Author : Snehashish Mitra

Published on Jan 18, 2024 Updated 0 Hours ago

भारतातील अलीकडच्या काही शहरी विस्तार प्रकल्पांवर चुकीच्या नियोजनासाठी टीका झाली आहे. हे लक्षात घेता, सॉल्टलेक हे शहरी पुनरुत्थान आणि नगर नियोजनाचे भारतीय मॉडेल म्हणून काम करू शकते.

निर्वासित पुनर्वसन आणि भविष्यकालीन नियोजन: सॉल्टलेक टाउनशिपचे धडे

गेल्या काही दशकांमध्ये ग्लोबल साउथच्या शहरांमध्ये शहरी विस्तार ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. यामध्ये पर्यावरणीय आणि सामाजिक भूदृश्ये बदलून आजूबाजूचे परिसर शहरामध्ये मिसळत आहेत आणि शहराची हद्द वाढत आहे. या संक्रमणामध्ये खाजगी भांडवलाचा लक्षणीय सहभाग असला तरी, स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील शहरी विस्तार केवळ राज्याच्या नेतृत्वाखाली होता. चंदीगड, दुर्गापूर, नेवेली, भिलाई आणि बोकारो सारखी शहरे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे पुढं आली होती. तर काही प्रकरणांमध्ये (जसे की भिलाई), परदेशी राष्ट्रांशी (जसे की पूर्वीच्या यूएसएसआर) सहकार्याने महत्त्वाची भूमिका बजावली. ही शहरी रचना अनेक घटकांवर आधारित होती. यात प्रशासकीय हेतू, मोठ्या प्रमाणात उत्पादन युनिट्सचा विकास आणि चार महानगरांवरील (कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली आणि चेन्नई) लोकसंख्येचा दबाव कमी करणे अशा अनेक गोष्टी होत्या. पण हे प्रयत्न तेवढ्यापुरते मर्यादित नव्हते.

दुतर्फा झाडे असलेले रुंद मोठे रस्ते, आणि हिरवे आच्छादन असलेली सॉल्टलेक टाऊनशिप ही भारतातील विवेकपूर्ण नियोजित आणि भविष्यकालीन शहरी टाउनशिपपैकी एक मानली जाते.

अविभाजित बंगालच्या प्रदेशातील निर्वासितांच्या एका भागाचं पुनर्वसन करण्यासाठी कोलकात्याला लागून असलेल्या पाकिस्तान (सध्याचे बांगलादेश) मध्ये सॉल्टलेक शहराची कल्पना आणि विकास 1950 च्या दशकापासून करण्यात आला होता. दुतर्फा झाडे असलेले रुंद मोठे रस्ते आणि हिरवे आच्छादन असलेली सॉल्टलेक टाऊनशिप ही भारतातील विवेकपूर्ण नियोजित आणि भविष्यकालीन शहरी टाउनशिपपैकी एक मानली जाते. भारतातील अलीकडील काही शहरी विस्तार आणि ग्रीनफिल्ड सिटी प्रकल्पांचे खराब नियोजन आणि राहणीमान पायाभूत सुविधांबद्दल टीका झाली आहे हे लक्षात घेता, सॉल्टलेक शहरी नियोजनाचे भारतीय मॉडेल होऊ शकते.

सॉल्टलेकची निर्मिती 

फाळणीनंतर, पूर्व पाकिस्तानमधून पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात निर्वासित आणि स्थलांतरित आले. या लोकसंख्येचा एक मोठा वर्ग कोलकाता आणि आसपास स्थायिक झाला. पश्चिम बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दुहेरी उद्दिष्टांसह कोलकात्याला लागून एक टाउनशिप बांधण्याची योजना आखली. यातील पहिलं म्हणजे  कोलकात्यावरील विद्यमान आणि येऊ घातलेला लोकसंख्येचा दबाव कमी करणे आणि दुसरं म्हणजे निर्वासितांना स्थायिक करणे, विशेषत: बंगाली मध्यमवर्गासाठी राहण्यायोग्य जागा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे.

कोलकात्याच्या पूर्वेकडील काही पाणथळ जमिनींवर पुन्हा हक्क सांगून नवीन टाउनशिप सॉल्टलेक विकसित करण्याची योजना होती. या पाणथळ जमिनी पूर्व कोलकाता वेटलँड्स (ईकेडब्ल्यू) चा भाग होत्या. ईकेडब्ल्यूच्या काही भागांवर पुन्हा दावा करण्याची कल्पना नेदरलँड्समधील जल सुधार पद्धतींपासून मोठ्या प्रमाणात प्रेरित होती. सॉल्टलेकसाठी ठेवलेल्या बहुतेक पाणथळ जागा कोलकात्याच्या तत्कालीन महापौरांच्या मालकीच्या होत्या ज्यांनी एक रुपयाच्या प्रतिकात्मक देवाणघेवाणीवर ही जमीन सरकारला दिली होती.

सॉल्टलेकसाठी ठेवलेल्या बहुतेक पाणथळ जागा कोलकात्याच्या तत्कालीन महापौरांच्या मालकीच्या होत्या ज्यांनी एक रुपयाच्या प्रतिकात्मक देवाणघेवाणीवर ही जमीन सरकारला दिली होती. 

सॉल्टलेकसाठी जमिनीचे सर्वेक्षण करण्याचं काम 1953 मध्ये नेडेको या डच अभियांत्रिकी कंपनीने हाती घेतलं. 15 फेब्रुवारी 1955 रोजी सरकारने सॉल्टलेक क्षेत्राच्या उत्तरेकडील पाणथळ जागा पुनर्संचयित करण्यासाठी 173.7 एकर जमीन संपादित केली. यामध्ये नायाबाद, करीमपूर, हादिया, जगतीपोटा, परगछिया, पाचपोटा, मुकुंदापूर आणि तेंतुलबारी येथील मौजा (प्रशासकीय-प्रादेशिक एकक) समाविष्ट होते. पूर्वीच्या युगोस्लाव्हियाच्या इव्हान मिलुटिनोविक इन्व्हेस्ट इम्पोर्ट कंपनीने (आयएमआयआयसी) 1959 मध्ये सॉल्टलेक पुनर्वसनासाठी निविदा मिळविली होती. सॉल्टलेकसाठी लेआउट योजना 1964 मध्ये स्वीकारण्यात आली होती. 1961 आणि 1967 च्या दरम्यान आयएमआयआयसीने हुगळी भरावातून उत्खनन केलेल्या गाळाचा वापर केला आणि सॉल्टलेक पाणथळ प्रदेश भरून काढला. याचं कंपनीला हुगळी नदीच्या निर्जंतुकीकरणाच कामही सोपवण्यात आले होते. भराव टाकणं पूर्ण झाल्यावर सॉल्टलेक टाउनशिपच्या इमारती बांधण्यास सुरूवात झाली.

सॉल्टलेकची योजना आणि भविष्यातील घटक

सॉल्टलेक हे एक नियोजित शहर असल्यामुळे त्याच्या शेजारी एक संरचित ब्लॉक पॅटर्न आहे ज्यामध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये समानुपातिक खुले मैदान, ग्रीनरी, सामुदायिक बाजारपेठा आहेत. हे सगळं पाच क्षेत्रांमध्ये पसरलेलं आहे. न्यूयॉर्क (मॅनहॅटन) आणि बार्सिलोना यांसारख्या ट्रान्सअटलांटिकमधील काही शहरांप्रमाणे ग्रिड पॅटर्नमध्ये सॉल्टलेक एकमेकांना लागून असलेल्या आयताकृती भूखंडांमध्ये विभागले गेले होते. आतमधले रस्ते एकमेकांना समांतर असे 90 अंशांवर छेदनबिंदूंसह तयार करण्यात आले होते. जमीन वाटपाच्या 50 टक्के भाग निवासी भूखंडांच्या वापरासाठी निश्चित केला होता आणि हा नमुना आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात राखला गेला आहे. बहुतेक रहिवासी ब्लॉक्सचे प्रवेशद्वार सामुदायिक बाजारापासून जवळच आहे. थोडक्यात दररोजच्या किराणा खरेदीपासून ते सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यापर्यंत अनेक क्रियाकलापांसाठी लोकांना एकत्र येता येतं. मोकळ्या जागा आणि खेळाच्या मैदानांची विस्तृत उपलब्धता सॉल्टलेकला भारतातील एक अद्वितीय टाउनशिप बनवते. इथे मुलांसाठी आणि प्रौढ दोघांनाही शारीरिक व्यायाम आणि मनोरंजनासाठी सार्वजनिक जागांवर प्रवेश आहे. वैयक्तिक गृहनिर्माण भूखंडांव्यतिरिक्त राज्य सरकारने अनेक गृहनिर्माण संकुले देखील स्थापन केली आहेत. अनेक राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागांनीही जमीन संपादित केली असून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गृहसंकुल बांधले आहेत. अशा गृहनिर्माण उपक्रमांमुळे कमी आणि मध्यम उत्पन्न गट सॉल्टलेकमध्ये स्थायिक होऊ शकले.

रहिवासी ब्लॉक्सचे प्रवेशद्वार सामुदायिक बाजारापासून जवळच आहे. थोडक्यात दररोजच्या किराणा खरेदीपासून ते सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यापर्यंत अनेक क्रियाकलापांसाठी लोकांना एकत्र येता येतं. 

सॉल्टलेकचे नगर नियोजक डोब्रिवोजे तोस्कोविक यांना टाउनशिपमध्ये चैतन्यपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी आर्थिक क्रियाकलापांमध्ये तरतुदी करायच्या होत्या. त्यामुळे 2000 च्या दशकापर्यंत रोजगाराची मुख्य ठिकाणे असलेल्या सरकारी इमारतींच्या स्थापनेसाठी तरतूद करण्यात आली. सॉल्टलेकच्या आसपास केंद्रित असलेले आयटी क्षेत्र हे पूर्व भारतातील सर्वात मोठे आयटी हब आहे. 2000 च्या दशकापासून सॉल्टलेकमधील आयटी क्षेत्राच्या विकासामुळे सॉल्टलेकमध्ये नवं जीवन, नवीन रोजगार उत्पन्न झाले आहेत. त्यामुळे टाउनशिपमधील ग्राहक-केंद्रित व्यवसायांचा विकास अधिक सुव्यवस्थित झाला आहे.

सॉल्टलेकमधील रस्त्यांसाठी 23 टक्के क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. आणि लागूनच असलेल्या कोलकात्यापेक्षा हे अत्याधिक सुविधपूर्ण आहे. त्यामुळे इथे रहदारीचे व्यवस्थापन देखील झाले आहे.   विशेषत: सॉल्टलेकमधील माहिती तंत्रज्ञान (आयटी) हबच्या विकासानंतर या सुविधा आणखीन चांगल्या पद्धतीने पुढे आल्या. कोलकात्याची नवीन पूर्व-पश्चिम मेट्रो आता सॉल्टलेकला मध्य कोलकात्याशी जोडते आणि लवकरच ती हावडा स्टेशनशी जोडली जाईल. या कनेक्टिव्हिटी उपक्रमामुळे कोलकाता महानगर क्षेत्राच्या इतर भागांतून सॉल्टलेकशी संपर्क साधणं देखील सुलभ झालं आहे.

सॉल्टलेक: एक शहरी नमुना

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या आकांक्षेसाठी भारताची अलीकडची शहरीकरणाची मोहीम महत्त्वाची मानली जाते. मात्र जर आपण देशभरातील नवीन शहरी घडामोडींचा संदर्भ घ्यायचा असेल (गुरुग्राम, न्यूटाऊन कोलकाता, नोएडा) तर यात अवास्तव नियोजन आणि अपुर्‍या पायाभूत सुविधा (पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, कनेक्टिव्हिटी, मोकळ्या जागा) आहेत. दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) सारख्या राज्य-संचलित संस्थांनी अयोग्य ठिकाणी गृहनिर्माण वसाहती विकसित केल्या आहेत. या घरांना खरेदीदार मिळणं अशक्य झालं. परिणामी 18,000 कोटी किमतीच्या न विकल्या गेलेल्या इन्व्हेंटरीज पडून आहेत. दुर्दैवाने नवकल्पनांच्या युगात हे घडतंय. शहरी घडामोडींच्या अशा चुकीच्या व्यवस्थापनामुळे भारतीय शहरवासी सहसा इतरत्र, विशेषतः पश्चिमेकडील चांगल्या शहरांचा शोध घेण्याचा मोह धरतात. आपण आपली पुढील शहरं लंडन , सिंगापूर किंवा शांघायच्या धर्तीवर बनवू  असं आश्वासन राजकारणी वारंवार देतात. मात्र, अशा योजना मुख्यत्वे नुसत्या बोलघेवड्या होऊन राहतात. यात ना कोणती कृती असते ना अंतर्दृष्टी असते. ही दृष्टी केवळ शहरांमधील सुशोभीकरणाच्या काही भागांपुरती मर्यादित राहते. सॉल्टलेकसारख्या भारतातील काही यशस्वी शहरी नियोजनाकडे पाहिलं तर अधिक अर्थपूर्ण ठरेल. यामुळे पुढील सुधारणांच्या संधींवर प्रकाश टाकता येऊ शकतो. 'इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज, कोलकाता' या सामाजिक विज्ञान संस्थेने सॉल्टलेक आर्काइव्हज विकसित करण्याच्या पुढाकाराने सॉल्टलेकबद्दलची विस्तृत गुणात्मक आणि परिमाणात्मक माहिती (वृत्तपत्र कव्हरेज, विधानसभेतील वादविवाद, नकाशे इ.) सांभाळून ठेवली आहे. सॉल्टलेक आर्काइव्ह्ज हे संशोधक आणि शहरी नियोजकांसाठी एक महत्त्वाचा संदर्भ असू शकतात जे न्याय्य आणि शाश्वत शहरीकरणावर लक्ष केंद्रित करतात. विशेष म्हणजे, निर्वासितांना सामावून घेण्यासाठी कोलकाता महानगराच्या आसपासच्या शहरी जागा वाढवण्याचा दृष्टीकोन आणि आधुनिक शहरी नियोजन सुलभ करण्यासाठी सक्षम संस्थांना कार्य सोपवणे हे भविष्यातील उद्दिष्टांसह सर्वसमावेशकतेचे यशस्वी संश्लेषण आहे, जे आजच्या शहरी नियोजक आणि प्रशासकांसाठी एक प्रभावी संदर्भ ठरू शकते.

स्नेहाशीष मित्रा  हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये अर्बन स्टडीजचे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.