Published on Jan 27, 2021 Commentaries 0 Hours ago

ट्रम्प यांचे अध्यक्षपद आधीच गेल्याने, त्यांच्यावर महाभियोग चालणार नाही. पण, कौल विरोधात गेल्यास, ते पुन्हा कधीही अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरू शकणार नाहीत.

ट्रम्प यांची ‘ऐतिहासिक’ अखेर

अमेरिकेच्या २४४ वर्षांच्या इतिहासात दोनदा महाभियोगाला सामोरे जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले अध्यक्ष ठरले. ही एक ऐतिहासिक घटना आहे. गेली चार वर्षे मनाप्रमाणे राज्यकारभार हाकणाऱ्या ट्रम्प यांचा सत्तासूर्य मावळताना ते नव्या आरोपांच्या फेऱ्यात अडकले. लोकनियुक्त सरकारच्या विरोधात बंडाला चिथावणी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मागील आठवड्यात १३ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकी संसदेचा (यूएस कॅपिटॉल) ताबा घेऊन ट्रम्प समर्थकांनी तिथे घातलेला धुडगूस यासाठी कारणीभूत ठरला. अजूनही पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे आणि आजवर कधी घडल्या नाहीत अशा अनेक गोष्टी तिथे घडण्याची चिन्हे आहेत. मात्र, तीन प्रमुख मुदद्यांच्या आधारे या सगळ्या घडामोडींचा वेध घ्यायला हवा.

अंतिम आकडेवारी : २३२ – १९७

ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावास त्यांच्याच पक्षाच्या, म्हणजेच रिपल्बिकन पक्षाच्या २११ पैकी १० प्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. याचे दोन अर्थ निघतात. ट्रम्प हे अजूनही आपले वर्चस्व राखून आहेत असे चित्र एकीकडे दिसते, तर दुसरीकडे रिपब्लिकन पक्षात सर्व काही आलबेल नाही. धरण फुटले आहे, असा अर्थही यातून काढता येतो. सिनेटमध्ये सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे नेते असलेले, आक्रमक नेते अशी प्रतिमा असलेले मिच मॅकनेल यांनी ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या प्रस्तावाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

मॅकनेल यांच्या या भूमिकेमुळे ट्रम्प यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. वर्षभरापूर्वी जे अशक्य वाटत होते, ते आता टप्प्यात आल्यासारखे वाटत आहे. पुरेसे रिपब्लिकन सिनेटर्स ट्रम्प यांच्या विरोधात गेल्याचे दिसत आहे. महाभियोगाचा प्रस्ताव येईल तेव्हा ते ट्रम्प यांना पदच्युत करण्याच्या बाजूने मतदान करतील असे चित्र आहे. महाभियोगाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांमध्ये वजनदार राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

जॉर्ज डब्लू. बुश यांच्या काळात उपाध्यक्ष राहिलेले डिक चेनी यांचे सुपुत्र लिझ चेनी हे देखील त्यात आहेत. ‘अमेरिकेच्या कुठल्याही अध्यक्षाने आजवर देशाच्या राज्यघटनेशी इतका मोठा विश्वासघात केला नव्हता. कुठल्याही अध्यक्षाने आपल्या पदाचा असा अवमान केला नव्हता,’ अशी भावना चेनी यांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या महाभियोगाच्या वेळी बहुतेक सिनेटरनी पक्षनिष्ठ राहणे पसंत केले होते. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. सध्याची २३२-१९७ ही अंतिम आकडेवारी आधीच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी आहे. उशिरा का होईना, आता सिनेटरना संधी मिळाली आहे.

गेल्या चार वर्षांत मॅकनेल यांना ट्रम्प यांचा राजकीय लहरीपणा प्रचंड सहन करावा लागला. त्यामुळे ते ट्रम्प यांना अक्षरश: वैतागले असून त्यांचा काटा काढण्यासाठी उत्सुक आहेत. महाभियोगावर सिनेटसमोर होणाऱ्या सुनावणीत मॅकनेल यांनी ट्रम्प यांना दोषी ठरवण्याच्या बाजूने कौल दिल्यास महाभियोगाचा प्रस्ताव संमत होण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश मते पूर्ण होतात. ट्रम्प यांचे अध्यक्षपद आधीच गेल्याने त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालणार नाही हे जरी खरे असले तरी मतांचा कौल त्यांच्या विरोधात गेल्यास पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याचे त्यांचे मार्ग बंद होणार आहेत.

ट्रम्प, जोरात

गेल्या चार वर्षांत ट्रम्प यांनी पुरेपूर मनमानी केली. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांना मोठा झटका बसला. त्यावेळी हातातला टीव्हीचा रिमोट आपटण्याखेरीज त्यांना काहीच करता आले नाही. मैलभर अंतरावर असूनही महाभियोगाचा प्रस्ताव ते रोखू शकले नाहीत. ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी आली, तेव्हा त्यांनी स्वत:ला जणू आपल्या खासगी डायनिंग रूममध्ये कोंडून घेतले आणि आतल्या आत खदखदत जगाच्या समोर आपला इतिहास उलगडताना पाहत राहिले. डिजिटल कंटेन्टवर नियंत्रण आणण्यासाठी सतत आटापिटा करणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांवरच या व्यासपीठांनी बहिष्कार घातला.

टेक उद्योग, सार्वजनिक डिजिटल व्यासपीठे आणि प्रतिक्रियाशील व संवेदनशील सार्वजनिक धोरणे यातील परस्परसंबंधांच्या दृष्टीने हा एक क्रांतिकारी क्षण होता. महाभियोगाच्या प्रस्तावावर मतदानानंतर बऱ्याच तासांनंतर ट्रम्प हे टीव्हीच्या पडद्यावर आले. मात्र ते नरमलेले होते. ६ जानेवारी रोजी यूएस कॅपिटॉल इमारतीवर झालेल्या हिंसाचाराचा कायदेशीर ठपका येऊ नये म्हणून ते सारवासारव करताना दिसले. अमेरिकी संसदेतील या धिंगाण्याआधी ट्रम्प यांच्यावरील कायदेशीर संकट प्रामुख्याने न्यूयॉर्कशी संबंधित प्रकरणांबाबत होते. मात्र, आता अवघ्या आठवडाभराच्या आतच ट्रम्प यांच्यासमोरील संकटाची व्याप्ती वाढली आहे.

पूर्णपणे नव्या पातळीवर गेली आहे. एफबीआयने (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) आधीच १७० प्रकरणांच्या फायली उघडल्या आहेत व आणखी शेकडो प्रकरणे उघडण्याचा इशारा दिला आहे. एफबीआयने ट्रम्प यांचा नामोल्लेख केलेला नाही. मात्र, डिजिटल मीडियावरील १ लाख पोस्ट्सचा आम्ही अभ्यास करत असून सगळे तुकडे जुळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगत एफबीआयने सूचक इशारा दिला आहे. हे सगळेच चिंता वाढवणारे आहे.

चहूकडे सैनिक

अमेरिकी संसदेने ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा दुसरा प्रस्ताव आणला आहे. त्यातून सुखरूप सुटका करून घेणे जवळपास अशक्य आहे. यूएस कॅपिटॉलच्या ज्या संगमरवरी फरशीवर लोक बिनधोक फिरायचे, तिथे नॅशनल गार्डचे शेकडो सैनिक झोपलेले पाहून सर्वांनीच तोंडात बोटे घातली. एका रात्रीत यूएस कॅपिटॉल इमारतीच्या आवाराभोवती सात फूट उंच तारांचे कुंपण घातले गेले. संपूर्ण परिसर एखाद्या शहरातील युद्धभूमीसारखा दिसू लागला. ही सगळी दृश्ये आपल्याला आतापर्यंतच्या प्रवासाची आठवण करून देत होती. अमेरिकेच्या सीमेवर मोठी भिंत बांधणे असो, लष्करी सामर्थ्याचा देखावा करणे असो वा लष्करी नेतृत्वाला रस्त्यावर वर्चस्व दाखवण्यासाठी प्रोत्साहन देणे असो, ट्रम्प यांचा यावर सातत्याने भर राहिला.

घराबाहेर शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांवर ट्रम्प यांनी अश्रुधुराचा मारा केला आणि व्हाइट हाऊसच्या आवाराभोवती त्यांनी आणखी एका कुंपणाची तटबंदी उभारली. ‘‘सर्वशक्तीनिशी लढा द्या, अन्यथा तुम्हाला तुमचा देश गमवावा लागेल’’ अशी चिथावणी ट्रम्प सतत त्यांच्या कडव्या समर्थकांना देत राहिले. या चिथावणीमुळेच अवघ्या आठवडाभरातच ट्रम्प समर्थकांनी यूएस कॅपिटॉल इमारतीवर चाल केली. ट्रम्प पुरस्कृत हा हिंसाचार थांबवण्यासाठी अमेरिकी पोलीस व अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केले. या धुमश्चक्रीत पाच लोक मारले गेले. हा सगळा प्रकार ट्रम्प टीव्हीवर पाहत होते आणि आतून धुमसत होते.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.