Author : Jaibal Naduvath

Published on Oct 25, 2023 Updated 0 Hours ago

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे आश्रयस्थान आणि गुन्हे करण्यासाठीचे सुलभ ठिकाण असे कॅनडाविषयीचे मत त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला कलंक लावतेच, शिवाय देशाचा सामाजिक पोत बिघडवण्याचा प्रत्यक्ष धोकाही निर्माण करते.

कॅनडाचे कोडे

अलीकडील राजनैतिक संघर्षाने कॅनडाच्या व्यवस्थेवर एक महत्त्वपूर्ण प्रकाश टाकला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी शीख कट्टरवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर काही दिवसांच्या आतच नाझी पक्षाच्या वॉफेन एसएस या लढाऊ गटाच्या यारोस्लाव्ह हंकेन या सैनिकाचा कॅनडाच्या कनिष्ठ सभागृहात सन्मान करण्यात आला आणि कॅनडा पुन्हा एकदा नव्या वादात सापडला. या घटनेमुळे युक्रेन युद्धासंबंधाने होत असलेल्या शब्दयुद्धामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना यश मिळवणे अनपेक्षितपणे शक्य झाले. रशियाच्या कृतीचा उद्देश युक्रेनमधील ‘नाझीवादाचे उच्चाटन’ करणे, हा आहे, असे पुतिन त्या वेळी म्हणाले. दक्षिणेच्या बाजूस अमेरिकेसारखा अत्यंत शक्तिशाली शेजारी लाभल्याने कॅनडा आंतरराष्ट्रीय प्रकाशझोतापासून दीर्घ काळ लांब राहिला. त्यामुळे अभय मिळालेल्या स्थितीत कोणताही धक्का बसण्याची भीती न बाळगता स्फोटक दृष्टिकोन ठेवणे कॅनडाला शक्य झाले. जगातील महासत्ता असलेला अमेरिकेसारखा मित्र, रशियासारखा जाहीर शत्रू आणि अनेक विकासात्मक आव्हानांशी झुंज देणाऱ्या भारत व चीनसारख्या उदयोन्मुख सत्ता, हे समीकरण त्यांना अनुकूल ठरले. मात्र, आता तो काळ मागे पडला आहे. जग पुढे गेले आहे आणि आव्हान देणारे देश राजकारणातील दिग्गज आणि आर्थिक क्षेत्रातील सत्तास्थाने म्हणून प्रस्थापित होऊ पाहात आहेत. या देशांच्या उदयाने कार्यक्षेत्राचे स्वरूप बदलले आहे आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठाम स्वर अधिक उंचावला आहे; परंतु जगातील या बदललेल्या वास्तवाशी कॅनडाने ताळमेळ राखला नाही. त्याऐवजी कॅनडाने विरुद्ध दिशेने प्रवास करून इतिहासाच्या प्रतिकूल रचनेला चिकटून उर्वरित जगाशी संघर्ष करीत आपले आचरण कायम ठेवले.

बदललेले एकीकरण

कॅनडामध्ये वृद्धांची संख्या वाढत असून तरुणांची जागा भरून काढणाऱ्या जननदराचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे हा देश मोठ्या प्रमाणावर स्थलांतरितांवर अवलंबून आहे. आज स्थलांतरितांची संख्या कॅनडाच्या लोकसंख्येच्या सुमारे एक तृतियांश आहे. कॅनडामध्ये दर वर्षी हजारो लोक वास्तव्यासाठी येत असल्याने देशाला गृहनिर्माण, आरोग्यसेवा आणि रोजगारासंबंधित डोंगराएवढ्या आव्हानांशी सामना करावा लागत आहे. समन्वयीत एकात्मिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे ही आव्हाने आणखी वाढत आहेत. त्यामुळे देशात आलेले नवे लोक स्थलांतरित समुदायांनी देऊ केलेल्या व्यवस्थेकडे ढकलले जातात. याचा परिणाम म्हणजे, हे समुदाय आपल्या समवेत आणलेल्या अडचणी व संघर्षाची प्रतिध्वनी ठिकाणे म्हणून कार्यरत राहून असुरक्षित व अल्पसंख्य वंचितांच्या वस्त्या बनले आहेत. या समुदायांचे राजकीय महत्त्व वाढत असताना त्यांच्या मतांवर या प्रतिध्वनी स्थानांच्या अतर्गत प्रवर्धित होणाऱ्या गोष्टींमुळे मोठा प्रभाव पडतो. स्थानीक राजकारणी नेहमी आपले स्थान मजबूत करत अशा लोकांचे लांगूलचालन करून आपली पोळी भाजून घेत असतात. अतिउजव्यांचा उदय आणि स्थलांतरित नागरिकांमधील प्रवाहाबाहेरील विकृत घटकांकडून राजकारण्यांच्या सूरात सूर मिसळणे हा या परिस्थितीचा परिणाम आहे. या परिस्थितीने कॅनडाच्या राजकारणाला आणि जीवनपद्धतीला वेगळा आकार दिला आहेच, शिवाय कॅनडाच्या जागतिक आघाड्यांवर, प्राधान्यक्रमांवर आणि धोरणात्मक प्रतिसादांवरही प्रभाव निर्माण केला आहे. या सगळ्याचा विचार केला नाही, तर हा मार्ग राष्ट्रीय पातळीवर आणि जागतिक स्तरावर दोन्ही ठिकाणी कॅनडाच्या मूलतत्त्वावरच परिणाम करू शकतो.

क्षमाशील फौजदारी न्याय

कॅनडामध्ये १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात फौजदारी न्यायव्यवस्थेतील सुधारणांमध्ये पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंतप्रधान पियरे ट्रुडो यांनी सादर केलेली ही व्यवस्था सुलभ जामीन, क्षमाशील शिक्षा आणि लवकर पॅरोल या तत्त्वांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, युवा फौजदारी न्याय कायद्यांतर्गत वयाने लहान असलेल्या गुन्हेगारांची ओळख लपवण्यात येते. असे गुन्हेगार अगदी खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात दोषी असल्याचे सिद्ध झाले असले, तरी त्यांची ओळख लपवली जाते. त्यामुळे न्यायदानाचे महत्त्व कमी होते. कॅनडातील न्यायव्यवस्थेअंतर्गत आज एक तृतियांश शिक्षा भोगलेले अनेक गुन्हेगार पूर्ण पॅरोलसाठी पात्र आहेत; तसेच काहींनी त्यांच्या कैदेच्या अनिवार्य कालावधीच्या केवळ एक षष्ठमांश भाग पूर्ण केला असला, तरी देखरेखीशिवायच्या छोट्या रजांसाठी ते पात्र ठरलेले आहेत. एअर इंडियाच्या विमानात १९८५ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात वेदनादायक दीर्घ काळ चाललेला तपास व खटला चालवण्याची निरर्थक पद्धती हा विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यापूर्वीच्या काळात घडलेल्या या सर्वांत मोठ्या भयानक विमान हल्ल्यासाठी कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही. या हल्ल्यात ३२९ निष्पापांचे बळी गेले होते. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची ही एक क्रूर थट्टा आहे. असा दृष्टिकोन भविष्यातील गुन्ह्यांना पायबंद घालणे, बेकायदा वर्तनाचा निषेध करणे आणि सार्वजनिक सुरक्षा यांसारख्या घटकांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे एक दुष्टचक्र सुरू होते आणि या चक्रातून बाहेर पडणे सोपे नसते. विशेष म्हणजे, या क्षमाशीलतेला खुद्द कॅनडातच लोकांचा फारसा पाठिंबा नाही. अलीकडेच करण्यात आलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थांविषयक सर्व्हेमध्ये तेथील ८० टक्के लोकांनी देशातील सध्याची फौजदारी न्यायव्यवस्था ही गुन्हेगारांसाठी खूप सोपी आणि शिक्षा क्षमाशील आहे, असे नोंदवले. एवढेच नव्हे, तर हे मत कॅनडाच्या सर्वेच्च न्यायालयाकडूनही प्रतिबिंबित झाले. कॅनडातील न्यायाधीश हे दीर्घ काळापासून शिक्षेबाबत फारच मवाळ भूमिका घेतात, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

कॅनडाची दुखरी नस

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बांधिलकीविषयी कॅनडाला अभिमान आहे. मात्र, तीच आता दुखरी नस बनत चालली आहे. कॅनडाचा उदारमतवादी दृष्टिकोन चळवळी करणाऱ्या गटांना स्वातंत्र्याबरोबरच दुराचार करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. या संस्था हक्कांच्या संरक्षणात्मक बुरख्याआड लपून गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वातंत्र्याचा गैरवापर करतात. कॅनडाच्या फौजदारी कायद्यात घृणाविरोधी तरतुदी आहेत. त्या तरतुदींअंतर्गत खटले चालवण्याचे प्रमाण फारच अल्प आहे, यात आश्चर्य नाही. याच अतिस्वातंत्र्यामुळे गुरपतवंतसिंग पनून याच्यासारख्या फुटीरतावादी व्यक्तींना द्वेष पसरवण्यास आणि दहशतवादी कृत्ये करण्याची धमकी देण्याची परवानगी मिळते. याच अतिस्वातंत्र्यामुळे जिम कींग्स्ट्रासारख्या व्यक्तींना मुलांमध्ये धर्मविरोधी भावना पसरवता येतात आणि मुलांच्या अजाण मनात हे विष कायमचे कालवता येते. अशा गैरवापरामुळे कॅनडाच्या देशांतर्गत ऐक्यास बाधा येतेच, शिवाय त्याचे व्यापक परिणामही होतात. यातून कॅनडाच्या सहिष्णुतेला चुकीचे वळण लागण्याचा धोका संभवतो; तसेच सुरक्षित जगासाठी होत असलेल्या जागतिक प्रयत्नांचे खच्चीकरण करणाऱ्या कृत्यांचे ते आश्रयस्थान बनू शकते. स्वातंत्र्याचे आदर्श हे द्वेषमूलकतेच्या प्रयत्नांची साधने बनू नयेत, हे कॅनडासमोरील आव्हान आहे.

कॅनेडियन फौजदारी संहितेमध्ये द्वेषविरोधी तरतुदी आहेत, परंतु आश्चर्यकारकपणे, त्या तरतुदींनुसार खटले दुर्मिळ आहेत.

स्थलांतरविषयक शिथिल धोरण आणि न्यायव्यवस्थेमुळे कॅनडाच्या समाजाचे ध्रुवीकरण तर होतेच, शिवाय जगभरातील संघर्षाच्या प्रदर्शनाचे ते एक ठिकाणही बनते. त्यामुळे कॅनडा अंतर्गत व बाहेरील दोन्ही ठिकाणच्या कायद्यापासून पळ काढणाऱ्यांना चुंबकासारखे खेचून घेतो. कॅनडात दर वर्षी शेकड्यांनी होणाऱ्या हत्यांना वुल्फपॅक अलायन्ससारखे संघटीत गुन्हेगारी माफिया आणि हेल्स अँजल्ससारख्या टोळ्या यांच्याबरोबरच आणखीही अनेक जबाबदार आहेत. २०२१ या केवळ एका वर्षात एकूण हत्यांपैकी सुमारे एक चतुर्थांश हत्या या टोळ्यांशी संबंधित आहेत. कॅनडा हे सध्याच्या काळातील सर्वांत वादग्रस्त व्यक्तींचे निवासस्थान आहे. या व्यक्ती मानवतेविरुद्धच्या काही सर्वांत वाईट गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला नूर चौधरी कॅनडात सुरक्षित आहे. हा खटला बांगलादेशातच चालवला जावा, यासाठी बांगलादेशाने अनेक वर्षांपासून प्रयत्न करूनही ते शक्य झाले नाही. बंडखोर नेते जनरल महंमद हमदान डगलो आणि सुदानच्या सत्तेवरील जनरल अब्देल फतह अल बुरहान यांच्यातील प्राणघातक संघर्षातील महत्त्वाची व्यक्ती असलेला युसुफ इब्राहिम इस्मायली अजूनही विनिपेग येथून सक्रिय आहे. १९९० च्या दशकात झालेल्या लायबेरियन युद्धादरम्यान भीषण आणि वेदनादायी युद्ध गुन्ह्यांमध्ये आरोप असलेला लायबेरियाचा योद्धा बिल होरॅस दोन दशकांपेक्षा अधिक काळ कॅनडात मोकाट होता. २०२० मध्ये त्याचा खात्मा करण्यात आला. पुरावे असूनही कॅनडा प्रशासनाने त्याच्याविरोधात खटला चालवला नाही. अशा व्यक्तींविरुद्धची निष्क्रियता त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचे बळी ठरलेल्यांचा अवमान करतेच, शिवाय कॅनडाच्या मानवतेविरुद्धच्या गुन्हेगारी व युद्ध गुन्हेगारी कायद्यालाही सहानुभूतीशून्य ठरवते. हे कायदे नरसंहार, मानवतेच्या विरुद्ध गुन्हेगारी आणि युद्ध गुन्हेगारीसारख्या गुन्ह्यांना न्याय देण्याचा दावा करतात.

वादग्रस्त वारसा

मात्र, कॅनडा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान आहे, अशी चिंता दीर्घ काळापासून व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या महायुदधानंतर शेकडो नाझींनी कॅनडात स्थलांतर केले. त्यामुळे कॅनडा हे युद्ध गुन्हेगारांचे आश्रशस्थान आहे, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. १९८६ मध्ये युद्ध गुन्हेगारांच्या अत्यंत मोठ्या व अंशतः सार्वजनिक चौकशी आयोगावेळी या चिंतेने शिखर गाठले. आयोगाच्या अहवालात या अनुषंगाने वॅफेन-एसएस गॅलिसिया डिव्हिजन याच्याविषयी एक स्वतंत्र विभागही आहे. त्यातील एक सैनिक सध्या झालेल्या राजनैतिक फज्जाच्या केंद्रस्थानी आहे. सेंट ‘व्होलोदिमीर युक्रेनियन स्मशानभूमी’ या कॅनडातील युक्रेनच्या सर्वांत मोठ्या स्मशानभूमीत विभाजनाचा उत्सव साजरे करणारे एक स्मारक आजही उभे आहे. टोरोंटोपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असलेले स्मारक पाहता ज्यू, पोल्स आणि अन्य पीडितांना वाटणारी भीती समजून घेता येते. कॅनडाने मात्र, काही समुदायांसाठी या स्मारकाचे मोल आहे, असे गृहित धरून त्यास परवानगी दिली आहे. एवढेच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी नाझीविरोधी गटांनी या स्मारकाची तोडफोड केली, तेव्हा नाझी स्मारकाची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्याच्या नावाखाली आश्चर्यकारकरीत्या तपासही सुरू केला होता. या परवानगीचे प्रतिध्वनी ‘खलिस्तानी’ अतिरेकी गटांना कॅनडात मिळालेल्या आश्रस्थानातही उमटत आहेत. मात्र, त्यात भारताशी असलेले आपले बंध जपणारा आणि साजरे करणाऱ्या चमकदार शीख समुदायाचाही समावेश आहे.

अनिश्चित वळण

कॅनडा आपल्या इतिहासातील एका अनिश्चित वळणावर उभा आहे. कारण तो आपले ऐतिहासिक आदर्श आणि बदललेल्या जगाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाच्या शिथिल स्थलांतर व गुन्हेगारी न्याय धोरणामुळे गुन्हेगारी, अतिरेकी व आंतरराष्ट्रीय वाद एकमेकांत गुंतण्याचे वातावरण निर्माण होत आहे. कॅनडाने आपल्या दृष्टिकोनावर तातडीने विचार करणे आवश्यक आहे. कारण हे दृष्टिकोन प्रतिबंध, सुरक्षितता आणि न्याय यांच्यावर सावट आणतात. हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर जगभरातील ज्या लाखो लोकांवर त्याचा परिणाम होत आहे, त्यांच्यासाठीही महत्त्वाचे आहे. मात्र, वारंवार इशारा देऊनही एकामागून एक येणाऱ्या सरकारांनी विनाकारण नैतिकतेच्या चुकीच्या भावनेला आणि सगळ्यांत धोकादायक अशा मतपेटीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत मूग गिळून गप्प बसण्याचा पर्यायच निवडला आहे. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे कॅनडाला परवडणारे नाही. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे आश्रयस्थान आणि गुन्हे करण्यासाठीचे सुलभ ठिकाण असे कॅनडाविषयीचे मत त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला कलंक लावतेच, शिवाय देशाचा सामाजिक पोत बिघडवण्याचा प्रत्यक्ष धोकाही निर्माण करते. एकेकाळी प्रशंसा झालेल्या कॅनडाच्या सहिष्णुतेची आता त्याच्या धोरणांकडून परीक्षा घेतली जात आहे. एक देश आपल्या ‘स्व’शी झुंज देत असल्याचे कॅनडाच्या देशांतर्गत आव्हानांतून प्रतिबिंबित होत आहे. कॅनडाचे भवितव्य त्याच्याच इच्छेवर अवलंबून आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही दशकांमधून नसले, तरी गेल्या काही आठवड्यांमध्ये आलेल्या अनुभवांतून शिकण्याच्या इच्छेवर अवलंबून आहे.

जयबल नाडुवथ हे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ सहकारी आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.