Author : Aparna Roy

Expert Speak Health Express
Published on Apr 12, 2024 Updated 0 Hours ago

हवामान बदलामुळे विद्यमान आरोग्यविषयक असुरक्षा कमालीची वाढत आहे. अशा प्रकारे अर्थपूर्ण प्रगतीकरता न्याय्य हवामानाच्या चळवळीच्या केंद्रस्थानी आरोग्याला स्थान मिळणे आवश्यक आहे.

आरोग्यावरील जागतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आरोग्य हवामान कृतीच्या केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे

हा लेख ‘जागतिक आरोग्य दिन २०२४: माझे आरोग्य, माझा हक्क’ या लेखमालिकेचा भाग आहे.


अलीकडेच भारताच्या हवामान खात्याने पुढील तीन महिन्यांत भारताच्या बहुतांश भागात उष्णतेच्या विलक्षण तीव्र लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामानातील मानववंशीय बदलांमुळे, सभोवतालच्या उष्णतेचे- जे सूर्याचे एकेकाळचे सामान्य पैलू होते, त्यांचे टाळता येणार नाही अशा पर्यावरणीय धोक्यात परिवर्तन होत आहे. २०२३ मध्ये, वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची पातळी ४२५ पीपीएमच्या नव्या उच्चांकावर पोहोचली, ज्यामुळे २०१४ ते २०२३ पर्यंतचे दशक हे आजवरच्या नोंदीतील सर्वात उष्ण दशक ठरले.

भारतावर याचा झालेला परिणाम फार मोठा आहे. २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या आरोग्य आणि हवामान बदलासंदर्भातील ‘लॅन्सेट काउंटडाऊन’नुसार, २०२२ मध्ये, उष्णतेची बाधा झाल्याने कामाचे संभाव्य १९१ अब्ज तास गमावले गेले, १९९१-२००० या दशकाच्या तुलनेत यात ५४ टक्क्यांनी वाढ झाली. अलिकडच्या वर्षांत, हवामान बदलामुळे येणाऱ्या उष्णतेच्या लाटा मानवी आरोग्यावर घातक परिणाम करू लागल्या आहेत.

हे विपरीत परिणाम केवळ भारतावर होत आहेत, असे नाही. हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका अशा राष्ट्रांना सोसावा लागतो, ज्यांचे ऐतिसाहिक काळापासून आजपर्यंत विषारी वायूंच्या वातावरणातील उत्सर्जनात सर्वात कमी योगदान आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना, प्रामुख्याने आरोग्यविषयक सोयीसुविधांच्या तुटवड्याचा फटका सहन करावा लागतो. जर सध्याचे कल दुर्लक्षित केले गेले, तर सर्वात असुरक्षित गट- महिला, आदिवासी समुदाय, वृद्ध आणि आधीच आरोग्यविषयक तक्रारी असणाऱ्या व्यक्तींवर- हवामान बदलाचे सर्वात गंभीर आरोग्यविषयक परिणाम होतील.

अलीकडेच संपलेल्या ‘कॉप २८’ या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलासंदर्भातील परिषदेत अखेर कोविड-१९ साथीच्या रोगामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि उष्णतेच्या लाटा व असुरक्षित समुदायांना सहन कराव्या लागलेल्या आत्यंतिक घटनांच्या पार्श्वभूमीवर, हवामान विषयक कृती अजेंड्यात आरोग्याचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘कॉप २८’ या पर्यावरण आणि आरोग्यविषयक परिषदेच्या जाहीरनाम्यात- फक्त संक्रमण, कमी वायू प्रदूषण, सक्रिय हालचाली आणि शाश्वत आरोग्यदायी आहारामुळे वातावरणातील विषारी वायूंच्या उत्सर्जनात खोलवर, जलद आणि सातत्यपूर्ण घट होऊन ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, असे म्हटले आहे. वचनबद्धता प्रशंसनीय असली तरी, हवामान बदलाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमधील जागतिक स्तरावरील विषमतेकडे लक्ष वेधण्यासाठी अधिक व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे. जागतिक हवामान प्रशासनाने आता बोलण्यापलीकडे पोहोचत, ठोस कृती करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर, हवामानातील बदलाचे अनेक परिणाम होत असून सद्य आरोग्य विषयक असुरक्षा अधिक तीव्र झाली आहे. उष्णतेच्या लाटांव्यतिरिक्त, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या आत्यंतिक हवामानाच्या घटनांमुळे- विशेषत: आधीच धोका असलेल्या प्रदेशांमध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रसार झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे आणि संसाधने कमी होत आहेत. अन्न आणि पाणी पुरवठ्यात हवामान-संबंधित आलेल्या व्यत्ययांमुळे पोषण आणि स्वच्छता विषयक मानके कमी होत आहेत, ज्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात. याशिवाय, हवामानातील बदल- स्थिर उपजीविका, समानता आणि आरोग्य सेवा व समुदायाच्या सहाय्यकारी नेटवर्कमध्ये प्रवेश यांसारख्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या सामाजिक घटकांना नष्ट करत आहेत.

आता इतरांपेक्षा वेगळे एकट्या-एकट्याने संकटांचा सामना करणे थांबवायला हवे. वाजवी आरोग्य सेवा आणि संसाधने उपलब्ध नसलेल्या लोकसंख्येवर हवामान बदलाचे असलेले वाढीव ओझे ओळखून जागतिक आरोग्य प्रशासनाने हवामान विषयक न्याय्य तत्त्वे स्वीकारायला हवी. अर्थपूर्ण प्रगतीसाठी हवामान न्याय्य चळवळीच्या केंद्रस्थानी आरोग्याला स्थान मिळणे आवश्यक आहे. ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’ने अलीकडे प्रकाशित केलेल्या ‘कन्व्हर्जिंग पाथ्स: ग्लोबल गव्हर्नन्स फॉर क्लायमेट जस्टिस अँड हेल्थ इक्विटी’ या अभ्यासात, जागतिक आरोग्य आणि हवामान प्रशासन या दोन्हींकरता नियमावली तयार करण्यासाठी, त्यांच्या अभिसरणाचे मार्ग शोधून काढण्याकरता महत्त्वाच्या कृतींची रूपरेषा स्पष्ट केली आहे.

१) जागतिक आरोग्य संघटनेच्या साथीच्या रोगासंदर्भातील करारात सर्वसमावेशकपणे हवामान बदल आणि पर्यावरणीय अधिकारांकडे लक्ष पुरवणे: ऑक्टोबर २०२३ मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरशासकीय वाटाघाटी मंडळाने- जागतिक आरोग्य संघटनेच्या साथीच्या रोगासंबंधित कराराचा मसुदा जाहीर केला, ज्याने भविष्यातील साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी राष्ट्रांकरता एकसंध मार्ग तयार केला. या महत्त्वाचा क्षणी एक मजबूत करार होणे आवश्यक आहे, जो संसर्गजन्य रोग आणि सार्वजनिक आरोग्य संकटांना तोंड देण्यासाठी तत्परता, प्रतिसाद आणि सहयोग बळकट करेल, आणि त्यांना हवामान बदलाशी घट्टपणे जोडेल. हा करार 'सामायिक आरोग्यविषयक' दृष्टिकोन अंगीकारत, हवामान बदलाच्या चौकटीत आरोग्याला समाविष्ट करतो. असे असले तरीही हवामान-चालित आरोग्य विषयक आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी 'सामायिक आरोग्या'च्या पर्यावरणीय पैलूंवर अधिक भर देणे आवश्यक आहे. कराराचे स्पष्टीकरण समानतेवर केंद्रित असायला हवे. केवळ मानके आणि आकडेवारीच्या पलीकडे जाऊन लाभांची समान वाटणी समाविष्ट करणे आवश्यक आहे.

२) हवामान बदलाच्या संकटाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करणे आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन- २००५ची व्याप्ती वाढवणे: आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन- २००५च्या संकुचित व्याप्तीमुळे आणि नियमांच्या चौकटीमुळे जागतिक आरोग्य प्रशासन संस्थांचे प्रभावीपण मर्यादित आहे, ज्यामुळे त्यांच्यावर आरोग्य विषयक आणीबाणीत आणि संसर्गजन्य रोगांबाबत अधिक मर्यादा येते. जागतिक आरोग्य विषयक धोक्यांचे बहुआयामी स्वरूप ओळखून, हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याबाबतच्या धोक्यांचा समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन- २००५ची व्याप्ती वाढवायला हवी. या नियमांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही आणि आरोग्य विषयक आणीबाणी उद्भवण्यातील पर्यावरणीय कारणे धोरणात लक्षात घेतली जात नाही.

३) आरोग्यसेवेसाठी अनुकूलता आणि आरोग्यसेवेतील हवामान बदल रोखण्याकरता वाढत्या निधीची तजवीज करत, जागतिक उद्दिष्टात आरोग्याकडे सुस्पष्ट लक्ष पुरवणे: सध्याच्या हवामान धोरणातील हवामान बदल कमी करणे आणि विषारी वायू उत्सर्जन कमी करणे हे विषमतेवर केंद्रित आहे; या दृष्टिकोनात लक्षणीय बदल होणे आवश्यक आहे. हवामान बदल रोखण्याकरता अनुकूल बदल करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात, विशेषत: आरोग्य सेवा क्षेत्रात निधीची तीव्र कमतरता आहे. आधीच संघर्ष करत असलेल्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर साथीच्या रोगामुळे आलेल्या अतिरिक्त ताणामुळे हा तुटवडा अधिक वाढला आहे. हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या वाढत्या आरोग्य विषयक धोक्यांना हाताळण्यासाठी, त्यांची क्षमता बळकट करण्याकरता या व्यवस्थेला भरीव आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे.

४) जागतिक हवामान प्रशासनाने 'हानी आणि नुकसान' निधीचे परिवर्तन करायला हवे: हवामान बदलाचे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे, विशेषत: प्राणहानी पलीकडच्या परिणामांचे आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे, आर्थिकदृष्ट्या मापन करणे हे एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे. आरोग्याच्या हानीचा सामना करणाऱ्या असुरक्षित लोकसंख्येला भरपाई आणि मदत मिळावी, याकरता नियमावली तयार करणे हे योजना कार्यान्वित करण्याकरता महत्त्वाचे ठरते. हे अत्यावश्यक ठरते की, 'हानी आणि नुकसान' या मुद्द्यात हवामान बदलाला अनुसरून बदल करणे आणि हानी व नुकसान कमी करण्याकरता पावले उचलणे हे तत्परतेने वाढवायला हवे. विकसित राष्ट्रांकडून त्यांच्या आर्थिक दायित्वांची पूर्तता करण्यासाठी वाढीव जबाबदारी पेलणे आवश्यक आहे. या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी आरोग्य आणि हवामान बदल यांच्या परस्परसंबंधांचा विचार करणाऱ्या महत्त्वाकांक्षी हानी आणि नुकसान निधीची स्थापना करणे अत्यावश्यक आहे.

हवामानातील उपक्रमांच्या केंद्रस्थानी आरोग्याला स्थान देणे आणि हवामानातील बदलांना आरोग्याची अत्यावश्यकता म्हणून चित्रित करणे यांतून धोरणात्मक लक्ष वाढू शकते आणि हवामान बदल रोखण्याकरता आवश्यक बदल करण्यास आणि हवामान बदल कमी करण्यास सार्वजनिक पाठबळ मिळू शकते. आरोग्य हे हवामान बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये एक शक्तिशाली बदल घडविणारे क्षेत्र आहे. हवामान बदलांमुळे होणाऱ्या केवळ गंभीर परिणामांवर प्रकाशझोत टाकण्याऐवजी, हवामान बदल रोखणारी कृती आणि शाश्वत, कमी-कार्बन जीवनमानाचे आरोग्यविषयक लाभ साजरे करण्यापर्यंत जर कथन बदलले, तर ते मूल्यांना आकार देऊ शकते आणि हवामान बदलाकरता कारणीभूत ठरणारी सामाजिक व वर्तनात्मक बदल कमी करण्यास प्रेरणा मिळू शकते.


अपर्णा रॉय या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या फेलो असून ‘हवामान बदल व ऊर्जाविषयक उपक्रमा’च्या प्रमुख आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.