Author : Shoba Suri

Published on Nov 26, 2021 Commentaries 0 Hours ago

ज्या देशांमध्ये हवेची गुणवत्ता सर्वात खराब आहे, अशा देशांच्या क्रमवारीत बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

प्रदुषणामुळे दिल्लीचे भविष्य धोक्यात

ज्या देशांमध्ये हवेची गुणवत्ता सर्वात खराब आहे, अशा देशांच्या क्रमवारीत बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील पार्टिक्युलेटेड मॅटर अर्थात हवेतील कण प्रदुषणाचे २.५ केंद्रीकरण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक हवेविषयीच्या गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वापेक्षा ५.२ पट अधिक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पर्यावरणीय बदलाबरोबरच हवेतील प्रदुषण हा मानवी आरोग्यासाठी असलेल्या सर्वात मोठ्या पर्यावरणीय धोक्यांपैकी एक आहे. १० आणि २.५ मायक्रॉन्स (µm) व्यासापेक्षा (अनुक्रमे पीएम१० आणि पीएम२.५) कमी अथवा लहान हवेतील प्रदुषकांची / कणाकणांची पातळी कमी करून, लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी हवेच्या गुणवत्तेच्या नवीन स्तरांची शिफारस त्यांनी केली आहे. ते केवळ फुफ्फुसांवरच परिणाम करत नाहीत तर पीएम२.५ रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे हृदयावर, रक्तवाहिन्यांवर तसेच श्वसनावरही परिणाम होतो.

हवेतील प्रदुषण हा २०१९ मध्ये जगभरात अकाली मृत्यूंचा चौथा प्रमुख जोखिमेचा घटक होता, ज्याला केवळ उच्च रक्तदाब, तंबाखूचा वापर आणि खराब आहार यांनी मागे टाकले. (आकृती १)

आकृती १: २०१९ साली सर्व कारणांमुळे झालेल्या मृत्यूंच्या एकूण संख्येनुसार जोखीम घटकांची जागतिक क्रमवारी.

स्रोत: स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२०

श्वसन मार्गावर परिणाम करणाऱ्या संसर्गापैकी ३० टक्के संसर्ग हवेतील प्रदुषणामुळे होतो तसेच २० टक्के बालमृत्यू ओढवण्यामागचे कारणही हवा प्रदुषण असते. हवेतील प्रदुषणामुळे संभवणाऱ्या रोगांचे प्रमाण कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अधिक आहे, ज्यामुळे सुमारे ९१ टक्के अकाली मृत्यू होतात (आकृती २). धुक्यापासून घरातील धुरापर्यंत हवेतील प्रदुषण हे जगभरातील आरोग्यासाठी धोकादायक आहे.

घराबाहेरील आणि घरातील हवा प्रदुषणाच्या एकत्रित परिणामांमुळे पक्षाघात, हृदयविकार, फुफ्फुसाचे रोग, श्वसनाचा वायुप्रवाह अवरोधित होऊन श्वास घेणे कठीण होणे, फुफ्फुसाचा कर्करोग आणि तीव्र श्वसन संसर्गामुळे अकाली मृत्यू होतात.

आकृती २: हवेची गुणवत्ता: कृती करण्याची वेळ आली आहे

स्रोत- युनिसेफ 2021

माहिती काय दर्शवते: लहान मुलांना सर्वाधिक धोका असतो

हवेतील प्रदुषणाचा मानवी आरोग्यावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम होतो. हवेतील प्रदुषकांच्या संपर्कात आल्यामुळे अर्भकाच्या जन्मावर आणि मुलांच्या श्वसन प्रणालीवर, रोगप्रतिकारक शक्तीवर, मेंदूच्या विकासावर आणि हृदयासंबंधीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मुलांवर आणि वृद्धांवर सर्वात तीव्र परिणाम होत आहे. (आकृती ३).

आकृती ३: वयानुसार २.५ कण प्रदुषण, ओझोन आणि घरगुती हवा प्रदुषणामुळे २०१९ साली झालेल्या जागतिक मृत्यूचे वर्गीकरण.

स्रोत: स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२०

असुरक्षित लोकांना, त्यातही आकलनविषयक कार्यक्षमतेत घट झाल्याने वृद्धांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसून येते. दमा, श्वसनासंबंधीची इतर लक्षणे, मुलांमधील फुफ्फुसाच्या कार्यात व मुलांच्या वाढीत आलेली कमतरता आणि श्वसनाच्या आरोग्यावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांचा खराब हवेच्या गुणवत्तेशी संबंध असल्याचे अभ्यास दर्शवतो. हवा प्रदुषण आणि मुलांची अपुरी वाढ यांच्यात एक तर्कसंगत दुवा असल्याचे ‘लॅन्सेट’चा अहवाल दर्शवतो.

बाहेरच्या हवेतील प्रदुषणाच्या संपर्कात असलेल्या गर्भवती महिलांमध्ये कमी वजनाचे बाळ जन्मण्याचा धोका वाढलेला असल्याचे एका परीक्षणात दिसून आले आहे. आपल्या देशातील एका अभ्यासात, अस्वच्छ इंधन वापरणाऱ्या घरातील मुलांची वाढ खुंटण्याची शक्यता जास्त असल्याचे आढळून आले आहे.

जगभरातील १५ वर्षांखालील सुमारे ९३ टक्के मुले प्रदुषित हवेत श्वास घेतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या जीवनमानावर अनिष्ट परिणाम होतो. १५ वर्षांखालील एक अब्जाहून अधिक मुले हवा प्रदुषणाच्या संपर्कात आली आहेत. ही आकडेवारी पाच वर्षांखालील मुलांसाठी अधिक वाईट आहे, कारण हवेतील प्रदुषणामुळे त्यांच्यातील १० पैकी एकाचा मृत्यू होतो. जगभरातील नवजात बालकांच्या मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यूंमध्ये हवेतील प्रदुषणाचा वाटा आहे, यातील सर्वाधिक मृत्यू अतिशय कमी वजनामुळे तसेच मुदतपूर्व जन्माच्या गुंतागुंतीशी संबंधित आहेत.

घरगुती हवेतील प्रदुषणामुळे झालेल्या नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूंची टक्केवारी उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियात सर्वाधिक आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत, पाच वर्षांखालील बालकांमध्ये श्वसन मार्गावर परिणाम करणाऱ्या तीव्र संसर्गामुळे (उदाहरणार्थ- न्यूमोनिया आणि तीव्र ब्राँकायटिस) होणाऱ्या सर्व मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू हवेतील प्रदुषणाच्या संपर्कात आल्याने होतात, म्हणूनच हवेतील प्रदुषण जगभरातील मुलांचा प्रमुख मारेकरी बनला आहे.

आकृती ४: २०००-२०१५ दरम्यान भारतात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूची कारणे

स्रोत: द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ २०१९

ज्या देशांमध्ये हवेची गुणवत्ता सर्वात खराब आहे, अशा देशांच्या क्रमवारीत बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील पार्टिक्युलेटेड मॅटर अर्थात हवेतील कण प्रदुषणाचे २.५ केंद्रीकरण हे जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक हवेविषयीच्या गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वापेक्षा ५.२ पट अधिक आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक डॅशबोर्डनुसार, भारत १९२ हवा गुणवत्ता निर्देशांकासह खराब पातळीवर आहे आणि हवा प्रदुषणाचे प्रमाण लक्षात घेता, ९७ देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

उप-राष्ट्रीय स्तरावर ५० हून कमी हवा गुणवत्ता निर्देशांक असलेल्या गोवा, केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू ही राज्ये वगळता, इतर सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये हवा प्रदुषणाची पातळी मध्यम ते घातक (हवा गुणवत्ता निर्देशांक ५१ ते ५०० सह) आहे. ४०० पेक्षा जास्त हवेचा गुणवत्ता निर्देशांक असलेली देशाची राजधानी धोकादायक मानली जाते, त्यानंतर हरियाणा (३९४) आणि उत्तर प्रदेशातील (३११) हवा प्रदुषण गंभीर पातळीवर आहे.

हे तत्कालीन हवा गुणवत्ता निर्देशांकाचे स्तर आहेत आणि ते वाढत आहेत, ज्याचा परिणाम दिवाळीनंतर दिसून येतो.
२०१९ साली, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत फटाके, कापणीनंतरचा पेंढा जाळणे आणि इतर कारणांमुळे हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर घसरल्याचे दिसून आले होते- पर्यावरण प्रदुषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने अथवा ‘इपीसीए’ने तेव्हा सार्वजनिक आरोग्यविषयक आणीबाणी घोषित केली. हवेतील प्रदुषणाने श्वसनाच्या समस्या निर्माण होऊन मुलांना सर्वाधिक फटका बसला; अशा प्रदुषित हवेच्या वाढत्या संपर्कामुळे मुलांना दमा आणि ब्राँकायटिसचा धोका वाढतो.

२०२० मध्ये कोविड-१९ साथीदरम्यान लॉकडाऊनमुळे विकसनशील राष्ट्रांच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. २०२० साली, भारतातील १५ प्रमुख शहरांच्या केलेल्या एका अभ्यासात, लॉकडाऊन दरम्यान वीजनिर्मिती प्रकल्प बंद झाल्याने आणि वाहनांच्या हालचालींवर निर्बंध आल्याने प्रदुषकांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीनंतर हवेतील प्रदुषण वाढल्याने आणि हवेची गुणवत्ता खराब झाल्यामुळे ही घट कायम राहू शकली नाही. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि लगतच्या प्रदेशात दिवाळीच्या वेळी फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होती.

आता कृती करण्याची वेळ आली आहे

‘नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम’तर्फे हवेतील प्रदुषकांच्या पातळीचे निरीक्षण आणि उल्लंघनाची नोंद केली जाते. या वर्षी फटाक्यांवर बंदी असतानाही याहून वेगळे घडले नाही, राज्यभरात यासंबंधीच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ५०० चा टप्पा ओलांडल्यामुळे, इतर अनेक विभागांसह दिल्लीला सर्वाधिक फटका बसला आहे. पंजाब आणि हरियाणा या शेजारील राज्यांत कापणीनंतरचा पेंढा जाळल्यानंतर आणि उत्तरेकडील प्रदेशांच्या तापमानात घट झाल्यानंतर ही स्थिती आणखी वाईट होईल.

हवेच्या गुणवत्तेमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाची शक्यता वाढते, शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करून, एखाद्या व्यक्तीस श्वसन आणि इतर संक्रमणाबाबत अधिक संवेदनक्षम बनवते. याचा मुलांना जास्त धोका असेल— कोविड-१९ मुळे घरात दीर्घकाळ राहिल्यामुळे पुरेशा शारीरिक हालचालींचा अभाव आणि सामाजिक संवादाचा अभाव याचा मुलांवर आधीच अनिष्ट परिणाम झाला आहे. फळे आणि भाज्यांसह अँटिऑक्सिडंट-समृद्ध आहाराचे सेवन वाढल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

हवेतील वाढत्या प्रदुषणामुळे आणि २०५० पर्यंत पाच वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर दुप्पट होण्याच्या प्रतिकूल अंदाजामुळे, सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक शाश्वत विकास उद्दिष्टांविषयक प्रगती साधण्याकरता हवेतील प्रदुषण कमी करणेही महत्त्वाचे आहे. प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारताने केंद्र आणि राज्य स्तरावर अनेक पावले उचलली आहेत- मग ते ‘सीएनजी’चा वापर असो, दिल्लीतील ‘विषम-सम’ उपाय असो, स्वच्छ इंधनासाठी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ किंवा ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ असो. २०७० सालापर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याची घोषणा अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे, आता कृती करण्याची वेळ आली आहे.

‘इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ने सर्वसहमतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, आरोग्यसेवा पायाभूत सुविधांचे विविध स्तरांवर बहुआयामी धोरण आणि मुलांवर हवा प्रदुषणाचे परिणाम तपासण्यासाठी घराबाहेरील आणि घरातील हवा प्रदुषण कमी करण्यासाठी उपाय योजण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. विशेषत: औद्योगिक आणि वाहनांच्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी, तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपायांसह कठोर धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास हवेतील प्रदुषणाच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल.

(हे भाष्य आधी ‘न्यूज १८’ येथे प्रकाशित झाले आहे.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.