Author : Don McLain Gill

Published on Feb 13, 2024 Updated 0 Hours ago

इंडो-पॅसिफिक हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या केंद्रस्थानी आहे.  त्यामुळे फिलीपाईन्सने या क्षेत्रातील आपली भूमिका वाढवून या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

बदलत्या भू-राजकीय वातावरणात फिलीपाईन्सला “लुक वेस्ट” धोरणाची आवश्यकता

भारतीय नौदलाने 5 जानेवारी रोजी हिंदी महासागर प्रदेशाच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्रात लायबेरियन-ध्वज असलेल्या MV लिला नॉरफोकचे अपहरण करण्याचा समुद्री चाच्यांचा प्रयत्न हाणून पाडला. या व्यापारी जहाजात 21 कर्मचाऱ्यांपैकी 6 फिलिपाईन्सचे नागरिक होते. हिंदी महासागराच्या प्रदेशात चाचेगिरीची समस्या वाढते आहे. त्याचवेळी  लाल समुद्रातील बहु-राष्ट्रीय व्यापारी जहाजांवर हौथी अतिरेक्यांचे हल्ले सुरू आहेत. त्यामुळे हिंदी महासागराच्या क्षेत्रातील सुरक्षेत आणखी वाढ करावी लागणार आहे. या क्षेत्रात सुरक्षेबाबत लक्षणीय आव्हानांचा सामना करावा लागत असल्यामुळे  पश्चिमेला अनुकूल परराष्ट्र धोरण तयार करणे आणि ते कार्यान्वित करणे फिलीपाईन्ससाठी महत्त्वाचे आहे. 

1946 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून, फिलीपाईन्सच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनात महत्त्वाचे बदल होत आहेत. यातला सर्वात लक्षणीय बदल 2010 मध्ये दिसून आला. या देशाने सागरी सुरक्षेवर भर देऊन अंतर्गत धोक्यांकडून बाह्य धोक्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले. चीनची दक्षिण चीन समुद्रातील विस्तारवादी महत्त्वाकांक्षा हे त्यामागचे कारण आहे. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द सी लॉ (UNCLOS) आणि 2016 च्या लवादाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून चीन विवादित जलक्षेत्रामध्ये सैन्य तैनात करतो आहे पण पश्चिम फिलीपीन समुद्रावर चीनचे विस्तारित दावे रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये दक्षिण चीन समुद्राच्या फिलीपाईन्सच्या अंतर्गत असलेल्या भागाचा  समावेश होतो. त्याचबरोबर प्रादेशिक समुद्र आणि 200 नॉटिकल मैल क्षेत्रात विकसित होणाऱ्या आर्थिक क्षेत्राचाही यात अंतर्भाव होतो. 

फिलीपाईन्सने सागरी सुरक्षेवर भर देऊन अंतर्गत धोक्यांकडून बाह्य धोक्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले. चीनची दक्षिण चीन समुद्रातील विस्तारवादी महत्त्वाकांक्षा हे त्यामागचे कारण आहे. 

परराष्ट्र धोरण आणि बाह्यशक्तींचे धोके यांच्यातील परस्परसंबंध लक्षात घेता फिलीपाइन्सने पश्चिम फिलीपीन समुद्रातील सुरक्षेमध्ये गतिमानता आणली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील सत्तास्पर्धेने फिलीपाइन्सला मुख्यतः पश्चिम पॅसिफिक केंद्रित धोरणाला प्राधान्य देण्यास प्रवृत्त केले आहे. पश्चिम फिलीपीन समुद्राच्या क्षेत्रातील स्थैर्यासाठी फिलीपाइन्सने पश्चिम पॅसिफिक केंद्रीत परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे.  तरीही हिंदी महासागराच्या क्षेत्रात या देशाची वाढती भागीदारी ओळखणेही तितकेच आवश्यक आहे. हा युक्तिवाद अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाच्या तीन घटकांचा विचार केला पाहिजे.

फिलीपाईन्सचे खलाशी जगभरात आघाडीवर आहेत. सर्व जागतिक व्यापारी जहाज कर्मचाऱ्यांपैकी एक चतुर्थांशहून अधिक फिलिपीनो नागरिक देशांतर्गत किंवा परदेशी ध्वजांकित जहाजांवर तैनात आहेत. याची संख्या अंदाजे 3 लाख 80 हजारच्या घरात जाते. एकूण वार्षिक व्यापारात हिंदी महासागराचे योगदान 6 ट्रिलियन अमेरिकी डाॅलर्सपेक्षा जास्त आहे. हे लक्षात घेता फिलिपिनो खलाशी मोठ्या प्रमाणात सतत समुद्रातून प्रवास करत असतात. हिंदी महासागरात चाचेगिरी आणि सागरी दहशतवादापासून ते अंमली पदार्थ आणि बंदुकीची तस्करी, मानवी तस्करी यासारख्या सुरक्षा धोक्यांचे प्रमाण इथे जास्त आहे.  लायबेरियन ध्वजांकित जहाजाचा अपहरणाचा प्रयत्न हा समुद्रातील अशा धोक्यांचा मोठा पुरावा आहे. खरं तर सोमाली चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या खलाशांपैकी अर्ध्याहून अधिक फिलिपाइन्सचे नागरिक आहेत. शिवाय हौथी अतिरेक्यांचे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे फिलिपिनो खलाशांना हिंदी महासागराचे क्षेत्र ओलांडल्यानंतर अधिक धोकादायक प्रवासाचा सामना करावा लागणार आहे.

फिलिपाईन्सच्या लोकसंख्येपैकी 10 टक्क्यांहून अधिक लोक परदेशात काम करतात. तिथे ते विविध व्यवसाय करतात. फिलीपाइन्सच्या सांख्यिकी प्राधिकरणानुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंत सुमारे 1.96 दशलक्ष परदेशी फिलिपिनो कामगार होते. यातले बहुतेक कामगार सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान सारख्या आखाती देशांमध्ये काम करतात. त्याच वेळी सुमारे 1 टक्के लोक आफ्रिकेत राहतात.  इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेमध्ये आधीच अस्थिरता आहे. त्यामुळे या कामगारांच्या सुरक्षेची चिंता आणखी वाढली आहे.

हिंदी महासागरात चाचेगिरी आणि सागरी दहशतवादापासून ते अंमली पदार्थ आणि बंदुकीची तस्करी, मानवी तस्करी यासारख्या धोक्यांचे प्रमाण जास्त आहे.

हिंदी महासागराच्या क्षेत्रात जागतिक सागरी तेल व्यापाराचा सुमारे 80 टक्के समावेश होतो तर दरवर्षी सुमारे 9.84 अब्ज टन माल या प्रदेशाच्या सागरी हद्दीतून जातो. पॅसिफिकमधील विकसनशील देश मध्य पूर्वेकडील कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असतात. या सगळ्या तेलाची वाहतूक हिंदी महासागरातून होते. इतर आग्नेय आशियाई देशांच्या तुलनेत फिलीपाईन्सचा ऊर्जेचा वापर कमी असला तरी फिलीपाईन्स तेलाचा निव्वळ आयातदार आहे. 2023 मध्ये फिलीपाईन्सने एकूण तेलाच्या 70 टक्क्यांहून अधिक तेलाची आयात केली. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार आणि ओमान या देशातून फिलीपाइन्स तेल आयात करत असतो. हिंदी महासागारातील महत्त्वाच्या समुद्री मार्गांच्या सुरक्षेवर फिलीपाईन्स किती अवलंबून आहे हे यावरून स्पष्ट होते.

परदेशात काम करणाऱ्या फिलिपिनी नागरिकांचे संरक्षण आणि आर्थिक सुरक्षितता हे फिलीपाईन्सच्या परराष्ट्र धोरणाच्या तीन प्रमुख स्तंभांपैकी दोन आहेत. म्हणूनच हिंदी महासागराच्या क्षेत्राचे   महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक मजबूत आणि दूरगामी परराष्ट्र धोरण तयार करणे फिलीपाईन्ससाठी महत्त्वाचे आहे. या प्रदेशात फिलीपाईन्सची मर्यादित राजनैतिक उपस्थिती त्याचा भूगोल आणि पश्चिम पॅसिफिकमधील घनिष्ठ आर्थिक आणि सुरक्षा संबंधांमुळे होती. परंतु इंडो-पॅसिफिक भू-राजकीय बांधणीचा उदय फिलीपाईन्सला आता एक नवी संधी प्रदान करतो. फिलीपाइन्स हा केवळ आग्नेय आशियाई देश म्हणून नाही तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मध्यम शक्ती म्हणून विकसित होतो आहे. 

फिलीपाईन्सने 2016 पासून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या वाढत्या अनिश्चिततेमुळे धोरणात्मक भागीदारांच्या वैविध्यतेला प्राधान्य दिले आहे. राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्या सध्याच्या प्रशासनात मनिलाने गैर-पारंपारिक भागीदारांसोबत सुरक्षा आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यावर खूप भर दिला आहे. फिलीपाईन्सने आपल्या पाश्चात्य शेजाऱ्यांशी घनिष्ठ भागीदारी निर्माण केली आहे. फिलीपाईन्स आणि भारत यांच्यातील सुरक्षा भागीदारी मजबूत करणे ही सर्वात उल्लेखनीय घडामोडींपैकी एक आहे. ब्राह्मोस करारापासून ते फिलीपाईन्स आणि भारतीय तटरक्षक दल यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यापर्यंत हे दोन्ही देश सातत्याने विशेषत: सागरी सुरक्षेमध्ये त्यांच्या संबंधांची व्याप्ती अधिक गहन आणि विस्तृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. फिलीपाईन्सला आपल्या तटरक्षकांसाठी भारताकडून सात हेलिकॉप्टर्स हवी आहेत. दोन्ही बाजू संयुक्त सागरी कवायतींची वारंवारता वाढविण्याचाही विचार करत आहेत.

मनिलाने आपल्या पाश्चात्य शेजाऱ्यांशी घनिष्ठ भागीदारी निर्माण केली आहे. फिलीपाईन्स आणि भारत यांच्यातील सुरक्षा भागीदारी मजबूत करणे ही सर्वात उल्लेखनीय घडामोडींपैकी एक आहे.

वाढत्या द्विपक्षीय संबंधांमुळे फिलीपाईन्सला हिंदी महासागरामध्ये आपले हित अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने हिंदी महासागरातील सुरक्षा प्रदाता म्हणून काम करण्यात सातत्य राखले आहे.  लायबेरियन ध्वजांकित जहाजाची सुरक्षा आणि जतन करण्यात भारतीय नौदलाचे यश हे या प्रदेशातील प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून भारताच्या प्रसिद्ध भूमिकेचा पुरावा आहे. फिलिपिनो खलाशांना भेडसावणारे धोके पाहता गुप्तचर माहितीची देवाणघेवाण अधिक सखोल करणे आणि भारतासोबत नौदल आंतरकार्यक्षमता सहकार्य सुधारणे यावर लक्ष दिल्यास फिलीपाईन्सला याचा लक्षणीय फायदा होईल. राजनैतिक आघाडीवर इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA) सारख्या संस्थांमध्ये सहभागी होणे फिलीपाईन्सच्या हिताचेच आहे.  यामध्ये सिंगापूर, इंडोनेशिया आणि थायलंड हे सदस्य आहेत तर चीन, जपान आणि दक्षिण कोरिया संवाद भागिदार आहेत. फ्रान्सचे संस्थात्मक सदस्यत्व सुलभ करण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची होती. त्याचप्रमाणे हिंदी महासागराचच्या क्षेत्रात संवाद भागीदार म्हणून फिलीपाईनस्च्या संभाव्य समावेशासाठी भारत एक महत्त्वाचा दुवा आहे. हिंदी महासागराच्या क्षेत्रात सक्रीयपणे गुंतल्यास फिलीपाईन्सला सदस्य आणि संवाद भागीदार देशांना सहकार्य करता येईल. हिंदी महासागराच्या स्थैर्यासाठी हा देश अधिक योगदान देऊ शकेल. तसेच या क्षेत्रात फिलीपाईन्सच्या राजनैतिक पाऊलखुणाही उमटतील.  

फिलीपाईन्स भारताप्रमाणेच संयुक्त अरब अमिरातीसोबत आपले सुरक्षा संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहे. दोन्ही बाजूंनी लवकरच संरक्षण सहकार्यावर सामंजस्य करार होईल, अशी अपेक्षा आहे. हा करार आखाती देशासोबत फिलीपाईन्सचा पहिलाच संरक्षण करार असेल. ऑक्टोबर 2023 मध्ये आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेच्या (ASEAN) गल्फ कोऑपरेशन कौन्सिल समिटमध्ये मार्कोस ज्युनियर देखील सहभागी झाले होते. संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया हे हिंदी महासागर आणि ऊर्जेच्या भू-राजकारणातील प्रभावशाली देश आहेत. त्यामुळे अबुधाबी आणि रियाधसोबतचे संबंध मजबूत केल्यास फिलीपाईन्सला ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी अधिक मार्ग उपलब्ध होतील. या दोन्ही आखाती देशांसोबत मनिलाचे धोरणात्मक सहकार्य नुकतेच आकार घेऊन लागले आहे. फिलीपिन्सला ही वाढती गती टिकवून ठेवण्यासाठी आणि अखेरीस इतर प्रादेशिक देशांशी संलग्नतेची व्याप्ती विस्तृत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.  

ऑक्टोबर 2023 मध्ये आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेच्या (ASEAN) गल्फ कोऑपरेशन कौन्सिल समिटमध्ये मार्कोस ज्युनियर देखील सहभागी झाले होते.  संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया हे हिंदी महासागर आणि ऊर्जेच्या भू-राजकारणातील प्रभावशाली देश आहेत.

फिलीपाईन्सने पारंपारिकपणे हिंदी महासागराच्या क्षेत्रात पली उपस्थिती तेवढी प्रभावीपणे ठेवलेली नाही. परंतु आता आंतरराष्ट्रीय भू-राजनीतीतील बदलांशी फिलीपाईन्सलाही जुळवून घ्यावे लागणार आहे.  इंडो-पॅसिफिक क्षेत्र आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या केंद्रस्थानी आल्यामुळे फिलीपाईन्सने या क्षेत्रात सक्रीय भूमिका घेणे गरजेचे आहे.  आपल्या धोरणात्मक गणनेत या क्षेत्राचे प्रतिनिधित्व वाढवून या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच फिलीपाईन्सने पूर्वेकडच्या देशांसोबतच निर्विवादपणे पश्चिमेकडेही पाहायला हवे.   

 

डॉन मॅक्लेन गिल हे फिलीपाईन्सशी संबंधित भू-राजकीय विश्लेषक, लेखक आणि डी ला सॅले विद्यापीठातील  (DLSU) आंतरराष्ट्रीय अभ्यास विभागाचे प्राध्यापक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.