Expert Speak Health Express
Published on Apr 14, 2025 Updated 1 Hours ago

जागतिक आरोग्य दिन 2025 च्या निमित्ताने, भारतात वाढत असलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाण हे दाखवते की आर्थिक प्रलोभने आणि सांस्कृतिक घटक कसे प्रसूतीला एक व्यावसायिक वैद्यकीय प्रक्रिया बनवत आहेत.

भारतातील सिझेरियन शस्त्रक्रियेतील वाढ: नफ्याच्या हव्यासाचा प्रसूतीवर होणारा परिणाम

Image Source: Getty

हा जागतिक आरोग्य दिन 2025: निरोगी सुरुवात, आशावादी भविष्य या लेख मालिकेचा एक भाग आहे.


भारतामधील प्रसूती ही दोन वेगवेगळ्या जगांची कथा सांगते: खाजगी आणि सार्वजनिक. खाजगी रुग्णालयांमध्ये मातांना वैयक्तिक लक्ष देणारे आलिशान वातावरण मिळू शकते, परंतु शस्त्रक्रियेच्या हस्तक्षेपाची शक्यता अधिक असते. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपकरणे आणि कर्मचारी अपुरे असू शकतात, पण नको असलेले वैद्यकीय हस्तक्षेप तुलनेने कमी होतात. 2019-21 दरम्यान, सार्वजनिक रुग्णालयांमधील संस्थात्मक प्रसूतींपैकी फक्त 14.3 टक्के प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे झाल्या, तर खाजगी रुग्णालयांमध्ये हा दर 47.4 टक्के होता. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार बहुतेक राज्यांतील खाजगी रुग्णालयांमध्ये आता अर्ध्याहून अधिक प्रसूती सिझेरियन पद्धतीने केल्या जात आहेत, तर सार्वजनिक रुग्णालयांमधील दर 10 ते 15 टक्क्यांदरम्यान आहेत.

जरी सिझेरियन शस्त्रक्रिया अती जोखमीच्या प्रकरणांमध्ये जीव वाचवणारी ठरू शकते, तरीही या पद्धतींचा अतिवापर हा एक गंभीर प्रश्न निर्माण करतो की, जन्मप्रक्रिया अतिशय वैद्यकीय स्वरूपाची तर होत नाहीये ना?

जगभरात जागतिक आरोग्य दिन 2025 साजरा होत असताना, "निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य" ही संकल्पना आयुष्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे लक्ष वेधते — मातृत्व. जरी सिझेरियन शस्त्रक्रिया अती जोखमीच्या प्रकरणांमध्ये जीव वाचवणारी ठरू शकते, तरीही या पद्धतींचा अतिवापर हा एक गंभीर प्रश्न निर्माण करतो की, जन्मप्रक्रिया अतिशय वैद्यकीय स्वरूपाची तर होत नाहीये ना? संशोधन दर्शवते की सिझेरियन दर 19 टक्क्यांहून अधिक असले, तरी त्यानंतर मातामृत्यू आणि नवजात मृत्यू दरामध्ये घसरण होतेच असे नाही. काही अभ्यास असेही दाखवतात की स्त्रिया वेदनायुक्त प्रसूतीची भीती, सुरक्षिततेची भावना, मागील नकारात्मक अनुभव, किंवा ज्योतिषावर आधारित डिलिव्हरीची तारीख निवडणे अशा कारणांमुळे सिझेरियनला प्राधान्य देतात. सुशिक्षित स्त्रिया सिझेरियन शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित व कमी त्रासदायक समजतात. म्हणूनच, सोय किंवा नफ्याच्या आधारावर नव्हे तर आरोग्याच्या गरजांवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्याला प्रोत्साहन देणे हे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.

प्रसूतीचा व्यवसाय

सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वाढत्या प्रकरणांच्या कारणांचा शोध घेण्याआधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की सिझेरियन (C-section) ही एक जीव वाचवणारी वैद्यकीय प्रक्रिया आहे आणि तिने अगणित जीव वाचवले आहेत. मूळ समस्या ही या प्रक्रियेमध्ये नाही, तर तिचा अनावश्यक आणि अतिवापर ज्या गरोदरपणात कोणताही गुंतागुंत किंवा धोका नाही अशा प्रसंगी केला जातो, यामध्ये आहे.  

आरोग्य क्षेत्रात अनेक आर्थिक आणि व्यवहार्य प्रलोभने सिझेरियन शस्त्रक्रियेकडे झुकलेली आहेत. रुग्णालयांच्या उत्पन्नाच्या मॉडेल्समध्ये शस्त्रक्रियेमार्फत होणाऱ्या प्रसूती सामान्य प्रसूतींपेक्षा खूपच फायदेशीर ठरतात. सिझेरियन प्रसूतीचा खर्च सामान्य प्रसूतीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असतो आणि ती ठराविक वेळापत्रकानुसार पूर्ण केली जाऊ शकते. संशोधनही याची पुष्टी करतं की, “सिझेरियन डिलिव्हरीचा खर्च अधिक आहे… आणि रुग्णालयांना त्यातून अधिक उत्पन्न मिळते,” ज्यामुळे खाजगी रुग्णालये नफ्यासाठी शस्त्रक्रियेला प्रोत्साहन देतात. अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये, सिझेरियन करणे हे वेळ वाचवणारे असते आणि डॉक्टर व नर्सेसचा वेळ कमी लागतो, जेव्हा की नैसर्गिक प्रसूतीसाठी वेळ लागतो व संयम ठेवावा लागतो—हे एक प्रकारचे विकृत प्रोत्साहन आहे जे हस्तक्षेपाला संयमावर प्राधान्य देतं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे प्रसूती सेवा आरोग्य क्षेत्रातील एक अनियमित बाजारपेठ तयार झाली आहे, जिथे काही दवाखाने आणि रुग्णालये अनावश्यक सिझेरियन शस्त्रक्रिया करून आर्थिक लाभ मिळवत आहेत.

खाजगी प्रॅक्टिसमध्ये असलेल्या प्रसूतीतज्ज्ञांवर कधी कधी कामगिरीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा दबाव असतो किंवा त्यांना स्वतःचे वेळापत्रक सांभाळायचे असते; दिवसा नियोजित सिझेरियन करणे हे मध्यरात्री अचानक सुरू होणाऱ्या नैसर्गिक प्रसूतीपेक्षा अधिक सोयीचे ठरते.

रुग्णालयाच्या नफ्यापलिकडे, डॉक्टरांचे प्रोत्साहन आणि त्यांची सोय देखील महत्त्वाची भूमिका बजावते. खाजगी प्रॅक्टिसमध्ये असलेल्या प्रसूतीतज्ज्ञांवर कधी कधी कामगिरीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा दबाव असतो किंवा त्यांना स्वतःचे वेळापत्रक सांभाळायचे असते; दिवसा नियोजित सिझेरियन करणे हे मध्यरात्री अचानक सुरू होणाऱ्या नैसर्गिक प्रसूतीपेक्षा अधिक सोयीचे ठरते. याच कारणामुळे सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाण आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळपूर्वी जास्त असते, जे नियोजनावर आधारित पसंती सूचित करते. यामध्ये एक “रक्षात्मक वैद्यकशास्त्र” (defensive medicine) घटकही आहे—काही डॉक्टर भविष्यातील गुंतागुंतींपासून बचाव करण्यासाठी आधीच सर्जरी करण्याचा निर्णय घेतात, जरी ती आवश्यक नसली तरीही. आरोग्य विमा देखील सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वाढीला कारणीभूत ठरू शकतो. सरकारी पॅकेजखाली येणाऱ्या सिझेरियन शस्त्रक्रिया सामान्यतः सरकारी रुग्णालयांमध्ये होतात, पण कधी कधी त्या सरकारी रुग्णालयांच्या शिफारसीवरून खाजगी रुग्णालयांमध्येही केल्या जातात. आयुष्मान भारत यासारख्या सरकारी योजनांतर्गत सिझेरियन प्रसूतीसाठी सुमारे ₹11,500 इतकी निश्चित रक्कम भरली जाते, तर खाजगी रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूतीसाठी भरपाई दिली जात नाही. ह्यामुळे रुग्णांच्या स्वतःच्या खिशातून होणारा खर्च (OOPE) कमी होऊ शकतो, पण त्याच वेळी खाजगी रुग्णालयांना जास्त पैसे मिळवण्यासाठी सिझेरियनला प्राधान्य देण्यास प्रवृत्त करू शकते. विमाधारक रुग्णांसाठी, "विमा आहेच" या विचारामुळे रुग्णांचे कुटुंबीय डॉक्टरांनी सुचवलेली सिझेरियन शस्त्रक्रिया फारशी प्रश्न न विचारता मान्य करतात, आणि त्यामुळे अनावश्यक सर्जरीवर आर्थिक मर्यादा राहत नाही. खर्च वाढत असल्याच्या भावना वाढत असताना, मातृत्व आणि आरोग्य विमा योजना अधिक प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास, विमा योजनांमुळे अनवधानाने अनावश्यक शस्त्रक्रिया प्रोत्साहित होऊ शकतात. जर यावर नियंत्रण ठेवले गेले नाही, तर अशा पेमेंट स्ट्रक्चरमुळे प्रत्येक प्रसूतीमागे जास्तीत जास्त नफा कमावण्याची प्रवृत्ती निर्माण होते.

भारतीय समाजाचे मागणीविषयक घटकही सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वाढीस कारणीभूत ठरतात. यामध्ये एक अनोखा घटक म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राचा जन्मवेळेवर होणारा प्रभाव. अनेक कुटुंबांमध्ये शुभ जन्मतारीख आणि वेळ यावर प्रबळ श्रद्धा असते. त्यामुळे अनेक वेळा होणारे पालक ज्योतिषांकडून सल्ला घेऊन "मुहूर्त" म्हणजेच सिझेरियन ठराविक शुभ क्षणी ठरवतात, हे आता सामान्य झाले आहे. याशिवाय, आणखी एक सांस्कृतिक प्रवृत्ती म्हणजे "Too Posh to Push" (खूप उच्च वर्गातील असल्यामुळे नैसर्गिक प्रसूती टाळणे) – विशेषतः काही शहरी, संपन्न कुटुंबांमध्ये दिसून येते. इथे प्रसूतीच्या वेदनांची भीती किंवा सोयीसाठी, वैद्यकीय गरज नसतानाही काही स्त्रिया सिझेरियन निवडतात.

एकदा सिझेरियन झालेल्या महिलांना पुढच्या गरोदरपणात नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न करण्यास निरुत्साहित केले जाते किंवा थेट नकार दिला जातो.

याशिवाय, सिझेरियननंतर नैसर्गिक प्रसूती (VBAC - Vaginal Birth After C-Section) याबाबत असलेली चुकीची माहितीही परत परत होणाऱ्या शस्त्रक्रियांना कारणीभूत ठरते. भारतात अनेक कुटुंबांमध्ये (आणि दुर्दैवाने अनेक डॉक्टरांमध्येही) “एकदा सिझेरियन झाला की पुढे सगळ्या प्रसूती सिझेरियनच” ही चुकीची धारणा रूढ आहे. एकदा सिझेरियन झालेल्या महिलांना पुढच्या गरोदरपणात नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न करण्यास निरुत्साहित केले जाते किंवा थेट नकार दिला जातो. हळूहळू त्यामुळे VBAC बद्दलचा आत्मविश्वासच कमी झाला आहे. 1990 च्या दशकात VBAC तुलनेने सामान्य होता, पण आज केवळ १० पैकी १ पात्र महिला याचा प्रयत्न करते. पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता, VBAC चे सुमारे ७५ टक्के प्रयत्न यशस्वी होतात आणि गंभीर गुंतागुंत (उदा. गर्भाशय फाटणे) होण्याचा धोका १ टक्क्यापेक्षाही कमी असतो. रुग्णालयांनाही जर VBAC अयशस्वी झाले आणि काही हानी झाली, तर कायदेशीर कारवाईचा धोका वाटतो, त्यामुळे ते सुरक्षिततेच्या नावाखाली परत सिझेरियन करणे पसंत करतात. परिणाम म्हणजे एक “स्वयंसिद्ध असणारी भविष्यवाणी” ज्यामुळे VBAC कमी होतात, त्यामुळे अधिकाधिक महिलांना सिझेरियनच्या साखळीचा सामना करावा लागतो.

प्रसूती कक्षाबाहेरील परिणाम

आज जरी सिझेरियन शस्त्रक्रिया सामान्य वाटू लागल्या असल्या, तरी त्याचे अनेक छुपे आरोग्यविषयक तोटे असू शकतात. एका स्त्रीसाठी, सिझेरियन ही एक मोठी उदरशस्त्रक्रिया असते, ज्यासोबत काही धोके असतात. अल्पकालीन धोके म्हणजे संसर्ग होण्याचा धोका, रक्तस्राव, रक्ताच्या गाठी (blood clots), आणि भूल दिल्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती. सामान्यतः प्रसूतीनंतर दिसणाऱ्या समस्या जसे की स्तनपानात अडचणी किंवा, या सिझेरियननंतरच्या वेदना व बरे होण्यास जास्त वेळ लागण्यामुळे प्रसूतीनंतरचे नैराश्य अधिक गंभीर होऊ शकते. नैसर्गिक प्रसूतीनंतर रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी असतो आणि स्त्रिया लवकर सावरतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, गरज नसताना सिझेरियन करणे कोणताही फायदा देत नाही, उलट नैसर्गिक प्रसूतीच्या तुलनेत मातामृत्यू व आजारपणाचा धोका वाढवते.

बाळासाठी देखील परिणाम, सिझेरियन प्रसूतीमुळे बाळाच्या सुरुवातीच्या आरोग्य पद्धतींमध्ये सूक्ष्म बदल होतात. नैसर्गिक प्रसूतीदरम्यान बाळ गर्भाशयातून बाहेर येताना होणाऱ्या दाबामुळे ते आईच्या योनीमधील नैसर्गिक सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येते. पण सिझेरियन प्रसूतीमध्ये हा नैसर्गिक संपर्क होत नाही. त्यामुळे बाळाच्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीव (gut flora) हे आईच्या देहातील नसून रुग्णालयातील किंवा बाह्य वातावरणातील सूक्ष्मजीवांनी तयार होतात. नवजात काळातील या सूक्ष्मजीवांच्या बिघडलेल्या “बीजारोपणामुळे” बाळाच्या प्रतिकारशक्तीच्या विकासावर परिणाम होतो, आणि संशोधनानुसार असे बाळ अनेक आजारांना अधिक संवेदनशील ठरू शकते.

नैसर्गिक प्रसूतीदरम्यान बाळ गर्भाशयातून बाहेर येताना होणाऱ्या दाबामुळे ते आईच्या योनीमधील नैसर्गिक सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येते. पण सिझेरियन प्रसूतीमध्ये हा नैसर्गिक संपर्क होत नाही. 

NFHS (राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण) मधील माहिती दर्शवते की, खाजगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या खिशातून होणारा सरासरी खर्च (OOPE) सुमारे US$ 498 (अंदाजे ₹43,000, मार्च 2025 नुसार 1 US$ = ₹87.22) इतका आहे, तर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये तो US$ 99 (सुमारे ₹8,600) आहे. सामान्य प्रसूतीचा खर्च याच्या तुलनेत खूपच कमी असतो, विशेषतः सार्वजनिक रुग्णालयांमध्ये तर तो या खर्चाच्या केवळ काही अंशांइतकाच असतो. NFHS-5 च्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक रुग्णालयांतील सामान्य प्रसूतीचा सरासरी खर्च सुमारे ₹2,916 इतका खाली आला आहे. दुसरीकडे, खाजगी रुग्णालयांमध्ये सामान्य प्रसूतीसाठीचा खर्च हजारोंमध्ये असतो, तरीही तो सिझेरियन शस्त्रक्रियेपेक्षा कमीच असतो.

खाजगी रुग्णालयांमध्ये अनेकदा भूल देणे, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या वस्तू (सर्जिकल कंझ्युमेबल्स), जन्मवेळी बालरोग तज्ज्ञांची उपस्थिती आणि शस्त्रक्रियेनंतरची निगा या सर्व गोष्टींसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारले जाते, ज्यामुळे "पॅकेज" किंमतीच्या पलीकडे अंतिम बिल प्रचंड वाढते. जर बाळाला नवजात अतिदक्षता विभागात (NICU) दाखल करण्याची गरज भासली (जी ठरवून केलेल्या लवकर सिझेरियन प्रसूतींमध्ये सामान्य बाब आहे), तर NICU चे दर दिवसाला खूपच जास्त असतात. तसेच, अनावश्यक सिझेरियनमुळे खर्चाची एक साखळी तयार होते—एकदा सिझेरियन झालेल्या महिलेला पुढच्या गरोदरपणात पुन्हा सिझेरियन होण्याची शक्यता अधिक असते, म्हणजेच पुन्हा एक मोठा खर्च.

जन्म: एक व्यावसायिक निर्णय?

बाळंतपणाची पद्धत निवडताना निर्णय हा वैद्यकीय गरज आणि मातेसाठी सुरक्षितता या निकषांवर आधारित असावा, नफा किंवा वेळेच्या सोयीवर नव्हे. डॉक्टर आणि रुग्णालये जाणूनबुजून किंवा नकळतपणे, अधिक उत्पन्न, वेळ वाचवणे आणि चुकीच्या उपचारांबद्दलच्या कारवाईची भीती यांसारख्या समजातील दबावांना बळी पडून, अनेकदा वैद्यकीय गरज नसतानाही सर्जरीकडे वळत आहेत. रुग्णालये आणि डॉक्टरांनी “प्रथम, हानी करू नये” (primum non nocere) या मूलभूत वैद्यकीय तत्त्वाशी पुन्हा एकदा प्रामाणिक बांधिलकी व्यक्त करणे आवश्यक आहे.

डॉक्टर आणि रुग्णालये जाणूनबुजून किंवा नकळतपणे, अधिक उत्पन्न, वेळ वाचवणे आणि चुकीच्या उपचारांबद्दलच्या कारवाईची भीती यांसारख्या समजातील दबावांना बळी पडून, अनेकदा वैद्यकीय गरज नसतानाही सर्जरीकडे वळत आहेत.

सामान्य प्रसूतीचे प्रमाण वाढवणे, VBAC (सिझेरियननंतर नैसर्गिक प्रसूती) सुरक्षित आहे याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सिझेरियन शस्त्रक्रियेपासून होणारे टाळता येण्याजोगे नुकसान यावर जनजागृती करणे हे चुकीच्या समजुती व भीती दूर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. प्रत्येक रुग्णालयाने सिझेरियन दराचे खुलेपणाने अहवाल देणे, अनावश्यक शस्त्रक्रियांचा आर्थिक फटका बसू नये यासाठी पेमेंट सिस्टिममध्ये बदल करणे, आणि विमा कंपन्यांकडून तपासणी (audit) करणे — ही धोरणात्मक पातळीवर टाकता येणारी महत्त्वाची पावले आहेत. सार्वजनिक उत्तरदायित्व वाढवण्यासाठी, उदाहरणार्थ सिझेरियन शस्त्रक्रियांचे अधूनमधून ऑडिट करणे, कमी जोखमीच्या प्रकरणांमध्ये दुसऱ्या तज्ज्ञाचा अभिप्राय घेणे अनिवार्य करून त्यासाठी प्रोत्साहन देणे — अशा उपाययोजना संतुलित प्रसूती प्रणालीसाठी उपयुक्त ठरतील.

सिझेरियन शस्त्रक्रियेचा द्वेष करणे हे उद्दिष्ट नसावे; कारण सिझेरियन हा अनेक वेळा जीव वाचवणारा पर्याय ठरतो आणि अजूनही अनेक स्त्रियांकरिता आवश्यक असतो. मात्र, एक विशिष्ट मर्यादा ओलांडल्यानंतर सिझेरियन शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढवले गेले, तरी त्याने आई व बाळाच्या मृत्यूदरात घट होत नाही. ही मर्यादा ओलांडल्यावर प्रत्येक टक्क्यातील वाढ ही हजारो अनावश्यक शस्त्रक्रियांचे प्रतीक ठरते — आरोग्याच्या दृष्टीने आणि आर्थिक परिणामांच्या दृष्टीनेही. बाळंतपण हा एक अत्यंत वैयक्तिक आणि आरोग्याशी संबंधित अनुभव असावा, आणि असा अनुभव देणारी व्यवस्था — जी या मूलभूत मूल्याचा सन्मान करते — केवळ सुरक्षित आणि आरोग्यदायी सुरुवातच देणार नाही, तर भारतीय मातांना आणि नवजात बाळांना उज्ज्वल, आशादायी भविष्याची वाटही खुली करून देईल.


के. एस. उपलब्ध गोपाल हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या हेल्थ इनिशिएटिव्हमध्ये असोसिएट फेलो म्हणून कार्यरत आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.