Author : Sameer Patil

Expert Speak Digital Frontiers
Published on Jan 09, 2023 Updated 0 Hours ago

येमेन आणि युक्रेनच्या रणांगणापासून सीरिया, आर्मेनिया आणि अझरबैजानपर्यंत, २१व्या शतकात युद्धाने आपले केंद्रस्थान अधिक बळकट केले आहे. वांशिक वैमनस्य, प्रादेशिक दावे आणि भू-राजकीय स्पर्धेमुळे हे आधुनिक संघर्ष हवाई, सागरी आणि सायबर विश्वात पसरले आहेत. परंतु, लक्षणीय बाब अशी की, या संघर्षांनी लष्करी सिद्धांतांना आकार देण्यात आणि भविष्यातील रणनीतींवर प्रभाव टाकण्यासाठी विनाशकारी तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका सुस्पष्ट केली आहे.

विनाशकारी तंत्रज्ञानाच्या युगातील युद्धाचे भविष्य

हा लेख रायसीना एडिट २०२२ या मालिकेचा एक भाग आहे.


तंत्रज्ञानाने युद्धात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे; दोघांमध्ये एक प्रकारचा सहजीवन संबंध आहे. ११व्या शतकातील ‘गनपावडर क्रांती’ पासून, तांत्रिक प्रगतीने रणांगणातील गतिशीलतेला आकार दिला आहे आणि लष्करी कारवाईचा निर्णय घेणाऱ्या नियोजकांना त्यांच्या सैन्याची मारक क्षमता वाढविण्यास सक्षम केले आहे. याउलट, बदलता धोका जाणवणाऱ्या वातावरणामुळे युद्धाचे स्वरूप पुरते बदलून टाकणाऱ्या विनाशकारी तंत्रज्ञानाचा शोध सुरू झाला आहे.[1]

११व्या शतकातील ‘गनपावडर क्रांती’ पासून, तांत्रिक प्रगतीने रणांगणातील गतिशीलतेला आकार दिला आहे आणि लष्करी कारवाईचा निर्णय घेणाऱ्या नियोजकांना त्यांच्या सैन्याची मारक क्षमता वाढवण्यास सक्षम केले आहे.

जेव्हा योग्य वापर करण्यात आला, तेव्हा तंत्रज्ञानाने विद्यमान लष्करी समतोल वाढवला आणि तुलनेने कमकुवत बाजूला याचा फायदा झाला. उदाहरणार्थ, प्युनिक युद्धांदरम्यान (इ.स. पूर्व २६४-१४६), कार्थॅजिनियन्सच्या भयानक सागरी सामर्थ्याचा सामना करताना, रोमन लोकांनी कार्थॅजिनियन जहाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचा पराभव करण्यासाठी कॉर्व्हस बोर्डिंग उपकरण विकसित केले. इतर प्रकरणांमध्ये, तांत्रिक प्रगतीमुळे लष्करी श्रेष्ठत्व बळकट होते. उदाहरणार्थ, १९४० च्या दशकात अण्वस्त्रांचे आगमन झाले त्यावेळेस अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या आधीच-उच्चतम असलेल्या लष्करी क्षमतांना आणखी बळकटी मिळाली.[2]

तंत्रज्ञानाधिष्ठित युद्धे

हा कल कायम राहिला असून, रोबोटिक्स आणि स्वायत्तता, क्वान्टम कॉम्प्युटिंग, सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विनाशकारी तंत्रज्ञानाद्वारे २१व्या शतकातील युद्धे भिन्न बनली आहेत. युक्रेनच्या सध्या सुरू असलेल्या संघर्षाने गतिशील युद्धाच्या प्रयत्नांना बळकट करण्यासाठी या तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका दाखवून दिली आहे: कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून लक्ष्य ओळखू शकणारे रशियाने तैनात केलेले कुब-ब्ला ड्रोन; टँक-विरोधी शस्त्रांनी सज्ज असलेले युक्रेनचे ड्रोन्स, जे हवाई शोधासाठी उपग्रहाचे थेट प्रक्षेपण वापरतात; आणि युक्रेन विरोधातील रशियन सायबर हल्ले आणि चुकीची माहिती देणार्‍या मोहिमांची लाट यामुळे ‘युद्धाविषयी संभ्रमाचे धुके’ निर्माण होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शक्तीवर चालणारे ड्रोन्स आणि रोबोटिक्स यांसारख्या स्वयंचलन (ऑटोमेशन) आणि माहिती-चालित तंत्रज्ञानाला पुरते चित्र बदलून टाकणाऱ्या विनाशकारी तंत्रज्ञानात महत्त्व प्राप्त झाले आहे आणि अल्गोरिदमच्या आधारे स्वतंत्रपणे लक्ष्यांवर हल्ला करण्याचे अधिकार मिळालेली स्वायत्त प्रणाली निर्माण केली आहे. सेन्सर्स आणि प्रोसेसरसह सुसज्ज अशा या प्रणाली लष्करी दलाला धोक्याच्या वातावरणाचा परिस्थितीजन्य इशारा देतात आणि सशस्त्र असल्यास, मानवी हस्तक्षेपाशिवाय लक्ष्य निवडण्यासाठी आणि त्यावर मारा करण्यासाठी त्यांना सक्रिय करता येते. याशिवाय, एखाद्या सैन्यात मानवी जीवितहानी होण्याची जोखीम कमी होते आणि स्वायत्त प्रणाली मोठ्या संख्येने तैनात केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, एकाच वेळी ड्रोनची झुंडच्या झुंड धाडणे या संकल्पनेद्वारे, अनेक ड्रोन्स सामरिक मोहीम साध्य करण्यासाठी परस्परांच्या संपर्कात राहून समन्वय साधतात. उदाहरणार्थ, जुलै २०२१ साली, इस्रायली सैन्याने हमस दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी दक्षिण गाझामध्ये ड्रोनची झुंड धाडली होती.

इस्रायलची सध्या कार्यरत असलेली आयर्न डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, आपल्या प्रदेशात प्रवेश करणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांमुळे नागरिकांना धोका आहे की नाही, याचे विश्लेषण करते.

अनेक पूर्ववर्ती प्रणाली- ज्यांचे अर्ध-स्वायत्त प्रणाली म्हणूनही वर्णन केले जाते- त्यात सुस्‍पष्‍टपणे स्वायत्तता वाढविण्याचा कल दिसून येतो. या प्रणाली आकाशापासून पाण्याखालीही कार्यरत राहू शकतात. उदाहरणार्थ, अमेरिकी नौदल कृत्रिम बुद्धिमत्तेने-सक्षम अशी रोबो पाणबुडी तैनात करण्याच्या मार्गावर आहे, जी मानवी हस्तक्षेपाशिवाय क्षेपणास्त्रांचा मारा करू शकते. याचप्रमाणे, रशिया जमिनीवर चालणारे एक मानवरहित वाहन विकसित करत आहे, जे मानवी नियंत्रणाशिवाय गस्त घालू शकते आणि एकाच वेळी अनेक ड्रोन्स पाठवू शकते. इस्रायलची सध्या कार्यरत असलेली आयर्न डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या प्रदेशात प्रवेश करणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांमुळे नागरिकांना धोका आहे की नाही, याचे विश्लेषण करते. माहिती-चालित तंत्रज्ञानाचा धोरणात्मक पाठपुरावा करताना भारतासह अनेक देशांनी या प्रणालींचा विकास करण्यावर भर दिला आहे. या व्यतिरिक्त, चीनसारखे काही देश या प्रणालींच्या आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या एकात्मिक विकासासाठी, नागरी-लष्करी एकत्रित दृष्टिकोनाचा अवलंब करत आहेत.

‘स्वयंचलित सक्षमते’वर बळाचा वापर?

मात्र जसा स्वायत्त प्रणालीचा विकास आणि वापर वाढत आहे, तशी नैतिक आणि शिष्टाचारासंदर्भातील आव्हानेदेखील वाढली आहेत (या प्रणालींचे नियमन करता येईल का?).

जिथे त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, त्या वेळेस स्वायत्त प्रणाली फायदेशीर आहे.अल्गोरिदमने त्यांची कार्यप्रणाली निश्चित केल्यामुळे, या प्रणाली निःसंशयपणे वेगाने विकसित होत असलेल्या युद्धक्षेत्रातील परिस्थितींशी ताळमेळ राखू शकतात आणि प्रतिसाद देऊ शकतात. स्वायत्त प्रणाली काय साध्य करू शकतात, यासंबंधित वेगवान बदल होत असताना, त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली आहे, जिथे यंत्रेच प्राणघातक शक्ती कधी वापरायची आणि ती वापरायची का, ते ठरवू शकतात. सरकारी सैन्याने मार्च २०२० मध्ये प्रतिस्पर्धी बंडखोरांच्या सैन्याला लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांची ‘शिकार’ करण्यासाठी तुर्की-बनावटीच्या कार्गु-२ स्वायत्त सशस्त्र ड्रोनचा वापर केला होता, हे संयुक्त राष्ट्र संघाच्या लीबियावरील तज्ज्ञांच्या पॅनेलने, उघड केल्यानंतर याविषयीचा वाद वाढला होता. या पॅनेलने नमूद केले होते की, या प्रणालींमध्ये “ऑपरेटर आणि युद्धसामग्री दरम्यान माहितीच्या जोडणी आवश्यक न राहता लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी कोड केले गेले होते: प्रत्यक्षात- ‘मारा करा, विसरा आणि शोधा’ क्षमतेने त्या सुसज्ज होत्या.”

काही प्रमाणात स्वायत्त असलेली प्रणाली जसजशी अधिक लष्करी सामग्रीत प्रवेश करेल आणि स्वायत्त प्रणाली हे एक वास्तव बनेल, तेव्हा हत्यांसाठी कोणाला जबाबदार धरायला हवे आणि  किती स्वायत्तता असावी आणि किती स्वीकारार्ह आहे या मानवी नियंत्रणाच्या मुद्द्याला अधिक महत्त्व प्राप्त होईल. दुर्दैवाने, या तांत्रिक प्रगतीवर आणि रणांगणातील घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यास आंतरराष्ट्रीय नियम धीमे आहेत.

याला आणखी एक कंगोरा आहे, तो म्हणजे अशा तंत्रज्ञानाचा बिगर सरकारी व्यक्ती, संस्थांत प्रसार होणे, जे नाविन्यपूर्ण उपयोजनेद्वारे अशा तंत्रज्ञानाची प्राणघातकता आणि उपयुक्तता वाढवू शकतात.

अल्गोरिदमच्या आधारे स्वतंत्रपणे लक्ष्यांवर हल्ला करण्याचे अधिकार मिळालेल्या स्वायत्त प्रणालीच्या मुद्द्यावर ‘प्राणघातक स्वायत्त शस्त्रे प्रणालीच्या क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानासंदर्भातील सरकारी तज्ज्ञांच्या गटाशी’ संयुक्त राष्ट्र संघटनेचा २०१७ पासून वावविवाद सुरू आहे. त्यांनी प्राणघातक स्वायत्त शस्त्रे प्रणाली वापरण्यासाठी काही तत्त्वे सुचवली आहेत, उदाहरणार्थ- आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा लागू करणे आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मानवी जबाबदारी आवश्यक असणे. ‘स्टॉप किलर रोबोट्स’ मोहिमेद्वारे नागरी समाज या प्रयत्नांत सहभागी होत आहे आणि स्वायत्त शस्त्र प्रणालींवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आवाहन करत आहे. या प्रश्नांशी संबंधित भागधारक या मुद्द्यांवर चर्चा करत असताना अनेक देश मात्र, त्यांच्या ठरावाची वाट पाहणार नाहीत आणि अशा प्रणाली तैनाती करण्यासंबंधी पावले उचलतील. याला आणखी एक कंगोरा आहे, तो म्हणजे अशा तंत्रज्ञानाचा बिगर सरकारी व्यक्ती, संस्थांत प्रसार होणे, जे नाविन्यपूर्ण उपयोजनेद्वारे अशा तंत्रज्ञानाची प्राणघातकता आणि उपयुक्तता वाढवू शकतात. उदाहरणार्थ, विविध दहशतवादी गटांनी लष्करी तळांना आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे. याशिवाय, अंमली पदार्थांची तस्करी करणारे गट तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी गट यांनी याआधीच उत्तर भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये अंमली पदार्थांची आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक करण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे.

लष्करी मनुष्य बळाची पुनर्कल्पना

रणांगणावर टर्मिनेटर-सारखे रोबो दिसले नाहीत तरी, मशीन लर्निंगवर आधारित कार्यक्षमतेने स्वयंचलन विकसित होत असल्याने सैन्यासाठी स्वायत्त प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

ते दिवस दूर नाहीत, जेव्हा या यंत्रणांना सुरूंग नष्ट करणे, किरणोत्सर्गी वातावरणात काम करणे तसेच सीमा संरक्षण यांसारखी नीरस कार्ये करण्यासाठी सैन्य दले तैनात करतील. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या ‘मानवरहित प्रणाली रणनीती: २००७-२०३२’ मध्ये अशी नोंद आहे की, स्वायत्त प्रणाली ही मानवापेक्षा ‘नीरस, गलिच्छ किंवा धोकादायक’ मोहिमांसाठी अधिक अनुकूल आहे, कारण अनेक कामांत मानवी क्षमता आणि उपस्थिती हे प्रतिबंधित घटक असतात. परंतु यंत्रांचा वापर करून, लष्करी नियोजक मानवी जीवितहानी कमी करू शकतात आणि मनुष्य बळाचा अधिक कार्यक्षमतेने वापर करू शकतात.

यंत्रमानव आणि इतर स्वायत्त यंत्रणा युद्धभूमीवर परस्परांना भिडण्याची शक्यता असल्याने आणि मानवी जीवितहानी होण्याची भीती नसल्यामुळे, लष्करी कारवाईचा निर्णय घेणारे नियोजक लढाईत पूर्णपणे उतरू शकतात आणि यशापर्यंत पोहोचू शकतात.

या संभाव्य विकासाचा लष्करात कार्यरत असणाऱ्या मनुष्य बळावर खोलवर परिणाम होऊ शकतो. ऑटोमेशनसाठी “काही विशिष्ट खासियती कमी करणे, सेवेत असलेल्या अनेक सदस्यांना पुन्हा नवी कौशल्य प्राप्त करणे आणि संपूर्णपणे नवीन नोकऱ्यांचा एक समूह- ज्यात नवे प्रशिक्षण, कौशल्ये, ज्ञान आवश्यक असते, ते निर्माण करणे” आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, त्यात काळजीवाहक, शिक्षक आणि विषय तज्ज्ञ यांसारखे वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि मूल्यमापन तसेच भावनिक बुद्धिमत्ता या संदर्भातील नोकऱ्यांची व्याप्ती वाढेल.

निष्कर्ष

तंत्रज्ञान आणि स्वयंचलन यामधील वेगाने होणारी प्रगती ही संघर्ष आणि युद्धाच्या भविष्याला आकार देत राहील. शक्य तितक्या लवकर शस्त्रास्त्रनिर्मिती करून ती तैनात करणे या एकमेव उद्देशाने राष्ट्रे या तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करत आहेत. यंत्रमानव आणि इतर स्वायत्त यंत्रणा युद्धभूमीवर एकमेकांना भिडण्याची शक्यता असल्याने, आणि मानवी जीवितहानी होण्याची भीती नसल्यामुळे, लष्करी कारवाईचा निर्णय घेणारे नियोजक लढाईत पूर्णपणे उतरू शकतात आणि यशापर्यंत पोहोचू शकतात. युद्धासाठी या तांत्रिक उत्क्रांतीचा हा सर्वात मोठा परिणाम आहे. यामुळे युद्धाचे राजकीय परिणाम आणि शत्रुत्व संपवण्यासाठी शांततापूर्ण उपाय शोधण्याची नैतिक गरज दूर होईल. अराजकतेकडे जाण्याची ही वेगळी शक्यता, प्राणघातक स्वायत्त शस्त्रप्रणाली आणि रोबोटिक्स यांसारख्या तंत्रज्ञानाचे नियमन अत्यावश्यक बनवते.


[1] Alex Roland, War and Technology: A Very Short Introduction (New York: Oxford University Press, 2016), 36–41.

[2] Michael Quinlan, Thinking About Nuclear Weapons: Principles, Problems, Prospects (Oxford & New York: Oxford University Press, 2009), 9.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.