बाबतीत कुंपणावर (कोणत्याही एका पक्षाशी बांधिलकी नसलेले) असलेल्या राज्यांमध्ये भारतीय वंशाचा मतदार हा निर्णायक समजला जातो. उच्च शिक्षण आणि संपन्नता ही भारतीय-अमेरिकी मतदाराची ताकद आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी नोव्हेंबर २०२० मध्ये झालेली निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. अनेक राज्यांतील मतदारांच्या संख्येत झालेली वाढ आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये रिपब्लिकन व डेमॉक्रॅट अशा कुठल्याही एका पक्षाशी बांधिलकी नसलेले मतदार हा घटक त्यासाठी कारणीभूत ठरला. अमेरिकेत एकूण ५३५ ‘इलेक्टोरल कॉलेज’ (अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान करणारे प्रतिनिधी) आहेत. यापैकी तब्बल १७३ प्रतिनिधी अॅरिझोना, फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, ओहियो, पेनसिल्व्हानिया, टेक्सास व विस्कॉन्सिन या नऊ राज्यांमध्ये आहेत. अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी ३२ टक्के लोकांचे प्रतिनिधित्व ही राज्ये करतात. ही नऊ राज्ये निवडणुकीच्या काळात त्या-त्या परिस्थितीनुसार कोणत्याही पक्षाकडे झुकू शकतात.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प कायम राहणार की डेमॉक्रॅट पक्षाचे उमेदवार सिनेटर जो बायडन बाजी मारणार हे ठरविण्यात या वेळीही याच राज्यांची प्रमुख भूमिका असेल, अशी अपेक्षा होती. ती खरी ठरली. मागील अध्यक्षीय निवडणुकीत कुंपणावरील नऊ राज्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकली होती. (खालील तक्ता पाहा.) २०२० मध्ये हे चित्र काहीसे बदलले. नऊ राज्यांपैकी पाच राज्यांनी डेमॉक्रॅट उमेदवाराला झुकते माप दिले. त्याचवेळी, २०१६ च्या निवडणुकीत डेमॉक्रॅट पक्षाला मतदान करणाऱ्या इतर राज्यांनी यावेळीही डेमॉक्रॅटच्या उमेदवारालाच पसंती दिली. त्यापैकी एकही राज्य रिपब्लिकन उमेदवाराकडे झुकले नाही. त्यामुळेच डेमॉक्रॅटचे उमेदवार जो बायडन यांना तब्बल ७४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवता आला.

हाच ट्रेंड २०१६ साली देखील पाहायला मिळाला होता. त्यावेळी कुंपणावरील राज्यांपैकी सहा राज्यांनी (फ्लोरिडा, आयोवा, मिशिगन, ओहियो, पेनसिल्वानिया, विस्कॉन्सिन) २०१२ च्या निवडणुकीपेक्षा वेगळा निर्णय घेतला होता. त्यांनी डेमॉक्रॅटऐवजी रिपब्लिकन उमेदवाराला पसंती दिली होती. परिणामी रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प यांचा ७७ मतांच्या फरकाने विजय झाला होता. मतदानाच्या बाबतीत द्विधा मन:स्थितीत असलेली आणखी सहा राज्ये (आयोवा, मैन, मिनिसोटा, नेब्रास्का, नेवादा, न्यू हॅमस्पिअर) यावेळी पुढे आली आहेत.

या राज्यात रिपब्लिक व डेमॉक्रॅटच्या उमेदवारांना मिळालेल्या पॉप्युलर मतांमधील फरक १० टक्क्यांपेक्षाही कमी होता. भारतीय-अमेरिकी नागरिकांच्या मतदानाच्या पॅटर्नबद्दल अद्याप काही ठोस सांगता येत नाही. असे असले तरी कुंपणावरील राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांचा गट अत्यंत महत्त्वाचा ठरतो, यात अजिबात शंका नाही. कारण, अशा राज्यांत मतदानातील किंचितसा बदलही संपूर्ण निकालाचे पारडे एखाद्या पक्षाच्या बाजूने फिरवू शकतो.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांनी कुंपणावरील राज्यांमध्ये जोरदार प्रचार केला होता. भारतीय-अमेरिकी मतदारांपर्यंत पोहोचणे हाच उद्देश यामागे होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपली किती जवळीक आहे, हे सांगून भारतीय वंशाच्या मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तर, २०१२ साली ‘व्हाइट हाउस’मध्ये दिलेल्या दिवाळी पार्टीची आठवण बायडन यांनी मतदारांना करून दिली.

नऊ पैकी पाच राज्यांमध्ये विजयी मतांच्या आकडेवारीपेक्षा भारतीय-अमेरिकी मतांची संख्या कितीतरी अधिक आहे. (वरील तक्त्यातील पिवळे चौकोन पाहा) त्यापैकी चार राज्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्या पारड्यात मते टाकली आहेत. या राज्यातील भारतीय-अमेरिकी नागरिकांच्या मतदानाचे नेमके आकडे उपलब्ध नसले तरी, वरील आकडेवारी पाहता भारतीय वंशाच्या मतदारांनी २०२० च्या निवडणुकीत डेमॉक्रॅट पक्षाची पाठराखण केलेली दिसते. वाढती संख्या आणि प्रभावामुळे भारतीय वंशाचे नागरिक हे अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये एक राजकीय शक्ती म्हणून उदयास आले आहेत. २०२० च्या अमेरिकी निवडणुकीच्या संदर्भातील अहवालातून ‘ओआरएफ’ने यावर प्रकाश टाकला आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांत भारतीय समाजाचा सांस्कृतिक प्रभाव कसा वाढतोय, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांची व्होटबँक वाढण्यात कळीची भूमिका बजावू शकतील, अशा महत्त्वाच्या व्यक्तींविषयी देखील अहवालात चर्चा आहे.

अमेरिकेतील भारतीय वंशाचे मतदार रिपब्लिकन पक्षाकडे झुकत असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. २०१६ च्या निवडणुकीत डेमॉक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना भारतीय-अमेरिकी मतदारांचा ७७ टक्के पाठिंबा मिळाला होता.  त्या तुलनेत २०२० च्या निवडणुकीत जो बायडेन यांच्या पाठिशी ६६ टक्के मतदार उभे असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भारताशी मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पावलं उचलली होती. मोदी आणि ट्रम्प यांच्या दिमाखदार एकत्रित सभांनी भारतीय-अमेरिकी मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे भारतीय वंशाच्या नागरिकांची जुनी पिढी ट्रम्प यांच्याकडे झुकल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून बायडन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची केलेली निवड भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची ठरली. निवडणूक काळात हॅरीस यांच्या भारतीय वंशाबद्दल ठळकपणे झालेल्या चर्चेचाही मोठा फायदा बायडेन यांना झाला.

कोविड १९ च्या महामारीमुळे या वेळच्या अमेरिकी निवडणुकीत तब्बल ६५ टक्के निवडणूकपूर्व मतदान झाले. (प्रत्यक्ष मतदानाच्या आधी लोकांच्या सोयीनुसार मतदान घेण्याची पद्धत अमेरिकेत आहे. त्याला Early Votes म्हणतात.) यावेळी तब्बल १५ कोटी मतदारांनी नियोजित वेळेच्या आधी मतदान केले. हा शतकातील विक्रम होता. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्याच्या कंटाळवाण्या व किचकट प्रक्रियेमुळे पाच राज्यांतील निकालांत आघाडी घेतलेल्या उमेदवारांची नावे निवडणूक झाल्यानंतरही तब्बल पाच दिवस घोषित होऊ शकली नाहीत. दोन उमेदवारांच्या मतांमध्ये असलेली किरकोळ तफावत आणि पोस्टल मतपत्रिकांची संख्या मोठी असल्यामुळे हे शक्य झाले नाही.

जिथे उमेदवारांच्या विजयाबद्दल कुठलाही अंदाज बांधता आला नाही अशा राज्यांमध्ये चुरशीची लढत झालेल्या सहा राज्यांचा समावेश होता. काही राज्यांमध्ये ट्रम्प आणि बायडेन यांना मिळालेल्या एकूण मतांमध्ये (पॉप्युलर व्होट्स) एक टक्क्यांहून कमी फरक होता. त्यात अॅरिझोना, जॉर्जिया व विस्कॉन्सिन या राज्यांचा समावेश होता. या राज्यांत ट्रम्प यांनी कडवी लढत दिली खरी, पण त्यांना डेमॉक्रॅटच्या बायडेन यांच्याकडून निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र, बायडेन यांचा एकंदर विजय आणि भारतीय-अमेरिकी मतदारांकडून त्यांना मिळालेला मजबूत पाठिंबा लक्षात घेता भारतीय वंशाचे मतदार रिपब्लिकन पक्षाकडे झुकत असल्याचा दावा साशंकता निर्माण करणारा आहे.

प्रांतिक सरकारमधील विविध पदांसाठी निवडणूक लढणाऱ्या भारतीय वंशाच्या उमेदवारांबरोबरच, न्यायालयात न्यायाधीश म्हणून आणि गव्हर्नर कार्यालयांमधील निवडणुकीसाठी रिंगणात असलेले भारतीय वंशाचे चारही उमेदवार (‘समोसा कॉकस’ म्हणून ओळखला जाणारा अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींचा गट) डेमॉक्रॅटच्या तिकिटावर पुन्हा एकदा ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज’मध्ये निवडून आले आहेत.

अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तिथे भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या फार मोठी नाही. मात्र, २००८ ते २०१८ या दहा वर्षांत ही संख्या सुमारे दीडशे टक्क्यांनी वाढली आहे हे लक्षात घ्यायला हवे. आर्थिक व राजकीय मोर्चेबांधणी करण्याची ताकद लक्षात घेता भारतीय-अमेरिकी समुदायाला भविष्यातील अमेरिकी राजकारण व निवडणुकांमध्ये अधिक अधिकार मिळायला हवा, एवढे नक्की!

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.