Author : Harsh V. Pant

Published on May 27, 2019 Commentaries 0 Hours ago

ऐतिहासिक अशा प्रचंड जनादेशाने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसण्याची संधी मिळाली आहे. पण या जनादेशामुळे मोदींवरील जबाबदारीही कैकपटींनी वाढली आहे.

मोदींची दुसरी इनिंग्ज!

प्रचंड अशा जनादेशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. मोदींची सुप्त लाट देशात आहे, याची पुसटशीही कल्पना त्यांच्या विरोधकांना आली नाही, हे त्यांचे मोठेच अपयश म्हणावे लागेल. मोदींच्या या ऐतिहासिक यशामुळे त्यांच्या विरोधकांच्या राजकीय आकलनाच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत. मोदींच्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्या बुद्धिजीवींनाही या जनादेशाने तोंडावर आपटवले आहे. आपल्याच कोषात वावरणा-या या बुद्धिजीवींना प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, मतदारांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा ठाव घेण्यात आलेले अपयश उल्लेखनीय आहे.

भारतात झपाट्याने स्थित्यंतर घडून येऊ लागले आहे. त्याला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि लोकसंख्याशास्त्र यांची किनार आहे. ती दृष्टिपथास पडण्यात बुद्धिजीवी आणि राजकीय पंडित एकाचवेळी सपशेल अपयशी ठरल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालांतून स्पष्ट झाले आहे. त्या उलट मोदींनी देशातील मतदारांची नाडी चांगलीच ओळखली असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित झाले. मोदींचा करिश्मा असा की, प्रथमच मतदान करणा-या तरुण नवमतदारांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, कार्यशैलीची अशी काही छाप पडली की या तरुणाईला त्यांनी मतदान केंद्रापर्यंत अक्षरशः खेचून आणले! नवमतदारांनी मोदींना भरभरून मतदान केले.

गेल्या पाच वर्षांत समाजातील प्रत्येक घटकात मोदींची लोकप्रियता वाढत गेली. परंतु मोदीद्वेषाने अंध झालेल्या त्यांच्या टीकाकारांना मोदींची ही लोकप्रियात कधी लक्षात आलीच नाही. आली असेल तरीही टीकाकारांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नसेल. ‘मोदींनी पाच वर्षांत काहीच केले नाही’, हा मोदींच्या टीकाकारांचा लाडका आरोप. त्यांच्या मते मोदी म्हणजे सामाजिकदृष्ट्या प्रतिकूल, सांस्कृतिकदृष्ट्या असंघटित, आर्थिकदृष्ट्या निरक्षर आणि राजकीयदृष्ट्या ध्रुवीकरण करणारा नेता.

एवढेच नव्हे तर जागतिक पटलावर भारताचे स्थान मजबूत होत असल्याचे दृष्य पुरावे उपलब्ध असूनही मोदींच्या टीकाकारांनी त्याकडे हेतुतः डोळेझाक केली. उलटपक्षी मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे स्थान घटले, इतपत आरोप करण्यात मोदींच्या टीकाकारांची मजल गेली. आम्हा भारतीयांना राजकारणात, सत्तास्थानी नामदारांना पाहण्याची इतकी वर्षे सवय झाली आहे. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींची कामदार छबी अगदी विरोधाभासी ठरते. यावर कडी म्हणून की काय समस्त भारतीयांना जात आणि प्रादेशिकतेच्या मर्यादा झुगारून देऊन पुढे येण्याचे, स्वतःचा विकास साधण्याचे मोदी करत असलेले आवाहन अखिल भारतीयांना सुखावून जाते, त्यातून मोदींच्या जादुई करिष्म्याची महत्ता पटते.

गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी केलेल्या वैयक्तिक टीकेचा फायदा अखेरीस मोदींनाच झाला. किंबहुना विरोधकांनी केलेली टीका हीच मोदींची कवचकुंडले बनली. विरोधकांनी केलेल्या टीकेलाच मोदींनी आपले शस्त्र केले आणि त्याचे रुपांतर जनमताची महालाट आपल्याकडे वळवण्यात केले. मोदींच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रेरित झालेल्या नवमतदारांनी, तरुण भारतीयांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून भारतीय राजकारणात अभूतपूर्व ठरेल, असा जनादेश मोदींच्या पारड्यात टाकला. मोदींनी भारतीय जनता पक्षाचा पायाही त्या निमित्ताने विस्तारला. मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आता केवळ काही प्रदेशांपुरताच मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण भारतात एकछत्री अंमल करण्याइतपत भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला आहे. भाजपचा असा विस्तार होत असताना इतर राजकीय पक्ष मात्र आक्रसत चालले आहेत. त्यांच्यावर अस्तित्त्वाची लढाई लढण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी सुरुवातीच्या काही टप्प्यांतच शस्त्रे खाली टाकली. मुद्द्यांवर निवडणूक लढण्यापेक्षा निव्वळ मोदींना सत्तेपासून रोखण्यासाठी विविध पक्षांनी एकत्र येण्याचा पर्याय अधिक गांभीर्याने स्वीकारला. एकट्याने मोदींना पराभूत करणे अशक्य आहे, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी एकत्र येण्यावाचून पर्याय नाही, असे मोदीविरोधकांना सातत्याने वाटू लागले आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच सर्व विरोधकांनी गळ्यात गळे घालायला सुरुवात केली. त्यामुळे जनमानसांत गेलेला संदेश अर्थातच चुकीचा होता. निकालांमुळे मात्र विरोधकांचे सत्ताग्रहणाचे इमले पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट झाले. कडबोळ्याच्या सरकारापेक्षा आक्रमक आणि निर्णायक नेतृत्व केव्हाही चांगले, या सूज्ञ विचारांतूनच भारतीय मतदाराने विरोधकांना भुईसपाट केले, हेच खरे.

मोदींनी गेल्या पाच वर्षांत काही चुका नक्कीच केल्या परंतु एक गोष्ट खरी की, त्यांनी भारताला जागतिक स्तरावर एक नवी ओळख देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यातूनच नवमतदारांना प्रेरणा मिळाली. नवमतदारांना आक्रमक आणि निर्णायक नेतृत्वाचे आकर्षण असते. त्यांना ते मोदींच्या रुपाने प्राप्त झाले. स्वतंत्र भारतातील आजच्या तरुणाईची जगाकडे पाहण्याची दृष्टी उदारमतवादी आहे.

आपल्या देशाची जगात एक चांगली, स्वच्छ प्रतिमा असावी, ही त्यांची महत्त्वाकांक्षा असून सक्षम नेतृत्वच ते करू शकते, हे तरुणाईंना पक्के ठाऊक आहे. मोदींना तरुणाईची ही मानसिकता पक्की ठाऊक होती आणि म्हणूनच प्रचारादरम्यान मोदींनी नवमतदारांना सक्षम भारतासाठी मतदान करण्याची साद घातली आणि तरुणांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मोदींच्या पदरात घवघवीत यश टाकले.

एकाच पक्षाला सलग दुस-यांदा स्पष्ट बहुमत मिळण्याचा इतिहास यंदाच्या निवडणुकीने घडवला. त्यासाठी मोदींचे निर्णायक नेतृत्व जितके कारणीभूत आहे तितकीच कारणीभूत आहे तरुण भारताने मोदींना दिलेली साथ. मोदींच्या तुलनेत तरुण असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना मात्र ही करामत नाही करता आली. त्यांना देशातील तरुणाईची नस ओळखता आली नाही, हे त्यांचे आणि काँग्रेसचे दुर्दैव. घराणेशाहीला मतदारांनी सलग दुस-यांदा नाकारले आहे. गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीत राहुल यांचा पराभव होणे, हा मोठाच संदेश आहे. मोदींना टक्कर देण्याच्या नादात राहुल स्वतःच्याच गढीत सपशेल पराभूत झाले, हा काळाचा मोठाच महिमा. नवा भारत आता नव्याने राजकीय गाथा लिहित आहे. मोदींनी हा बदल घडवून आणला आहे. मात्र, हे त्यांच्या विरोधकांच्या टीकाकारांच्या लक्षात यायला बराच उशीर लागला. या बदलाचे परिणाम काय होतील, हे येणारा काळच सांगू शकेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.