Published on Nov 09, 2023 Updated 20 Days ago

भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा विजेचा ग्राहक आहे. त्यामुळे पुढील दोन दशकात भारताची उर्जेची मागणी पाहता युरोपियन युनियनच्या ऊर्जा प्रणालीसारखी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.

एनर्जी क्लाउड: स्वच्छ ऊर्जा पुरवठ्याचा प्रभावी मार्ग

भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा विजेचा ग्राहक आहे. त्यामुळे पुढील दोन दशकात भारताची उर्जेची मागणी पाहता युरोपियन युनियनच्या ऊर्जा प्रणालीसारखी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दशकांत ऊर्जेचा वापर दुपटीने वाढला आहे. भारताचा दरडोई ऊर्जेचा वापर अजूनही जागतिक सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा होतो की सुप्त ऊर्जेची मागणी जास्त आहे आणि शेवटच्या ग्राहकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. याशिवाय पुढील दोन दशकांत भारताच्या शहरी लोकसंख्येमध्ये 27 कोटी लोकांची भर पडणार आहे. त्यामुळे विजेची निर्मिती आणि वितरणामध्ये लक्षणीय सुधारणा कराव्या लागतील.

भारताच्या विद्युत ग्रीड क्षेत्रामध्ये पर्यायी ऊर्जेची भर घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पर्यायी ऊर्जेचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे असले तरी या ऊर्जेवर सदासर्वकाळ अवलंबून राहता येत नाही. जेव्हा विजेची मागणी जास्त असते तेव्हा पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि ग्रीडचे काम संतुलित ठेवण्यासाठी ऊर्जा साठवण्याची प्रणाली आवश्यक असते.  ही वीज पायाभूत सुविधांमध्ये सामावून घेण्यासाठीची यंत्रणा सध्या तरी अस्तित्वात नाही. ऊर्जेचे केंद्रीकरण करणारी साठवण यंत्रणा सामान्यत: स्पिनिंग टर्बाइनच्या स्वरूपात असते. यामुळे विजेची मागणी वाढली तर वीज निर्मिती कंपन्या विजेचे उत्पादन वाढवू शकतात किंवा कोळसा किंवा डिझेल बॅकअप जनरेटर त्वरित चालू केले जाऊ शकतात. परंतु हे मार्ग खर्चिक आणि प्रदूषणकारी आहेत.

याउलट बॅटरी आणि पंप केलेले हायड्रो-स्टोरेज यासारखे स्वच्छ ऊर्जेचे पर्याय आता जागतिक स्तरावर वापरले जात आहेत. फ्लायव्हील्स, सुपरकॅपॅसिटर आणि ग्रीन हायड्रोजन यासारखं इतर स्टोरेज तंत्रज्ञानही विकसित होतं आहे.   2022 मध्ये बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीममध्ये 5 अब्ज अमेरिकी डाॅलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली. जागतिक BESS बाजार 2030 पर्यंत 120 ते 150 अब्ज अमेरिकी डाॅलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

वीज साठवणाऱ्या बॅटरीजमुळे ग्रीडला असंख्य फायदे मिळू शकतात. एक बॅटरी अनेक प्रकारची कामे करू शकते. अशा बॅटरीजमध्ये वीज साठवून ठेवून ठेवता येते आणि ज्यावेळी विजेचा जास्तीत जास्त वापर होतो त्या वेळी ती वापरता येते. बॅटरीजचा वापर रोज याच कारणासाठी केला तर विजेच्या पुरवठ्याचे नियमन करता येते. जेव्हा विजेची मागणी कमी असते तेव्हा पर्यायी ऊर्जेच्या निर्मितीमध्येही तिचा वापर होऊ शकतो.

विजेसाठी फक्त साठवणूक यंत्रणा उभारणे काहीसे अव्यवहार्य आहे. कारण बहुतेक वेळा त्याची गरज रोज चार तासांच्या आत म्हणजे अल्प-मुदतीच्या साठवणुकीसाठी असते. यावर क्लाउड स्टोरेज हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी वेगळी स्टोरेज यंत्रणा उभारावी लागत नाही. मागणी आणि वापर या तत्त्वावर ही वीज वापरता येते.

II. शेरू यंत्रणा: ऊर्जा साठवणुकीसाठी परवडणारी आणि सोपी सुविधा निर्माण करणे

यामध्ये ऊर्जा साठवणुकीसाठी सुलभ आणि परवडणारी प्रणाली उभारली जाते. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात या प्रणालीमुळे मोठे बदल घडत आहेत. उर्जेचे व्यवस्थापन आणि वापर करण्याच्या पद्धतीतही मोठी सुधारणा झाली आहे. शेरूने सुरुवातीला तीनचाकी इलेक्ट्रिक रिक्षांसाठी बॅटरी स्वॅपिंग यंत्रणा उपलब्ध करून दिली. कोविड-19  च्या काळात केलेल्या लॉकडाऊनमुळे दळणवळणाच्या सेवा अचानक ठप्प झाल्या. त्यावेळी इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या बॅटरीजचा पर्यायी वापर करायची संधी होती. याचा फायदा घेऊन भारताने व्हर्च्युअल क्लाउड स्टोरेज नेटवर्कची संकल्पना आणली. आता याला नेटबॅट असं म्हणतात. यामध्ये ऊर्जेची साठवणूक करण्यासाठी अशा  बॅटरी एकत्रित केल्या जाऊ शकतात.

ही वाटचाल इंडस्ट्री 4.0 कडे आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) तसेच क्लाउड सारख्या उत्पादन प्रक्रिया आणि उत्पादनांचे डिजिटल परिवर्तन होते आहे. या बॅटरी यंत्रणेचा वापर करण्याच्या पद्धती पाहिल्या तर  आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा कसा वापर करायचा याची दृष्टी मिळते. यामुळे खर्चातही बचत होते आणि स्वच्छ आणि अधिक लवचिक वीज पुरवठा होऊ शकतो.

The Power Of Energy Cloud Solutions

नेटबॅट हे शेरूचे प्रमुख उत्पादन आहे. हे तंत्रज्ञान भारताच्या विकसित ऊर्जा परिसंस्थेमध्ये ऊर्जेची साठवणूक आणि अखंड एकीकरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.  यामुळे वितरण कंपन्यांना आणि ग्रीड ऑपरेटरना विजेच्या वापरानुसार ऊर्जा साठवणुकीच्या सुविधेचा लाभ घेता येतो. बॅटरीजच्या मालकांनाही यामुळे कमाईची संधी आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहने अधिक स्वस्त बनू शकतात. या यंत्रणांमुळे विशेषतः तळाशी असलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडले आहेत. ई-रिक्षांच्या चालकांना  याचा चांगला फायदा झाला आहे.

नेटबॅटची मुख्य वैशिष्ट्ये

1. ऊर्जा साठवणुकीच्या क्षमतेत वाढ:  प्रगत विश्लेषण आणि अल्गोरिदमचा फायदा घेऊन ऊर्जेची साठवण, कार्यक्षमता आणि योग्य वापर यामध्ये सुधारणा करता येतात. विजेची मागणी आणि पुरवठा याचे व्यवस्थापन करण्यासाठी वितरण कंपन्यांना याची मदत होते. त्याचबरोबर  पारंपारिक ऊर्जेवरचे अवलंबित्व कमी होऊन स्वच्छ ऊर्जेच्या एकत्रीकरणाला चालना मिळते.

2. ग्रीडचे स्थैर्य णि लवचिकता: नेटबॅट ही यंत्रणा सर्वाधिक मागणी असलेल्या कालावधीत किंवा आपत्कालीन परिस्थितीत ऊर्जा साठवण क्षमता वाढवून ग्रीडमध्ये स्थिरता आणि लवचिकता वाढवते. यामुळे पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचे एकीकरण सुरळित होते  आणि ग्रीडच्या जोडणीमध्ये मोठ्या सुधारणा होतात. यामुळे ग्राहकांना विश्वासार्ह आणि स्थिर वीजपुरवठा देता येतो.

3. मागणी प्रतिसाद आणि लवचिकता : नेटबॅट ग्रीड सिग्नल आणि सिग्नलवर आधारित ऊर्जा संचयन प्रणालीच्या डिस्चार्जमध्ये समन्वय साधून मागणी आणि पुरवठा सुलभ करते. या लवचिकतेमुळे ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करता येतो आणि जास्त मागणी असेल त्या काळात  ग्रीडवरचा ताण कमी करता येतो. शिवाय खर्चातही बचत होते.

III. प्रमुख कंपन्यांसाठी संधी आणि आव्हाने:

पर्यायी ऊर्जानिर्मिती सतत होत नसल्याने ही ऊर्जा इलेक्ट्रिक ग्रिडमध्ये एकत्रित करणे हे ग्रीडच्या स्थिरतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आव्हान आहे. उर्जानिर्मितीमध्ये तीव्र वाढ किंवा घट झाली तर त्याचा ग्रिडवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे ग्रीडला आवश्यकतेनुसार ऊर्जेचा पुरवठा होईल असे उपाय आवश्यक आहेत. ‘टाईम ऑफ डे’ हे टेरिफ येत्या काही वर्षांमध्ये मोठी भूमिका निभावणार आहे. ऊर्जेच्या साठवणुकीचा डेटा मिळत राहिला तर त्याचा योग्य वापर करून घेता येईल.

त्याचबरोबर वीज नियामक यंत्रणा आणि त्याला अनुकूल प्रशासकीय रचना यासारखी आव्हानेही यात आहेत. यासाठी धोरणकर्त्यांनी आर्थिक प्रोत्साहन देऊन नियामक प्रक्रिया सुलभ केली पाहिजे आणि आणि ग्रीडच्या एकत्रिकरणासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवली पाहिजे. नेटबॅटसारख्या ऊर्जा साठवण यंत्रणांच्या वापरालाही प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याच पद्धतीने, भारतात स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जेच्या गतिशील पुरवठ्यावर काम करणाऱ्या अनेक स्टार्टअप कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या वाढीसाठी भांडवल उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील  धोरणकर्ते आणि कंपन्या यांची सहयोगी भागीदारी महत्त्वाची ठरेल. सुरळीत ऊर्जा संक्रमण, विश्वासार्हता, ज्ञानाची देवाणघेवाण आणि भागधारकांमध्ये सहकार्य वाढवणे या उद्देशाने वितरण कंपन्या, तंत्रज्ञान पुरवणारे लोक आणि   आर्थिक मदत पुरवणाऱ्या यंत्रणा यांची युती घडवून  आणण्याची ‘शेरू’ची इच्छा आहे.

निष्कर्ष 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी वेगाने आर्थिक विकास होत आहे. पण या आर्थिक वाढीबरोबरच वाढत्या कार्बन उत्सर्जनाचा भारही येतो.म्हणूनच भारताने 60 टक्के वीज पर्यायी ऊर्जास्रोतांतून मिळवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. शेरू टीम ऊर्जा क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर करून विजेच्या ग्रीडमध्ये पर्यायी ऊर्जा सामावून घेण्यासाठी प्रयत्न करते आहे. स्वच्छ, हरित आणि अधिक शाश्वत विकास हे भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणूनच हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.

अंकित मित्तल हे ‘शेरू’चे सीईओ आणि संस्थापक आहेत.

काविन आदित्यन हे शेरू येथे मार्केटिंग व्यवस्थापक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.