-
CENTRES
Progammes & Centres
Location
करोना विषाणूच्या उद्रेकामुळे भांबावलेला चीनची देशांतर्गतच नव्हे तर जागतिक पातळीवरही चीनची विश्वासार्हता पणाला लागली आहे.
चीनमध्ये प्रत्येक नववर्षाचे चिन्ह असते. यंदाचे वर्ष हे उंदराचे म्हणजे मूषकवर्ष आहे. मात्र, त्याची सुरुवात फारच वाईटरित्या झाली. करोना विषाणूने (त्याचे नामकरण आता नॉव्हेल करोनाव्हायरस २०१९-एनसीओव्ही असे केले आहे) सध्या चीनमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यंत २००हून अधिक जणांचा बळी या आजाराने घेतला आहे. आणि बाधितांची संख्या तर १०,०००च्याही वर गेली आहे.
करोना विषाणूचा चीनमध्ये झालेला उद्रेक आणि जगभरात त्याचा झालेला फैलाव लक्षात घेत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर २५ जानेवारी रोजी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक बोलावून करोना विषाणूच्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर सविस्तर चर्चा केली, यातूनच या साथीच्या आजाराचे गांभीर्य अधोरेखित होते.
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी तातडीने योग्य ती पावले उचलून रुग्णांना या आजाराच्या मिठीतून मुक्त करण्यासाठी शर्थीचे वैद्यकीय प्रयत्न करावेत आणि आजाराचा फैलाव रोखावा, असे आदेशच चीन सरकारने सर्व यंत्रणांना दिले आहेत. वेळीच या विषाणूवर नियंत्रण न मिळवल्यास चीनची जागतिक स्तरावरील पत घसरण्याची शक्यता आहे. म्हणूनच स्वतः अध्यक्ष जिनपिंग यांनी यात जातीने लक्ष घातले आहे. कारण चीनची सर्वच पातळ्यांवर विश्वासार्हता पणाला लागली आहे.
करोना विषाणूच्या फैलावाला वुहान या अत्यंत गजबजलेल्या शहरातून सुरुवात झाली. वुहान हे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्याचे केंद्रबिंदू समजले जाते. नेमक्या त्याच शहरातून या आजाराला सुरुवात झाली, हा मोठाच दैवदुर्विलास! करोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली त्यावेळी काही रुग्णांना समुद्री खाद्यपदार्थांपासून तर काहींना वुहान येथील मांस बाजारात मिळणा-या विशिष्ट प्राण्यांचे मांस सेवन केल्याने लागण झाल्याचे सांगितले जात होते. म्हणजे हा आजार प्राण्यापासून माणसात संक्रमित होत असल्याचा प्राथमिक अंदाज होता. परंतु वुहान येथील या मांस बाजाराशी दूरान्वयानेही संबंध नसताना जसजशी रुग्णांची संख्या वाढत गेली, तसतसे हा आजार केवळ प्राण्यांकडून माणसांकडे नव्हे तर माणसांकडूनही तो संक्रमित होत असल्याचे निदर्शनास आले.
वस्तुतः करोना विषाणूचे कुटुंब मोठे आहे. या प्रकारच्या विषाणूंचा साध्या सर्दीतून श्वसनाद्वारेही संसर्ग होतो. प्राण्यांमध्ये आढळणारे विषाणू साधारणतः एकसारखेच असतात, त्यातल्या काहींचाच माणसाला संसर्ग होण्याचा धोका असतो. काहीवेळा प्राणीस्थित करोना व्हायरस त्याचे रुपडे पालटून माणसाच्या शरीरात बेमालूमपणे शिरतो आणि संबंधित माणसाद्वारे त्या विषाणूचा फैलाव होतो. झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे प्राणी आणि मनुष्यप्राणी अतिनिकट (वुहानमधील वेट मार्केटप्रमाणे) येऊ लागले आहेत. त्यातूनच करोनासारख्या विषाणूंचा फैलाव झपाट्याने होऊ लागला आहे.
नव्या विषाणूची लागण झाल्याची अधिकृत कबुली चीनतर्फे ३१ डिसेंबर रोजी देण्यात आली. तोपर्यंत वुहानमध्ये करोनाचा उद्रेक पुरेशा प्रमाणात झाला होता. गेल्या चार आठवड्यांत करोनाने बाधित झालेल्यांची आणि या विषाणूची लागण झाल्याने मरण पावणा-यांची संख्या झपाट्याने वाढली. चीन तसेच हाँगकाँगच्या विविध भागांतून करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. तसेच थायलंड, जपान, नेपाळ, दक्षिण कोरिया, तैवान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रिया, जर्मनी, कम्बोडिया, व्हिएतनाम, मलेशिया आणि सिंगापूर इत्यादी देशांमध्येही संशयित रुग्णांची यादी वाढू लागली.
वुहानमधील ४,००० चिनी नागरिक अजूनही परदेशात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नेपाळमध्ये करोनाचे रुग्ण आढळणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. कारण भारत आणि नेपाळ यांच्या सीमा खुल्या आहेत. आतापर्यंत तरी नेपाळातून भारतात आलेल्यांच्या करोना चाचण्यांचे सर्व निष्कर्ष नकारात्मक आले आहेत. केद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ३० जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये करोनाचा भारतातील पहिला रुग्ण केरळात आढळल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित रुग्ण वुहान विद्यापीठात शिकणारा भारतीय विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात त्याला एका बंदिस्त खोलीत ठेवण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय तज्ज्ञ बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते इतर करोना विषाणूंच्या यापूर्वीच्या उद्रेकांदरम्यान थेंबांच्या माध्यमातून, स्पर्श आणि फोमाइट्स (कपडे, भांडे आणि फर्निचर यांच्यातून निघणारे कण जे संसर्ग पसरवतात) यांच्या माध्यमातून माणसाकडून माणसाकडे विषाणूचे संक्रमण होत होते, त्यानुसारच २०१९-एनसीओव्हीचे स्वरूप असावे. विषाणूंचा प्रवेश आणि आजारी पडणे यामधील काळातही, रुग्णामध्ये त्याची लक्षणे आढळून येण्याच्याही आधी, हा विषाणू फैलावू शकतो, ही नवीन माहिती या निमित्ताने उजेडात आली आहे. त्यामुळे संक्रमणाचे गुणोत्तर सतत वाढते राहते. चीनमधून येणा-या प्रवाशांची कसून तपासणी आणि चीनमध्ये प्रवास करण्यावर आलेले कडक निर्बंध, एक कोटी लोकसंख्येचे वुहान शहर आणि सहा कोटी लोकंसख्या असलेला हुबेई प्रांत यांचा बाह्यजगाशी संबंध तोडणे, हे सर्व का, हे यातून स्पष्ट होते.
२४ जानेवारी रोजी चीनच्या नव्या वर्षाला प्रारंभ झाला. नववर्षाच्या निमित्ताने चीनमध्ये एक आठवडा सार्वजनिक सुट्टी असते. दूर देशी राहणारे अनेक चिनी नागरिक या सणाच्या निमित्ताने आपल्या आप्तस्वकीयांच्या भेटीसाठी चीनमध्ये तरी येतात किंवा अनेक जण परदेशी तरी जातात. यातूनच करोना विषाणूची लागण संपूर्ण चीनमध्ये आणि बाह्यजगात झाली असावी, असा दाट संशय आहे. हे एवढ्या झटपट घडले की काही कळायच्या आत करोना विषाणूने आपले हातपाय पसरलेदेखील! चीनला सावरायला वेळही मिळाला नाही.
आता खबरदारीचा उपाय म्हणून चीन सरकारने चिनी नववर्षाची आठवडाभराची सुट्टी आणखी तीन दिवस म्हणजेच २ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. स्टारबक्स, मॅक्डोनाल्ड्स, डिस्नेलँड आणि द फॉर्बिडन सिटी यांसारख्या बड्या नाममुद्रांनी त्यांचे अनुक्रमे हुबेई प्रांत, शांघाय आणि बीजिंग येथील आऊटलेट्स तात्पुरत्या स्वरूपासाठी बंद केले आहेत. मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्रित येण्याच्या ठिकाणांवर, जसे की मंदिरांमधील प्रार्थना वगैरे, बंदी घालण्यात आली आहे. हेतू हाच की आजाराचा फैलाव होऊ नये! शांघायमध्ये तर सुपरमार्केट्स, वैद्यकीय सेवा पुरवठादार आणि सार्वजनिक सेवा इत्यादी वगळता अनेक उद्योगांनी १० फेब्रुवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.
आता करोना विषाणूची तुलना सार्स (सिव्हिअर ऍक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) या आजाराशी केली जाऊ लागली आहे. सार्सने २००२-०३ या वर्षात चीनमध्ये थैमान घातले होते. तब्बल ८,००० रुग्णांना या आजाराची बाधा झाली होती तर ८०० जण सार्सचे बळी ठरले होते. सार्स हाही प्राण्यांपासून होणारा आजार होता. करोना हा याच माळेतला विषाणू आहे, जो वटवाघळांपासून फैलावत असल्याचे बोलले जात आहे. नोव्हेंबर, २००२ मध्ये सार्सचे प्राथमिक रुग्ण गुआंगडाँग प्रांतात आढळून आले. परंतु जागतिक आरोग्य संघटनेला तब्बल तीन महिन्यांनंतर त्याची माहिती देण्यात आली.
अगम्य अशा विषाणूचा गुआंगडाँग प्रांतात थैमान घातल्याचे कळविण्यात आले होते. त्यानंतर चीनमध्ये सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आला. चीनच्या आरोग्य यंत्रणांनी नंतर सार्वजनिक माफीही मागितली. करोना विषाणू परिवाराचे ते पहिले प्रकरण होते, त्यातूनच आजार झपाट्याने फैलावण्याची किती उच्च क्षमता करोना विषाणूकडे आहे हे स्पष्ट झाले होते. जागतिक अर्थव्यवस्थेत त्यामुळे ३० ते १०० दशलक्ष डॉलर नुकसान झाले होते.
तेव्हाच्या आणि आताच्या चीन सरकारच्या वर्तनात फरक आढळतो. करोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान चीन सरकार पुरेसे खुले असल्याचे आढळून येत आहे. परंतु चीन सरकारने खरोखरच खुले धोरण स्वीकारले आहे का, हा खरा प्रश्न आहे. विषाणु उद्रेकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य यंत्रणांचा प्रतिकार काहीसा तोकडा होता. त्यात वरून झिरपणारा चिनी प्रशासकीय दृष्टिकोन जागोजागी दिसून येत होता. मात्र, चिनी प्रशासकीय यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. परंतु असे असले तरी ‘सबकुछ सरकार’ हे चिनी प्रारूप त्यात डोकावतेच. शी जिनपिंग यांच्यासाठी ही कस पाहणारी परिस्थिती आहे. नवा चीन घडविण्याच्या दृष्टीने सत्ता हाती घेतलेल्या जिनपिंग यांनी डेंग शाओपिंग यांची शिकवण मागे टाकत चिनी लोकांना ‘जगात मानाचे स्थान मिळविण्यासाठी झटा’, असा संदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर चीन प्राप्त परिस्थितीला कसा तोंड देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जेव्हा वेळ येते तेव्हा चीन समर्थपणे परिस्थितीला सामोरे जातो, हे चिनी प्रारूप जगाला दाखवून देण्याची ही नामी संधी आहे. जगात चीनला महत्त्व आहे आणि त्यामुळेच करोनाला तोंड देण्यासाठी चीन जागतिक आरोग्य संघटनेसारख्या संघटनेला आपल्या करोनाविरूद्धच्या लढ्यात सहभागी करून घेईल, अशी आला आहे. सार्सवर प्रभावी लस शोधून तीन विकसित करण्यासाठी २० महिन्यांचा कालावधी लागला. आता २०१९-एनसीओव्हीवरील लशीसाठी अमेरिकेतील आरोग्य यंत्रणांनी ९० दिवसांची मुदत स्वतःला घालून दिली आहे.
मे, २०१८ मध्ये केरळात निपाह या आजाराच्या उद्रेकाने थैमान घातले होते. या आजाराचा सामना केरळ सरकारने कसा केला हे फार उद्बोधक आहे. निपाह हाही प्राण्यांपासून फैलावणारा आजार आहे. फळांवर गुजराण करणा-या वटवाघळांपासून तो माणसांत संक्रमित होतो. भारतात निपाहने १७ बळी घेतले. परंतु केरळातील स्थानिक यंत्रणांनी वेळीच हालचाली करत निपाहच्या रुग्णांना एकटे ठेवल्याने आजाराचा उद्रेक होण्याला आळा बसला.
आरोग्य हा राज्यांच्या सूचीमधील विषय आहे, हे पथ्यावरच पडले. ईशान्येत (या ठिकाणि निपाहने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले होते आणि २००१ मध्ये झालेल्या उद्रेकाने सिलिगुडीत ४९ बळी घेतले होते) काम करण्याचा अनुभव असणा-या आणि विषाणू ओळखण्यासाठी आवश्यक सामुग्री हाती असलेल्या मणिपाल सेंटर फॉर व्हायरस रिसर्च या संस्थेशी संपर्क साधण्याच्या कामात स्थानिक डॉक्टरांनी पुढाकार घेतला. राज्याच्या आरोग्य यंत्रणेनेही वेळ न दवडता तातडीने बाधित रुग्णांची दखल घेत अनेकांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे जून आणि त्यानंतर केरळात निपाहचा एकही रुग्ण आढळला नाही. केरळ निपाहमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आणि तेथील प्रवासावर लादण्यात आलेले निर्बंधही उठविण्यात आले. जिल्हा आणि राज्य यंत्रणांनी वेळीच पुढाकार घेतला नसता आणि राज्यातल्या परिस्थितीचे नुसतेच कागदी अहवाल केंद्र सरकारकडे पाठवत राहिले असते तर निपाहचा उद्रेक होऊन अनेकांचे बळी गेले असते.
अगदी थोड्याच बळींच्या बदल्यात निपाहवर नियंत्रण मिळविण्यात केरळ सरकार यशस्वी ठरले. तथापि, प्राण्यांच्या माध्यमातून होणा-या विविध आजारांचे प्रमाण भारतात वाढीस लागले आहे. त्यातच भारतातील काही भागांमध्ये डेंग्यू, हिवताप आणि इन्फ्लुएंझा यांसारखे ठरावीक ऋतूंत होणा-या आजारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर देशव्यापी आरोग्य पाहणी कार्यक्रमाला बळकटी द्यायला हवी.
भारतात साथीच्या आजारांचे तज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि कीटकतज्ज्ञांची प्रचंड वानवा आहे. त्यामुळे रोगनिदान करण्यात बराच वेळ वाया जातो. जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीला भारतात मुक्त वाव आहे, हे लक्षात घेता या क्षेत्रात सार्वजनिक आणि खासगी यांची भागीदारी वाढीस लागून त्याचे आदर्श प्रारूप तयार होणे गरजेचे आहे. जेणेकरून देशातील आरोग्य सेवा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलू शकेल. आजार पाहणी, रोगनिदान साहित्याची उपलब्धता आणि लस विकसित करण्याचा वेग इत्यादींमध्ये अमूलाग्र बदलही घडून येऊ शकेल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Ambassador Rakesh Sood was a Distinguished Fellow at ORF. He has over 38 years of experience in the field of foreign affairs economic diplomacy and ...
Read More +