Published on Oct 22, 2019 Commentaries 0 Hours ago

बांगलादेशाची वार्षिक ८% दराने वाढणारी अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे, भारत-बांगलादेश मैत्री महत्त्वाची आहे.

भारत-बांगलादेश मैत्री महत्त्वाची

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०१९ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर काही महिन्यांच्या आताच हा दौरा झाला. भारत आणि बांगलादेश मित्र आहेत. त्यामुळे, या दोन देशांमधील विशेष नाते अधोरेखित करण्यावर या दौऱ्यात भर दिसून आला. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’तर्फे ‘इंडिया इकॉनॉमिक फोरम’ नावाची परिषद ३ व ४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत भरवण्यात आली होती. त्यातही शेख हसीना यांनी भाग घेतला. त्यांना या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहाण्याचे निमंत्रण ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने दिले होते. ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सध्या अतिशय उत्तम आहेत आणि या दौऱ्यात त्यांचा आढावा घेतला गेला. त्याशिवाय, अन्य काही प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. या दौऱ्याअंती ५३ परिच्छेद असलेले एक संयुक्त निवेदनही प्रकाशित करण्यात आले. दौऱ्यादरम्यान झालेल्या विविध चर्चांमधील मुख्य मुद्द्यांचा निवेदनात उल्लेख होता. या पुढील भारत बांगलादेश संबंध कशा स्वरूपाचे असतील याची कल्पना या निवेदनात दिसून येते, आणि म्हणूनच हा दस्तऐवज फार महत्त्वाचा मानला जात आहे.

दोन्ही देशांतील परस्पर सहकार्य अजून वृद्धिंगत करण्याच्या हेतूने कोणत्या कोणत्या क्षेत्रांना प्राधान्य देण्याबद्दल सहमत झाली आहे याची माहिती निवेदनात आहे. ही बाब विशेष दखलपात्र आहे. या क्षेत्रात सीमासुरक्षा आणि प्रबंधन, दोन्ही पक्षांना समान फायदा होईल अशी भागिदारी; जमीन, जल व आकाशमार्गे दळणवळणाच्या साधनांचा विकास; राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सहकार्य; परस्परपूरक विकासनिती, ऊर्जा क्षेत्रात सहकार्य; महात्मा गंधी जयंती समारोह (२०२०), बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांचा जयंती समारोह (२०२०) व बांगलादेश मुक्ती युद्धाची सुवर्णजयंती (२०२१) इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून सांस्कृतिक सहकार्य वृद्धींगत करणे इत्यादींचा समावेश आहे.

दळणवळण, संपर्क, विविध क्षमता वाढविणे, संस्कृती इत्यादींच्या संबंधाने तब्बल ७ करार या दौऱ्यात करण्यात आले, ही या दौर्याची तात्काळ दिसलेली फलश्रुती असे म्हणता येईल. समुद्री किनाऱ्यावर देखरेख ठेवण्याकरता साधने पुरविणे, चट्टोग्राम व मोंगला बंदरांमधून भारताकडे मालाची ने-आण करण्याबाबत अंमलात आणण्याची प्रक्रिया, त्रिपुरातील सबरूम शहराकरता पिण्याच्या पाण्यासाठी फेनी नदीतून १.८२ क्युसेक्स पाणीउपसा करण्याबाबत सहमती, भारताने बांगलादेशला देऊ केलेल्या विविध कर्जसदृश मदतीची अंमलबजावणी, हैद्राबाद व ढाक्का विद्यापीठांमधील परस्पर सहकार्याबद्दल सहमती, सांस्कृतिक देवाणघेवाणीचे पुनरूज्जीवन, दोन्ही देशातील युवकांचा परस्पर संपर्क वाढविण्याबाबत सहमती असे ७ सामंजस्य करार या दौऱ्यात झाले. या शिवाय ३ प्रकल्पांचे उद्घाटनही झाले. द्रवरूप पेट्रोलियम वायुची बांगलादेशातून आयात, ढाक्क्यातील रामकृष्ण मिशनमधील विवेकानंद भवन, बांगलादेशातील खुलना येथील इन्स्टिट्युट ऑफ डिप्लोमा इंजिनियर्स या संस्थेने उभारलेल्या बांगलादेश-भारत व्यावसायिक कौशल्य विकास संस्था इत्यादी तीन उद्घाटनेही या दौऱ्यादरम्यान झाली.

दोन्ही देशांतील विश्वास आणि मैत्री अधोरेखित करण्याच्या दृष्टीने शेख हसीना यांचा हा भारत दौरा महत्त्वाचा ठरला. मात्र, या दौऱ्याकडून बांगलादेशातील जनतेच्या अपेक्षा खूपच जास्त होत्या. त्यामुळे तेथील जनतेत या दौऱ्याबद्दल म्हणावे तितके समाधान दिसून येत नाही. भारत हा मोठा शेजारी आहे आणि त्यामुळे त्याने बांगलादेशला अजूनही बरेच काही देऊ करायला हवे होते, अशीच भावना तेथील जनतेत आहे. तिस्ता नदीचे पाणी वाटून घेण्याबाबत दोन्ही देशांतला, २०११ पासून अद्याप रखडलेला करार होण्याची खूपच जास्त अपेक्षा त्यांना होत्या. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही देशांना मंजूर झालेला कराराचा मसुदा नाकारला आणि तिस्ता पाणीवाटप करार बारगळला.

२०१७ साली, म्यानमारमधील राखिने राज्यातून हाकलून लावलेल्या रोहिंग्या निर्वासितांच्या मुद्द्यावर, त्यांना स्वगृही परत पाठविण्याच्या दृष्टीने भारत अधिक कणखर भूमिका घेईल, अशी आशाही बांगलादेशी जनतेला होती. प्रस्तुत दौऱ्यादरम्यान भारताने या निर्वासितांना सुरक्षितपणे परत जाता यायला हवे, आपला चरितार्थ नीटपणे चालवता यायला हवा या आपल्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. शिवाय, या निर्वासितांकरता पुरविण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचेही आश्वासन दिले.

मात्र, हे पुरेसे नाही, अशीच भूमिका बांगलादेशात सर्वत्र दिसून आली. भारत हा एक मित्रदेश आहे आणि क्षेत्रीय महासत्ताही आहे. त्यामुळे, या प्रकरणी म्यानमारशी चर्चा करून रोहिंग्या निर्वासितांना स्वगृही निर्भययेने परत जाता येईल व शांततेने जगता येईल असे वातावरण तिथे निर्माण करण्यास भाग पाडावे, अशी बांगलादेशी जनतेची अपेक्षा आहे. या बाबतीत बांगलादेशाने अन्य काही देशांकडेही मदत मागितली आहे. चीन-म्यानमार संबंध मैत्रीपूर्ण आहेत. जुलै महिन्यात पंतप्रधान शेख हसीना चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी तिथेही हा मुद्दा उपस्थित केला होता. चीननेही मदतीचे आश्वासन दिले, पण अद्याप वास्तवात तसे काही घडताना दिसून आलेले नाही.

गेल्या काही काळात बांगलादेशीयांच्या मनात भारताबद्दल संशय बळावत चालला आहे. याला एखादा विशिष्ट मुद्दाच कारणीभूत आहे असे नाही सांगता येणार. बराच काळ रखडलेला तिस्ता पाणी वाटप करार, रोहिंग्या निर्वासितांच्या मुद्द्यावर भारताची भूमिका, आसाममध्ये राबवले जात असलेले राष्ट्रीय नागरीकता नोंदणी अभियान असे अनेक मुद्दे कारणीभूत आहेत. विशेषत: राष्ट्रीय नागरीकता नोंदणी अभियानामुळे जरा जास्तच बांगलादेशी दुखावाले आहेत. कारण, भारतातील बेकायदा बांगलादेशींना शोधून काढण्याकरताच हा सगळा खटाटोप आहे अशी त्यांची भावना आहे. या अभियानात, तब्बल १९ लाख लोकांचे नागरीकत्व नाकारण्यात आले आहे. त्यामुळे, या सगळ्यांना बांगलादेशात लोटून देण्यात येईल अशी भिती तेथील लोकांना वाटत आहे.

कुणालाही बांगलादेशात पाठविले जाणार नाही अशी ग्वाही भारताने दिली आहे. तरीही बांगलादेशीयांना भारताच्या वागणुकीबद्दल संशय आहेच. बांगलादेशातील नागरीकांमध्ये खदखदत असलेल्या या असंतोषाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, कारण येत्या काळात दोन्ही देशांमधील संबंधांवर याचा अनिष्ट परिणाम होईल.

बांगलादेशासोबत दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध असणे हे पूर्वेकडील व सर्वच शेजारी देशांना प्राधान्य देण्याच्या भारताच्या धोरणाशी सुसंगतच आहे. केवळ याकरताच नव्हे तर, ईशान्य भारतात शांती व स्थैर्य नांदावे याकरताही ते महत्त्वाचे आहे. Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation (BIMSTEC) आणि Bangladesh, Bhutan, India and Nepal (BBIN) इत्यादी क्षेत्रीय / उप-क्षेत्रीय उपक्रमांच्या उभारणीतही बांगलादेशाने भारताला उत्तम सहकार्य केले आहे.

भारताच्या ईशान्य भागात जाण्याकरता बांगलादेशमार्गे जाता येणे सुकर आहे. तसेच, ईशान्य भारतात शांती प्रस्थापित होण्याकरता बांगलादेशाचे योगदानही महत्त्वाचे असणार आहे. ईशान्य भारतात गेली कित्येक दशके फुटीरतावाद्यांच्या कारवाया जोमाने चालू होत्या, मात्र गेल्या काही काळात बांगलादेशाने केलेल्या सहकार्यामुळे हा भाग आता बराच शांत झाला आहे. २००९ मध्ये सत्तेवर आल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशात राहून भारतविरोधी कारवाया करणार्या फुटीरतावादी गटांवर कठोर कारवाई केली. या कारवाईमुळेच उल्फाचा अध्यक्ष अरबिंद राजखोवा किंवा बोडो फुटीरतावाद्यांचा नेता रंजन दायमारी यांसारख्यांना अटक करणे भारताला शक्य झाले.

आज जगभरात जागतिकीकरणाला आवाहन दिले जात आहे. स्वत:च्या हितांना प्राधान्य देण्याला अग्रक्रम दिला जात आहे. राजकीय-आर्थिक समीकरणं बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत बांगलादेश संबंध सखोल होत जाणे भारताकरता आवश्यक होत चालले आहे. याचे परीणाम टाळण्याकरता क्षेत्रीय संबंध अधिकाधिक बळकट असणे गरजेचे आहे. आज बांगलादेशात आर्थिक सुबत्ता वाढते आहे. तेथील अर्थव्यवस्था वार्षिक ८% दराने वाढत आहे आणि आज जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे, क्षेत्रीय संदर्भात बांगलादेशासोबतची मैत्री अतिशय महत्त्वाची आहे.

या दौऱ्याचे मूल्यमापन शेख हसीनांच्या चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच करावे लागेल. चीनच्या दौऱ्याचे कुठलेही ठोस फलित अद्याप दिसून यायचे असले तरीही, त्या दौऱ्याबाबत बांगलादेशीयांना काही खटकलेही नव्हते. चीन हुशार आहे, त्याच्या वागणुकीत दिखाऊपणा आहे. उदा. २०१६ मध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बांगलादेश दौऱ्यात २८ अब्ज डॉलरच्या आर्थिक सहाय्याचा करार झाला होता, त्या अंतर्गत चीनने २ अब्ज डॉलर इतकं कर्ज मंजूर केले. चीनने बांगलादेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्याही जाहीर केल्या आहेत.

बांगलादेशात कोणत्याही नेत्याच्या भारत दौऱ्याचे मूल्यमापन नफातोट्याच्या चष्म्यातूनच केले जाते. त्यामुळे, अशा वेळी केलेली एखादी कृती निव्वळ दिखाऊ जरी असली तरी ती महत्त्वाची ठरते आणि संबंधांना मारक ठरणाऱ्या शक्तींच्या अपप्रचाराला आळा घालण्याचेही काम करते. बांगलादेशातील अंतर्गत राजकारणातही भारताशी संबंध कसे असावेत यावरून दोन तट आहेत हे ही लक्षात घेतले पाहीजे. अवामी लीग भारतधार्जिणी आहे असा आरोप लीगचे राजकीय विरोधक करत असतातच. त्यामुळे, अशा काही घटनांमुळे त्यांना भारतविरोधी वातावरण तयार करण्याची संधी मिळते.

द्विपक्षीय संबंधांना अनेक गुंतागुंतीचे पदर आहेत. तरीही या संबंधांची जोपासना करणे गरजेचे आहे. संबंध दृढ करण्याची व हा प्रवास अधिकाधिक सुकर करण्याची इच्छा दोन्हीही देशांना आहे हेच या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकवार स्पष्ट झाले. आजवरच्या अनुभवाने हेच म्हणावेसे वाटते की, जनसामान्यांच्या मनात सकारात्मक चित्र उमटत राहील या दिशेनेच प्रयत्न सातत्याने होत राहाणे हितकारक ठरेल.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.