Author : Tuneer Mukherjee

Expert Speak Raisina Debates
Published on Jul 30, 2024 Updated 0 Hours ago

जगभरातल्या नौदलांनी कामिकाझे ड्रोन किंवा पेलोडसह दीर्घ पल्ल्याची वाहने विकसित करण्याचा मार्ग निवडला आहे. त्यात आता आणखी भर पडून मानवरहित नौदल युद्धांचे तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे.   

नौदलांमधील युद्धात 'ड्रोन्स'चा वाढता वापर

अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे नवे प्रमुख ॲडमिरल सॅम्युअल पापारो यांनी अलीकडेच एक विधान केले आहे. चीनच्या आक्रमणापासून तैवानचे रक्षण करायचे असेल तर अमेरिकेने 'हेलस्केप' संकल्पनेच्या भोवती आपली रणनीती आखली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये तैवानची सामुद्रधुनी ओलांडून बहुउद्देशीय ॲट्रिटेबल ड्रोनच्या तैनातीची कल्पना आहे. ॲडमिरल सॅम्युअल पापारो यांचे हे विधान पाहिले तर नौदल युद्धात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन महत्त्वाचे ठरणार आहेत हे लक्षात येते. युरोप आणि मध्य पूर्वेत चालू असलेल्या संघर्षांमध्ये धोरणात्मक यश मिळविण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नौदल मोहिमांमध्ये असे ड्रोन तैनात केले जात आहेत. त्यामुळे अशा ड्रोनचा कामिकाझे प्रकारातील हल्ल्यांमध्ये वापर करण्याचा पर्याय समोर येतो आहे. त्याचबरोबर अनेक नौदले पारंपारिक युद्धनौका आणि ड्रोन एकत्रित करून हायब्रीड फ्लीट्स वापरु लागली आहेत. मानवी ऑपरेटर आणि ड्रोन यांच्यातले नियंत्रण सुलभ करण्यासाठी नेटवर्क कम्युनिकेशन्स देखील विकसित होत आहेत. अशा घडामोडी आधुनिक नौदल युद्धाच्या गतीशीलतेला आकार देतात. त्यामुळेच या लेखात ड्रोनचा विकास आणि नौदलाची रणनीती यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.  

ड्रोन विकासातील समकालीन ट्रेंड

जगभरातील शक्तिशाली नौदलांनी उच्च क्षमतेची मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही), मानवरहित पृष्ठभाग वाहने (यूएसव्ही) आणि मानवरहित पाण्याखालील वाहने (यूयूव्ही) विकसित करण्यामध्ये गुंतवणूक केली आहे. या मानवरहित प्रणालींच्या विकास धोरणांचे उद्दिष्ट हे एक प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार करणे हे आहे. अशा यंत्रणा गस्ती विमाने आणि पाणबुड्यांसारख्या पारंपारिक साधनांची मदत न घेता गुंतागुंतीच्या मोहिमा करू शकतात. महाद्वीपीय युद्धाच्या वातावरणात उच्च क्षमतेची मानवरहित हवाई वाहनांची तैनाती केली जाते. अशा मानवरहित यंत्रणा महासागराच्या तळाशी जाऊन तिथले नकाशे तयार करणे, समुद्राखालील गंभीर पायाभूत सुविधांचे निरीक्षण करणे अशी कामे करू शकतात. पाळत ठेवणे आणि गुप्तचर सेवा पुरवणे अशीही कामे यांचा वापर करून करता येतात.  

जगभरातील शक्तिशाली नौदलांनी उच्च क्षमतेची मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही), मानवरहित पृष्ठभाग वाहने (यूएसव्ही) आणि मानवरहित पाण्याखालील वाहने (यूयूव्ही) विकसित करण्यामध्ये गुंतवणूक केली आहे.

नौदले ड्रोनना स्वायत्त क्षमता प्रदान करण्याचा विचार करत आहेत. असे केल्याने त्यांना आधीच आखलेल्या मोहिमा मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पाडता येतील. यासाठी नौदले पूरक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यात AI-सक्षम मशीन लर्निंग अल्गोरिदम, क्वांटम-एनक्रिप्टेड कम्युनिकेशन नेटवर्क आणि विस्तृत बँडविड्थ ध्वनिक आणि व्हिज्युअल सेन्सर अशी तंत्रज्ञाने महत्त्वाची आहेत. मल्टी-डोमेन स्वार्मिंगच्या संकल्पनेवरही काम सुरू आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मानवरहित मालमत्ता या हवाई, पृष्ठभाग आणि उप-पृष्ठभागासारख्या नेटवर्कद्वारे जोडल्या जातील. यामध्ये समन्वय साधताना त्याबद्दल गुप्तता राखली तर त्याची अमलबजावणी सक्षम होईल. त्याचप्रमाणे कमांड, कंट्रोल, कॉम्प्युटिंग, कम्युनिकेशन्स, सायबर, इंटेलिजन्स, पाळत ठेवणे, रीकॉनिसन्स अँड टार्गेटिंग (C5ISRT) सिस्टीम अशा युद्धक्षेत्राच्या प्रभावी यंत्रणांमध्ये नव्यानव्या सुधारणा केल्या जात आहेत. यामध्ये जलद व लवचिक आक्रमण साखळी तयार करणे हे उद्दिष्ट आहे. यामुळे स्पर्धात्मक सागरी वातावरणात वर्चस्व राखता येते.  

कामिकाझे ड्रोनचे महत्त्व

शक्तिशाली देशांनी हाती घेतलेल्या उच्चस्तरीय विकास कार्यक्रमांच्या उलट युक्रेन आणि येमेनमधील सैन्याने कमी किंमतीच्या ॲट्रिटेबल ड्रोनमध्ये सुधारणा केल्या आहेत.   व्यावसायिक UAVs आणि USV ला स्फोटक पेलोड जोडून या मानवरहित प्रणालीचे कामिकाझे ड्रोनमध्ये रूपांतर केले जाते. असे ड्रोन प्राणघातक असतात आणि त्यांच्या लक्ष्याचा वेगाने वेध घेतात. शत्रूपक्षाला हे ड्रोन पाडणे अशक्य असते. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक जॅमिंग आणि स्पूफिंग करता येत नाही. त्यामुळे हवाई हल्ल्यांसाठी याचा वापर होतो. अशा ड्रोन्सचे नियंत्रण उपग्रह किंवा रेडिओ लिंकद्वारे केले जाते. ऑपरेटरशी लिंक तुटली तरीही हे कामिकाझे ड्रोन त्यांचे लक्ष्य ओळखून त्यावर हल्ला चढवतात. 

शक्तिशाली देशांनी हाती घेतलेल्या उच्चस्तरीय विकास कार्यक्रमांच्या उलट युक्रेन आणि येमेनमधील सैन्याने कमी किंमतीच्या ॲट्रिटेबल ड्रोनमध्ये सुधारणा केल्या आहेत.    

इतर ड्रोनच्या तुलनेत कामिकाझे ड्रोन हे व्यावसायिक स्तरावरही सिद्ध झाले आहेत. युक्रेन आणि हौथी सैन्याने याच ड्रोनचा आधार घेऊन त्यांच्या यंत्रणा विकसित केल्या आहेत. युद्धक्षेत्रातली त्यांची परिणामकारकता लक्षात आल्याने त्यात नवेनवे शोध लागत आहेत. युक्रेनने मागुरा V5 आणि सी बेबी तसेच येमेनने तुफान-1 यासारख्या बहुउद्देशीय यूएसव्हीचा विकास केला आहे. या कामिकाझे ड्रोनचे प्राथमिक स्वरूप पाहता हे ड्रोन सागरी युद्धाला नवे आयाम देणार आहेत.

मागुरा V5 मरीन कॉम्बॅट ड्रोन

रणनीतीच्या दृष्टीने या कामिकाझे ड्रोनने आपली क्षमता सिद्ध केली आहे. काळ्या समुद्रात या सागरी ड्रोनने रशियन नौदलाच्या नाकेबंदीचा प्रभावीपणे प्रतिकार केला आणि उच्च क्षमतेच्या रशियन नौदलाविरुद्ध युक्रेनची रणनीती सक्षम केली. लाल समुद्रात गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईला प्रतिसाद म्हणून बाब अल-मंडाब सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर हल्ले करण्यासाठी हौथी सैन्याने याच कामिकाझे ड्रोनचा वापर केला आहे. या प्रदेशात मालवाहतुकीचे रक्षण करण्यासाठी अनेक राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. पण हौथी सैन्याने जागतिक सागरी व्यापाराचे महत्त्वाचे मार्ग लक्ष्य केले आहेत. हे कमी किंमतीचे स्वदेशी ड्रोन नौदल युद्धासाठी फारच परिणामकारक आहेत हे युक्रेन आणि हौथी सैन्याने दाखवून दिले आहे. 

'हेलस्केप' रणनीती म्हणजे काय?  

'हेलस्केप' हे तैवान सामुद्रधुनीमध्ये चीनच्या नौदलाचा सामना करण्यासाठी केलेलं बहुउद्देशीय ड्रोनचे नेटवर्क आहे. हे अमेरिकेने विकसित केले आहे. अशा यंत्रणांमुळे चीनच्या आक्रमणाला आळा घालता येईल आणि अमेरिका व त्याच्या भागीदारांना संपूर्ण आक्रमण करण्यासाठी वेळ मिळेल, असा अमेरिकेचा होरा आहे. या धोरणानुसार अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्री कॅथलीन हिक्स यांनी सप्टेंबर 2023 मध्ये ‘रेप्लिकेटर इनिशिएटिव्ह’ ची घोषणा केली. यामध्ये अनेक क्षेत्रात गुणवत्ता असलेली स्वायत्त प्रणाली तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी दीड ते दोन वर्षांची कालमर्यादा आहे. जून 2024 मध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने USV साठी 49 वेगवेगळ्या कंपन्यांना 984 दशलक्ष अमेरिकी डाॅलर्सची कंत्राटे दिली. यावरून 'हेलस्केप' रणनीती अमेरिकेसाठी किती महत्त्वाची आहे ते कळते.

अमेरिकेचा हा रेप्लिकेटर उपक्रम ड्रोन उत्पादनाला चालना देतो. सध्या अमेरिकेचे ड्रोन उत्पादन चीनच्या तुलनेत खूपच मागे आहे. चीन व्यावसायिक आणि लष्करी ड्रोनच्या जगभरातील उत्पादनात आघाडीवर आहे आणि तैवानच्या नाकेबंदीसाठी स्वतःचे ड्रोन तैनात करण्याची योजना आखतो आहे. चीनचे सैन्य वारंवार तैवानच्या आसपास हवाई दलाच्या जेट्ससह ड्रोन तैनात करते. त्यांना संयुक्त लढाईच्या तयारीची गस्त असे म्हटले जाते. शिवाय जानेवारी 2023 मध्ये चीनने जगातील पहिले समुद्री ड्रोन वाहक झू है युन लॉन्च करण्याचीही घोषणा केली आहे. महत्त्वाच्या अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये चीन अमेरिकेशी मोठी स्पर्धा करतो आहे. चीनने काही प्रमुख क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासाची आघाडी घेतली आहे हेच चीनच्या या ड्रोन वाहकाच्या तैनातीने हे दाखवून दिले आहे. क्वांटम तंत्रज्ञान, सायबर तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वायत्तता यातील चीनची प्रगती तैवानवरून असलेल्या अमेरिका –चीन संघर्षात निर्णायक ठरू शकते.  

भविष्यातील नौदल धोरणे 

विविध नौदले आपल्या पारंपारिक मालमत्तांसह मोठ्या प्रमाणात UAVs, USVs आणि UUVs तैनात करत आहेत. या संरचनांमध्ये  मानवयुक्त आणि मानवरहित यंत्रणांमध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता असेल. सोबतच मॅन-मशीन टीमिंगचा समावेश करणारे प्रोटोकॉल आवश्यक आहेत. अमेरिकेच्या नौदलाची सागरी  मोहिमांची संकल्पना आता बदलते आहे. आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सागरी नौकांवरून हल्ले करण्यापेक्षा पृष्ठभागावरील कृती गटांकडे जाण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या मानवरहित प्लॅटफॉर्मने विमानवाहू जहाजे आणि पाणबुड्यांसारख्या यंत्रणांना मागे टाकले तर अशा यंत्रणेसाठी निधी, देखभाल, प्रशिक्षण यावर भर द्यावा लागेल. अशा मानवरहित यंत्रणांमुळे नौदलाने भविष्यात ड्रोनचा प्रतिकार करणाऱ्या आणि या प्रतिकाराचा सामना करणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास करणे आवश्यक आहे.

सध्याच्या सागरी वातावरणात कामिकाझे ड्रोनमुळे निर्माण झालेल्या धोक्यांनी पारंपारिक नौदलांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. त्यांचे वर्चस्व कमी केले आहे. त्यामुळे या ड्रोनचा प्रतिकार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जॅमिंग किंवा उच्च क्षमतेच्या मायक्रोवेव्ह आणि ऊर्जा शस्त्रांद्वारे अशा ड्रोन्सचा प्रतिकार करता येईल. याशिवाय हवाई ड्रोनमध्ये इलेक्ट्रॉनिक पेलोड देखील बसवले जाऊ शकतात. ड्रोन सायबर हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी मात्र असुरक्षित आहेत. हे ड्रोन एकमेकांशी आणि त्यांना नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेशी जोडलेले असतात. त्यामुळे फक्त एका ड्रोनच्या हॅकिंगमुळे संपूर्ण यंत्रणा कमजोर होऊ शकते. म्हणूनच ड्रोन विकसित करताना सायबर आणि इलेक्ट्रॉनिक सुरक्षा पुरवणारे तंत्रज्ञान त्याला जोडणे आवश्यक आहे.

मानवरहित यंत्रणांचे आव्हान पाहता नौदलाने भविष्यात ड्रोनचा प्रतिकार करणाऱ्या आणि या प्रतिकाराचा सामना करणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास करणे आवश्यक आहे.

सागरी क्षेत्रामध्ये ड्रोनचा प्रसार सामरिक स्थ्यैर्यावर लक्षणीय परिणाम करेल. एप्रिल 2024 मध्ये इराणने आजपर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. यासाठी त्यांनी शेकडो ड्रोन तैनात केले आणि इस्त्रायलमधल्या अनेक ठिकाणी एकाच वेळी आक्रमण केले. अमेरिकन, फ्रेंच, ब्रिटीश आणि जॉर्डन सैन्याच्या मदतीने इस्रायलकडे अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली होती. इराणच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ते सक्षम होते परंतु तरीही सर्व हवाई मालमत्तेचे संरक्षण करता आले नाही. इराणचा हा हल्ला म्हणजे मानवरहित यंत्रणांच्या युद्धाचा उत्तम नमुना आहे. अनेक देश मानवरहित मालमत्ता तैनात करू शकतात, त्याद्वारे शत्रूला लक्ष्य करू शकतात. भविष्यात अशा कृती या पारंपरिक युद्धापेक्षा कमी तीव्र असतील असे गृहित धरले तरी असे हल्ले मोठ्या युद्धाला तोंड फोडू शकतात. यामध्ये धोरणात्मक युद्धाचाही समावेश होतो.  

नौदलाची युद्धयंत्रणा सातत्याने विकसित होत आहे. मानवरहित प्लॅटफॉर्म आणि संबंधित विघटनकारी तंत्रज्ञानाने या क्षेत्रात नवीन आयाम जोडले आहेत. परंतु सागरी सुरक्षेचे मूलभूत स्वरूप तेच आहे. नौदल सराव आणि प्रदर्शनांमध्ये क्लिष्ट मानवरहित प्रणालींचा समावेश असलेले डावपेच दाखवण्यात येत असले तरी त्यांची प्रत्यक्ष अमलबजावणी अद्याप बाकी आहे. जगभरातील नौदल रणनीतीकारांनी नौदल युद्धातील या उत्क्रांतीचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. या भू-राजकीय आणि तांत्रिक घडामोडी महत्त्वाच्या पर्वाचे रणशिंग फुंकत असतात. जगातल्या सुप्रसिद्ध नौदलांना हौथींसारख्या सैन्याने आव्हान दिले आहे. हा एक सूचक इशारा आहे. यामुळेच नजीकच्या भविष्यात नौदल खरेदीची धोरणे लवचिक असणे आवश्यक आहे. तसेच प्रगत, सामरिक आणि धोरणात्मक मानवरहित प्लॅटफॉर्ममध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. कामिकाझे ड्रोन विकसित करणे, अद्ययावत पेलोडसह दीर्घ क्षमतेची वाहने निवडणे आणि मानवरहित युद्धप्रणाली विकसित करणे असे मार्ग सगळ्याच नौदलांना निवडावे लागणार आहेत.


तुनीर मुखर्जी हे आशियाई सुरक्षेचे संशोधक आहेत. ते दक्षिण आशियातील नौदलाच्या आधुनिकीकरणाचा अभ्यास करत आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.