Image Source: Getty
ग्रँड नरेटिव्ह हे वैचारिक प्रवाह नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे साधन आहे, यास इतिहास साक्षी आहे. ग्रँड नरेटिव्ह म्हणजे समाजाच्या सामूहिक चिंता आणि आकांक्षा, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विचारधारेवर प्रभाव टाकणारे रूपक आहे. अशा नरेटिव्हनी इतिहासामध्ये महत्त्वाची भुमिका बजावली आहे. तसेच, समाजाची ओळख आणि स्वेच्छेने काम करण्याची क्षमता परिभाषित केली आहे. ग्रीको पर्शिअन (499–449 BC) युद्धांमुळे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याच्या इर्षेपाई विविध संस्कृतींमध्ये एक चिरस्थायी फूट निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम पाच शतकांच्या वसाहतीवादी राजकारणाचा समावेश असलेल्या अडीच सहस्रकांहून अधिक काळामधील पाश्चिमात्य आणि पौर्वात्य राजकारणावर झाला. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या श्रेष्ठतेचे समर्थन करणाऱ्या या नरेटिव्हचा प्रभाव पौर्वात्य राष्ट्रांसोबतच्या संबंधांवर पडला आहे, तसेच यातून पाश्चिमात्य राष्ट्रांच्या सामर्थ्याची आणि काळाच्या चढ उतारांना तोंड देण्याच्या स्थायीभावाची पुष्टी झाली आहे. अमेरिकेची ‘मॅनिफेस्ट डेस्टिनी’, फ्रान्सचे ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे प्रतीक म्हणून कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांच्या ‘प्रोलिटारिएट्स ऑफ ऑल कंट्रीज, युनाईट!’ या ‘कम्युनिस्ट मॅनिफॅस्टोतील’ घोषणेने राजकारण, तत्कालिन आकांक्षा आणि समकालीन राजकीय संस्था यांना आकार दिला आहे.
पाश्चिमात्य राष्ट्रांच्या श्रेष्ठतेचे समर्थन करणाऱ्या या नरेटिव्हचा प्रभाव पौर्वात्य राष्ट्रांसोबतच्या संबंधांवर पडला आहे, तसेच यातून पाश्चिमात्य राष्ट्रांच्या सामर्थ्याची आणि काळाच्या चढ उतारांना तोंड देण्याच्या स्थायीभावाची पुष्टी झाली आहे.
'मॅनिफेस्ट डेस्टिनी'ने अमेरिकेच्या पश्चिमेकडील विस्तारास दैवी आणि राष्ट्रीय अनिवार्यता म्हणून समर्थित केले आहे. या ग्रँड नरेटिव्हने प्रादेशिक अधिग्रहणांच्या कार्यासही समर्थन दिले आहे. यात लुईझियाना परचेस (१८०३), टेक्सासचे अनेक्सेशन (१८४५), ओरेगॉन ट्रेल स्थलांतर आणि मेक्सिकन-अमेरिकन युद्ध (१८४६ -१८४८) यांमुळे अमेरिकेचा प्रभाव पॅसिफिक किनारपट्टीपर्यंत विस्तारित झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या उपक्रमाची व्याप्ती वाढवणाऱ्या ग्रीनलँड, कॅनडा आणि पनामा कालवा यांसारख्या अतिरिक्त-सार्वभौम जागांचा समावेश असलेली अमेरिकेची संकल्पना म्हणजे आर्थिक राष्ट्रवादाच्या पलीकडे जाणारा या ग्रँड नरेटिव्हाचा रेंगाळता प्रतिध्वनी आहे. त्याचप्रमाणे, फ्रेंच राज्यक्रांतीचा आत्मा असलेले स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे ब्रीदवाक्य लोकशाही आणि सामाजिक न्यायावरील आधुनिक वादविवादांना अधोरेखित करणारे आहे. या तत्त्वत्रयींनी जगभरातील राजकीय हालचालींना प्रेरणा दिली आहे आणि मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणापत्राच्या मसुद्यावरही प्रभाव टाकला आहे. तसेच आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाही रे वर्गामधील एकतेचे जागतिक आवाहन कमी झाले असले तरी, त्याचे वैचारिक सार समकालीन ट्रेड युनियन चळवळी, सामाजिक न्याय चळवळी आणि साम्राज्यवादविरोधी संघर्षांमध्ये टिकून आहे.
भावनिक आवाहन
ग्रँड नरेटिव्हचे यश हे अस्तित्वाच्या विषयी असलेल्या रोजगार, अर्थव्यवस्था, इमिग्रेशन, प्रादेशिकवाद आणि राष्ट्रीय अभिमान यांसारख्या विविध चिंतांमध्ये आहे. अशा चिंतांना भावनिकतेची जोड देऊन व लोकांच्या कल्पनाशक्तीला मोहित करून शक्तिशाली वैचारिक चौकट तयार करण्यात येते. या सर्व नरेटिव्हच्या एकत्रितपणामुळे एक सामायिक उद्देश आणि त्याच्यासाठी लढण्याचे फायदे लोकांसमोर ठेवले जातात. काही दशकांच्या धोरणात्मक प्रवचनातून हे साध्य होईलच असे नाही. या प्रक्रियेत, ही नरेटिव्ह वैचारिक विभाजनांची चौकट मोडत एकप्रकारचा दृष्टीकोन तयार करतात. या दृष्टीकोनचा वापर करून लोक त्यांच्या सामाजिक आणि नैतिक अत्यावश्यकतेचा अर्थ लावतात. परिणामी, ही नरेटिव्ह मोठ्या प्रमाणात मनपरिवर्तन करण्याचे शक्तिशाली साधन बनतात.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी १९८० च्या त्यांच्या अध्यक्षीय प्रचारामध्ये ‘लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषवाक्याचा वापर करून तत्कालीन आर्थिक मंदीमुळे चिंताग्रस्त असणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या भावनेला आवाहन केले होते. त्याचप्रमाणे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २०१६ आणि २०२४ च्या अध्यक्षीय मोहिमेमध्ये ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही घोषणा केली. याचा परिणाम असा झाला की लोकांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक अस्थिरतेविषयींच्या चिंतांमुळे दोघांनाही आपापल्या काळात राष्ट्राध्यक्षपद मिळाले. या ग्रँड नरेटिव्हाबाबत डेमोक्रॅट्समध्येही आकर्षण दिसून आले. उदाहरणार्थ, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांच्या १९९२ च्या यशस्वी अध्यक्षीय मोहिमेदरम्यान अनेक वेळा या शब्दाचा संदर्भ दिला होता. अशाच प्रकारे, टेक बॅक कंट्रोल आणि व्होट लिव्ह अशी मध्यवर्ती संकल्पना वापरून सार्वभौमत्व आणि स्वयंनिर्णयाच्या आकांक्षेला आवाहन करत ब्रेक्झिटला यश मिळाले. युरोपिअन युनिअनपासून ब्रिटन वेगळा होईल असे फार कमी जणांना वाटत होते तरीही ब्रेक्झिट हे आता वास्तव आहे.
तसेच, आपल्या देशाला शतकानुशतकांच्या ‘अपमानातून’ बाहेर काढण्यासाठी ‘चीनी राष्ट्राच्या उद्धारासाठीचे ‘चायना ड्रीम’, हे चीनी वैशिष्ट्यांसह समाजवादाद्वारे साध्य करण्यासाठी व त्यांच्या चीन-केंद्रित जागतिक सुव्यवस्था प्रकल्पाला पुढे नेण्याचे एक साधन म्हणून चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी चीनी राष्ट्राभिमानाला आवाहन केले आहे.
तसेच, आपल्या देशाला शतकानुशतकांच्या ‘अपमानातून’ बाहेर काढण्यासाठी ‘चीनी राष्ट्राच्या उद्धारासाठीचे ‘चायना ड्रीम’, हे चीनी वैशिष्ट्यांसह समाजवादाद्वारे साध्य करण्यासाठी व त्यांच्या चीन-केंद्रित जागतिक सुव्यवस्था प्रकल्पाला पुढे नेण्याचे एक साधन म्हणून चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी चीनी राष्ट्राभिमानाला आवाहन केले आहे. किंवा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या राजकीय सीमांबाहेरील विशाल प्रदेशांना एकत्रित करण्यासाठी 'रशियन मीर' किंवा 'रशियन वर्ल्ड' ची कल्पना मांडली आहे. ही संकल्पना व्यापक रशियन सभ्यता आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी लागू आहे. त्याचप्रमाणे, व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष ह्यूगो चावेझ यांचा 'बोलिव्हेरियनवाद' येथे लक्षात घ्यायला हवा. स्पॅनिश वसाहतवादी जोखडातून व्हेनेझुएला मुक्त करण्यासाठी सायमन बोलिव्हरच्या संघर्षातून बोलिव्हेरियनवाद स्पष्टपणे रेखाटण्यात आलेला आहे. पॅन-हिस्पॅनिक, समाजवादी आणि राष्ट्रवादी आदर्शांच्या मिश्रणाचा समावेश करून, अमेरिकन विचारधारेच्या राजकीय वर्चस्वाच्या चळवळीला यामुळे पर्याय निर्माण झाला आहे.
समाजमाध्यमांची भुमिका
ग्रँड नरेटिव्ह राजकीय क्षमतेचा अविभाज्य भाग बनलेला असताना, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अधिक सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भावनेने भारित, ओव्हरसिम्प्लीफाईड मेसेजिंगमध्ये रुजलेले ग्रँड नरेटिव्ह ही सोशल मीडियाच्या मेकॅनिक्ससह अखंडपणे संरेखित केली जाते. बाइट- साईजच्या आणि भावनिक आकर्षक कंटेन्टवर अशा नरेटिव्हला समर्थन मिळते. प्रतिबद्धता व्युत्पन्न करणाऱ्या आणि भावनांना हात घालणाऱ्या कंटेन्टला अल्गोरिदम प्राधान्य देतात. यामुळे असा कंटेन्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या मूळ राजकीय संदर्भांच्या पलीकडे ही माहिती लोकांमध्ये प्रसारित होते. मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्थलांतर, बेरोजगारी, अनुचित व्यापार संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा यातील सब-नरेटिव्ह यांना गंभीरपणे प्रतिध्वनीत करणारा भावनिक कंटेन्ट आयडिओलॉजीकल इको चेंबर्स तयार करतो आणि भिन्न लोकांचे एकत्रीकरण केले जाते.
ब्रेक्झिट मोहिमेदरम्यान, उदाहरणार्थ, 'व्होट लीव्ह' समर्थकांचा असा दावा आहे की युरोपियन युनियन सोडल्यास यूकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेसाठी दर आठवड्याला ३५० दशलक्ष पाऊंड्स उपलब्ध होतील. खरेतर याचे मोठ्या प्रमाणावर खंडन होऊनही हा व्हायरल चर्चेचा मुद्दा बनला होता. त्याचप्रमाणे गुन्हेगारी आणि व्यवस्था याविषयीच्या व्यापक चिंतेला टॅप करून, फिलीपिन्समध्ये सोशल मीडियाने माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या ‘वॉर ऑन ड्रग्ज’ मोहिमेला लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समर्थकांनी मोहिमेच्या डावपेचांना न्याय देणारा कंटेन्ट प्रसारित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आणि ड्रग-संबंधित हिंसाचारापासून समुदायांचे रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या कृतींना महत्त्व प्राप्त करून देले. यामुळे या मोहिमेच्या समर्थनार्थ सार्वजनिक धारणा तयार झाली.
प्रगत एआय चालित बॉट्स सोशल मीडिया अल्गोरिदममधील असुरक्षिततेचा प्रभावीपणे फायदा उठवू शकतात. हे बॉट्स अल्गोरिदममध्ये फेरफार करणारी बनावट एंगेजमेंट व्युत्पन्न करतात आणि एकमताचा भ्रम निर्माण करण्यासाठी, जनसंस्थेवर आणि सार्वजनिक धोरणावर प्रभाव टाकतात.
या पार्श्वभूमीवर जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मुळे या विषयाला अधिक गांभिर्य प्राप्त झाले आहे. डीपफेक्ससारख्या हायपर-रिअलिस्टिक एआय-व्युत्पन्न कंटेन्टमुळे वास्तविक आणि कृत्रिम सामग्रीमध्ये फरक करणे अशक्य केले आहे. आज, अशाप्रकारचा सिंथेटिक कंटेन्ट वापरकर्त्याने व्युत्पन्न केलेल्या कंटेन्टसह एकत्रित केला जातो. त्यामुळे अशी माहिती अस्सल असल्याचा एक गैरसमज तयार होतो. प्रगत एआय चालित बॉट्स सोशल मीडिया अल्गोरिदममधील असुरक्षिततेचा प्रभावीपणे फायदा उठवू शकतात. हे बॉट्स अल्गोरिदममध्ये फेरफार करणारी बनावट एंगेजमेंट व्युत्पन्न करतात आणि एकमताचा भ्रम निर्माण करण्यासाठी, जनसंस्थेवर आणि सार्वजनिक धोरणावर प्रभाव टाकतात. असे तंत्रज्ञानाचे सामर्थ्य पाहता, एआय-व्युत्पन्न डीपफेक आणि सॉफ्टफेक हे जगभरातील राजकीय प्रकल्पांमध्ये मुख्य स्थान बनले आहेत.
नवी अर्थव्यवस्था
अल्गोरिदमिक षडयंत्रांच्या पलीकडे विचार केला तर, सर्वव्यापी संगणकाच्या पार्श्वभूमीवर ग्रँड नरेटिव्हांची परिणामकारकता ही धोरणात्मक निर्णयाबाबत लोकांच्या कमी होत चाललेल्या संयमामुळे बळकट होत आहे. दैनंदिन जीवनात इंटरनेटद्वारे होणारा संप्रषणाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत आहे. तंत्रज्ञानाच्या व्यसनामुळे लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी होत असल्याने यात आणखीनच भर पडली आहे. सततचे स्क्रोलिंग, नोटिफिकेशन्सचा सतत भडिमार आणि डिजिटल मीडियावर शॉर्ट-फॉर्म कंटेंट याचा वापर शाश्वत प्रतिबद्धतेऐवजी संक्षिप्त उत्तेजनासाठी केला जात आहे. व्यक्तींना माहितीच्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये वेगाने स्विच करण्याची सवय झाल्याने विस्तारित कालावधीसाठी लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत तीव्र घट होत आहे. काही अंदाजांनुसार, मिलेनिअलचा अटेन्शन स्पॅन सुमारे १२ सेकंद, तर जेन झीचा अटेन्शन स्पॅन सुमारे ८ सेकंद आहे. १० ते ४४ वर्षे वयोगटातील या लोकसंख्येमध्ये जागतिक लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येचा समावेश आहे. तसेच जागतिक कार्यबलापैकी ४० टक्के लोकसंख्या असलेल्या या गटामध्ये सर्वात जास्त राजकीय प्रभाव असलेले लोक आणि सर्वात व्यापक सोशल मीडिया वापरकर्ते यांचा समावेश आहे.
पारंपारिक राजकीय नरेटिव्ह हे नैसर्गिकरित्या मर्यादित परंतु भावनिकदृष्ट्या आकर्षक असल्याने या नवीन डिजिटल वास्तविकतेमध्ये टिकून राहण्यासाठी त्यास संघर्ष करावा लागत आहे. ग्रँड नरेटिव्हला समजून घेण्यासाठी किमान संज्ञानात्मक प्रयत्नांची आवश्यकता असली तरीही मजबूत वैयक्तिक आणि नैतिककेची त्यास जोड असणे आवश्यक असते. ‘बिल्ड द वॉल’ सारख्या घोषणांचा वापर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या कठोर इमिग्रेशन भूमिकेचा एक भाग म्हणून केला होता. या साध्या घोषणेमुळे त्यांना समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळवणे सुलभ झाले. यास मुख्य प्रवाहातील संस्थांवरील सार्वजनिक विश्वासाची व्यापक झीज आहे, असे म्हणता येऊ शकते. अनेक दशकांपासून प्रचलित असलेल्या राजकीय अजेंडांमुळे निर्माण झालेल्या मजबूत अँटी-इन्कम्बेंसींमुळे अनेक नागरिकांचा सत्तास्थापनेबद्दल भ्रमनिरास झाला आहे. सोशल मीडियामध्ये माहितीचे लोकशाहीकरण आणि पारंपारिक जपुन ठेवण्यात आलेली माहिती लोकांसमोर उघडी करण्याची अतुलनीय क्षमता आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर नॅरॅटिव्ह बदलामध्ये, सत्ता पुनर्वितरणामध्ये तसेच विविध स्तरातील लोकांना एकत्र आणुन त्यांच्यामध्ये आशा आणि आश्वासने निर्माण करण्यासाठी केला जातो.
पारंपारिक माध्यमांचा प्रभाव
सोशल मीडियाने निःसंशयपणे ग्रँड नरेटिव्हच्या प्रसाराला गती दिली असली, तरीही पारंपारिक मीडियामधील वैधतेमध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पारंपारिक माध्यमे व्यावसायिक विचारांनी चालवली जातात त्यामुळे प्रेक्षक व्यस्ततेपासून आर्थिक आणि राजकीय सोयीस्करतेपर्यंतच्या कारणांसाठी ग्रँड नरेटिव्हला बळकट करण्यात त्यांचा मोठा हात असतो. एकीकडे, लोकांनी ठोस पावले उचलावीत यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच यामुळे सत्ताविरोधी भावना व लोकांच्या सुप्त चिंता वाढीस लागून त्यांचा खप वाढतो व परिणामी, जाहिरात महसूलात वाढ होते. तर दुसरीकडे, राजकीय आणि कॉर्पोरेट हितसंबंध असलेले मीडिया समूह, त्यांच्या भागधारकांच्या अजेंड्याला बळकटी देण्यासाठी त्यास नरेटिव्हशी संरेखित करण्याचा प्रयत्न करतात.
पारंपारिक माध्यमे व्यावसायिक विचारांनी चालवली जातात, त्यामुळे प्रेक्षक व्यस्ततेपासून आर्थिक आणि राजकीय सोयीस्करतेपर्यंतच्या कारणांसाठी ग्रँड नरेटिव्हला बळकट करण्यात त्यांचा मोठा हात असतो.
‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट: द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ द मास मीडिया’ (१९८८) या एडवर्ड एस हर्मन आणि नोम चॉम्स्की त्यांच्या पुस्तकात त्यांनी वैचारिक आणि आर्थिक हितसंबंधांद्वारे माहिती फिल्टर करून प्रसारमाध्यमे सक्रियपणे सार्वजनिक धारणा कशी तयार करतात याची मांडणी केली आहे. माध्यम संस्था आणि राजकीय घटक यांच्यातील सहसंबंधांमुळे नरेटिव्ह शाश्वत वैधता प्राप्त होते व सार्वजनिक प्रवचन आणि वैचारिक दिशा यांना आकार दिला जातो. मॉर्फ केलेल्या माहितीच्या लँडस्केपमध्ये पारंपारिक माध्यमांपेक्षा सोशल मिडीया अधिक प्रभावी ठरतो. यात माहितीच्या अचूकतेपेक्षा ती माहिती लोकांपर्यंत कशाप्रकारे लवकर पोहोचते यावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे चुकीची किंवा अपुर्ण माहिती सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने त्याचा परिणाम पारंपारिक माध्यमांवर तसेच लोकांच्या विचारावर दिसून येतो.
काळजीपुर्वक पडताळणी करताना
ग्रँड नरेटिव्ह संज्ञानात्मक आलेख थोडक्यात लोकांसमोर मांडतात त्यामुळे जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार याचे आकलन करून घेणे लोकांना सोयीस्कर ठरते. तसेच मोठ्या प्रमाणात धोरणात्मक गोंधळ दूर होतो. मीडिया, तंत्रज्ञान आणि लोकप्रिय संदेशवहन यांच्या अभिसरणामुळे ग्रँड नरेटिव्ह राजकीय घोषणांच्या पलीकडे जाऊन व्यापक आणि चिरस्थायी परिणामांसह ओळख किंवा आयडेन्टीटीला आधार देणारे फ्रेमवर्क तयार करतात. जसजसा डिजिटल मीडिया विकसित होत जाईल तसतसे ग्रँड नरेटिव्हला अधिक सामर्थ्य प्राप्त होईल. परिणामी, २१ व्या शतकातील राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाच्या ते केंद्रस्थानी येतील. आकर्षक नरेटिव्ह रचण्याची ताकद आता काही मोजक्या लोकांपर्यंत मर्यादित नाही. समाजविघातक घटक हे चुकीच्या हेतूने पण योग्य साधनांचा आधार घेऊन छुपे वार करतात. पारंपारिक माहितीच्या गेटकिपर्सना बाजूला सारत, सोशल मिडीयावरील एआयच्या अनियंत्रित वापरामुळे तसेच अस्पष्टतेमुळे निर्माण होणाऱ्या ग्रँड नरेटिव्हचा धोका वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे. सेंद्रिय भावना आणि अभियांत्रिकी सहमती यांच्यातील रेषा आधीच अस्पष्ट असल्याने माहितीपूर्ण निवडीच्या कल्पनेला आव्हान दिले जात आहे. कमी होत असलेला अटेंशन स्पॅन, माहितीची सत्यता पडताळण्यामधील उदासीनता यामुळे या युगातील मोठे आव्हान आपल्यासमोर उद्भवले आहे. विवादित वास्तविकता आणि समजण्यास कठीण सत्यांचा सामना करताना, ग्रँड नरेटिव्ह भविष्याला आकार देतील की नाही हा यापुढे भेडसावणारा प्रश्न नसून त्याऐवजी त्यांच्यावर कोण आणि किती प्रमाणात नियंत्रण ठेवेल हा मुख्य प्रश्न आहे.
जयबल नाडुवथ हे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि सिनियर फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.