-
CENTRES
Progammes & Centres
Location
चीनच्या अध्यक्षांनी सीसीपीच्या शतक महोत्सवी सोहळ्यात, चीनच्या ‘महान पोलादी भिंती’ला टक्कर न देण्याचा इशारा जगाला दिला.
चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला (सीसीपी) १ जुलै रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. या मुहूर्तावर अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हस्ते शतक महोत्सवी सोहळ्याला सुरुवात झाली. सीसीपीच्या या शतकपूर्ती सोहळ्यात सहभागी झालेले ७०,००० सदस्य एकत्र येऊन उत्साहात गात होते, नाचत होते, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत होते. यातून संपूर्ण देशात उत्साहाचा संचार झाल्याचे दिसून आले. यातून पक्ष, देश आणि देशवासीय हे सर्व एकसंघ असून मजबूत आणि लवचीक असल्याचा संदेश चिनी नेतृत्वाला जगाला द्यायचा होता.
तथापि, अध्यक्ष जिनपिंग यांनी यावेळी केलेल्या भाषणात जगाला इशारा देताना चीनच्या ‘महान पोलादी भिंती’ला टक्कर देण्याचा विचार कोणी करू नये, असा इशारा शत्रूराष्ट्रांना दिला. त्यातून या देशात कशाचे मंथन सुरू आहे आणि सीसीपीला बाह्यशक्तींपासून, विशेषत: अमेरिका आणि इतर शत्रूराष्ट्रांकडून, कोणती आव्हाने आहेत, याचा उहापोह झाला.
जगातील इतर देशांच्या तुलनेत चीनला कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवता आले. तसेच महासाथीच्या संपूर्ण काळात चीनच्या अर्थव्यवस्थेची वाटचालही चांगली झाली. हाँगकाँगमधील स्थितीची हाताळणी, उईगिर मुस्लिमांवर केलेले अत्याचार आणि करोनाची जगापासून लपवून ठेवलेली माहिती या सर्व कारणांमुळे अध्यक्ष शी यांची राजवट जगभरात अप्रिय आणि तुसडी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. युनायटेड फ्रण्ट वर्क डिपार्टमेंट (यूएफडब्ल्यूडी) या आपल्या प्रोपगंडा शाखेतर्फे कम्युनिस्ट पक्षाने संशयास्पद वाटतील असे उपक्रम राबविल्याने जगभरात पक्षाच्या हेतूविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
कम्युनिस्ट पक्षाची चीनमध्ये एकहाती सत्ता आहे. तरी शतकपूर्ती महोत्सव ही काही लहानसहान कामगिरी नक्कीच नाही. एखादा पक्ष देशावर, देशवासियांवर, राजवटीवर किती प्रदीर्घ काळ घट्ट पकड घेऊ शकतो, हेच यातून अधोरेखित होते. चिनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना शांघायमध्ये १९२१ साली १३ जणांच्या उपस्थितीत झाली. त्यात माओ झेडाँग यांचाही समावेश होता. कम्युनिस्ट पक्षाला सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. ‘लाँग मार्च’मुळे कम्युनिस्ट पक्षाला १९४९ मध्ये सत्ता हस्तगत करता आली.
राष्ट्रवादी शक्तींना पक्षाने पराभूत केले. मात्र, सत्ता हस्तगत करण्यासाठी पक्षाने सुरू केलेली रक्तरंजित क्रांती दीर्घकाळपर्यंत पक्षाबरोबर राहिली. त्यातून त्यांच्या राजकीय धोरणाची आखणी झाली आणि इतर देशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित झाला. पक्षाने लांब उडी, सांस्कृतिक क्रांती अशा अचाट उपक्रमांची आखणी केली. ती तितक्याच क्रूरपणे राबवली. त्यामुळे लक्षावधी चिनी नागरिकांना प्राणास मुकावे लागले.
मात्र, माओंनी केलेल्या घोडचुकांमधून धडे घेत त्या तातडीने सुधारण्याची चपळाई कम्युनिस्ट पक्षाने दाखवली. कम्युनिस्ट पक्षाने पक्षांतर्गत तसेच देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर सुधारणा हाती घेतल्या. त्यातच डेंग शिआओपिंग यांच्या रूपाने पक्षाला एक सक्षम नेतृत्व लाभले. डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचा कायापालट झाला. अर्थव्यवस्था जोमाने धावू लागली. डेंग यांनी पक्षाला गर्तेतून खेचून काढत एका उंचीवर नेऊन ठेवले. चीनमध्ये या कालावधीला ‘दुसरी क्रांती’ असे संबोधले जाते. डेंग यांनी आर्थिक सुधारणा प्रचंड वेगाने राबवल्या.
‘देशी भांडवलाच्या प्रारूपा’वर आधारित मुक्त व्यापार धोरण राबवले. त्यातून चीनने जगाला थक्क करणारी आर्थिक प्रगती साधली. अवघ्या चार दशकांत चीनचा गरीब देश ते जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असा बदल झाला. विकासाच्या वाटा चौखूर पसरल्याने चीनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी आणि मध्यमवर्ग उदयाला आला. देशातील ८० कोटी जनता दारिद्र्यरेषेखालून वर आली. त्यामुळे माओंच्या युगात तिरस्कारासाठी पात्र ठरलेला कम्युनिस्ट पक्ष लोकांच्या गळ्यातील ताईत बनला.
तरीही मुक्तधोरण आणि सार्वकालिक उच्च प्रगतीच्या कालखंडात डेंग ते हू जिंताओ यांच्यापर्यंतच्या नेतृत्वाने कम्युनिस्ट पक्षाला मुक्त ध्येयधोरणे राबविण्याचे स्वातंत्र्य बहाल केले. तसेच आपल्या विचारधारेवर आधारलेल्या प्रकल्पांना कमी महत्त्व देऊन विकास साधण्याच्या कार्यक्रमाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळे राजकीय आदर्शवादाचा घट्ट पीळ कमी होण्यास मदत झाली. पाश्चिमात्य देशांनाही कम्युनिस्ट पक्षाची भुरळ पडली. साम्यवादी चीन लोकशाहीकडे वळविल्याचे विश्लेषण त्यावेळी अनेकांनी केले.
तथापि,शी जिनपिंग यांनी २०१२ मध्ये पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राजकीय उदारीकरण औटघटकेचे ठरले. पक्षाची धुरा हाती आल्यानंतर जिनपिंग यांनी डेंग शाओपिंग यांचे ‘तुमची शक्ती लपवा आणि तुमच्या वेळेचा आदर करा’ हे तत्त्व बासनात ठेवत पक्ष आणि पक्षाच्या सदस्यांना राष्ट्रीयत्वाच्या मार्गावर चालण्याचे आदेश दिले.
उदाहरणार्थ २०१७ मध्ये जिनपिंग यांनी चीनने आता जगाचे नेतृत्व करण्याची आणि आपले एकमेवाद्वितीय असे आर्थिक प्रारूप जगाला दर्शवण्याची वेळ आली असल्याचे सांगत लोकांना प्रोत्साहित केले. ते म्हणाले, ‘चिनी वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या भरभराटीच्या समाजवादी आर्थिक प्रारूपाने जगाला एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे’. माजी प्राध्यापक आणि कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय प्रशिक्षण उपक्रमाचे माजी अध्यक्ष कै क्षिया यांच्या मते जिनपिंग यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी पक्षात निदान काही प्रमाणात स्वायत्तता तरी होती. मात्र, जिनपिंग यांच्या येण्याने तीही नाहिशी झाली.
पूर्वीचे नेते काही अंशी उदारमतवादी होते. पक्षाच्या इतिहासात माओ आणि डेंग यांच्यानंतरचा सर्वात शक्तिशाली नेता म्हणून आपली गणना होईल, या दृष्टीने जिनपिंग यांनी अतिशय पद्धतशीरपणे पक्षात आपले महत्त्व वाढवले. आपल्या मार्गात येणाऱ्या किंवा येऊ शकणाऱ्या हितशत्रूंचा जिनपिंग यांनी व्यवस्थित बंदोबस्त केला. त्यांचे पक्षातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे ठरेल.
२०१७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या १९व्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेत ‘जिनपिंग यांना डेंग शिआओपिंग यांच्यानंतरचा सर्वात शक्तिशाली नेता’, असे घोषित करण्यात आले आणि ‘नवपर्वासाठी चिनी गुणवैशिष्ट्ये असलेले शी जिनपिंग यांचे समाजवादावरील विचार’ पक्षाने मखरात बसवले. जिनपिंग यांनी आपले अध्यक्षपद चिरंतन काळापर्यंत रहावे यासाठी दोनदाच अध्यक्षपदाची पक्षीय घटनेतील तरतूद २०१८ साली रद्दबातल ठरवली, हा चीन आणि चीनच्या अभ्यासकांसाठी सर्वात मोठा धक्का होता.
अशा प्रकारे शी जिनपिंग यांनी जियांग झेमिन आणि हू जिंताओ यांच्या कार्यकाळात फोफावलेल्या सामूहिक नेतृत्वाच्या फांद्या छाटून टाकल्या. माओंच्या प्रदीर्घ कालावधीदरम्यान एककल्ली कारभार खूपच बोकाळला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सामूहिक नेतृत्वाला बळ देण्याचा डेंग यांचा प्रयत्न होता. पक्ष आणि सरकार या दोघांनाही त्यांनी जाणीवपूर्वक वेगळे ठेवले होते. पक्ष आणि देश यांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी शी जिनपिंग यांनी प्रखर राष्ट्रवाद आणि सामूहिक चिंतन ही दोन तत्त्वे शिताफीने राबवली.
शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने आपल्या हितशत्रूंना काबूत ठेवण्यासाठी तसेच पीपल्स लिबरेशन आर्मीसारख्या (पीएलए) महत्त्वाच्या संस्थांवर वरचष्मा ठेवण्यासाठी सातत्याने बाह्यशक्तींच्या धोकाभीतीचा (उदा : हाँगकाँग आणि शिंकियांग) किंवा चीनच्या भरभराटीवर जळणाऱ्या शत्रूंचा बागुलबुवा उभा केला. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षात अमूलाग्र बदल झाला आणि मार्क्सवाद व लेनिनवादावर अधिक भर देण्यात आला, जो कालौघात मागे पडला होता. कारण चीन जगभरात आर्थिक शक्ती म्हणून झपाट्याने उदयास येत होता. शी जिनपिंग यांच्या राजवटीत पक्षाची जरब सत्तेबरोबरच खासगी संस्थांपर्यंतही विस्तारित केली.
चिनी नेतृत्वाने जवळपास दशकभर आर्थिक संपन्नतेवर लक्ष केंद्रित केले. शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात त्यास अधिक वेग आला. जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने आपला प्रभाव वाढविण्याचा निर्धार केला. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील शेजारी देशांमधील अंतर्गत मुद्द्यांवर हस्तक्षेप करायला कम्युनिस्ट पक्ष अजिबात हयगय करत नाही. आणि हे सर्व अगदी पद्धतशीरपणे आणि विविध मार्गांनी केले जाते. खासगी कंपन्याही कम्युनिस्ट पक्षाच्या हस्तक्षेपापासून नामानिराळ्या नाहीत.
पक्षाचे समिती सदस्य या कंपन्यांच्या ध्येयधोरण ठरवणाऱ्या मंडळांमध्येही सदस्य म्हणून उपस्थित असतात. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात पक्षाला परदेशात आपला प्रभाव वाढविण्यासाठी देशातील आर्थिक स्रोत मुक्तपणे (अंदाजे दरसाल १० अब्ज डॉलर ) वापरण्याची मुभा आहे. तसेच जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे अडगळीत गेलेल्या युनायटेड फ्रण्ट वर्क डिपार्टमेंटचे (यूएफडब्ल्यूडी) झालेले पुनरुज्जीवन. परदेशात कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी या विभागाचा पूरेपूर वापर करून घेण्यात येत आहे. चीनचे अभ्यासक त्यास ‘जादूई शस्त्र’ असे संबोधतात. ही मोहीम अधिक जोमाने राबविण्यासाठी जिनपिंग यांनी युनायटेड फ्रण्टला पक्षाची विदेशी संबंधांची शाखा म्हणून मान्यता देऊन टाकली.
अनेक घटनांमध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोप इत्यादी ठिकाणी झालेल्या चिनी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यक्रमांना युनायटेड फ्रण्टने निधीचा पुरवठा केल्याचे निदर्शनास आले. अखेरीस कम्युनिस्ट पक्ष आणि युनायटेड फ्रण्ट यांचा निधी नवसंकल्पना राबविणाऱ्या संस्था, प्रभावशील असलेले विचारवंत आणि आघाडीच्या विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, वर्तमानपत्रे आणि इतर संबंधित माध्यमे यांच्यापर्यंत पोहोचता केला जाऊ लागला. कम्युनिस्ट पक्ष आणि युनायटेड फ्रण्ट यांनी चालवेल्या या उपक्रमांतून चांगले यश मिळू लागले.
अलीकडच्या वर्षांत चीनचा सर्वाधिक प्रभाव पडलेल्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया (राजकीय देणग्या देऊन प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न), न्यूझीलंड आणि अमेरिका यांचा क्रमांक वरचा आहे. अमेरिकेत तर हा प्रभाव एवढा वाढला की तत्कालीन ट्रम्प प्रशासनाला कन्फुशिअस केंद्रांवर कारवाई करावी लागली. त्यांच्यावर वैचारिक स्वैराचार फैलावणे आणि हेरगिरी करणे, हे आरोप लगावण्यात आले. या प्रभावक्षेत्र निर्माण करण्याबरोबरच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हसारखे महा भूराजकीय प्रकल्पांच्या माध्यमातूनही कम्युनिस्ट पक्ष आणि चीन यांनी आपला दरारा वाढविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
अंतिमत: सात दशके सत्तेत राहिल्यावर तसेच पूर्वाश्रमीच्या गरीब देशाला अनोखी अशी आर्थिक सुबत्ता प्राप्त करून दिल्यावर पूर्वाश्रमीच्या नेत्यांचा व्यावहारिक द्रष्टेपणा कौतुकाला पात्र आहे. हाच कम्युनिस्ट पक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली कट्टरतावादी आणि प्रखर राष्ट्रवादी झाला आहे. पक्षाची वाढती मक्तेदारी आणि दादागिरी व वाढता प्रभाव तसेच कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पक्षाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
थोडक्यात, यशस्वी कम्युनिस्ट पक्ष ज्याने अशक्य आणि मागास देश असलेल्या चीनचा अल्पावधीत अमूलाग्र बदल घडवून आणला आणि आर्थिक व तांत्रिक महाशक्ती बनवले, हाच देश आता शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात वेगळे वळण घेत असल्याचे दिसून येत आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Niranjan Sahoo, PhD, is a Senior Fellow with ORF’s Governance and Politics Initiative. With years of expertise in governance and public policy, he now anchors ...
Read More +