देशातील बहुतांश शहरे महानगरांमध्ये आज साधारणतः एक कोटींच्या आसपास लोकसंख्या आहे. पुढील जनगणनेवेळी बेंगळुरू हे देखील महानगर बनल्याचे जाहीर होऊन ते मुंबई आणि दिल्ली या महानगरांच्या पंगतीत बसेल, याची खात्री आहे. केवळ बेंगळुरूचेच नाही, तर अनेक भारतीय शहरांची हीच स्थिती असून अनेक शहरे महानगरांच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. हे काही फार चांगले लक्षण नक्कीच नाही.
नुकताच कोरोनाचा आलेख घसरू लागला आहे. कोरोनाकाळ टीपेला असताना त्यात मोठ्या प्रमाणात महानगरेच भरडली गेल्याचे आपल्या निदर्शनास आले. अनेक महानगरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊन, तेथील आरोग्ययंत्रणांवर ताण आला. मुंबई आणि दिल्ली ही त्याची अगदी ताजी उदाहरणे. कोरोनाचा आलेख घसरणीला लागला असला तरी, अजून धोका पूर्णपणे टळलेला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महानगरांनी कोरोनाच्या फैलावासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले होते.
देशातील शहरीकरणाच्या या सर्व परिस्थितीमुळे दोन मोठे प्रश्न उपस्थित होतात – नगर विकासाच्या दृष्टिकोनातून महानगरे हे योग्य प्रारूप आहे का? त्यांच्या सकारात्मक बाबी नकारात्मतांवर मात करू शकतील का?
महानगरांच्या चमकधमकला, चकचकीतपणाला जे भूलतात किंवा त्याचे आकर्षण ज्यांना असते ते नक्कीच सकारात्मक दृष्टिकोनातून या प्रश्नांकडे पाहतील. त्यांच्या दृष्टीने महानगरांचे अर्थकारण, तेथील भव्य वास्तूरचना, कला आणि संस्कृती यांतील महानगरांचे योगदान, महानगरातील नागरिकांची जीवनशैली, सर्व स्तरातील महिला आणि पुरूषांना आकर्षित करणारी या महानगरांची शक्ती, महानगरांमध्ये होणारी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि येथे होणारे संपत्तीनिर्माण या सर्व बाबी अधोरेखित करून सांगितल्या जातील. अर्थातच या सगळ्या सकारात्मक बाबी कोणीही नाकारू शकत नाही आणि लहान शहरांची तुलनाच महानगरांशी होऊ शकत नाही.
वर उल्लेखलेल्या सर्व सकारात्मक बाबींची जमेची बाजू असताना महानगरांना एक काळी बाजूही आहे, जिच्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. कोणत्याही आधुनिक लोकशाही पद्धतीत जर समानता हा कळीचा मुद्दा असेल तर या कसोटीत महानगरे सर्व बाजूंनी अपयशी ठरतात. महानगरांमध्ये असलेल्या झोपडपट्ट्या हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. महानगरांमध्ये असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये अठराविश्वे दारिद्र्य असते. वीज-पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची वानवा असते. अतिशय घनदाट जाळे असते झोपड्यांचे आणि त्यात अत्यंत दाटीवाटीने लोक रहात असतात. अतिशय गलिच्छ वातावरण असते. हे एक प्रकारचे शोषणच आहे. कारण शहरांकडून पुरवल्या जाणा-या श्रमिक आणि सेवांचा महानगरे स्वीकार करतात परंतु त्यांच्यासाठी चांगल्या सोयीसुविधा देण्यात महानगरे तोकडी पडतात.
महानगरांमध्ये राहण्यासाठी परवडू शकेल अशा जागा उपलब्ध नसतात. गावच्या तुलनेत शहरांमध्ये निवासाचा खर्च दुप्पट असतो. महानगरांमध्ये तर हा खर्च कैकपटींनी वाढतो. जमिनीची किंमत हा या खर्चाचा प्राथमिक घटक असतो. शहरे जसजशी विकसित होत जातात तसतशी तेथील लोकसंख्येची घनता वाढते आणि जमिनीच्या किमती आकाशाला भिडू लागतात. त्यामुळे परवडणा-या जमिनींची टंचाई वाढते. गरीब आणि निम्न मध्यमवर्ग मग अशा महानगरांपासून दुरावू लागतो. तो महानगरांपासून दूरच्या उपनगरांमध्ये राहण्यासाठी जातो.
महानगरांमध्ये पर्यावरण आणि सार्वजनिक खुल्या जागा यांचा श्वास कोंडला जातो. विविध स्रोतांतून निर्माण होणारे प्रदूषण वाढत जाते आणि बांधकामांचे प्रमाण जसे वाढते त्यामुळे अधिकाधिक उपक्रमांना सामावून घ्यावे लागत जाते आणि खुल्या जागा आक्रसू लागतात व त्यातून गुणवत्तापूर्ण जीवनाच्या शक्यता मावळायला लागतात. त्यातच महानगरांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती झपाट्याने बळावतात. संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अधिकाधिक संधी, लपून राहण्यासाठी मुबलक जागांची उपलब्धता आणि पकडले जाण्याची कमीतकमी शक्यता हे सर्व महानगरांमध्ये असल्यामुळे गुन्हेगारांना महानगरांचे अधिक आकर्षण असते.
आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महानगरे जलदगती जीवन उपलब्ध करून देतात, नोकरीची ठिकाणे घरापासून लांब असल्याने प्रवासाचा वेळ वाढतो आणि कामाच्या वेळाही विचित्र बनतात. त्यामुळे खाण्याच्या सवयी बदलतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम अर्थातच आरोग्यावर होतो. त्यातून स्थूलपणा वाढणे, मधुमेह आणि हायपरटेन्शन व मानसिक जार बळावू लागतात.
थोडक्यात महानगरे मोठ्या अर्थव्यवस्था निर्माण करत असल्या तरी समृद्ध-निरोगी जीवन जगण्याच्या सर्व शक्यता महानगरे फेटाळून लावतात. त्यामुळे स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास अशी शहरे जी विषम, न परवडणारी, पर्यावरणघातकी आणि रोगट जीवनशैली उपलब्ध करून देतात ती शाश्वत नसतात. या सर्वाचा उलटफेर करण्यासाठी एखादा शाश्वत मार्ग शोधून काढावा लागणार आहे.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.