Author : Kabir Taneja

Published on Jul 06, 2021 Commentaries 0 Hours ago

भंगार आणि डक्ट-टेपपासून तयार केलेल्या आणि स्फोटके वाहून नेणाऱ्या ड्रोन्सनी लाखो डॉलर किमतीच्या भारतीय विमानांचे प्रचंड नुकसान केले.

दहशतवादाचा बदलता चेहरा : क्रूड ड्रोन्स

भारतीय हवाई दलाच्या जम्मू तळावर नुकताच ड्रोन हल्ला झाला. त्याचे बरेच पडसाद उमटले. भारत-पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या १४ किमी अंतरावर असलेल्या या तळावर झालेल्या या ड्रोन हल्ल्यात क्रूड ड्रोन्सचा वापर करण्यात आला. भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला चढविण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर झाल्याने लष्करी ठाण्यांना असलेला दहशतवादी हल्ल्यांचा धोका आणखीनच वाढला आहे. या नव्या प्रकारामुळे जम्मू-काश्मीरमध्येही अराजक माजवण्यासाठी सीमेपल्याडच्या दहशतवादी संघटनांकडे एक नवे शस्त्र हाती लागले आहे.

सीरिया युद्धात रशियाकडून लाटकियाजवळील हेमेमिम या हवाई दलाच्या तळाचा सर्रास वापर होत होता. याच तळावर २०१८ मध्ये ड्रोन्सच्या साह्याने जोरदार हल्ला चढवण्यात आला. तेव्हाच या तंत्रज्ञानाची झलक जगाला पहायला मिळाली. अमेरिकेने दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एमक्यू-९ रीपर या ड्रोनसदृश तंत्रज्ञानाचा वापर अशाच प्रकारे केला होता. आता हेच तंत्रज्ञान दहशतवादी संघटनांच्या हाती लागले आहे.

जम्मूमध्येही हेमेमिमसारखाच हल्ला झाला. सीरियाच्या हवाई तळावर ठेवलेल्या रशियन जेट्स व इतर महत्त्वाच्या युद्धसामग्रीचे ड्रोन हल्ल्याने बरेच नुकसान झाले होते. रशियाने सारवासारव करताना लघुपल्ल्याची विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि रेडिओ जॅमर्स वापरून हा हल्ला निकामी केल्याचा दावा त्यावेळी केला होता. मात्र, त्या ड्रोन हल्ल्याने रशियाची व्हायची तेवढी नाचक्की झाली होती. तथापि, भंगार आणि डक्ट-टेपपासून तयार केलेल्या आणि स्फोटके (आयईडी) वाहून नेणाऱ्या ड्रोन्सनी लाखो डॉलर किमतीच्या विमानांचे प्रचंड नुकसान केले, ही वस्तुस्थिती असून संरक्षणविषयक धोरण आखणाऱ्यांपुढे नवे आव्हान उभे केले आहे.

दहशतवाद्यांच्या आणि दहशतवादी संघटनांच्या हाती ड्रोन तंत्रज्ञान पोहोचण्याचा इतिहास फार लांबचा नाही. २०१३ ते २०१५ या कालावधीत जेव्हा इस्लामिक स्टेट (आयएस) ही दहशतवादी संघटना सीरियामध्ये माथेफिरू जिहादींची भरती करत होती तेव्हा युरोप आणि त्या पलीकडच्या प्रदेशातून आलेल्या धर्मवेड्या तरुणांच्या मनात आयसिसची स्वत:ची हवाई दल यंत्रणा असावी, अशी योजना घोळत होती. योजनेला आकार देण्यासाठी मग या तरुणांनी सीरिया आणि इराकमधील युद्धाने उदध्वस्त झालेल्या ठिकाणांवरून भंगार गोळा करून ते परस्परांना जोडत त्यांना क्वाडकॉप्टर्सची जोड देत स्फोटके वाहून नेऊ शकतील, अशा ड्रोन्सची निर्मिती करण्यात यश मिळवले.

आयसिसच्या कारवायांना वेग आला तेव्हा एरवी चित्रिकरणासाठी वा खेळासाठी वापरल्या जाणाऱ्या क्वाडकॉप्टर्सची तस्करी सीरिया आणि इराकमध्ये होऊ लागली. क्वाडकॉप्टर युरोपातील इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळणाऱ्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असते. वस्तुत: कॉन्फ्लिक्ट आर्मामेंट रिसर्चच्या मतानुसार ऑगस्ट, २०१६ मध्ये भारतात खरेदी केलेला ड्रोन त्याच वर्षी ब्रिटनमध्ये सक्रिय करण्यात आला.

तोच ड्रोन इराकच्या उत्तरेला मोसुल या आयसिसच्या बालेकिल्ल्यापासून काही मैलांच्या अंतरावरच असलेल्या ताल येथे सापडला. त्याच वर्षी आयसिसने त्यांच्याकडे असलेल्या ड्रोन तुकडीच्या साह्याने आठवडाभरात ३९ इराकी सैनिकांना जखमी तरी केले किंवा ठार तरी मारले, असे जाहीर केले. या ड्रोन हल्ल्यांचे चित्रिकरण करून त्यांचा आपल्या ऑनलाइन प्रचारासाठी आयसिसने पूरेपूर वापर केला.

मात्र, ड्रोन हल्ल्यांमागील यशस्वीतेच्या सरासरीची उकल करताना मतमतांतरे आहेत. अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात गेल्या वर्षी नागोर्नो-काराबाख या प्रांतावरून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी तुर्कीने तयार केलेल्या बायराक्तार टीबी२ या ड्रोन्सचा वापर अझरबैजानच्या लष्कराने केला. त्यातून युद्धामध्ये ड्रोन्सचा वापर किती उपयुक्त ठरू शकतो, याची खात्री पटली. मात्र, अझरबैजान-अर्मेनिया युद्धातील ड्रोन वापराची तुलना जम्मूतील घटनेशी केली जाऊ शकत नाही. अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यातील युद्ध पारंपरिक होते, दोन देशांमधील होते. बायराक्तार ड्रोन हे लष्करी वापरासाठी तयार करण्यात आले आहेत. ते काही क्रूड ड्रोन्स नव्हते. यावर भारतात बराच खल सुरू आहे. त्यात तथ्य किती याचा उहापोह होणे गरजेचे आहे.

क्रूड ड्रोन्सचा वापर गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. २०१९ मधील काही अहवालांमध्ये नक्षलावाद्यांनीसुद्धा छत्तीसगडमधील बस्तर परिसरातील निमलष्करी दलांच्या तळांची टेहळणी करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचे नमूद आहे. येमेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियातील तेलविहिरींवरही ड्रोन हल्ला झाला. तसेच २०१८ मध्ये निकोलस मादुरो या व्हेनेझुएलाच्या नेत्यावरील हल्ल्यासाठीही ड्रोनचा वापर करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाचा प्रसार नागरी की लष्करी वापरासाठी करायचा, किंवा यात समतोल कसा साधायचा, हे आता आव्हानात्मक होत चालले आहे.

क्रूड ड्रोन्ससारख्या असममित युद्धतंत्राच्या वापराचा धोका भारताला नवा नाही. उलटपक्षी भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांनी डिसेंबर, २०२० मध्येच ड्रोन्सद्वारे हवाई हल्ला होण्याचा धोका भारताला असल्याचे सूचित केले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यांचा धोका ओळखून त्याला प्रतिसाद देण्याबरोबरच त्यापासून बचाव करण्याच्या मुद्द्यावर ठोस असा विचार आधीच झालेला असावा. जम्मूत झालेला ड्रोन हल्ला हा या तंत्रवापराच्या धोक्याची आठवण करून देणारा असून तो केवळ लष्कर किंवा राज्यापुरताच मर्यादित नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Kabir Taneja

Kabir Taneja

Kabir Taneja is a Fellow with Strategic Studies programme. His research focuses on Indias relations with West Asia specifically looking at the domestic political dynamics ...

Read More +