Author : Pratnashree Basu

Expert Speak Health Express
Published on Apr 12, 2024 Updated 0 Hours ago

इंडो-पॅसिफिक प्रदेशातील राष्ट्रे आरोग्यविषयक सामायिक आव्हानांना तोंड देत असताना, आरोग्य मुत्सद्देगिरी या प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य विषयक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी एक प्रमुख ताकद बनू शकते. 

इंडो-पॅसिफिक प्रदेशात आरोग्य मुत्सद्देगिरी आणि रोगांचा सामना करण्याची क्षमता यामध्ये निरोगी संतुलन कसे साधता येईल?

हा लेख ‘जागतिक आरोग्य दिन २०२४: माझे आरोग्य, माझा हक्क’ या लेखमालिकेचा भाग आहे.


इंडो-पॅसिफिक प्रदेशातील आरोग्य विषयक मुत्सद्देगिरी एक महत्त्वाच्या टप्प्याचे प्रतिनिधित्व करते, ज्यात सार्वजनिक आरोग्य विषयक उपक्रम भौगोलिक घटकांवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांचे आणि आर्थिक विषमतेचे गुंतागुंतीचे जाळे छेदत आहेत. या विशाल आणि गतिमान प्रदेशातील राष्ट्रे सामायिक आणि वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य विषयक आव्हानांना सामोरे जात असताना, उदयोन्मुख संसर्गजन्य रोगांपासून, असंसर्गजन्य आरोग्यविषयक संकटांपर्यंत, आरोग्य विषयक मुत्सद्दीपणा सार्वजनिक आरोग्य विषयक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी आणि प्रादेशिक सहकार्याला चालना देताना आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध करण्यासाठी एक निर्णायक शक्ती म्हणून काम करू शकते आणि प्रादेशिक स्थैर्यावर परिणाम करणाऱ्या उद्रेकांचा प्रभाव कमी करू शकते. जगभरात सकारात्मक आरोग्य परिणाम साध्य करण्यासाठी आरोग्य आणि परराष्ट्र धोरणाच्या परस्परावलंबनाकडे लक्ष वेधणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय घोषणांद्वारे आणि ठरावांद्वारे परराष्ट्र धोरणाच्या चर्चेत आरोग्यावर भर दिला जात आहे.

कोविड साथीचा सामना करताना शिकलेले धडे

२०व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जागतिकीकरणासमोर आणि सार्वजनिक आरोग्यासमोर उभ्या राहिलेल्या नव्या धोक्यांमुळे इंडो-पॅसिफिकमधील आरोग्य मुत्सद्देगिरीच्या चित्रात लक्षणीय बदल झाले आहेत. २००३ मधील सार्सचा उद्रेक, २००९ मधील एचवनएनवन साथीचा रोग आणि अगदी अलीकडच्या कोविड-१९ साथीच्या रोगासारख्या जागतिक आरोग्य संकटांना प्रतिसाद देण्यात हा प्रदेश आघाडीवर होता. या घटनांनी समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसादाची गरज अधोरेखित केली आहे आणि आरोग्यासंदर्भातील मुत्सद्देगिरीला भौगोलिक घटकांवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांविषयक चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेश जागतिक आरोग्य उपक्रमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून बौद्धिक संपदा हक्क, लस समानता आणि मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवेत पारंपरिक औषधांचे एकत्रीकरण या संबंधीच्या चर्चेत योगदान देत आहे.

अलिकडच्या वर्षांत, आरोग्य विषयक मुत्सद्देगिरी समाविष्ट करण्यासाठी ‘क्वाड’सारख्या उपक्रमांनी त्यांचे लक्ष विस्तारले आहे. विशेषत: कोविड-१९ साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या छायेत परराष्ट्र धोरणात आरोग्याच्या धोरणात्मक महत्त्वावर भर देण्यात आला आहे. जागतिक स्तरावर लशी किफायतशीर दरांत उपलब्ध करून देण्याकरता ‘क्वाड’ने महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. प्रामुख्याने कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांना लस उपलब्ध होण्यात अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. ‘क्वाड वॅक्सिन पार्टनरशिप’ आणि ‘ग्लोबल पॅन्डेमिक रडार’ला मदत यांसारख्या उपक्रमांमुळे ‘क्वाड’ देशांनी सहयोगी लस संशोधनावर लक्ष केंद्रित केले आहे. या व्यतिरिक्त, ‘क्वाड’ ने व्यापक जनजागृती मोहिमा आणि वैज्ञानिक सहभागाद्वारे लसीकरणाविषयी जनमानसात असलेला संकोच आणि चुकीच्या माहितीचा सामना केला आहे, लशीविषयीचा जनतेतील विश्वास वाढवला आहे. ‘क्वाड’ने सदस्य देशांमधील धोरण रूळावर आणण्याचा प्रयत्न केला, जागतिक आरोग्य समानतेची वकिली केली आणि लशींच्या पुरवठ्यातील टंचाई व वितरणातील अकार्यक्षमता यांसारख्या समस्यांचे निराकरण केले. जितक्या लशींचे वितरण करायचे होते, त्यात कमतरता भासण्यासारख्या  आव्हानांना तोंड देत असतानाही, ‘क्वाड’ने भविष्यातील आरोग्य आणीबाणी आणि इंडो-पॅसिफिकमधील स्थानिक स्तरावरील साथीच्या रोगांसाठी लस उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने आपली उद्दिष्टे पुन्हा तपासली आहेत.

‘जगातील औषधांचा डेपो’ या अर्थाने जगातील ६० टक्के लस पुरवठ्याचे उत्पादन करत आहे आणि जागतिक स्तरावर कोविड-१९ लशींच्या वितरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारताची आरोग्य क्षेत्रातील मुत्सद्देगिरी आरोग्यसेवा संसाधने सर्वांना समान उपलब्ध होण्यासाठी सहाय्य करण्यापर्यंत विस्तारली आहे. ‘लस मैत्री कार्यक्रमां’तर्गत, भारताने केवळ देशांतर्गत वापरासाठीच नव्हे तर जागतिक वितरणासाठी लशींचे उत्पादन करण्याकरता, आपल्या मोठ्या औषधनिर्माण उत्पादन क्षमतेचा लाभ करून घेतला. हिंदी महासागर क्षेत्र, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनसह विविध खंडांमधील ९० पेक्षा जास्त देशांना लाखो लशींचे डोस प्रदान करण्यात हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे. मात्र, या उपक्रमाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, ज्यात भारतातील कोविड-१९ प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, देशांतर्गत लशींचा तुटवडा निर्माण झाला, ज्यामुळे लशींच्या निर्यातीवर तात्पुरता परिणाम झाला. या अडथळ्यांना न जुमानता, कार्यक्रम सुरू राहिला आणि जागतिक लस पुरवठ्यात योगदान सुरू राहिले, तसेच लशींचे अधिक न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी कोवॅक्स सुविधेला सहाय्य दिले गेले.

‘लस मैत्री कार्यक्रमां’तर्गत, भारताने केवळ देशांतर्गत वापरासाठीच नव्हे तर जागतिक वितरणासाठी लशींचे उत्पादन करण्यासाठी, आपल्या मोठ्या औषधनिर्माण उत्पादन क्षमतेचा लाभ करून घेतला.

दक्षिण कोरिया, तैवान, न्यूझीलंड आणि व्हिएतनाम यासारख्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांनी कोविड-१९ साथीच्या रोगाला प्रभावी प्रतिसाद देत उदाहरण प्रस्थापित केले. ज्यातून आरोग्याच्या संकटस्थितीत त्वरित कार्यवाही करताना, तंत्रज्ञानाचा अवलंब, जनतेचा विश्वास आणि व्यवस्थापनात पारदर्शक संवाद या बाबींचे महत्त्व दिसून येते. दक्षिण कोरियाचा प्रतिसाद व्यापक स्तरावरील चाचण्या, संपर्काचा नाविन्यपूर्ण रीतीने माग काढणे आणि त्यांची मजबूत आरोग्य सेवा प्रणाली व सार्वजनिक सहकार्यावर अवलंबून एकूण लॉकडाउन टाळण्यातून दिसून आला.

कडक प्रवासी निर्बंध, प्रभावी सार्वजनिक आरोग्य संदेश आणि आरोग्य विषयक व इमिग्रेशन डेटाचे एकत्रीकरण यांसह तैवानच्या सक्रिय उपायांनी साथीच्या रोगाला दूर ठेवले. न्यूझीलंडने ‘कठोर प्रयत्न करा, लवकर घालवा’ या रणनीतीसह निर्णायक व त्वरित भूमिका घेतली, ज्यामध्ये जागतिक स्तरावर सर्वात कठोर लॉकडाउन आणि सीमा नियंत्रण उपायांचा समावेश होता. व्हिएतनामच्या रणनीतीत सीमा बंद करण्याचे समान उपाय योजले गेले, तसेच सार्वजनिक आरोग्य विषयक सुस्पष्ट संवाद आणि समुदाय एकत्रीकरणासाठी तळागाळातील नेटवर्कचा वापर करण्यात आला, ज्याने साथीच्या रोगाच्या उत्पत्तीच्या जवळ असूनही तेथील केसेसची संख्या आणि मृत्यूची संख्या लक्षणीयरीत्या कमी राहिली.

या राष्ट्रांनी हे दाखवून दिले की, प्रतिबंधात्मक सीमा नियंत्रण, सार्वजनिक आरोग्य सज्जता व चाचण्या आणि माग काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा चपळ पद्धतीने वापर यांमुळे जागतिक आरोग्य धोक्यांचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. साथीच्या रोगाने आरोग्याचा आणि परराष्ट्र धोरणाचा परस्परसंबंध अधोरेखित केला, भविष्यातील आरोग्य विषयक आव्हाने पेलता यावी, याकरता सहयोगी, बहुपक्षीय दृष्टिकोनाची वकिली केली. या इंडो-पॅसिफिक देशांच्या अनुभवांमुळे जागतिक एकता, सज्जता आणि परस्परांच्या यशातून आणि आव्हानांतून शिकण्याची इच्छा यांवर जोर देऊन, साथीच्या रोगांना प्रतिसाद देण्यास सक्षम लवचिक आरोग्य व्यवस्था तयार करण्यासाठी एक तपशीलवार योजना उपलब्ध झाली.

इंडो-पॅसिफिकमधील प्रमुख आरोग्य विषयक मुत्सद्देगिरीचे उपक्रम

पुढाकार

वर्णन

आघाडीच्या संस्था

क्वाड लस भागीदारी

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात वितरणासाठी ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांच्या सहयोगी प्रयत्नांतून भारतात कोविड-१९ लस निर्मितीचा विस्तार केला गेला.

ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका

कोवॅक्स सुविधा

इंडो-पॅसिफिकसह सर्व सहभागी देशांत कोविड-१९ लस सर्वांना उपलब्ध व्हावी, हे सुनिश्चित करणारा जागतिक उपक्रम.

ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिन अँड इम्युनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, दि कोलिएशन फॉर एपिडेमिक प्रीपेअर्डनेस इनोवेशन्स (सीइपीआय), युनिसेफ

आरोग्य सुरक्षेसाठी इंडो-पॅसिफिक धोरण

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, साथीच्या रोगासाठीची सज्जता सुधारणे आणि आरोग्य सुरक्षा वाढवणे यावर लक्ष केंद्रित करणारी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील रणनीती

अमेरिका

उदयोन्मुख विकार आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणीसाठी आशिया-पॅसिफिक धोरण

जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचा उद्देश उदयोन्मुख रोग आणि सार्वजनिक आरोग्य आणीबाणी व्यवस्थापित करण्यासाठी व प्रतिसाद देण्यासाठी प्रादेशिक क्षमता वाढवणे हा होता.

जागतिक आरोग्य संघटना

आसियान वन हेल्थ इनिशिएटिव्ह

 

संपूर्ण प्रदेशातील आरोग्य विषयक परिणाम सुधारण्यासाठी एक सहयोगी दृष्टिकोन वैश्विक जगात आरोग्य आणि विकास विषयक आव्हानांसाठी एकात्मिक दृष्टिकोनाची आवश्यकता प्रतिबिंबित करतो, जिथे मानव, प्राणी आणि परिसंस्था यांचे आरोग्य अतूटपणे जोडलेले आहे.

दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (आसियान)

पॅसिफिक हेल्थ सिक्युरिटी पार्टनरशिप

पॅसिफिक बेटातील देशांना आरोग्यव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि लशींच्या तरतुदीसह आरोग्य विषयक आणीबाणीला प्रतिसाद देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे सहाय्य.

ऑस्ट्रेलिया

भारत-आसियान हेल्थ कोऑपरेशन

हा उपक्रम भारत आणि आसियान देशांदरम्यान पारंपरिक औषधे, डिजिटल आरोग्य आणि आरोग्य विषयक आपत्कालीन प्रतिसाद या बाबतीत आरोग्य सहकार्याला प्रोत्साहन देतो.

भारत, आसियान देश

प्रादेशिक उदयोन्मुख रोग हस्तक्षेप केंद्र (आरइडीआय)

संशोधन, प्रशिक्षण आणि सहकार्याद्वारे उदयोन्मुख संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी सिंगापूर-अमेरिकेचा संयुक्त उपक्रम.

सिंगापूर, अमेरिका

 

स्रोत: लेखकाचे संकलन

आव्हाने कमी करणे

भारत-पॅसिफिक प्रदेशातील आरोग्य विषयक मुत्सद्देगिरीला या क्षेत्राची विविधता, भौगोलिक संबंधांवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांतील तणाव, आर्थिक विषमता आणि सीमापार आरोग्य विषयक धोक्यांच्या विस्तृत श्रेणीमुळे आव्हाने उद्भवतात. राजकीय मतभेद आणि देशांमधील ऐतिहासिक तणाव आरोग्याच्या मुद्द्यांवर एकत्रित भूमिका घेत कृती योजण्यात अडथळा आणू शकतात, तर आर्थिक असमानता आरोग्य सेवा संसाधनांची असमान उपलब्धता निर्माण करते. संसर्गजन्य रोग, पर्यावरणीय धोके आणि हवामान बदलाच्या प्रभावांना या प्रदेशाची संवेदनशीलता, आरोग्य सेवा व्यवस्थेमधील पायाभूत सुविधांची व क्षमतेची असमान स्थिती असल्याने एकत्रित आरोग्य धोरणांच्या अंमलबजावणीत आणखी गुंतागुंत निर्माण होते.

राजकीय मतभेद आणि देशांमधील ऐतिहासिक तणाव आरोग्याच्या मुद्द्यांवर एकत्रित भूमिका घेत कृती योजण्यात अडथळा आणू शकतात, तर आर्थिक असमानता आरोग्य सेवा संसाधनांची असमान उपलब्धता निर्माण करते.

आसियान, जागतिक आरोग्य संघटनेची प्रादेशिक कार्यालये आणि ‘क्वाड’सारख्या व्यासपीठाद्वारे प्रादेशिक सहकार्य वाढवणे हे केवळ तात्कालिक आरोग्य संकटांचा सामना करण्यासाठीच नव्हे तर आरोग्य व्यवस्थेची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी सहयोगी आरोग्य उपक्रमांना चालना देण्याकरता महत्त्वाची ठरते. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानातील गुंतवणुकीसह क्षमता-उत्पादनाचे प्रयत्न, कमकुवत आरोग्य व्यवस्थेची उन्नती साधण्यासाठी आणि आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध होण्यास चालना देण्यासाठी आवश्यक ठरतात. राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि माहितीच्या गोपनीयतेचा आदर सुनिश्चित करताना प्रादेशिक डेटा-शेअरिंगच्या नियमांची चौकट आणि पूर्वसूचना प्रणाली विकसित केल्याने, आरोग्य विषयक धोक्यांना वेळेवर प्रतिसाद देण्यात सक्षमता प्राप्त होईल. शिवाय, वैविध्यपूर्ण लोकसंख्येत आरोग्य विषयक जागरूकता आणि आरोग्यविषयक शिक्षण वृद्धिंगत करण्यासाठी स्थानिक समुदायांना संलग्न करणे, पारंपरिक आरोग्य पद्धतींचा आदर करणे आणि प्रभावी संवाद धोरणे उपयोगात आणणे महत्त्वाचे आहे.

अखेरीस, इंडो-पॅसिफिकमधील आरोग्य विषयक मुत्सद्देगिरीत केवळ विशिष्ट आरोग्य आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आहे, असे नाही तर शाश्वत विकासाच्या आणि सामाजिक समावेशकतेच्या व्यापक उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याचीही क्षमता आहे. असुरक्षित लोकसंख्येला प्राधान्य देत आणि आरोग्य सेवांच्या उपलब्धतेतील विषमता नष्ट करण्याकरता, आरोग्य विषयक मुत्सद्देगिरी प्रादेशिक एकतेचा आणि जागतिक आरोग्य सुरक्षेचा आधारस्तंभ ठरू शकते.


प्रत्नश्री बसू या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.