Author : Sadan Khan

Expert Speak Young Voices
Published on Jan 16, 2025 Updated 0 Hours ago

पर्यावरण तज्ञ वारंवार पराली जाळण्याच्या अपायकारक प्रथेला आळा घालण्याची मागणी करत आहेत. तरीही, ही अपारंपरिक पद्धत मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली या सहा राज्यांमध्ये शेतीला लागलेल्या आगींच्या तब्बल २३,५०५ घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

पराली जाळण्याच्या समस्येवर जागरूकता आणि शाश्वत उपाय

Image Source: Getty

    पर्यावरण तज्ञ वारंवार पराली जाळण्याच्या अपायकारक प्रथेला आळा घालण्याची मागणी करत आहेत. तरीही, ही अपारंपरिक पद्धत मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली या सहा राज्यांमध्ये शेतीला लागलेल्या आगींच्या तब्बल २३,५०५ घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

    नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील हिवाळी काढणीचा हंगाम वायू प्रदूषण वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. पीक उत्पादन घटणे, वेळ आणि पैशाची कमतरता, तसेच बाजारभाव कमी होणे यांसारख्या अडचणींमुळे शेतकरी शेती लवकर मोकळी करण्यासाठी पिकांना आग लावण्याचा मार्ग स्वीकारतात. थंड हवामान आणि कमी वाऱ्यामुळे तापमानातील अस्थिरतेमुळे प्रदूषक विखुरणे कठीण होते, ज्यामुळे वातावरणात दाट धुके तयार होते. शेतातील विषारी धूर आणि शहरातील आधीच उच्च कार्बन उत्सर्जन यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. परिणामी, आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, आणि मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

    थंड हवामान आणि कमी वाऱ्यामुळे तापमानातील अस्थिरतेमुळे प्रदूषक विखुरणे कठीण होते, ज्यामुळे वातावरणात दाट धुके तयार होते. शेतातील विषारी धूर आणि शहरातील आधीच उच्च कार्बन उत्सर्जन यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ होते.

    सरकारची राज्यांना सध्याची मदत आणि निधी वितरण

    भारत सरकारने २०१८ पासून पीक अवशेष व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत एकूण ३,३३३.१७ कोटी रुपयांची तरतूद केल्याचा दावा केला आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशला अनुक्रमे १,५३१ कोटी, १,००६ कोटी आणि ५०० कोटी रुपये निधी वाटप करण्यात आला आहेत. हा निधी शाश्वत शेतीसाठी अत्याधुनिक उपकरणांना अनुदान देणे, जैवऊर्जा पायाभूत सुविधा निर्माण करणे, तसेच हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रणाली विकसित करणे यासाठी वापरला जातो. याशिवाय, पर्यायी शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे, संशोधनाला चालना देणे, आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे हे देखील या उपक्रमाचा एक भाग आहे.

    अनेक नोंदींनुसार, हा निधी अपुरा ठरत असून त्याचा अधिक प्रभावी आणि परिणामकारक उपयोग होऊ शकला असता. पहिली गोष्ट म्हणजे, पीक अवशेष कार्यक्रमात अधिक पैसा गुंतविण्याची मागणी राज्य सरकारने सातत्याने केली आहे, ज्यात पंजाब सरकारने नुकतीच केलेली १२०० कोटी रुपयांची याचिका केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. दुसरे म्हणजे, केवळ शेतावर आधारित अवशेष यंत्र योजनांसाठी १,१५१.८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, परंतु पीक विविधीकरणासारख्या महत्त्वाच्या इतर आवश्यक उपाययोजनांसाठी मात्र निधीची मोठी कमतरता आहे.

    सिद्धांतात कायदा, व्यवहारात कृतीचा अभाव

    वायु (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १९८१ नुसार, इंधन वगळता कोणत्याही प्रकारचे प्रदूषण निर्माण करणारे पदार्थ जाळण्यास मनाई आहे. पराली जाळणे हे नागरिकांच्या प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. कायद्यांतर्गत तरतुदी स्पष्ट असल्या तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत नरमाईची भूमिका घेतली आहे. परिणामी, या कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात टाळाटाळ होत आहे. यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरयाणा या राज्यांवर, पराली जाळण्याच्या विरोधात पुरेशी कारवाई न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. २०२१ मधील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पराली जाळण्याला गुन्हा ठरवण्याची मागणी मान्य केली होती. मात्र, आजही या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

    यावर्षी पराली जाळण्याविरोधात पुरेशी कारवाई न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरयाणा या दोन्ह राज्य सरकारांना फटकारले होते.

    राष्ट्रीय हरित लवादासारख्या विद्यमान नियामक यंत्रणा असूनही, अंमलबजावणी कायमच मोठे आव्हान ठरले आहे. पराली जाळणे हा प्रतिबंधित गुन्हा मानला जातो, ज्यासाठी २,५०० रुपयांपासून ३०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात दंड वसुली करताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शेतात जाऊन कारवाई करणे कठीण ठरते, आणि परिणामी, कायद्याची अंमलबजावणी अपूर्ण राहते. पौसा-४४ या पर्यावरणास हानीकारक तांदळाच्या वाणावर बंदी घालण्यात आली असली तरी, शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणावर या वाणाची लागवड करताना दिसतात.

    पूर्वीच्या धोरणांचे अनपेक्षित परिणाम

    अनुदानित खते, हमीभाव (एमएसपी), आणि मोफत वीज यांसारख्या धोरणांमुळे भातशेतीचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढले आहे. मात्र, या धोरणांमुळे पिकांचे अवशेष (पराली) आणि भूजल टंचाई यांसारख्या गंभीर समस्याही निर्माण झाल्या आहेत. भारताच्या एकूण धान्य उत्पादनात भातशेतीचा वाटा सुमारे ४१ टक्के आहे.

    हरयाणा आणि पंजाबमध्ये लागू करण्यात आलेल्या पंजाब प्रिझर्वेशन ऑफ सबसॉइल वॉटर ॲक्ट २००९ या जलसंधारणाच्या कायद्यामुळेही पराली जाळण्याच्या घटना वाढल्या आहेत. या कायद्यानुसार, भाताची पेरणी फक्त पावसाळ्यातच करता येते, कारण भातासारखी पाण्यावर अवलंबून असणारी पिके या काळात भूजल शोषण्यास टाळाटाळ करतात. नोव्हेंबरच्या सुरुवातीला भात कापणी होत असल्याने शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी शेत तयार करण्यासाठी केवळ १० दिवसांचा कालावधी मिळतो. पुढील पीक चक्रात उशीर झाल्यास उत्पादनात घट होईल, या भीतीने शेतकरी घाईघाईने मागील पीक काढणीतील अवशेष पेटवून देतात. जलसंपदा विषयक स्थायी समितीने सुचवलेल्या शिफारशींमध्ये संपूर्ण राज्यावर सरसकट बंदी घालण्याऐवजी कायद्याचा फेरविचार करणे आणि पाणीटंचाई असलेल्या भागांमध्येच निर्बंध लागू करणे याचा समावेश आहे.

    मशीन क्षमता आणि आव्हाने

    पीक अवशेष व्यवस्थापनासाठी (सीआरएम) सुमारे दीड लाख यंत्रे उपलब्ध आहेत, परंतु त्यापैकी पाच लाखांहून अधिक यंत्रांची देखभाल करणे आवश्यक आहे किंवा ती निष्प्रभ झाली आहेत. एका अहवालानुसार, सीआरएमचा वापर करणाऱ्या किमान ५० टक्के शेतकरी शेवटी पराली जाळण्यावरच अवलंबून राहतात. हॅप्पी सीडर आणि डिनर सीडर यांसारख्या सीआरएम यंत्रांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान म्हणजे या यंत्रांना चालवण्यासाठी ६० हॉर्सपॉवरचा (एचपी) महागडा ट्रॅक्टर लागतो, जो अनेकदा अन्य उपयोगासाठी अयोग्य ठरतो. भाड्याने घेतल्यासही, शेतकऱ्याला साधारणपणे १०,००० रुपयांचा खर्च येतो.याशिवाय, चार एकर शेतीसाठी पराली काढण्याचे यंत्र भाड्याने घेण्यासाठी सुमारे दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागते, ज्यामुळे वेळेची आणि संसाधनांची मोठी अडचण निर्माण होते.

    पीक वैविध्य

    केंद्र सरकारने बहुपीक पायाभूत सुविधांचा विकास आणि देखभाल करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. सध्या, अन्न सुरक्षा योजनेचा भाग म्हणून सरकार मोठ्या प्रमाणावर भात पिकांची खरेदी करते आणि त्यांना किमान आधारभूत किंमतीच्या (एमएसपी) सुरक्षिततेच्या जाळ्यात ठेवते. मात्र, केंद्र सरकारच्या हमीभावातून बिगर-भात पिकांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांचे त्या पिकांकडे फारसे लक्ष गेलेले नाही. एमएसपीच्या सुरक्षा कवचाखाली अधिकाधिक पिकांची खरेदी केली जावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. शासन पुरस्कृत आधारभूत किमतीत २३ पिकांचा समावेश करावा, अशी मागणी असूनही, अद्याप व्यवहार्य आराखडा तयार करण्यात आलेला नाही. तज्ज्ञांच्या मते, पीक अवशेष उपकरणांवरील सध्याच्या अनुदानापेक्षा पीक वैविध्याला प्राधान्य देत निधीचे वाटप केले असते, तर ते अधिक परिणामकारक ठरले असते.

    २३ पिकांचा समावेश शासन पुरस्कृत आधारभूत किमतीत करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली असली, तरी अद्याप व्यवहार्य आराखडा तयार झालेला नाही.

    राज्यांनी हरयाणा मॉडेलची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. या मॉडेलमध्ये ३०,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी बिगर-भात पिके घेतली आहेत आणि थेट बियाणे तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्याबदल्यात, सरकार शाश्वत पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देते आणि लॉजिस्टिक समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण भागात उद्योग स्थापन करत आहे. याशिवाय, आहारातील आवडीनिवडींमध्ये बदल केल्यास पीक विविधतेला चालना मिळू शकते आणि परिणामी, पराली जाळण्याचा मुख्य कारणीभूत असलेल्या भातशेतीचा प्राधान्यक्रम कमी होऊ शकतो. भारतातील लोकसंख्येला गहू आणि तांदळाबरोबरच भाजीपाला आणि फळांची आहारात आवश्यकता आहे, कारण भाज्या आणि फळे नैसर्गिकरित्या कमी अवशेष निर्माण करणारी पिके आहेत. 

    पिकांच्या अवशेषांसाठी कचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा

    "कचऱ्यापासून संपत्तीपर्यंत"चे उपाय मोठ्या प्रमाणावर राबवले गेले, तर भारताला शाश्वत कृषी अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याची मोठी संधी मिळू शकते. उदाहरणार्थ, भारत सरकारने पिकांच्या अवशेषांपासून जैव-ऊर्जा निर्मितीसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत, ज्यात हरियाणा आणि पंजाबमध्ये बायो-इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा समावेश आहे. तथापि, अनेक अडथळ्यांवर मात करण्यासाठी स्पष्ट रणनीती आखण्याची आवश्यकता आहे. पंजाबमधील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प यापूर्वी दोन वेळा लांबणीवर पडला आहे, आणि आणखी एक प्रकल्प पर्यावरणाच्या उल्लंघनामुळे आणि समुदायाच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला आहे. केंद्र सरकारने अनेक बायोइथेनॉल प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला असला तरी, राज्य आणि केंद्र यांच्यातील कमकुवत समन्वयामुळे ते अवघड झाले आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार, २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताला १०.१६ अब्ज लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे.

    भारत सरकारने पिकांच्या अवशेषांपासून जैव-ऊर्जा निर्मितीसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत, ज्यात हरियाणा आणि पंजाबमध्ये बायो-इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा समावेश आहे.

    पिकांच्या अवशेषांपासून भारत दरवर्षी ४८.३५ गिगावॅट (गिगावॅट) ऊर्जा उत्पादन करू शकतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय, शिल्लक राहिलेल्या पिकांचा जनावरांचा चारा म्हणून वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे बाजारपेठेतील संबंध बळकट होऊ शकतात आणि पिकांचे अवशेष अधिक प्रभावीपणे वापरता येऊ शकतात. कोरडा चारा, हिरवा चारा आणि चारा साहित्याचा अनुक्रमे ३५.६ टक्के, १०.९५ टक्के आणि ४४ टक्के तुटवडा भासत असलेल्या भारतात, अन्नधान्याच्या मोठ्या मागणीची गरज भासणार आहे. त्यामुळे पिकांच्या अवशेषांचे योग्य नियोजन आणि त्यांचा वापर कृषी उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

    ई-प्लॅटफॉर्म आणि डिजिटल साधनांचा वापर

    डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे शेतकरी आणि बायो-कलेक्शन कंपन्यांना सर्व्हिस मशिन भाड्याने घेता येतील आणि चारा संकलनावरील रिअल-टाइम माहितीवर लक्ष ठेवता येईल. हरियाणा सरकार आणि डेलॉयट यांनी सुरू केलेल्या कृषी यंत्र या बहु-स्थानिक भाषा-सक्षम ॲपमुळे दोन शहरांमध्ये पराली जाळण्याच्या घटना यशस्वीरित्या कमी झाल्या आहेत.

    भारताची एअर मॉनिटरिंग सिस्टीम

    प्रत्यक्ष शेताला लागलेली आग आणि सरकारी अहवालात प्रसिद्ध झालेली आकडेवारी यामध्ये तफावत असल्याने रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानात सुधारणा करता येईल. जेव्हा वायु गुणवत्ता निर्देशांकाचा (एक्यूआय) विचार केला जातो, तेव्हा भारतीय गणना आणि जागतिक एजन्सीजमधील तफावत हे पद्धतशीर आणि कार्यक्षमतेच्या समस्यांवर तातडीने लक्ष देऊन त्या सोडविण्याची आवश्यकता भासवते.

    नवीन प्रस्तावित पीक वाण

    पूसा ४४ ला चांगला पर्याय म्हणून सुचविण्यात आलेल्या पीआर १२६ वाणाचे उत्पादन कमी आहे. आणि यामध्ये पीक दोष असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे, जीनोम एडिटिंगसारख्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाणाची गुणवत्ता सुधारली पाहिजे.

    स्मॉग टॉवर आणि क्लाउड सीडिंग

    अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्मॉग टॉवर आणि क्लाउड सीडिंगचे दोष त्याच्या फायद्यांपेक्षा जास्त आहेत, कारण ते महाग असतात. त्यामुळे, त्यांना किफायतशीर बनवण्यासाठी नाविन्याची नितांत गरज आहे. राजधानीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी, केंद्र सरकारने त्याला परवानगी नाकारली.

    प्रत्यक्ष शेताला लागलेली आग आणि सरकारी अहवालात प्रसिद्ध झालेली आकडेवारी यात तफावत असल्याने रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानात सुधारणा करता येईल.

    सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह संवाद

    केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण संवाद साधल्यास पराली जाळण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. पराली जाळल्याने पर्यावरणावर होणारा परिणाम तसेच दीर्घकालीन शेतीउत्पादनावर होणारा नकारात्मक प्रभाव शेतकरी समाजाला समजावून सांगण्यासाठी नागरी समाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. ग्रामीण भारतातील २०,००० कुटुंबांवर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ४४ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की पराली जाळल्याने वायू प्रदूषणास हातभार लागत नाही. हे दर्शवते की पराली जाळल्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची ग्रामीण भारताला अद्याप पूर्ण जाणीव नाही. त्यामुळे, पराली जाळण्याच्या परिणामांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

    निष्कर्ष

    सीआरएम योजनेचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सरकारने अधिक निधीचे वाटप करावे आणि या योजनेचे किफायतशीर विश्लेषण करावे. उपमृदा जल संरक्षण कायदा २००९ आणि एमएसपी अंतर्गत पिकांच्या यादीसारख्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे आवश्यक आहे. ऊर्जेची गरज असलेल्या भारतासाठी मोठ्या प्रमाणावर जैवऊर्जा उद्योग उभारणे फायदेशीर ठरेल. यामुळे इंधन निर्मितीच्या नव्या संधी निर्माण होतील आणि पराली जाळण्याच्या घटनाही कमी होतील. सरकारने पीक विविधीकरण कार्यक्रमाला गती द्यावी, शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करावा, तसेच पर्यावरणपूरक पिकांसाठी संशोधन व विकासात गुंतवणूक करावी. शेवटी, धोरणकर्ते आणि शेतकरी यांच्यात सुसंवाद प्रस्थापित झाल्यास पिकांच्या अवशेषांचा शाश्वत आणि परिणामकारक उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना नक्कीच मदत होईल.


    सदान खान हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.