Author : Hari Seshasayee

Published on Feb 01, 2024 Updated 0 Hours ago

व्हेनेझुएला आणि गयाना या दोन देशांमध्ये एस्क्विबो या प्रदेशावरून दीर्घ काळ सुरू असलेल्या वादात सध्या वाढ होताना दिसते. मात्र, व्हेनेझुएलाच्या देशांतर्गत राजकारणाने खतपाणी घातलेल्या चहाच्या पेल्यातील वादळापेक्षा त्याला फारसा काही अर्थ नाही.

व्हेनेझुएला-गयाना वाद : चहाच्या पेल्यातील वादळ?

व्हेनेझुएला आणि गयाना या दोन देशांतील तणाव वाढत असताना ब्राझीलचे अध्यक्ष लुई इनास्यू ‘लुला’ दा सिल्व्हा यांनी अलीकडेच झालेल्या एका परिषदेत टिप्पणी करून संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘दक्षिण अमेरिकेत आम्हाला एक गोष्ट नको आहे, ती म्हणजे युद्ध.’ काही देश अंतर्गत संघर्षाने ग्रासलेले असले, तरी लॅटिन अमेरिकेत विसाव्या व एकविसाव्या शतकात कोणतीही मोठी युद्धे झालेली नाहीत. या प्रदेशातील अखेरचे बहुराष्ट्रीय युद्ध म्हणजे १८७९ मध्ये झालेले पॅसिफिक युद्ध. अलीकडील व्हेनेझुएला-गयाना सीमावादावर काहीतरी अनिष्ट घडणार या धास्तीच्या अस्वस्थ भावनेचे सावट असले, तरी गेल्या दीडशे वर्षांत येथे कोणताही मोठा आंतरराष्ट्रीय संघर्ष झालेला नाही.

पार्श्वभूमी

विशेष म्हणजे, व्हेनेझुएला व गयाना या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे भिन्न अगदी दोन टोकाच्या आहेत आणि ते एकमेकांचे शेजारी आहेत. गयानाच्या अर्थव्यवस्थेत २०२२ मध्ये ६२ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे ही ‘२०२२ मधील जगातील सर्वाधिक मोठी जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पन्न) वाढ आहे,’ असे सांगण्यात आले. गयानाला लागूनच असलेल्या व्हेनेझुएलामध्ये २०२३ मध्ये महागाईत प्रचंड वाढ होऊन ती ३६० टक्क्यांवर पोहोचली आहे. व्हेनेझुएलाच्या आर्थिक अधोगतीची जेवढी चर्चा सध्या सुरू आहे, तेवढीच गयानातील आर्थिक प्रगतीची चर्चा होत आहे. अर्थात, या सर्व गदारोळात अलीकडील सीमावाद चहाच्या पेल्यातल्या वादळापेक्षा अधिक नाही.    

अलीकडील व्हेनेझुएला-गयाना सीमावादावर काहीतरी अनिष्ट घडणार या धास्तीच्या अस्वस्थ भावनेचे सावट असले तरी, गेल्या दीडशे वर्षांत येथे कोणताही मोठा आंतरराष्ट्रीय संघर्ष झालेला नाही.

 उभय देशांमधील सध्याचा वाद हा एस्क्विबो या १,५९,५४३ स्क्वेअर किलोमीटरच्या प्रदेशावरून असून या प्रदेशाची लोकसंख्या १,२५,००० आहे, तर येथील बहुसंख्यांची भाषा इंग्रजी आहे. या प्रदेशावर गयानाचे प्रशासन असले, तरी व्हेनेझुएलाने आता त्यावर दावा केला आहे. एस्क्विबो दोन गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या म्हणजे, हा प्रदेश एकूण भूभागाच्या दोन तृतीयांश एवढा भव्य म्हणजे इंग्लंडच्या आकारापेक्षाही मोठा आहे. हा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने विशेषतः पेट्रोलियमने समृद्ध आहे.

हा प्रादेशिक वाद काही नवा नाही. या वादाची मुळे सन १८०० च्या उत्तरार्धात असलेल्या वसाहतकाळात आहेत. त्या काळात अमेरिका व ब्रिटनने मोठ्या प्रदेशाचे आधुनिक काळातील गयाना व व्हेनेझुएला असे दोन देशांत विभाजन करण्यास सहमती दर्शवली होती. त्या वेळी एस्क्विबो प्रदेशाच्या बहुतेक भूभागाच्या प्रशासनाचे अधिकार गयानाकडे दिले. एकविसाव्या शतकात हा वाद बहुतांश सुप्त राहिला. मात्र, २०१३ मध्ये एस्क्विबो प्रदेशाच्या वरच्या भागात गयानाला पेट्रोलियमचे मुबलक साठे सापडले. त्यानंतर हा वाद उफाळून आला.

सध्याच्या वादाला व्हेनेझुएलाचे राजकारणी निकोलास मादुरो यांनी खतपाणी घातले. मादुरो यांनी आपले समर्थन वाढवण्यासाठी या वादाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आपला हेतू साध्य करण्यासाठी मादुरो यांनी या प्रश्नावर व्हेनेझुएलामध्ये सार्वमत घेऊन त्यास वैधता देण्याचाही प्रयत्न केला; परंतु मतदानातील निराशाजनक निर्णयामुळे लोकांना हिंसक गुन्हेगारी आणि वाढत्या महागाईसारख्या देशांतर्गत समस्यांची अधिक चिंता आहे, असे दिसून आले. मात्र, देशातील विरोधकांच्या राजकारणावरून व आगामी निवडणुकीवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यास मादुरो एका मर्यादेपर्यंत यशस्वी झालेले दिसतात.    

एस्क्विबो दोन गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या म्हणजे, हा प्रदेश एकूण भूभागाच्या दोन तृतीयांश एवढा भव्य म्हणजे इंग्लंडच्या आकारापेक्षाही मोठा आहे. हा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने विशेषतः पेट्रोलियमने समृद्ध आहे.

पुढे काय?

ब्राझीलचे लुला, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासारख्या अनेक मध्यस्थांनी; तसेच कम्युनिटी ऑफ लॅटिन अमेरिकन व कॅरेबियन स्टेट्स आणि कॅरेबियन कम्युनिटी या प्रादेशिक संस्थांनी व्हेनेझुएला व गयानादरम्यानचा तणाव निवळावा यासाठी मदत केली. व्हेनेझुएलाचे मादुरो यांनी गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांची दि. १४ डिसेंबर रोजी अर्गायल, सेंट व्हिन्सेंट व ग्रेनाडाइन्स येथे भेट घेतली. ‘दोन्ही देशांतील सध्याच्या वादामध्ये कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना धमकावू नये किंवा बळाचा वापर करू नये,’ या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. दोन्ही देशांच्या सैन्याला अतीदक्षतेचा इशारा दिला असतानाही या देशांच्या प्रतिनिधींची तीन महिन्यांनंतर पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. अर्गायलमध्ये दोन्ही देशांमध्ये किमान सलोखा निर्माण झाला आहे, असे वाटत असतानाच व्हेनेझुएलाने गयानाच्या सीमेजवळ एफ-१६ आणि सुखोई लढाऊ विमानांसह पाच हजार सैनिक तैनात केले. याला प्रत्युत्तर म्हणून गयानाने २९ डिसेंबर रोजी ब्रिटनकडून एचएमएस ट्रेंट ही युद्धनौका प्राप्त करून आपले ताकद दाखवून दिली. मात्र, जर संघर्ष उभा राहिलाच, तर व्हेनेझुएलाची लष्करी क्षमता गयानापेक्षा अनेक पट अधिक असेल. ‘ब्लूमबर्ग’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात व्हेनेझुएलाला झुकते माप देऊन, दोन्ही देशांमध्ये लष्करी असमतोल इतका आहे, की त्याचे प्रमाण शंभरास एक असा आहे, असे नमूद करण्यात आले आहे. तरीही एस्क्विबोमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत; तसेच व्हेनेझुएलाचा एक भाग म्हणून अंतर्भाव होण्यासाठी विशिष्ट सांस्कृतिक व भाषीक अडथळेही मोठे असल्याने त्यावर आक्रमण करणे व्हेनेझुएलासाठी एक त्रासदायक गोष्ट असेल. बहुतांश निरीक्षकांच्या मते, गयानाच्या अधिपत्याखालील एस्क्विबोवर स्वारी करणे व्हेनेझुएलाच्या हिताचे नाही; परंतु आपली सत्ता टिकवण्यासाठी मादुरो एस्क्विबोचा पत्ता कसा वापरतील, ते दिसेलच.  

व्हेनेझुएलाचे मादुरो यांनी गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांची दि. १४ डिसेंबर रोजी अर्गायल, सेंट व्हिन्सेंट व ग्रेनाडाइन्स येथे भेट घेतली. ‘दोन्ही देशांतील सध्याच्या वादामध्ये कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना धमकावू नये किंवा बळाचा वापर करू नये,’ या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

व्हेनेझुएला-गयाना संघर्ष अखेर क्षीण होत जात संपतो की वाढत जातो, यावर भारताने बारकाईने लक्ष ठेवायला हवे. कारण केवळ काही वर्षांपूर्वीच भारताच्या एकूण तेल आयातीमधील व्हेनेझुएलाचा वाटा बारा टक्के होता. भारत गयानाकडून तेलाची आयात करीत नसला, तरी भारत-गयाना तेल व्यापारासाठी बाजारपेठेतील परिस्थिती अनुकूल होण्यास कदाचित फार वेळ लागणार नाही. शिवाय भारताचे गयानाशी असलेले संबंध व्यापार-उदिमापेक्षाही अधिक खोलवर रुजलेले आहेत. गयानातील सर्वांत मोठा वांशिक समूह हा मूळचा भारतीय असून त्यांना इंडो-गयानीज असे संबोधले जाते. हा समूह गयानातील एकूण लोकसंख्येच्या चाळिस टक्के आहे. अर्थात, सध्या तरी भारताला कोणा एका देशाची बाजू घेण्याची आवश्यकता नाही. या प्रश्नात विवेकाने उत्तर मिळू शकेल आणि एकविसाव्या शतकात लॅटिन अमेरिका आंतरराष्ट्रीय संघर्षातून मुक्त होईल, अशी आशा आहे.

हरी शेषसाई हे ‘ओआरएफ’च्या ‘धोरणात्मक अभ्यास कार्यक्रमा’तील अभ्यागत फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.