Author : Sauradeep Bag

Published on Aug 21, 2023 Commentaries 0 Hours ago

आभासी वास्तव, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल चलनाच्या मशागतीत चीनने दाखवलेल्या धोरणात्मक दूरदृष्टीतून चीनने तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाकडे कूच केले आहे.

वर्तमान विचाराच्या पुढे: चिनी तंत्रज्ञानाचे वर्चस्व

पारंपरिकपणे अमेरिका त्यांच्या जागतिक तंत्रज्ञानातील वर्चस्वाकरता ओळखली जाते. असे असताना चीन वेगाने या स्पर्धेत प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे. विस्तारित देशांतर्गत बाजारपेठ आणि भरभराट होत चाललेल्या तंत्रज्ञान क्षेत्र याद्वारे चीनने अमेरिकेच्या तंत्रज्ञानातील विलक्षण कौशल्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दोन राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या तांत्रिक संघर्षात विविध प्रकारच्या चिंता, बौद्धिक संपदा हक्क, व्यापार धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींचा समावेश आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन, हेरगिरी आणि युक्रेनमधील रशियाच्या कृतींना पाठिंबा यांसह अनेक कारणांमुळे अमेरिकेने चीनवर निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध प्रामुख्याने चीनच्या महत्त्वाच्या तंत्रज्ञान पुरवठादारांच्या प्रवेशावर निर्बंध घालून त्याची तांत्रिक क्षमता मर्यादित करण्याचा प्रयत्न करतात. असे असले तरी, नवोन्मेषाच्या आघाडीवर आपले स्थान टिकवून ठेवण्याची दृढ वचनबद्धता दर्शवून, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रयोग करण्याच्या प्रयत्नांत चीन अढळ आहे.

आभासी अवकाशाला गती

नानजिंग, शांघाय आणि झेंगझो यांसारख्या शहरांनी या आभासी क्षेत्रात संशोधनाला आणि विकासाला चालना देण्यासाठी सक्रिय पावले उचलल्याने चीनमध्ये मेटाव्हर्सच्या संकल्पनेला लक्षणीय गती मिळत आहे. मेटाव्हर्स-संबंधित संशोधनाला बळकटी आणण्याकरता शैक्षणिक आणि उपक्रमासंबंधित संसाधनांचा लाभ घेण्यासाठी नानजिंगने ‘चायना मेटाव्हर्स टेक्नॉलॉजी आणि अॅप्लिकेशन इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’ सादर केला. शांघाय २०२५ सालापर्यंत ३५० अब्ज युआनच्या मेटाव्हर्स औद्योगिक कमाईचा अंदाज व्यक्त करत आपल्या मेटाव्हर्स उद्दिष्टांत प्रगती करत आहे. शहराने व्हर्च्युअल आरोग्यविषयक निदान आणि ऐतिहासिक वास्तुशिल्पीय खुणांच्या डिजिटल प्रतिकृतींसह मेटाव्हर्स वापर प्रकरणांची श्रेणी खुली केली आहे.

मानवी हक्कांचे उल्लंघन, हेरगिरी आणि युक्रेनमधील रशियाच्या कृतींना पाठिंबा यांसह अनेक कारणांमुळे अमेरिकेने चीनवर निर्बंध लादले आहेत.

गती कायम ठेवण्यासाठी, झेंग्झूने मेटाव्हर्स उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने एखादी गोष्ट कशी करायची याविषयीच्या धोरणविषयक योजनेच्या मालिकेचे अनावरण केले आहे. शहराच्या मेटाव्हर्स उद्योगाला समर्पित १० अब्ज युआन निधीसह, विकासाला चालना देण्यासाठी शहर सज्ज आहे. आकर्षक प्रोत्साहने देऊ करून, ज्या कंपन्या त्यांचे मुख्यालय झेंगझोऊ येथे स्थलांतरित करत आहेत, त्यांच्या प्रकल्पात भरीव गुंतवणूक करीत आणि वाढीसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देत आहेत. हा प्रयत्न मेटाव्हर्स तंत्रज्ञान विकसित करतो, त्यांना शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रांमध्ये एकात्मित करतो.

चीनच्या वित्तपुरवठा सुविधा आणि प्रोत्साहने मेटाव्हर्स क्रांतीचे नेतृत्व करण्याचा त्यांचा दृढनिश्चय दर्शवतात, ज्यामुळे राष्ट्रव्यापी आभासी वास्तव आणि विस्तारित वास्तवाच्या क्षेत्राशी संबंध असलेल्या डिजिटल सामग्रीत महत्त्वपूर्ण प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.

सर्वप्रथम जागतिक केंद्रीय बँक डिजिटल चलन उपयोगात आणणारा देश

डिजिटल युआनसह जागतिक केंद्रीय बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) विकासात चीन आघाडीवर आहे. पीपल्स बँक ऑफ चायनाद्वारे व्यवस्थापित केलेले, डिजिटल युआन हे भौतिक रेन्मिन्बी (आरएमबी)च्या समतुल्य कायदेशीर निविदा म्हणून काम करते. क्रिप्टोकरन्सीसारखे काम न करता, जागतिक केंद्रीय बँक डिजिटल चलन सरकारी नियंत्रणाच्या कक्षेत येते, चीनला केंद्रीकृत आणि नियमन चौकटीसह सुसज्ज करते. डिजिटल युआनचे सुरुवातीचे टप्पे मुख्यत: प्रमुख किनारी शहरांत केंद्रित केले गेले आहेत, हळूहळू व्यापक राष्ट्रव्यापी प्रक्षेपणाकडे प्रगती करत आहेत.

जलद, किफायतशीर आणि संभाव्यत: अधिक सुरक्षित व्यवहारांद्वारे वैशिष्ट्यीकृत, डिजिटल युआन पारंपारिक देय यंत्रणेपेक्षा अधिक कामगिरी करते. बँकांसारख्या मध्यस्थांना रोखून व्यवहार सुरळीत केल्याने प्रक्रियेला गती मिळते आणि खर्च कमी होतो. जागतिक केंद्रीय बँक डिजिटल चलन आर्थिक गैरव्यवहाराविरूद्ध वर्धित सुरक्षा प्रदान करू शकते. मात्र, गोपनीयता, निनावीपणा आणि पाळत ठेवणे ही चिंतेची क्षेत्रे आहेत.

चीनचा सर्वसमावेशक डिजिटल युआन प्रायोगिक सेवा प्रदान कार्यक्रम, अनेक प्रांत आणि शहरांमध्ये पसरलेला आहे. हे तंत्रज्ञान अधिक सफाईदारपणे सेवा देण्याचे आणि तंत्रज्ञानाचे नवनवे शोध घेण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करते. शहरी केंद्रांत जलद विस्तार आणि २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धांसारख्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीद्वारे, जिथे डिजिटल युआनचा वापर वाहतुकीच्या पेमेंटसाठी केला जाईल. चीनने जागतिक केंद्रीय बँक डिजिटल चलनाचे मुख्य प्रवाहातील देय व्यवस्थेत अखंडपणे एकात्मिक करण्याची आपली महत्त्वाकांक्षा अधोरेखित करून, डिजिटल चलनांसाठी जागतिक नेतृत्वाच्या आपल्या भूमिकेची पुष्टी केली.

डिजिटल सिल्क रोड डिजिटल युआनचा अवलंब वाढवू शकेल. डॉलरवर अवलंबून असलेल्या आर्थिक संरचनांना पर्याय शोधणाऱ्या देशांना मदत करेल.

विविध देशांमधील देय रकमेच्या देवाणघेवाणींच्या प्रयोगांवर लक्ष केंद्रित करून सप्टेंबर २०२२ मध्ये हाँगकाँग हे डिजिटल युआन ज्या क्षेत्रात प्रायोगिक सेवा प्रदान केल्या जाणार आहेत ते निर्दिष्ट क्षेत्र बनले. मात्र, चीनच्या इतर भागांच्या तुलनेत त्याचा अवलंब आणि मिळालेले यश कमी आहे. तरीसुद्धा, हा प्रयत्न जागतिक आर्थिक व्यवस्थेत ‘आरएमबी’ची स्थिती बळकट करण्यासाठी मोठ्या उद्दिष्टांसह जोडला जातो. ‘आरएमबी’ परकीय चलनाच्या साठ्यातील पाचव्या क्रमांकाची मालमत्ता म्हणून गणली जात असताना, चीनच्या या कृती डॉलरच्या अवलंबित्वापासून दूर जाण्याचे सूचित करतात, नवीन आर्थिक मार्गाचा पर्याय देऊ करतात.

‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’सारख्या उपक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीयीकरणासाठी डिजिटल युआनच्या संभाव्यतेला आणखी बळ मिळाले आहे. डिजिटल सिल्क रोड डिजिटल युआनचा अवलंब वाढवू शकेल, डॉलरवर अवलंबून असलेल्या आर्थिक संरचनांना पर्याय शोधणाऱ्या देशांना मदत करेल. डिजिटल युआनचा स्वेच्छेने अवलंब करण्यास प्रोत्साहन देऊन जागतिक आर्थिक गतिशीलता पुन्हा परिभाषित करण्याची चीनची कल्पना आहे.

चीन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शर्यतीत वरचढ

जागतिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शर्यतीत चीन अनेक पाश्चात्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत स्पर्धात्मकतेत वरचढ आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही माहितीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या ‘चिनी वैशिष्ट्यांसह समाजवाद’ या प्रारूपात विशाल माहितीसंच एकत्रित करण्याची यंत्रणा आहे. हे चिनी सरकारशी संलग्न असलेल्या कंपन्यांना एक लाभ प्रदान करते, ज्यामुळे त्यांना व्यावसायिक प्रयत्न वाढविण्यासाठी सरकार-संकलित माहितीचा फायदा घेता येतो.

हार्डवेअर किंवा संरक्षण उत्पादनासारखे नाही तर, कृत्रिम बुद्धिमत्ता सामान्यतः खुल्या वैज्ञानिक प्रारूपाअंतर्गत कार्य करते, ज्ञान हस्तांतरणासाठी संशोधनाद्वारे अल्गोरिदम सामायिक करते. ही चौकट नवोदितांना प्रस्थापित घटकांमधील दरी कमी करण्यास, त्यांच्या प्रगतीला गती देण्यास मदत करते. पेटंटला प्राधान्य देणार्‍या पारंपरिक क्षेत्रांसारखे नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेची नवकल्पना माहितीवर आणि प्रतिभेवर अवलंबून असते, ज्यामुळे स्पर्धेत वरचढ राहण्याचा एक अद्वितीय लाभ मिळतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही माहितीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या ‘चिनी वैशिष्ट्यांसह समाजवाद’ या प्रारूपात विशाल माहितीसंच एकत्रित करण्याची यंत्रणा आहे.

चीनचा धोरणात्मक फायदा त्यांच्या माहितीविषयक संपत्तीत आणि संगणक शास्त्रज्ञांच्या व अभियंत्यांच्या अत्यंत कुशल समूहात आहे. बाजारपेठ गतिशीलता विविध कृत्रिम बुद्धिमत्ताविषयीची अॅप्लिकेशन्स चालवतात आणि नवकल्पना वाढवतात. अनुकूल धोरणे व लवचिकतेसह, चीनच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाढ दिसून येते आणि नवनव्या उपक्रमांचे हे क्षेत्र पालनपोषण करते.

तंत्रज्ञानाच्या वर्चस्वासाठी शोध

अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेले तंत्रज्ञान युद्ध हे वाढत्या तणावाचे वैशिष्ट्य आहे, विवादाच्या केंद्रस्थानी सेमीकंडक्टर आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या काळात सुरू झालेले व्यापार युद्ध, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या नेतृत्वाखाली तीव्र झाले आहे, कारण अमेरिका चीनच्या उच्च-तंत्रज्ञान उद्योगांच्या प्रगतीत अडथळा आणू पाहत आहे.

अमेरिकेच्या सरकारी उद्योग व सुरक्षा खात्याने अंदाजे ६०० चिनी संस्था ओळखल्या आहेत- ज्यात चिनी दूरसंचार आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स दिग्गज कंपन्या- उदा. हुआवे समाविष्ट आहेत आणि त्यांना व्यापार प्रतिबंध सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यात लष्करी तंत्रज्ञान, फाइव्ह-जी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत तंत्रज्ञानात कार्यरत असलेल्या कंपन्यांचा व संशोधन संस्थांचा समावेश आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धेचे परिणाम जगावर होत आहेत, ज्यामुळे बाजारपेठा, पुरवठा साखळ्या आणि व्यापार गतिशीलता प्रभावित होते.

चिनी कंपन्यांवर अमेरिकेने केलेल्या कारवाईला चीनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अलीकडेच लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशन आणि रेथिऑन मिसाइल्स अँड डिफेन्स या दोन कंपन्या आपल्या व्यापार प्रतिबंध सूचीत समाविष्ट केल्या आहेत. या हालचालीनंतर लॉकहीड मार्टिन आणि रेथिऑन मिसाइल्स अँड डिफेन्स या कंपन्यांवर तैवानला शस्त्रास्त्र विक्री करण्याबाबत निर्बंध लादले जातील. कारवाईअंतर्गत त्यांना चीन संबंधित आयात किंवा निर्यात करण्यास बंदी आहे आणि चीनमध्ये नवीन गुंतवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

चीनच्या प्रगतीत अडथळे आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न असूनही, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वान्टम तंत्रज्ञानासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत चीन प्रबळ शक्ती म्हणून उदयास आला आहे. अमेरिका सेमीकंडक्टरच्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित करत असताना, चीनचे नेतृत्व विविध प्रमुख क्षेत्रांत विस्तारत आहे, चीन एक आघाडीची तंत्रज्ञान महासत्ता म्हणून स्थान प्राप्त करीत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धेचे जगावर परिणाम होत आहेत, ज्यामुळे बाजारपेठा, पुरवठा साखळ्या आणि व्यापार गतिशीलता प्रभावित होते. राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी चिनी संस्थांवर निर्बंध लादून युरोपही मैदानात उतरला आहे. तंत्रज्ञानाच्या वर्चस्वासाठीचा संघर्ष जटिल आणि बहुआयामी आहे, या स्पर्धेत चिरस्थायी वरचढपणा मिळवण्यासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्नशील आहे. तरीही, अमेरिका आणि युरोपने आभासी वास्तव, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल चलनांच्या मशागतीत चीनच्या तुलनेत, त्यांच्याइतका वेळ खर्ची घातलेला नाही आणि धोरणात्मक दूरदृष्टीही दाखवलेली नाही. प्रतिभा आणि माहिती या दोन्हींची विपुलता लक्षात घेता, ही उन्नती चीनची अव्याहत प्रगती सुरू ठेवण्यासाठी सज्ज आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.