अलीकडच्या काळात बलुचिस्तानमध्ये उल्लेखनीय घटना घडत आहेत. खरेतर हा प्रांत मीडिया आणि माहितीच्या ब्लॅकहोलमध्ये असल्यामुळे याबाबत कोणताही अहवाल प्रसिद्ध झालेला नाही किंवा त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. याचे एक कारण म्हणजे या संघर्षात लोकशाही, मानवी हक्क, कायद्याचे राज्य आणि अशा तत्वांचा दावा करणाऱ्या देशांच्या दृष्टीने कधीही प्राधान्य नसलेल्या लोकांचा समावेश आहे. प्रदीर्घ काळ दडपलेले व पिचलेले बलुच राष्ट्र आता जागृत होत आहे. एक अतिशय पारंपारिक, पुराणमतवादी, सनातनी आणि आदिवासी समाज आणि संस्कृती जपणारा हा समुदाय सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही आहेच व त्यासोबत त्याच्या मूलभूत राजकीय आणि मानवी हक्कांसाठी उभे राहण्यासाठी तरुण स्त्रिया पुढाकार घेत आहेत. दीर्घ काळानंतर अशाप्रकारची एक विभक्त राजकीय व्यवस्था, कदाचित पहिल्यांदाच एका छत्राखाली एकत्र येत आहे. बलुचिस्तानमधील या जनआंदोलनाला कसे हाताळायचे यावर बलाढ्य पाकिस्तानी लष्कर आणि त्यांचे सहकारी विचारमंथन करत आहेत. मलाला युसुफझाईवरील हल्ल्यानंतर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानवर टीका करण्यासाठी कवी हबीब जालिब यांनी डरते हैं बंदुकों वाले एक निहत्ती लड़की से (बंदुकधारी माणसे एका नि:शस्त्र तरुणीला घाबरतात) अशा शब्दांचा वापर केला होता. खरेतर ही बाब बलुचिस्तानसाठी अगदी चपखल बसत आहे आणि स्पष्ट, उग्र आणि अविचल डॉ. महरंग बलोच हे बलूच प्रबोधनाचा चेहरा बनले आहेत.
बलुचिस्तानमधील या जनआंदोलनाला कसे हाताळायचे यावर बलाढ्य पाकिस्तानी लष्कर आणि त्यांचे सहकारी विचारमंथन करत आहेत.
१९४८ साली पाकिस्तानने बळजबरीने बलुचिस्तान विलीन करून घेतल्यापासून आजतागायत पाच मोठी बंड झाली. बलुच अतिरेक्यांनी जवळच्या टेकड्यांवरून पाकिस्तानी लष्कराच्या क्वेटा छावणीला लक्ष्य केल्यानंतर २०००-०१ मध्ये शेवटचे बंड सुरू झाले. परंतु २००६ मध्ये पाकिस्तानी लष्कराने बलूच आदिवासी प्रमुख नवाब अकबर बुगती यांना ठार केल्यानंतर बंडखोरीची व्याप्ती वाढली. तेव्हापासून आजपर्यंत बंडखोरीची परिसीमा गाठण्यात आली आहे. यात शेकडो लोक मारले गेले आहेत आणि अनेक लोकांचा क्रूरतेने छळ करण्यात आला आहे आणि अनेकांना सक्तीने बेपत्ता करण्यात आले आहेत, परंतु याचा बलुचांच्या प्रतिकारावर कोणताही परिणाम झालेला नाही. किंबहूना, पाकिस्तानी सैन्याने वापरलेले डावपेच आणि क्रूरता यांमुळे बलुचांच्या संतापाला आणि संकल्पालाच खतपाणी घातले गेले आहे. खरेतर, महरंग बलोचसह बलुचिस्तानमधील जनआंदोलनाचे नेतृत्व करणारे अनेक नेते हे बलुच स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज आहेत. या बलुच स्वातंत्र्यसैनिकांना एकतर पाकिस्तानी सैन्याने मारले आहे किंवा 'बेपत्ता' केले आहे. सर्रासपणे चालू असलेल्या राज्याच्या हल्ल्याचा प्रतिकार करणारे बलुच स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज हे यात बळी ठरले आहेत.
सुमारे २०२१-२२ पासून, बलुचिस्तानमधील चळवळीने वेग घेतला आहे. यात अतिरेकी आणि राजकीय हालचालींना एकत्रितपणे वेग आला आहे. अतिरेकी चळवळीची तीव्रता आणि महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे, तसेच पाकिस्तानी राज्याविरुद्ध हल्ले करण्याचे धाडसही वाढले आहे. ॲम्बुश आणि आयईडी स्फोटांव्यतिरिक्त, अतिरेक्यांनी लष्करी चौक्या, छावण्या आणि अगदी नौदलाच्या हवाई तळावर हल्ला केला आहे. उच्चशिक्षित महिला आत्मघातकी हल्लेखोरांचा आत्मघातकी हल्ल्यांसाठी वापर करण्यात आला आहे. बलुचिस्तानमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुच योद्धे हे सुसज्ज आणि प्रशिक्षित आहेत. त्यांचा ठसा आणि प्रभाव मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये पाकिस्तानी लष्कर पाऊल ठेवण्यास नाखूष आहे. हे अतिरेकी त्यांच्या फायद्यासाठी भूप्रदेशाचा वापर करत आहेत आणि त्यांना लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या क्रूर कारवाईमुळे अतिरेक्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये भर पडत आहे. यामुळे डॉ अल्लाह नजर यांसारखे नेते आता लिव्हींग लेजंड म्हणून ओळखले जात आहेत.
अतिरेकी चळवळीची तीव्रता आणि महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे, तसेच पाकिस्तानी राज्याविरुद्ध हल्ले करण्याचे धाडसही वाढले आहे.
सोबतच, राजकीय चळवळीलाही मोठे जनसमर्थन मिळत आहे. मामा कादीर सारख्या बलुच कार्यकर्त्यांनी भूतकाळात लाँग मार्च काढले असले तरी हे काही रावळपिंडी ते इस्लामाबाद किंवा लाहोर ते इस्लामाबाद असे नेहमीच्या पंजाबी शैलीतील लाँग मार्च नव्हते. असे हे मार्च लँड क्रूझर आणि इतर फॅन्सी एसयूव्हीसारख्या आलिशान गाड्यांमधून काढण्यात न आल्यानेच महरंग बलोच व बलुच यक्जेहती समिती यांनी लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवले.
२०२३ च्या उत्तरार्धात एका तरुण बलूच कार्यकर्त्याच्या न्यायबाह्य हत्येविरुद्ध निषेध नोंदवण्यासाठी इस्लामाबादपर्यंत लाँग मार्च काढण्यात आला तेव्हा हे कार्यकर्ते पुढे आले. पाकिस्तानच्या राजधानीकडे जाताना, मोर्चेकऱ्यांना पाकिस्तान सरकारने त्रास दिला, अटक केली आणि अडवणूक केली. पाकिस्तानातील मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आयोजकांविरुद्ध खोडसाळ बाबी प्रकाशित केल्या, परंतू त्याचा कोणताही परिणाम कार्यकर्त्यांवर झाला नाही. इस्लामाबादमध्ये त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांना मूलभूत सुविधाही नाकारण्यात आल्या. यात विरोधासाठी भाड्याच्या गुंडांचा वापर करून आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यावेळेस हे आंदोलन संपले आणि मोर्चेकरी बलुचिस्तानमध्ये परतले, तोपर्यंत महरंग बलोच हे एक नायक झाले होते. त्यांच्यामागील पाठबळ इतके जास्त होते की पाकिस्तानी सरकारलाही या बाबींस दडपणे निव्वळ कठीण झाले. पाकिस्तानसाठी सर्वात वाईट बाब म्हणजे, बलुच राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या महिलांची प्रतिष्ठा नष्ट करण्याचे पाकिस्तानी लष्करी आस्थापनेचे सर्व प्रयत्न पुर्णपणे फसले आहेत.
अखेरीस जूनमध्ये बीवायसीने मूलभूत राजकीय, नागरी आणि अगदी मानवी हक्क नाकारल्याच्या निषेधार्थ ग्वादर येथे संपूर्ण प्रांतातील लोकांचा ‘बलूच राजी मुची’ (बलूच राष्ट्रीय मेळावा) आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यातील विशेष बाब म्हणजे सर्व बलुचांना एका समान कारणासाठी एकत्र करण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये आतापर्यंत न अनुभवलेली लोकांची जमवाजमव करण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना न जुमानता, लोकांनी संकटाचा सामना केला आणि क्रूर शक्तीला नकार देत अनेक प्रकारे बलुच लोकांच्या शोषण आणि अत्याचाराचे प्रतीक म्हणून ग्वादारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. १७ व्या शतकात युरोपियन वसाहतकर्त्यांनी स्थापन केलेल्या 'कारखान्या'चा २१व्या शतकातील समतुल्य म्हणून या शहराकडे पाहिले जाते. राष्ट्रीय मेळाव्याला इतका प्रतिसाद मिळाला की जे लोक ग्वादरला जाऊ शकले नाहीत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये प्रभावीपणे निषेधासाठी मोर्चे आयोजित केले. या नॅशनल मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादाने पाकिस्तानी सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री सर्फराज बुगतीसारखे स्थानिक सहकारीही थक्क झाले.
राष्ट्रीय मेळाव्याला इतका प्रतिसाद मिळाला की जे लोक ग्वादरला जाऊ शकले नाहीत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये प्रभावीपणे निषेधासाठी मोर्चे आयोजित केले.
बलुच राजी मुचीमुळे अनेक प्रकारे, बलुचिस्तानचे विभाजन करून राज्य करण्याच्या पाकिस्तानी सरकारच्या सर्व डावपेचांचा उलगडा झाल्याचे संकेत मिळाले. प्रादेशिक रेषा आणि आदिवासी ओळख तसेच अगदी राजकीय संलग्नता ओलांडून, बलुच लोक राष्ट्रासाठी एकत्र आलेले दिसले. बुग्ती किंवा माजी सिनेट अध्यक्ष सादिक संजरानी सारख्या राजकीय उद्योजकांना पाकिस्तान सरकारने वित्तपुरवठा केला आहे. परंतू त्यांचा लोकांशी तुटलेला संवाद ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रस्थापित राजकारणी आणि आदिवासी प्रमुखही या परिस्थितीमध्ये असंबद्ध ठरले आहेत. बलूच लोकसंख्येमध्ये आपली प्रासंगिकता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आता बीवायसी आणि महरंग बलोच यांची बाजू घेण्यास भाग पाडले जात आहे. ग्वादरमधील हक दो तहरीकचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या जमात इस्लामीच्या मौलाना हिदायत उर रहमान सारख्या नेत्यांना हिंसाचारामुळे बलुचिस्तानमधील सरकारशी संबंध तोडून नॅशनल गॅदरिंगमध्ये सहभागी होण्यास भाग पाडण्यात आले आहे. हे आंदोलन तुर्बत येथे हलविण्यात आल्यानंतर महरंग बलोच आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी करत लोकांनी जोरदार स्वागत केले आहे.
बलुचिस्तानमधील महिला आणि तरुण कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी सरकारला हादरवून टाकले आहे आणि बलुच राष्ट्र सत्यात उतरत आहे ही एक निर्विवाद बाब आहे. “बलूच यक्जेहती कमिटी ही दहशतवादी आणि गुन्हेगारी माफियांची प्रॉक्सी आहे” असे बलाढ्य पाकिस्तानी लष्कराकडून लष्कराच्या मुख्य प्रवक्त्यानी सांगितले आहे. ही बाब उपरोधिक आहे. खरेतर पाकिस्तानी लष्करावर बलुचांनी खंडणी आणि संरक्षण रॅकेट चालवल्याचा, मानवी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या नेटवर्कला आश्रय देण्याचा आणि इराणमधून तस्करी केल्या जाणाऱ्या तेलातून नफा कमावल्याचा आरोप केला आहे. या सर्व कारवाया पाकिस्तान सरकारच्या अधिकृत सहभागाशिवाय शक्य नाहीत, असेही बलुचांचे मत आहे. आतापर्यंत बीवायसीच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी लष्कराने अतोनात प्रयत्न केले असले तरी या सर्वांचा कोणताही परिणाम बीवायसीवर झालेला नाही.
बीवायसीने बलुच मध्यमवर्गातून नवे नेतृत्व उभे केले आहे. नेतृत्वासाठी आदिवासी नेत्यांवर अवलंबून राहण्याची तितकीशी गरज राहिलेली नाही. नवे नेते सुशिक्षित, वचनबद्ध, स्पष्ट बोलणारे आहेत. प्रतिकार आणि एकत्रीकरणाचे समीकरण त्यांना कळले असल्याने ते केवळ बलुचिस्तानमध्येच नव्हे तर उर्वरित जगाशी प्रभावीपणे संवाद साधत आहेत. सर्व मीडिया क्लॅम्पडाउन आणि इंटरनेट ब्लॉकेजना टाळून त्यांचा संदेश लोकांपर्यंत आणि जगापर्यंत पोहोचवण्यासाठी ते आधुनिक संप्रेषण साधनांचा उत्कृष्ट वापर करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बलुच कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि लोकांशी राजकीय, घटनात्मक आणि आर्थिक मुद्द्यांवर संपर्क साधला आहे. यासाठी कोणत्याही अतिरेकी कारवाई किंवा हिंसाचार किंवा फुटीरतावादाच्या समर्थनाचा वापर करण्यात आलेला नाही. पाकिस्तान करत असलेल्या दाव्यांमधील फोलपणा बलुचांच्या उदाहरणावरून स्पष्ट झाला आहे. पाकिस्तानने पंजाब आणि सिंधमधील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसह राजकीय कार्यकर्त्यांच्या न्यायबाह्य हत्या आणि सक्तीने बेपत्ता करून कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राजकीय व्यवस्थेचा वापर करून निवडणूकांमध्ये गैरप्रकार करून सरकारधार्जिण्या लोकांना सत्तेत बसवल्याचा आरोपही पाकिस्तान सरकारवर करण्यात आल्याने राज्यावर घटनेत अंतर्भूत असलेल्या अधिकारांचे उल्लंघन आणि नाकारल्याच्या पार्श्वभुमीवर सरकारकडे या बाबींचे खंडन करण्यासाठी कोणताही आधार शिल्लक राहिलेला नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, पाकिस्तानी आस्थापनेच्या जुलमी कारभारामुळे बलुच कार्यकर्त्यांना उच्च नैतिक आधार मिळाला असून त्याचा प्रभावी वापर कार्यकर्त्यांनी केला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बलुच कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि लोकांशी राजकीय, घटनात्मक आणि आर्थिक मुद्द्यांवर संपर्क साधला आहे. यासाठी कोणत्याही अतिरेकी कारवाई किंवा हिंसाचार किंवा फुटीरतावादाच्या समर्थनाचा वापर करण्यात आलेला नाही.
राजकीय चाणाक्षपणासोबत, बलुच स्त्रिया पुढाकार घेत आहेत ही वस्तुस्थिती एका क्रांतीपेक्षा कमी नाही. बलुचिस्तानमध्ये नव्हे तर पाकिस्तानमध्येही महिलांना सार्वजनिक जीवनात फारशी भूमिका नाही. राजकीय पटलावरही महिलांसाठी राखीव जागा बहुतांशी घराणेशाहीने भरल्या जातात. बीवायसीने राष्ट्रीय मेळावा आयोजित केला आहे ही आणखी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. बलुचिस्तानमध्ये मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारा एकच राष्ट्रीय पक्ष असण्याची गरज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. समाजातील विस्कळीतपणा, नेत्यांमधील अहंकार, आदिवासींमधील विभाजन आणि राज्याच्या हस्तक्षेपामुळे राजकारणापासून बलुच नेहमीच दूर राहिले आहे. बीवायसी आणि महरंग बलोच यांनी एका अर्थाने अशक्यप्राय गोष्ट साध्य केली आहे. पदांसाठी कोणतेही भांडण किंवा सत्तेची मक्तेदारी करण्याचा प्रयत्न यात करण्यात आलेला नाही, ही सुद्धा एक उल्लेखनीय बाब आहे. बीवायसीने समी दीन बलोच सारख्या स्त्रिया आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारच्या नेतृत्वाची एक मजबूत दुसरी फळी तयार केली आहे.
अलिकडच्या वर्षांत बलुच राष्ट्रवादींनी मोठी प्रगती केली आहे. असे असले तरी, राष्ट्रीय मेळाव्याला एक ठोस आणि संघटित राष्ट्रीय चळवळ बनवण्याचा आणि बळकटी देण्याच्या प्रयत्नांमध्ये तसेच त्यांच्या मागण्यांसाठी आंतरराष्ट्रीय राजकीय, मुत्सद्दी आणि नैतिक समर्थन मिळवण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पंजाबचे वर्चस्व असलेल्या पाकिस्तानी आस्थापना आणि ‘डीप स्टेट’कडून होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी त्यांना स्वतःला तयार करावे लागणार आहे. स्वशासनाच्या हक्कासाठी बलुचिस्तानमध्ये दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे आणि जगाने या महत्त्वाच्या भू-सामरिक भौगोलिक प्रदेशाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
सुशांत सरीन हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.