Published on Dec 28, 2020 Commentaries 0 Hours ago

सद्यस्थितीतील शहरांची आणि वाढत्या प्रदुषणाची स्थिती पाहता, आगामी काळात उभी(व्हर्टीकल) जंगले आणि इतर हरित संरचना या अनिवार्य आहेत.

मुंबईच्या पर्यावरणासाठी हवी उभी जंगले

अलीकडे बंगलोरमध्ये भारतातील पहिले उभ्या संरचनेचे जंगल उभारले गेले. अर्थात हा प्रवास हिरवळीने वेढलेल्या शहरांकडे घेऊन जाणारा आहे. परंतु यात एक प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे मुंबई, दिल्ली सारख्या अधिक प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये ही संकल्पना आतापर्यंत का राबवली गेली नाही? या शहरांमधील पर्यावरणीय समस्यांसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही भारतामधील आधुनिक मेट्रो शहरांपैकी एक आहे. परंतु मुंबईला प्रदूषण आणि अतिदाट लोकवस्ती या समस्यांनी ग्रासलेले आहे. मुंबईतील जागेची उपलब्धता पाहता, उंच आणि टोलेजंग इमारतींची गरज अधोरेखित झाली आहे. हीच गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने मुंबईने उभ्या (व्हर्टीकल) बांधकामांचा ट्रेंड विकसित झाला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईत गगनचुंबी इमारती बहुसंख्येने उभ्या राहात आहेत. जगभरातीत अनेक शहरांसमोर पूर्वनियोजनाचा अभाव असलेले बांधकाम हे महत्वाचे आव्हान आहे.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असेलल्या पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबईचा समावेश होतो. शहरातील वाढत जाण्यार्‍या लोकसंख्येची गरज नीती रचनाकारांनी लक्षात घेत असतानाच शहर नियोजकांनी शाश्वत विकासाची मुल्ये विसरता कामा नये. या लेखामध्ये मुंबईच्या विकास कामांमध्ये हिरवळीसह हरित पायाभूत सुविधा वाढीस लागण्यासाठी- उभी जंगले हा पर्याय होऊ शकतो, हा मुद्दा अधोरेखित केला  आहे.

इटलीतल्या मिलान या शहरामध्ये २०१४ साली पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून उभी(व्हर्टीकल) जंगल व्यवस्था उदयाला आली. उभी(व्हर्टीकल) जंगले किंवा ज्याला इटालियन भाषेत बॉस्को वर्टीकल असे म्हटले जाते या व्यवस्थेत दोन निवासी गगनचुंबी इमारतींमध्ये ९०० झाडे, १०,००० रोपे आणि काही झुडपे लावली जातात. मानव आणि इतर प्रजातींच्या सहजीवनासाठी उभ्या (व्हर्टीकल) जंगलांमार्फत शहरात पुनर्वनीकरण केले जाते. जगातील विविध शहरांना हवामान बदलाचा आणि वाढत्या प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. अशा शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जैवविविधता वाढीस लागण्यासाठी या व्हर्टीकल जंगलांना अल्पावधीतच जगभरातून लोकमान्यता मिळाली आहे. नानजिंग, सिंगापूर आणि सिडनी ही शहरे त्यांच्या हरित स्थापत्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

१९७२ ते २०११ या काळात मुंबईमध्ये बिल्टअप एरियाच्या दृष्टिकोनातून बरेच बदल झाले. मुंबईत वाढत्या लोंढ्यांना सामावून घेण्यासाठी निवासी, शैक्षणिक, औद्योगिक संकुलांमध्ये वाढीव चटई क्षेत्र २३४ चौरस किमी पासून १,०५६ चौरस किमी पर्यंत वाढलेला आहे. मुंबईच्या आजूबाजूचाही प्रदेश विकसित झालेला आहे. परंतु यात मात्र पर्यावरणाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

वेगवेगळ्या हिरवळीच्या जागा या विकासकामात नष्ट झाल्या आहेत. काही संशोधनांमधून असे दिसून आले आहे की मुंबईतील हरित पट्टा कमी होत चालला आहे. मुंबईच्या एकूण क्षेत्रापैकी ४६.७ टक्के जागा १९८८ मध्ये हिरवळीने व्यापलेली होती. ती टक्केवारी २०१८ रोजी २६.६७ टक्के इतकी कमी झाली आहे.  याचा थेट परिणाम शहराचे तापमान वाढण्यावर झालेला आहे. वेळीच जागतिक तापमान वाढीला आळा घातला नाही तर जमिनीचे तापमान असेच वाढत जाईल आणि वाढते प्रदूषण व वारंवार येणार्‍या उष्णतेच्या लाटा यांचे दूरगामी परिणाम जैवविविधतेवर होतील.

समुद्राची वाढती पातळी, वारंवार येणारे पूर, वाढते प्रदूषण आणि वाढती लोकसंख्या यांमुळे विकास योजनांमध्ये शाश्वत विकास समाविष्ट करणे अत्यावश्यक झाले आहे. शहरांपुढील समस्यांवर उभी (व्हर्टीकल)जंगले हा एक महत्वाचा पर्याय ठरू शकतो. उभी(व्हर्टीकल) जंगले वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. परिणामी वातावरणातील ऊर्जा कार्यक्षमता आणि ऑक्सिजनच्या प्रमाण वाढ होते. शहरांतील ज्या भागांना प्रदूषणाचा सर्वात जास्त धोका आहे तिथे अशी जंगले उभारणे पर्यावरणाच्या दृष्टीने सोयीचे आहे.

उदाहरणार्थ, मिलान शहरात ही जंगले उभारल्यानंतर असे लक्षात आले की, शहराची हवामान पातळी सुधारली आहे, जैवविविधता वाढीस लागली आहे आणि जमिनीच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. चीनमधील नानजिंग या शहरात दरवर्षाला २५ टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेणे  व ६० किलो ऑक्सिजन दर दिवसाला मिळवण्याच्या दृष्टीने हरित टॉवर्सची निर्मिती करण्यात आली आहे. 

जगात दरवर्षाला नैसर्गिक आपत्तींची तीव्रता आणि वारंवारता वाढत आहे. या दृष्टीने शाश्वत शहरी जंगलांचा विचार अत्यंत निकडीचा आहे. जंगलांचे अनेक फायदे आहेत. शहरांमध्ये रस्त्यांच्या कडेला लावलेली झाडेसुद्धा हवेचे प्रदूषण कमी करण्यात योगदान देतात. सुदैवाने आजही मुंबईचा बराच भाग जंगलांनी व्यापलेला आहे. विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींचे आश्रयस्थान असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरेचे जंगल ही मुंबईची फुप्फुसे आहेत. असे असले तरी मुंबईच्या हवामानाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईची हरित व्हर्टीकल जंगले आणि हरित पट्ट्यांची गरज पुन्हा समोर आली आहे.

निसर्गात जंगले वाढण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागतो आणि ही जंगले संपूर्ण नष्ट करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधीही पुरेसा ठरतो. निर्वनीकरणाचा परिणाम हवा, पाणी आणि मातीच्या गुणवत्तेवर होतो. बांधकामासाठी आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जंगलतोड करणे आणि त्याची भरपाई म्हणून दुसर्‍या ठिकाणी झाडे लावणे यामुळे पर्यावरणाची हानी भरून येत नाही. झाडे लावणे आणि वाढवणे यात बराच कालावधी जातो त्यामुळे ही  पर्यावरणाची भरून न येणारी हानी आहे. आरेचे जंगल हे आरक्षित वनक्षेत्र आहे हे घोषित झाल्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी काही प्रमाणात टळली आहे.

२०१५ मध्ये मुंबईत शहर नियोजकांनी उभ्या(व्हर्टीकल) जंगलांचा विषय चर्चिला होता. परंतु या संकल्पनेतील काही त्रूटींमुळे हा विषय गांभीर्याने घेतला गेला नाही. सध्या ज्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रकल्प चालू आहेत त्यांचे मुंबईच्या पर्यावरणावर नक्कीच दूरगामी परिणाम होत आहेत. २०२० मध्ये ५३ गगनचुंबी इमारतींसह मुंबई जगातील सर्वाधिक गगनचुंबी इमारती असणार्‍या २५ शहरांमध्ये गणली गेली आहे . लहान मोठ्या निवासी संकुलांच्या निर्मितीसोबत ४४ अधिक गगनचुंबी इमारतींचे बांधकाम सध्याच्या घडीला मुंबईत चालू आहे.

ज्या ज्या देशात उभ्या(व्हर्टीकल) जंगलांची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. त्या त्या देशात विविध प्रयोग करून या प्रकल्पांमध्ये काय बदल करता येतील याचा अभ्यास चालू आहे. शहर नियोजनात रचनाकारांनी इतर देशांनी केलेल्या चूका टाळल्या पाहिजेत. शहराच्या भौगोलिक स्थितीनुसार प्रकल्पांमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. मुंबईतील ढासळते हवामान आणि भविष्यातील संकटांना डोळ्यासमोर ठेऊन प्रकल्पाचा खर्च आणि त्यातून मिळणारे लाभ यांचे विश्लेषण होणे गरजेचे आहे.

विकासकामांचा विचार करत असताना सरकारने या विकासकामांचे पर्यावरणीय परिणाम सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. निसर्गाबाबतचा आदर प्रकल्पातून प्रतिबिंबीत व्हायला हवा. शहर नियोजन करताना आधीच्या चुकांमधून  शिकत नव्याने येणार्‍या आव्हानांना तोंड द्यायला हवे. उपलब्ध जंगले आणि हरित पट्टे संरक्षित करून नवीन हरित पट्टे निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सद्यस्थितीतील शहरांची स्थिती पाहता उभी(व्हर्टीकल) जंगले आणि इतर हरित संरचना या अनिवार्य आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.