Published on Feb 06, 2024 Updated 0 Hours ago

अलीकडे चीनच्या सैन्यातील विविध विभागांच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींच्या झालेल्या उचलबांगडीवरून दिसून येते की, लाचखोरीबाबत कठोर होऊन, शी जिनपिंग आगामी लढायांसाठी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या लढाऊ क्षमतेची पुनर्रचना करत आहेत.

शी जिनपिंग यांनी कापले ‘पीएलए’च्या उच्च अधिकाऱ्यांचे पंख

चीनची संसद म्हणून काम करणाऱ्या ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’मधून वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकल्यानंतर ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधील शुद्धीकरण वाढत असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच वेळी, चीनमध्ये भ्रष्टाचारविरोधी आख्यानाचा मोठा प्रतिध्वनी उमटला आहे.

कायदेशीर आणि विचारविनिमय करणाऱ्या संस्थांकडून बाहेरचा दरवाजा दाखविलेल्यांमध्ये लष्करी विभागांच्या उच्चभ्रू विभागातील कर्मचाऱ्यांचा आणि संरक्षण-औद्योगिक संकुलाचा समावेश आहे. त्यातील लेफ्टनंट जनरल झांग झेंझोंग आणि राव वेनमिन यांनी केंद्रीय लष्करी आयोगात (सेंट्रल मिलिटरी कमिशन) काम केले होते, ज्यांना संरक्षण सेवांच्या देखरेखीचे काम देण्यात आले होते; लेफ्टनंट जनरल झांग युलिन हे केंद्रीय लष्करी आयोगाच्या उपकरण विकास विभागात कार्यरत होते; रॉकेट दलातील सर्वोच्च अधिकारी जनरल झोउ यानिंग, आणि त्यांचे उत्तराधिकारी, जनरल ली युचाओ, जे उच्चभ्रू लष्करी विभागात देशाच्या आण्विक शस्त्रागाराचे संरक्षक आहेत; आणि लेफ्टनंट जनरल ली चुआंगुआंग. जनरल डिंग लायहांग, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या हवाई दलाचे माजी कमांडर आणि व्हाइस अॅडमिरल जू शिनचुन ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या दक्षिण विभागीय कमांडचे माजी उपकमांडर आहेत. ‘पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स’ने ‘चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’चे नेतृत्व करणारे वू यानशेंग, ‘चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन’चे वांग चांगकिंग, जे क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत, आणि लिउ शिक्वान, ज्यांनी ‘चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन’ आणि ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’साठी शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्या ‘चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रूप कॉर्पोरेशन’मध्ये काम केले आहे, यांच्यासारख्या तंत्रज्ञानविषयक तज्ज्ञाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे; अलीकडे, माजी संरक्षण मंत्री ली शांगफू आणि माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातील अनुपस्थितीमुळे ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या सर्वोच्च नेतृत्वात मंथन झाले आहे. नेतृत्वात करण्यात आलेला असा अचानक बदल रॉकेट दलातही पाहायला मिळाला. अलीकडच्या काळात, चीनमधील आर्थिक दुरवस्थेची तीव्रता वाढलेली आहे. नव्या वर्षाच्या संदेशात, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ दैनिकाने भ्रष्टाचाराच्या धोक्यांबद्दल नेत्यांसह सर्वसामान्य सदस्यांनाही चेतावणी दिली. याआधी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना जर्नल’- ‘क्युशी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाच्या लेखा परीक्षकांना उद्योग, तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांच्या कामकाजाची बारकाईने तपासणी करण्याचे आवाहन केले.

शी जिगपिंग यांच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून असलेल्या अपेक्षा आणि वास्तव

ऑक्टोबर २०२२ मध्ये २०व्या ‘नॅशनल पार्टी काँग्रेस’मध्ये केलेल्या भाषणात शी जिनपिंग यांनी त्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’साठीच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले. संरक्षण-संबंधित विज्ञान आणि तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे आणि उपकरणे यांच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यावर भर देत, जागतिक दर्जाचे सैन्य तयार करणे हा चीनच्या आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे यांवर त्यांनी भर दिला. त्यांनी लढाऊ क्षमतांमध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला गती देण्याचे वचन दिले. अलिकडच्या वर्षांत, २००० ते २०१६ दरम्यान एका दशकाहून अधिक काळ सैन्यावरील खर्च दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत असताना, संरक्षण विभागाकडे मुबलक निधी आहे. गेल्या वर्षी, चीनच्या संरक्षण बजेटमध्ये ७.२ टक्क्यांनी- सुमारे १.५५ ट्रिलियन युआनने (२२४ अब्ज अमेरिकी डॉलर्स) वाढ झाली,  पारंपरिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांची जबाबदारी पेलणाऱ्या रॉकेट दलाच्या विभागातील ‘स्पष्ट कमतरता’ उघड करणाऱ्या ‘पीपल्स डेली’त प्रकाशित झालेल्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या अहवालातील निष्कर्षांनुसार, संरक्षण क्षेत्राला झालेल्या उच्च निधी वाटपाचा ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ श्रेष्ठतम बनण्याकरता फायदा झाल्याचे दिसून येत नाही. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ आणि त्याच्या लष्करी-औद्योगिक विभागांतील भ्रष्टाचारामुळे चीनची संरक्षण सज्जता बिघडली आहे, अशा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी केलेल्या मूल्यांकनाने आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यात पश्चिम चीनमधील क्षेपणास्त्र विभागात खराब झालेले झाकण आणि इंधनाऐवजी पाण्याने भरलेली क्षेपणास्त्रे यांची उदाहरणे दिली आहेत. ‘केंद्रीय लष्करी आयोग’, जे लष्कराचा सर्वोच्च निर्णय घेणारे प्राधिकरण आहे, त्यांच्याकडे हे प्रकरण सोपवले गेले आहे आणि त्यांनी अधिक पारदर्शकता आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ‘केंद्रीय लष्करी आयोगा’चे उपाध्यक्ष जनरल झांग युक्सिया यांनी म्हटले आहे की, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या संपादन आणि संशोधन विभागाने शी जिनपिंग यांचे आधुनिकीकरणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि लढाया जिंकण्याची क्षमता विकसित करण्यासाठी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करायला हवे. झांग यांनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’करता इतर प्राधान्यक्रमही अधोरेखित केले. जसे की: युद्ध क्षेत्रातील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या तरतुदी प्रदान करणे; शस्त्रास्त्रांच्या विकासात प्रगत तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत सुधारणा करणे; आणि प्रणाली अद्ययावत करणे.

पारंपरिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांची जबाबदारी पेलणाऱ्या रॉकेट दलाच्या विभागातील ‘स्पष्ट कमतरता’ उघड करणाऱ्या ‘पीपल्स डेली’मधील ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या अहवालातील निष्कर्षांनुसार संरक्षण क्षेत्रातील उच्च वाटपामुळे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला श्रेष्ठतेचा फायदा मिळाल्याचे दिसत नाही.

‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ आणि ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ यांच्यातील गुंतागुंतीचे नाते

‘पक्षाने बंदूक चालवायलाच हवी’ या माओवाद्यांच्या आदेशाचे ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ पालन करते. आपल्या सेनापतींप्रति अढळ निष्ठा मिळवण्याचा तिचा प्रयत्न असतो. चीनच्या निर्णय घेणाऱ्या संस्था असलेल्या पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समितीत ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे प्रतिनिधित्व आहे. दोन ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ जनरल पॉलिटब्युरोवर असतात, तर केंद्रीय समितीतील, २०५ कायमस्वरूपी आणि १७१ वैकल्पिक सदस्यांपैकी सैनिकी विभागाचा वाटा सुमारे २० टक्के असतो. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’मधील उच्चभ्रू अधिकाऱ्यांच्या निकटतम कुटुंबांचा चीनच्या संरक्षण औद्योगिक संकुलात मोठा हिस्सा होता. उदाहरणार्थ, वरिष्ठ चिनी नेते डेंग झियाओपिंग, ये जियानिंग आणि यांग शांगकुन यांच्या नातेवाईकांचे चीनच्या बड्या संरक्षण कंपन्यांशी संबंध होते. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ची शक्ती संरचना आणि चीनच्या राजकीय व्यवस्थेतील अभेद्यता हे भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. अलीकडच्या काळात, ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ने पक्ष सदस्यांकरता निकटतम कुटुंबाच्या आणि नातेवाईकांच्या व्यावसायिक उपक्रमांचे प्रकटीकरण अनिवार्य करणारी मार्गदर्शक तत्त्वे लागू करून लागेबांधे विषयीच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पीपल्स डेली’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात असे म्हटले आहे की, ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चे सदस्य ‘विशेष स्वारस्य गटांची’ सेवा करत नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी नियमांची आवश्यकता होती, पक्ष सदस्यांच्या नातेवाईकांना नियमबाह्य नफा मिळविण्यासाठी मदत करण्याच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या अनैतिक उपक्रमांमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला, याबाबत पक्षाने विलाप केला.  मात्र, राजकीय आणि लष्करी उच्चभ्रू यांच्यातील परस्परांत गुंतलेल्या हितसंबंधांमुळे संरक्षण-उत्पादन व्यवस्थेतील भ्रष्टाचार नष्ट करणे कठीण झाले आहे.

संसाधने आणि निधी मुबलक असलेल्या सरकारी मालकीच्या उद्योगांसारख्या क्षेत्रातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी तपासनीसांची गरज शी जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे.

सारांश असा की, प्रथम, ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’मधील पारंपरिक विचार असा होता की, प्राधान्य क्षेत्रात सतत आर्थिक वाटप केल्याने त्यांची इच्छित उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होईल. शी यांनी लेखापरीक्षकांना पैसे सावधपणे खर्च करतात का याची पडताळणी करण्याचे आदेश दिल्याने, यातून शिस्त सुधारण्याचा त्यांचा संकल्प दिसून येतो. दुसरे असे की, केंद्रीय शिस्त तपासणी आयोगाची अलीकडेच बैठक झाली, जी लाचखोरी तपासण्यासाठीची ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ची प्रमुख यंत्रणा आहे. हे भविष्याकरता एक सूचक आहे. संसाधने आणि निधी मुबलक असलेल्या सरकारी मालकीच्या उद्योगांसारख्या क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी तपासकर्त्यांची गरज शी जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे. व्यावसायिक हितसंबंध आणि राजकीय प्रतिष्ठान यांच्यातील मिलीभगत मोडून काढण्याला प्राधान्य राहील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत, त्यामुळे आगामी काळात त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला वाव मिळेल असे दिसते. अखेरीस, विशेषत: भारत-चीन सीमेवर तणावपूर्ण स्थिती आणि मोठ्या प्रमाणावर सैन्याची उभारणी कायम आहे हे लक्षात घेता, शी जिनपिंग आणि ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे नेतृत्व यांच्यातील ताणलेले संबंध कदाचित एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवातून दुसऱ्याला मिळालेला आनंद या अर्थाने तयार झाले असावेत. तरीही, सैन्याची करण्यात आलेली पुनर्रचना सूचित करते की, लाचखोरीबाबत कठोर होऊन, शी जिनपिंग आगामी लढायांसाठी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या लढाऊ क्षमतेची पुनर्रचना करत आहेत.

कल्पित ए मंकीकर हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राम’चे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.