Expert Speak Raisina Debates
Published on Apr 26, 2024 Updated 0 Hours ago

सध्या जपान चीनी आक्रमकतेचा सामना करत आहे. याच पार्श्वभुमीवर, अमेरिकेसोबत नवीन धोरणात्मक हेतूने क्षमता बांधणी करणे जपानसाठी फायद्याचे ठरणार आहे. 

अमेरिका-जपान शिखर परिषद : इंडो- पॅसिफिकच्या भवितव्याची शाश्वती

वाढता प्रादेशिक तणाव आणि बदलत्या आंतरराष्ट्रीय गतिमानतेच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका व जपानदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या शिखर परिषदेत द्विपक्षीय संबंधांना आकार देण्यासाठी आणि व्यापक भू-राजकीय प्रवाहांवर प्रभाव टाकण्यासाठी निर्णायक चर्चा करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या बैठकीला तीन अस्थिर आंतरराष्ट्रीय परिस्थितींची पार्श्वभूमी होती. यात रशिया-चीन युती, दक्षिण चीन समुद्र आणि तैवान सामुद्रधुनीमध्ये चीनची वाढलेली आक्रमकता आणि दीर्घकाळ चाललेल्या रशिया- युक्रेन युद्धाची अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणावर पडली छाया यांचा समावेश आहे.

जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी त्यांच्या युनायटेड स्टेट्सला दिलेल्या भेटीदरम्यान, वाढती जागतिक आव्हाने आणि संरक्षणविषयक बिघडलेले वातावरण लक्षात घेता जपान व यूएस यांच्यातील युतीची गरज अधोरेखित केली आहे. यूएस काँग्रेसला संबोधित करताना, पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी भविष्यातील व्हिजनवर लक्ष केंद्रित केले आहे. ही दृष्टी साकार करण्यासाठी जपान आणि अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असे त्यांनी त्यांच्या राजनयिक अनुभवांच्या आधारे म्हटले आहे. भविष्यात यूएस नेतृत्वाभोवती अनिश्चितता असूनही, किशिदा यांनी यूएस-जपान युतीसाठी द्विपक्षीय समर्थनाची पुष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. यात यूएस काँग्रेसला संबोधित करण्यासारख्या विश्वासार्ह भुमिकेचाही समावेश केला आहे. राजकीय बदलांची पर्वा न करता स्वत:ला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान देऊन मुक्त व्यापार आणि नियम-आधारित आर्थिक सुव्यवस्थेसाठी आपली वचनबद्धता प्रदर्शित करण्याचे जपानचे उद्दिष्ट आहे.

भविष्यात यूएस नेतृत्वाभोवती अनिश्चितता असूनही, किशिदा यांनी यूएस-जपान युतीसाठी द्विपक्षीय समर्थनाची पुष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. यात यूएस काँग्रेसला संबोधित करण्यासारख्या विश्वासार्ह भुमिकेचाही समावेश केला आहे.

यूएस व जपान यांच्यातील भागीदारी दोन्ही देशांसाठी तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय जटिल आव्हानांशी झुंजत असताना व जपानच्या आसपासचे सुरक्षा वातावरण अधिक आव्हानात्मक होत असताना, या शिखर परिषदेमुळे जागतिक स्तरावर नेतृत्वाची भुमिका बजावण्यासाठी जपान  तयार असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील सुधारणा, वाढता संरक्षण खर्च, जपान व आरओके यांच्या संबंधातील सुधारणा आणि आग्नेय आशिया, पॅसिफिक बेटे व युक्रेन यांना पाठिंबा यासह इंडो-पॅसिफिकमध्ये जपानच्या सक्रिय भूमिकेचीही ही एकप्रकारे पावती आहे. किशिदा यांनी नमूद केल्याप्रमाणे, जपान आता अमेरिकेचा “जागतिक भागीदार” म्हणून काम करण्यास तयार आहे. नेत्यांकडून अपेक्षित असलेल्या घोषणांमध्ये मजबूत संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, महत्त्वपूर्ण नागरी अंतराळ सहकार्य उपक्रम, उदयोन्मुख तंत्रज्ञानातील प्रमुख संशोधन भागीदारी आणि आर्थिक संबंध व सुरक्षा मजबूत करण्यासाठी विविध व्यावसायिक सौद्यांचा समावेश आहे.

धोरणात्मक दृष्टीकोनातून, शिखर परिषदेमुळे जपानला यूएस बरोबरची आपली युती मजबूत करण्याची एक मोलाची संधी मिळाली आहे. ही बाब जपानच्या संरक्षण धोरणासाठी महत्त्वपूर्ण आहे. जपानची ऐतिहासिक राष्ट्रीय सुरक्षा रणनीती, वाढीव संरक्षण खर्च आणि काउंटरस्ट्राइक क्षमतांचे संपादन यांसारख्या बाबी या प्रदेशातील अमेरिकेच्या धोरणात्मक हितसंबंधांशी संरेखित आहे. इंडो-पॅसिफिकमधील आव्हानात्मक सुरक्षा परिस्थिती विशेषत: चीनचा उदय आणि उत्तर कोरियाकडून सततच्या धोक्यांमधून जपान नेव्हिगेट करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच, हे संरेखन जपानसाठी महत्त्वपूर्ण आहे. शिखर परिषदेत लष्करी आणि संरक्षण उपकरणांचा विकास आणि संभाव्य सह-उत्पादनावर सहकार्याचा प्रस्ताव असेल, असे अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री कर्ट कॅम्पबेल यांनी यापूर्वी सुचवले होते. दशकांपूर्वी स्थापन झाल्यापासून द्विपक्षीय युतीमध्ये “सर्वात महत्त्वपूर्ण” अपग्रेड म्हणून या शिखर परिषदेचा उल्लेख अध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे.  या सहकार्याच्या प्रमुख ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणून धोरणात्मक सहकार्यावर अधिक भर देण्यात आला आहे. बायडन यांनी ऑकसच्या सुरक्षा फ्रेमवर्कच्या पिलर २ मध्ये जपानच्या सहभागाची शक्यता देखील वर्तविली आहे. आर्थिकदृष्ट्या, या शिखर परिषदेने अवकाश, क्लाउड आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चर तसेच अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामधील प्रमुख संशोधन भागीदारीसह विविध उपक्रमांद्वारे जपानला अमेरिकेसोबतचे आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या संधी प्रदान केल्या आहेत. वाढत्या स्पर्धात्मक जागतिक लँडस्केपमधील आर्थिक सुरक्षेच्या संदर्भात, दोन्ही देशांनी जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचा वापर करणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासह, न्युक्लिअर फ्यूजन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकास आणि व्यावसायिकीकरणाला गती देण्यासाठी संयुक्त भागीदारीची घोषणा केली आहे.

दशकांपूर्वी स्थापन झाल्यापासून द्विपक्षीय युतीमध्ये “सर्वात महत्त्वपूर्ण” अपग्रेड म्हणून या शिखर परिषदेचा उल्लेख अध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. या सहकार्याच्या प्रमुख ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणून धोरणात्मक सहकार्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

याआधी ७ एप्रिल रोजी अमेरिका, फिलीपाईन्स, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी दक्षिण चीनी समुद्रात केलेल्या संयुक्त नौदल सरावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आहे. या महत्त्वाच्या पण अस्थिर सागरी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचे समर्थन करण्याच्या त्यांच्या एकत्रित भूमिकेचे संकेत देणे हे या सरावाचे मुख्य उद्दिष्ट होते. फिलीपिन्ससोबतच्या प्रथम त्रिपक्षीय शिखर परिषदेच्या माध्यमातून प्रादेशिक स्थिरतेवर भर देण्यात आला आहे. तसेच, या प्रदेशातील राष्ट्रांना त्यांच्या सार्वभौम हक्कांचे रक्षण करण्यासाठी यूएस आणि जपान कटीबद्ध असल्याच्या धोरणात्मक उद्दिष्टालाही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. जपानच्या व्यापक परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांचा विचार करता ही बाब महत्त्वपुर्ण तर आहेच पण त्यासोबत प्रादेशिक गतिशीलतेला आकार देण्याच्या त्याच्या सक्रिय भूमिकेचेही यातून दर्शन घडले आहे. त्रिपक्षीय बैठकीदरम्यान, तिन्ही राष्ट्रांच्या नेत्यांनी इंडो-पॅसिफिकमधील जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक कॉरिडॉरसाठी पहिल्या भागीदारीचा भाग म्हणून लुझोन इकॉनॉमिक कॉरिडॉर लाँच केला आहे. जपान, फिलीपाईन्स आणि अमेरिका यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीनंतर घोषित करण्यात आलेला लुझोन कॉरिडॉर हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील फिलीपाईन्समधील सुबिक बे, क्लार्क, मनिला आणि बटांगास यांना जोडणाऱ्या ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट (पीजीआयआय) कॉरिडॉरसाठीचे पहिले पाऊल आहे.

या प्रदेशात चीनची वाढती आक्रमकता पाहता अमेरिकेने इंडो-पॅसिफिक क्षेत्राकडे पुन्हा लक्ष केंद्रित करणे हे बायडन यांच्यासाठी गरजेचे आहे. युक्रेन आणि मध्य पुर्वेमध्ये चालू असलेल्या युद्धामधील अमेरिकेच्या सहभागावरून देशांतर्गत अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आहे. अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर, या व्यापक असंतोषाचे रूपांतर राजकीय अराजकतेत झाले असल्याचे युक्रेन आणि इस्रायलला मदत मंजूर करण्यावरून यूएस काँग्रेसमध्ये झालेल्या भांडणातून स्पष्ट झाले आहे. युक्रेन आणि मध्य पूर्वेमधील अमेरिकेच्या आर्थिक आणि धोरणात्मक वचनबद्धतेमुळे त्यांचे लक्ष इंडो- पॅसिफिक क्षेत्रावरून विचलित झाल्याचा या प्रदेशातील राष्ट्रांचा समज झाला आहे. म्हणूनच, बायडन यांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशातील प्रमुख भागीदार असलेल्या जपानशी द्विपक्षीय संबंध कायमस्वरूपी टिकण्याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याद्वारे, बायडन आणि किशिदा भविष्यातील राजकीय आणि धोरणात्मक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे स्पष्ट आहे. सध्याच्या संबंधांचे आयसेनहोवर युगातील लष्करी युतीमध्ये अपग्रेडेशन करून भविष्यातील अनिश्चिततेपासून द्विपक्षीय संबंधांना प्रूफिंग करण्याचा प्रयत्न दोन्ही राष्ट्रे करत आहेत. त्रिपक्षीय सामर्थ्याच्या प्रदर्शनात फिलीपाईन्सला जोडून घेऊन दक्षिण चीन समुद्रात चीनचा प्रतिकार करण्यासाठी जपान-फिलीपाईन्स-यूएस ही सर्वात शक्तिशाली युती असणार आहे, याचे संकेत बायडन यांनी दिले आहेत. वाढत्या चिनी आक्रमकतेचा व आव्हानाचा सामना करत असलेल्या जपान आणि फिलीपाईन्स या दोन्ही देशांसाठी नवीन धोरणात्मक हेतूसह क्षमतांचे एकत्रिकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्रिपक्षीय सामर्थ्याच्या प्रदर्शनात फिलीपाईन्सला जोडून घेऊन दक्षिण चीन समुद्रात चीनचा प्रतिकार करण्यासाठी जपान-फिलीपाईन्स-यूएस ही सर्वात शक्तिशाली युती असणार आहे, याचे संकेत बायडन यांनी दिले आहेत.

अमेरिका आणि जपान यांच्यातील संबंध आत्तापर्यंत मजबूत आणि विश्वासार्ह राहिले आहेत. त्यास अमेरिकन कॉंग्रेसचा फार विरोध झालेला नाही. टोकियोसोबतच्या लष्करी संबंधांमध्ये धोरणात्मक सुधारणा आणि मनिला देण्यात आलेले आश्वासन या दोन्ही बाबी राजकीयदृष्ट्या बायडन यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कॉंग्रेसमधील गोंधळ आणि गाझामधील युद्धविरामासाठी इस्रायलवर दबाव आणण्यासाठी बायडन प्रशासन फार काही करत नसल्याच्या चर्चांना विराम देण्याची आता योग्य वेळ आहे.


प्रत्नश्री बसू ऑब्झव्हर रिसर्च फाऊंडेशनच्या असोसिएट फेलो आहेत.

विवेक मिश्रा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Pratnashree Basu

Pratnashree Basu

Pratnashree Basu is an Associate Fellow, Indo-Pacific at Observer Research Foundation, Kolkata, with the Strategic Studies Programme and the Centre for New Economic Diplomacy. She ...

Read More +
Vivek Mishra

Vivek Mishra

Vivek Mishra is a Fellow with ORF’s Strategic Studies Programme. His research interests include America in the Indian Ocean and Indo-Pacific and Asia-Pacific regions, particularly ...

Read More +