Author : Nicol Andreula

Published on Aug 29, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनोत्तर जगाच्या पुनर्रचनेसाठी स्वतःच्या कोषातून बाहेर पडत आक्रमक धोरण अवलंबणे विविध देशांसाठी क्रमप्राप्त आहे. त्यातूनच पुढील संकटे टाळता येऊ शकतील.

जगाची आर्थिक घडी पुन्हा कशी बसेल?

मनुष्यप्राण्याने आतापर्यंत अनेक संकटांना धीरोदात्तपणे तोंड दिले आहे. तसेच कोरोनाबद्दल होईल, अशी आशा आपण करायला हवी. या संकटावर मात करून, पुढे वाटचाल करण्यासाठी नेमक्या कोणत्या घटकांना जवळ करायला हवे, कोणते तातडीचे उपाय योजायला हवेत, कोणती धोरणे राबवायला हवीत यांचा धांडोळा घेणे अत्यावश्यक आहे.

सध्या साऱ्या मानवजातीला कोरोना या एका नव्या विषाणूच्या भयाने पछाडले आहे. कोरोनाच्या महासाथीने संपूर्ण जगाला कवेत घेतल्याने लोकांना ‘न भूतो न भविष्यति’ अशा सामाजिक आणि आर्थिक टाळेबंदीला सामोरे जावे लागले. आंतरराष्ट्रीय हालचालींवरही निर्बंध आले आणि जागतिक पुरवठा साखळीही ठप्प झाली. कोरोना संकटाने विद्यमान संकटे सौम्य वाटतील अशी परिस्थिती निर्माण केली असून नव्या समस्याही या संकटाच्या माध्यमातून जगासमोर उभ्या केल्या आहेत. एका अनिश्चिततेच्या गर्तेत जग सापडले आहे.

या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावरील कंपन्या आणि धोरणकर्त्यांनी त्यांच्या नियोजन, निर्णय प्रक्रिया आणि परिचालन प्रक्रियेत पुढील सहा टप्प्यांचा समावेश करून घ्यायला हवा.

सुरुवात छोट्यापासून व्हायला हवी

‘फायनान्शिअल टाइम्स’ या अर्थ विषयाला वाहिलेल्या दैनिकातील स्तंभलेखक मार्टिन वुल्फ यांच्या मतानुसार, पुढे काय वाढून ठेवले आहे, हे जाणून घेण्यासाठी काही सूक्ष्मातिसूक्ष्म आर्थिक स्थित्यंतराचे सविस्तर विश्लेषण केले जाणे, अत्यावश्यक आहे. त्यासाठी निश्चितच दोन गोष्टी गरजेच्या आहेत : पहिली गोष्ट म्हणजे पुढील २४ ते ३६ महिने सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील मोठ्या कर्जांच्या प्रमाणात विभागले गेले पाहिजे तसेच अर्थव्यवस्था दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्याने खासगी क्षेत्रात अनेक चुका आढळून येतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेत २००८ मध्ये जेव्हा ‘सबप्राइम पेच’ निर्माण झाला होता त्यावेळी लागू करण्यात आलेल्या काटकसरीच्या योजनांच्या तुलनेत सद्यःस्थिती पूर्णतः वेगळी आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर आणि मोठमोठे कर कमी करणे आवश्यक असून नजीकच्या भविष्यात तसे होऊ शकते.

जलद तंत्रज्ञानाची कास धरा

या सर्व अगदी निश्चित अशा अंदाजांच्याही पलीकडे जाऊन कोरोनाचे संकट जगावर येण्यापूर्वीही ज्याचा जगाशी काहीही संबंध नव्हता, असे काय घडू शकते, याचाही विचार केला जाणे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचा बदल झाला आहे, तो म्हणजे तंत्रज्ञानात! तंत्रज्ञानात झालेल्या या सक्तीच्या बदलामुळे प्रत्येक व्यक्ती अधिक सज्ञान बनली आहे. कोरोना विषाणूबरोबर प्रगत झालेले हे तंत्रज्ञान विषाणूबरोबरच अस्तंगत होणारे नाही, कारण तंत्रज्ञानातील हा बदल हळूहळू होतच होता.

तंत्रज्ञानातील हा जो बदल आहे तो काहींसाठी फायद्याचा ठरेल आणि जे या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकणार नाहीत, ते वेगाने उद्ध्वस्त होतील. एकीकडे फेसबुकसारख्या महाकाय कंपन्या त्यांच्या जगभरातील कार्यालयांमधील एकूण कर्मचा-यांपैकी निम्म्या लोकांना घरून काम करण्याची मुभा देण्याची तयारी करत आहेत. कारण तंत्रज्ञानातील बदलांना आत्मसात करण्याची तयारी त्यांनी खूप पूर्वीपासूनच करू ठेवली होती. मात्र, दुसरीकडे अनेक कंपन्या, विशेषतः एसएमई, बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरण्याची पुरेशी तयारी नसल्याने सक्तीच्या डिजिटलायझेशनमुळे हडबडून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छोट्या कंपन्यांनी त्यांच्या तंत्रज्ञानावारील गुंतवणुकीला तसेच क्षमतांना अधिकाधिक वाव द्यायला हवा, अन्यथा त्या मागे पडतील किंवा अर्थव्यवस्थेतून कायमच्या बाद होतील.

हरित पुनर्रचनेला चालना

प्रत्येक आपत्तीनंतर बदल आणि पुनर्रचना एकसाथ मार्गक्रमण करतात. विद्यमान स्थितीत पुनर्रचना हा चांगल्या बदलासाठीचा एक उत्तम मार्ग ठरू शकतो. मोठ्या उद्योगांना तसेच लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना सरकार देऊ करत असलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापल्या मानसिकतेत बदल करून घेत, स्वतःच्या जगाचा परिघ वाढविण्यासाठी नवीन प्राथमिकता आखणे महत्त्वाचे आहे.

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तसेच सामाजिक क्रांतीसाठी, जे धट्ट्याकट्ट्या आर्थिक पॅकेजातून होणे शक्य आहे, शाश्वतता हा महत्त्वाचा घटक असावा लागतो. चांगले भविष्य घडविण्यासाठी स्वच्छ ऊर्जेच्या माध्यमातून, वृद्धिंगत होत असलेल्या हरित शहरांमधून किंवा अधिक पर्यावरणस्नेही शाश्वत वाहतूक आणि दळणवळण प्रणाली विकसित करण्यासारख्या हरित अर्थव्यवस्थांमधील गुंतवणूक, हा एक महत्त्वाचा भाग असेल.

जागतिक कार्यक्षमता ते स्थानिक संरक्षण आणि अतिरेक

अतिजागतिकीकरण आणि जागतिक पुरवठा साखळी यांच्यातील कच्चे दुवे तसेच परस्परांमध्ये गुंतलेल्या अर्थव्यवस्था यांमुळे विद्यमान आणीबाणीची परिस्थिती जगभरात निर्माण झाली आहे. त्याचे धक्के संपूर्ण जगालाच अनुभवावे लागत आहेत, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भविष्यात महागड्या असल्या तरी, स्थानिक पातळीवरच पुरवठा साखळ्या निर्माण होण्याच्या दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित आणि राष्ट्रीय धोरणे वाढीस लागतील, ज्यांची अंमलबजावणी अमेरिकेसारखे देश कोरोना काळाला सुरुवात होण्याच्या कितीतरी आधीपासून करू लागले आहेत.

परिचालनाच्या परिप्रेक्ष्यातून अनेक कंपन्या कार्यक्षमता वाढीस लागण्यासाठी तसेच आर्थिक कारणांसाठी अधिक मोठे होण्याचे टाळू शकतात आणि भविष्यातील मोठे धक्के पचवता यावेत यासाठी मोठ्या प्रमाणात साठा करण्याच्या अतिरेकाला प्राधान्य देऊन कंपन्या साठवणूक व पुरवठा यंत्रणेत वैविध्य आणू शकतील.

आणि पुनश्च जागतिक एकता!

पुनर्निर्माण राष्ट्रीय पातळीवर व्हावे वा जागतिक पातळीवर हा सर्वात मोठा प्रश्न आंतरराष्ट्रीय धोरणकर्त्यांना सध्या पडला आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रसाराला मुख्यत्वे करून जागतिकीकरण कारणीभूत ठरले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरीही या आपत्तीला तातडीने तोंड देण्याची जबाबदारी – म्हणजे औषध तसेच पीपीई किट यांच्या खरेदीची वगैरे – मुख्यत्वे देशांतर्गत संस्थांवर येऊन पडली. या देशांतर्गत संस्थांना जागतिक स्तरावरून फक्त काही तंत्रसाह्यच मिळू शकले.

असे असले तरीही दीर्घकाळपर्यंत दोन मुख्य कारणांसाठी ‘जागतिक नियोजन’ गरजेचे आहे. प्रथम म्हणजे कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी जागतिक समन्वय असणे, ज्यामुळे ही प्रक्रिया जलदगतीने होईल आणि लस उपलब्ध झाल्यानंतर तिचे जगभरातच समान वितरण होईल. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे इतिहासाने आपल्याला हे शिकवले आहे की, जग जेवढे परस्परावलंबी राहील तेवढे ते सुरक्षित आणि संपन्न राहील. तसेच त्यामुळे जगात एकी आणि शाश्वतता टिकून राहण्यास मदत होईल.

जागतिक पुनर्रचना योजनेसाठी परस्पर विश्वास असणे आत्यंतिक गरजेचे आहे. परस्पर विश्वास म्हणजे माहिती आणि स्रोतांची उघडपणे देवाणघेवाण करणे आणि धोरणांमध्ये समन्वय असणे. मानवी इतिहासातील कोविड-१९ महासाथ ही अधिक अनुभव देणारी आहे त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी दुहीपेक्षा जागतिक एकता अधिक महत्त्वाची आहे. अर्थात हे म्हणणे सोपे असले तरी प्रत्यक्ष कृती कठीण आहे परंतु असा जागतिक नियोजनाचा प्रस्ताव एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि त्यातून एक नवीन प्रेरणा मिळते जी खर्चापेक्षा अधिक महत्त्वाची असते.

सर्व शक्यतांचा विचार करा

एकूणच भविष्यावर अनिश्चिततेचे सावट असून केवळ सूक्ष्मआर्थिक उपायांशी संबंधितच – ज्यावर आधीच प्रक्रिया सुरू झाली आहे – सावध अंदाज व्यक्त करता येऊ शकतील. कोरोनोत्तर काळात झपाट्याने बदलणा-या जगाला तोंड देण्यासाठी प्रमाणित, एकमार्गी आर्थिक अंदाज प्रारुपे पुरेशी ठरणार नाहीत. सध्याच्या अत्यंत अस्थिर, अनिश्चित, जटील आणि संदिग्ध काळात नुसते अंदाज वा आडाखे बांधणे सोडून देत जे शक्य आहे त्या सर्व गोष्टींचे नियोजन करण्यास अग्रक्रम देणे अगत्याचे आहे.

परिस्थितीनुरूप नियोजन हा एक धोरणांचा संच असून त्यात सर्व शक्यतांचा अंदाज बांधून त्यानुसार नियोजन केलेल असते. त्यात पुढील वाटचालीत येऊ शकणा-या अडचणी, त्यातील जोखमी, त्यातून काढता येणारे मार्ग इत्यादींचा सखोल अभ्यास केलेला असतो.

कोरोना काळातून सुरक्षितपणे बाहेर पडत पुन्हा विकासाच्या मार्गावर जगाला यायचे असेल तर हाच एक मार्ग उपलब्ध आहे. आतापर्यंत सरकारांनी प्रतिसादात्मक भूमिका निभावली आहे. आता त्यांना पुढे येऊन स्वतःचा मार्ग काढावा लागणार आहे. स्वतःच्या कोषातून बाहेर पडत आक्रमक धोरण अवलंबणे विविध देशांसाठी क्रमप्राप्त आहे. त्यातूनच पुढील संकटे टाळता येऊ शकतील.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.