Image Source: Getty
बांगलादेशातील दहा लाखांहून अधिक निर्वासितांचा समावेश असलेले रोहिंग्या संकट हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे मानवतावादी आव्हान आहे. २०१७ मध्ये म्यानमारच्या लष्कराने रोहिंग्या मुस्लिमांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतर हे संकट अधिक चव्हाट्यावर आले होते. देशांतर्गत आणि राजकीय आव्हानांना सामोरे जाताना बांगलादेशवर या असुरक्षित लोकसंख्येला सामावून घेण्याचा प्रचंड दबाव आहे. बांगलादेशमधील वाढता अंतर्गत दबाव, मोठ्या प्रमाणात राजकीय स्थित्यंतरे आणि म्यानमारशी वाढता सीमेवरील संघर्ष यामुळे हे संकट आता गंभीर वळणावर पोहोचले आहे. या घडामोडींमुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिसादांच्या परिणामकारकतेबद्दल महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात.
भूतकाळातील राजकीय दृष्टिकोन
रोहिंग्यांचे भवितव्य बांगलादेशच्या राजकीय परिप्रेक्ष्यात दीर्घकाळ गुंतलेले आहे, जिथे राष्ट्रीय हित आणि मानवतावादी जबाबदाऱ्या अनेकदा एकमेकांसोबत भिडतात. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या संकटावर बांगलादेशच्या प्रतिसादाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. म्यानमारच्या रखाइन प्रांतातील हिंसक लष्करी कारवाईनंतर, त्यांच्या प्रशासनाने दहा लाखांहून अधिक रोहिंग्या निर्वासितांना कॉक्स बाजारमध्ये आश्रय घेण्याची परवानगी दिली. २०१९ मध्ये, त्यांच्या सरकारने संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी उच्चायुक्त (यूएनएचसीआर) च्या सहकार्याने संयुक्त प्रतिसाद योजना सुरू केली, ज्याद्वारे निर्वासितांना अन्न, निवारा, आरोग्य सेवा आणि शिक्षण पुरवले जाईल.
बांगलादेशात निर्वासितांच्या दीर्घकालीन उपस्थितीबद्दल चिंता वाढू लागली, कट्टरतावाद वाढण्याची भीती आणि अतिरेकी गटांकडून निर्वासितांची संभाव्य भरती याची चिंता व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीला या मानवतावादी निर्णयांना लोकांचा पाठिंबा मिळाला. मात्र, निर्वासितांचे संकट जसजसे वाढत गेले, तसतसे भावना बदलत गेल्या. बांगलादेशात निर्वासितांच्या दीर्घकालीन उपस्थितीबद्दल चिंता वाढू लागली, कट्टरतावाद वाढण्याची भीती आणि अतिरेकी गटांकडून निर्वासितांची संभाव्य भरती याची चिंता व्यक्त केली जात आहे. या वाढत्या चिंतेबरोबरच संसाधनांची स्पर्धा आणि वाढता स्थानिक तणाव यामुळे अस्थिर राजकीय वातावरण निर्माण झाले. परिस्थितीच्या भूराजकीय गुंतागुंतीमुळे हसीना यांचा दृष्टिकोन आणखी गुंतागुंतीचा झाला. बांगलादेशने रोहिंग्यांना परत पाठवण्याची मागणी केली आणि त्यांना परत आणण्यासाठी २०१८ मध्ये म्यानमारबरोबर सामंजस्य करारही केला. मात्र, म्यानमारने निर्वासितांना परत स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याने या आघाडीवर फारशी प्रगती झाली नाही.
हसीना यांनी विशेषत: चीन आणि भारताकडून प्रादेशिक पाठिंबा मागितला, परंतु दोन्ही देश या क्षेत्रातील सामरिक हितसंबंधांमुळे रोहिंग्या समस्येवर थेट तोडगा काढण्यास कचरत होते. उदाहरणार्थ, चीनने बांगलादेशला मदत केली, पण म्यानमारचा राग येऊ नये म्हणून 'रोहिंग्या' हा शब्द वापरणे टाळले आणि त्याऐवजी त्यांना 'विस्थापित व्यक्ती' म्हणून संबोधले. त्याचप्रमाणे भारताने आपल्या सीमेवर येणाऱ्या निर्वासितांबाबत सुरक्षेची चिंता व्यक्त केली आणि म्यानमार सरकारशी संबंध दृढ करण्यास प्राधान्य दिले.
जसजसे आंतरराष्ट्रीय प्रयत्न फोल ठरले आणि देशांतर्गत दबाव वाढत गेला, तसतसे हसीना यांच्या सरकारला वाढत्या चौकशीला सामोरे जावे लागले. रोहिंग्या विरोधी भावना आणि आर्थिक आव्हानांमुळे स्थानिक समुदाय व निर्वासितांमध्ये तणाव उभा राहिला. २०२४ च्या अखेरीस, सुमारे १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, भ्रष्टाचार, हुकूमशाही आणि प्रशासनाच्या समस्या यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी हसीना यांना पदच्युत केले. या अचानक राजकीय बदलामुळे रोहिंग्या निर्वासितांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, अस्थिरतेने ग्रस्त असलेल्या देशात त्यांच्या छावण्यांच्या व्यवस्थापनावरही चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
नवे सरकार : रोहिंग्यांसाठी आशा?
विस्कळीत देशाला स्थिर करण्याची जबाबदारी असलेल्या नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील नवे अंतरिम सरकार रोहिंग्यांना नवी उमेद देईल, अशी अपेक्षा आहे. असुरक्षित लोकसंख्येसाठी दीर्घकाळ वकिली करणाऱ्या युनूस यांच्यासमोर आता या मानवतावादी संकटाचा सामना करताना बांगलादेशच्या गुंतागुंतीच्या राजकीय पटलावर मार्ग काढण्याचे आव्हान उभे आहे. युनूस या घडामोडींना सामोरे जात असताना, बांगलादेशमधील रोहिंग्या-विरोधी वाढत्या भावना आणि निर्वासित छावण्यांतील तसेच आसपासच्या हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हसीना यांच्या स्थापनेत सक्रिय सहभाग असल्याने या छावण्यांकडे त्यांच्या प्रशासनाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या सरकारच्या पतनानंतर, या छावण्यांबाबत स्थानिकांचा संशय वाढल्याने रोहिंग्यांविरोधातील वैमनस्य आणखी तीव्र झाले आहे.
म्यानमारमधील या ताब्यानंतर रोहिंग्यांविरोधातील हिंसाचार अधिकच वाढत असताना, निर्वासित आपल्या सुरक्षिततेसाठी बंगालच्या उपसागरातील धोकादायक प्रवासाचा मार्ग स्वीकारत आहेत. सप्टेंबर २०२४ पासून, हजारो लोकांनी सीमा ओलांडल्याची नोंद आहे, ज्यामुळे या संकटाची तीव्रता अधिकच वाढली आहे.
देशांतर्गत आव्हानांसोबतच बांगलादेशच्या सीमेवर पश्चिम म्यानमारमध्ये सुरू असलेल्या सततच्या संघर्षांमुळे या भागातील प्रादेशिक सुरक्षा अधिकच कमकुवत होत चालली आहे. दहशतवादी अराकान आर्मीने (एए) २०२३ च्या अखेरीस राज्य प्रशासन परिषदेचा (एसएसी) पराभव केल्यानंतर, रखाइनच्या अनेक भागांवर, विशेषतः बांगलादेश सीमेजवळील शहरांवर नियंत्रण मिळवले आहे. म्यानमारमधील या ताब्यानंतर रोहिंग्यांविरोधातील हिंसाचार अधिक वाढला आहे. सुरक्षिततेच्या शोधात रोहिंग्या निर्वासित बंगालच्या उपसागरातील धोकादायक प्रवासाचा मार्ग स्वीकारत आहेत. सप्टेंबर २०२४ पासून हजारो लोकांनी सीमा ओलांडल्याची नोंद झाली आहे. २० डिसेंबर रोजी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर किनारपट्टीवर मासेमारी ट्रॉलरमधून १०२ रोहिंग्यांची सुटका केली, ज्यामुळे दूरच्या देशांवरही या अशांततेचा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाढत्या तणावामुळे प्रादेशिक पातळीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, बांगलादेशने म्यानमारबरोबरच्या संबंधांमध्ये वेगळा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशच्या नव्या सरकारने अधिक सर्वसमावेशक आणि बहुपक्षीय दृष्टिकोन स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. म्यानमारशी व्यवहार करताना राजकीय संवादाला प्राधान्य देण्याचा विचार त्यांच्या रणनीतीचा मुख्य भाग आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७९ व्या महासभेत युनूस यांनी म्यानमारमध्ये निर्वासितांना परत पाठवण्याच्या विषयावर भाष्य केले. त्यांनी बांगलादेश रोहिंग्यांना पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करताना, दीर्घकालीन आणि शाश्वत उपायांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक असल्यावर भर दिला. युनूस यांनी प्रत्यार्पण प्रक्रियेचा समावेश असलेल्या उपाययोजनांमध्ये आंतरराष्ट्रीय भागधारकांची सक्रिय भागीदारी महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. म्यानमारशी व्यापक राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी जागतिक पातळीवरील सहकार्याला चालना देण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
बांगलादेशने राजकीय प्रयत्नांद्वारे या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करत असताना, विशेषतः अमेरिकेकडून मदतीसाठी पश्चिमेकडे पाहत आहे. रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशातील यजमान समुदायांना सुमारे १९९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची अतिरिक्त मानवतावादी मदत देणारी अमेरिका या संकटातील सर्वात प्रभावी आंतरराष्ट्रीय भागधारकांपैकी एक आहे. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पुनरागमनामुळे या संकटातील अमेरिकेच्या सहभागाची दिशा लक्षणीय बदलू शकते. ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात स्थलांतरित आणि निर्वासितांबाबत कठोर धोरण अवलंबले गेले होते, ज्यामध्ये निर्वासितांच्या प्रवेशावर मर्यादा आणि प्रादेशिक राजनैतिक प्रयत्नांमध्ये कमी सहभाग या बाबींचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय मानवतावादी जबाबदाऱ्यांपेक्षा देशांतर्गत चिंतांना प्राधान्य देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' दृष्टिकोनामुळे दुसऱ्या ट्रम्प प्रशासनात निर्वासितांच्या मदतीसाठी आणि बांगलादेशला राजकीय सहकार्यासाठी अमेरिकेच्या निधीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती नवीन सरकारच्या बहुपक्षीय दृष्टिकोनाला थेट आव्हान उभी करेल आणि युनूस यांना नाजूक समतोल साधण्याची गरज भासेल. रोहिंग्यांच्या हक्कांचे रक्षण करताना आणि त्यांच्या समर्थनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवताना, म्यानमारकडून अधिक उत्तरदायित्व मिळवण्यासाठी दबाव वाढवणे ही युनूस यांच्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची पण आवश्यक रणनीती ठरेल.
बांगलादेश राजकीय प्रयत्नांद्वारे या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करत असताना, विशेषतः अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा ठेवत पश्चिमेकडे पाहत आहे.
संकटाच्या भवितव्याचा वेध
बदलती परिस्थिती लक्षात घेता, रोहिंग्या संकटाबाबत बांगलादेशच्या भविष्यातील धोरणांना आकार देण्यासाठी ढाका प्रशासनाची स्पर्धात्मक हितसंबंधांचा समतोल साधण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दहा लाखांहून अधिक निर्वासितांना आश्रय देण्याचा ताण आता वाढता राजकीय मुद्दा बनला आहे, आणि त्यामुळे बांगलादेशवर ओपन डोअर धोरणाचा फेरविचार करण्यासाठी देशांतर्गत दबावही वाढत आहे. युनूस यांनी मांडलेला बहुपक्षीय दृष्टिकोन हा सरकारी आणि बिगर-राज्य घटकांसाठी एक ठोस चौकट तयार करू शकतो, ज्यामुळे सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रत्यार्पणासाठी मार्ग मोकळा होईल. तसेच, परतलेल्या निर्वासितांवर पुन्हा अत्याचार होणार नाहीत याची खात्री करण्यातही यश मिळू शकेल. जागतिक समुदायाच्या सक्रिय सहभागामुळे रोहिंग्या प्रत्यार्पणाबाबत म्यानमारवर दबाव वाढवता येईल, तसेच सशस्त्र लष्करी गटांकडून होणाऱ्या चिथावणीला रोखण्यास मदत होऊ शकते. या प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रादेशिक मुत्सद्देगिरीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तथापि, बांगलादेश व जागतिक स्तरावरील बदलत्या राजकीय प्रवाहांमुळे या प्रयत्नांची व्याप्ती मर्यादित राहिली आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि गाझा संकट यांसारख्या संघर्षांनी जागतिक लक्ष वेधून घेतले असताना, रोहिंग्या निर्वासितांच्या संकटाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरीही, हे संकट असा एक गंभीर मुद्दा आहे ज्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा या मानवीतावादी संकटाचा परिणाम प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यावर होऊ शकतो.
मल्लिका थापर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.
आदित्य गौदारा शिवमूर्ती हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राम्सचे सहयोगी फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.