Expert Speak Health Express
Published on Jun 14, 2024 Updated 0 Hours ago

बदलते हवामान आणि विषाणूजन्य संसर्गाचा वाढता फैलाव यामुळे निपाहचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असल्याने नैतिक सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाची गरज अधोरेखित झाली आहे. 

निपाह व्हायरस: संदर्भानुरूप सार्वजनिक आरोग्य प्रतिसादांची गरज

Image Source: NIAID

केरळामध्ये निपाह विषाणू संसर्गाचा चार वेळा उद्रेक झाल्याच्या बातम्या आल्यापासून निपाह विषाणूबाबत  प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने चर्चा होत आहे. सर्वसाधारणपणे, निपाहचा संसर्ग झालेल्या प्राण्यांची लघवी किंवा लाळ यामुळे दुषित झालेल्या फळांच्या सेवनाने निपाह विषाणूचा संसर्ग माणसांमध्ये होतो. या रोगाची लक्षणे आढळून न येणे ते श्वसनातीस संसर्ग ते तीव्र एन्सिफलायटीस अशाप्रकारची लक्षणे या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींमध्ये आढळतात. कोरोना इतका निपाह हा संसर्गजन्य नसला तरी त्याचा मृत्यूदर ४० ते ७५ टक्के असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रायोरिटी डिसीजमध्ये हा केंद्रस्थानी आहे.

या रोगाचा सर्वात अलीकडील उद्रेक गेल्या वर्षी कोझीकोड जिल्ह्यामध्ये नोंदवण्यात आला होता. यात दोन मृत्यूंसह प्रयोगशाळेने पुष्टी केलेल्या सहा केसेसचा समावेश होता. या परिस्थितीमध्ये जलद पावले उचलत केरळ सरकारने सार्वजनिक हालचालींवर निर्बंध, सोशल डिस्टंसिंग आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केल्याने हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागला. कोविडच्या काळात लादण्यात आलेली सर्व बंधने निपाह उद्रेकाच्या काळात लावण्यात आली होती. निपाह रोगाचा फैलाव रोखण्यासाठी कोविड काळात करण्यात आलेल्या उपायांवर अवलंबून राहणे उपयुक्त ठरणार नाही तर निपाह विषाणूचा संसर्ग कशाप्रकारे होतो हे समजून घेण्यासाठी माणसांमध्ये या विषाणूंचा संसर्ग, संसर्गाचा वेग आणि या रोगाशी लढताना येणारी बंधने यांचा सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार आहे अशाप्रकारचा युक्तिवाद या लेखात करण्यात आला आहे. संभाव्य जागतिक आरोग्यविषयक आणिबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नैतिक सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाची गरज या लेखात अधोरेखित करण्यात आली आहे.

या परिस्थितीमध्ये जलद पावले उचलत केरळ सरकारने सार्वजनिक हालचालींवर निर्बंध, सोशल डिस्टंसिंग आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केल्याने हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागला.

एक सुरक्षित प्रतिसाद

या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केरळ सरकारने केलेल्या उपाययोजनांचे फायदे अधिक असले तरी हा प्रतिसाद सर्वात योग्य होता असे म्हणता येणार नाही. केरळ सरकार, आरोग्य विभाग तसेच या विषयातील तज्ञ यांनी निपाह विषाणूच्या प्रादुर्भावाकडे एक धोका म्हणून पाहिले. याला राजकारणाचा मुद्दा न करता या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी अपवादात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. संसर्गजन्य रोगांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित प्रतिसाद देणे ही काही नवी संकल्पना नाही. तर, शांतता आणि सुरक्षा टिकवण्यासाठी आरोग्य हा मुलभूत घटक आहे या जागतिक संघटनेच्या मँडेटशी ही बाब सुसंगत आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य उपायांबाबत जागरूकता वाढवणे आणि संशोधन व विकास उपक्रमांना योग्य निधी उपलब्ध करून देणे फायदेशीर ठरते हे अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे, कोविड महामारीच्या काळातील प्रतिबंधात्मक उपाय हे संसर्गजन्य रोगांचा फैलाव रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या सुरक्षा प्रतिसादाचे एक उदाहरण आहे. रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक प्रतिसाद आवश्यक असला तरी, या प्रतिसादाची योग्यता यावर अद्यापही फार अभ्यास झालेला नाही. निपाह विषाणूच्या संदर्भात, प्राणी – मानव संबंधातील स्पिलओव्हर इव्हेंट्स, संसर्गाचे डायनॅमिक्स यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हे घटक सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाच्या स्वरूपामध्ये योगदान देतात. निपाह विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक नाहीत. तर, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संदर्भावर आधारित प्रतिसाद अधिक गरजेचा आहे. 

विषाणूचा फैलाव रोखण्यासाठीच्या विशिष्ट उपाययोजना

२०२३ मध्ये केरळात निपाहच्या उद्रेकाच्या वेळी करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्याशी निगडीत उपाययोजनांमध्ये निपाह विषाणूच्या फैलावाच्या डायनॅमिक्सवर लक्ष देण्यात आले नव्हते. यामुळे या उपाययोजना कठोर व नैतिकदृष्ट्या अन्यायकारक होत्या. कोविड महामारीच्या काळात लागू केलेल्या उपाययोजना याही वेळेस लावल्यामुळे निपाहसाठी लॉकडाऊन लावण्याची ही पहिलीच वेळ होती. ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थच्या इथॉक्स सेंटरच्या संशोधकांनी निपाहचा फैलाव रोखण्यासाठी कोविड उपाययोजनांपेक्षा वेगळा दृष्टिकोन ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे. यात निपाहच्या ट्रान्समिशन डायनॅमिक्सवर भर देण्यात आला आहे. निपाहचा संसर्ग दुषित फळ किंवा फळांपासून तयार केलेल्या उत्पादनांच्या सेवनामुळे तसेच घर किंवा दवाखान्यासारख्या तुलनेने बंदिस्त जागांमध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तींकडून इतर व्यक्तींना होतो. श्वासोत्सवासाशी निगडीत रोगांचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, प्रवासावरील प्रतिबंध, लॉकडाऊन बॉर्डर स्क्रीनिंग इत्यादी उपाय प्रभावी ठरतात. परंतू, निपाहचा पॅटर्न श्वासोत्सवासाशी निगडीत इतर रोगांच्या संसर्गापेक्षा वेगळा आहे. निपाह हा क्लोज कॉंटॅक्ट सेटिंग्समध्ये अधिक फैलावतो त्यामुळे घरी राहण्याची सक्ती आणि कॉरंटाईन यांसारख्या उपाययोजनांमध्ये संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका अधिक असतो.

निपाहचा संसर्ग दुषित फळ किंवा फळांपासून तयार केलेल्या उत्पादनांच्या सेवनामुळे तसेच घर किंवा दवाखान्यासारख्या तुलनेने बंदिस्त जागांमध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तींकडून इतर व्यक्तींना होतो.

यासोबतच, बॉर्डर टेस्टिंग मँडेटसारखे पर्याय संसर्गाच्या दुर्मिळ केसेससाठी पुरेसे असतील किंवा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी योग्य ठरतीलच असे नाही. या रोगाचा मृत्युदर जास्त असल्याने, विषाणू संसर्गाच्या प्रत्येक केसमध्ये जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, प्रत्येक केसद्वारे संसर्ग आटोक्यात आणणे गरजेचे ठरते. निपाह विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी अत्यंत कठोर उपाययोजना योग्य किंवा नैतिकदृष्ट्या न्याय्य ठरतील असे नाही हे यामधून सुचित होते. त्याऐवजी घरगुती किंवा क्लिनिकल प्रसार मर्यादित करण्यासाठीच्या  प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. २०१८ च्या निपाह उद्रेकादरम्यान केरळचा प्रतिसाद कॉंटॅक्ट ट्रेसिंगवर केंद्रित असल्याने तो व्यवस्थापित करण्यासाठी प्रभावी आणि पुरेसा ठरला, हे लक्षात घ्यायला हवे. सार्वजनिक आरोग्य उपायांचा वापर प्रतिक्षिप्तपणे त्या त्या वेळेची गरज समजून केला पाहिजे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

आरोग्यविषयक संवाद

निपाह विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्रिय सार्वजनिक संप्रेषण हे उद्रेक व्यवस्थापन आणि लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका बजावते. निपाह विषाणूबाबतची वैद्यकीय समज या रोगाच्या सामाजिक समजुतीशी जुळत नाही, हे बांग्लादेशमधील कम्युनिटी केस स्टडीजमधून दिसून आले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक घटकांचा संसर्गाबद्दल चुकीच्या समजुतींना हातभार लागल्याने तसेच रोगाचे वैज्ञानिक कारण आणि प्रतिबंधात्मक उपायांचे उपयुक्ततावादी मूल्य समजून घेण्याच्या समाजाच्या क्षमतेस अडथळा आणल्याने हा उद्रेक आटोक्यात आणण्यास अधिक कालावधी लागला.

निपाह विषाणूच्या उद्रेकामध्ये आर्थिक पद्धती, हवामान बदल आणि जैवविविधता यांचा एकत्रितपणे थेट परिणाम व्हायरल ट्रान्समिशन डायनॅमिक्सवर होतो. म्हणूनच हे जागतिक आरोग्य संघटनेच्या वन हेल्थ पर्स्पेक्टिव्हचे एक उदाहरण आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये विषाणूचा प्रसार प्रामुख्याने वटवाघूळापासून माणसांमध्ये झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रसार वृक्षारोपणासाठी बिया गोळा करणाऱ्या लोकांमधून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. निपाहचा संसर्ग झालेली वटवाघूळे काजू किंवा सुपारीसारख्या फळांची बाह्य आवरणे खातात व आतील फळ जमिनीवर टाकतात. हेच फळ वृक्षारोपण करणारे शेतकरी उचलतात. निपाहचा विषाणू या फळांच्या पृष्ठभागावर ३० तासांपर्यंत सक्रिय राहू शकतो. त्यामुळे ही फळे प्रसाराचा संपर्क बिंदू म्हणून काम करतात. 

निपाहचा संसर्ग झालेली वटवाघूळे काजू किंवा सुपारीसारख्या फळांची बाह्य आवरणे खातात व आतील फळ जमिनीवर टाकतात.

आरोग्याशी निगडीत फ्रेमवर्कच्या तर्कशुद्ध आणि माहितीपूर्ण अभ्यासातून वृक्षारोपण समुदायांमध्ये प्रतिबंधात्मक वर्तनाबाबत जागृकता निर्माण करता येऊ शकते. कच्च्या फळांच्या रसाचे सेवन आणि या फळांच्या पृष्ठभागावर मिळणारा निपाह विषाणू यांच्यातील दुव्याबाबत माहिती नसल्यामुळे बांग्लादेशमधील आरोग्य सेवांबाबत लोकांच्या मनात अविश्वास होता. वृक्षारोपण क्षेत्रात, वटवाघळांचे आरोग्य मानवी आरोग्याशी संबंधित असते. त्यामुळेच, व्हायरल ट्रान्समिशनला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांबाबत लोकांमध्ये पारदर्शकता निर्माण केल्यास जागरुकता वाढवू शकते तसेच अशाप्रकारच्या परिस्थितींशी जुळवून घेण्यासही मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, होम क्वारंटाईन संबंधीच्या कठोर प्रोटोकॉलचे पालन करून संपर्काद्वारे होणारा प्रादुर्भाव रोखणे, फळांचा रस गोळा केल्यानंतर वैयक्तिक स्वच्छतेच्या उपायांना प्रोत्साहन देणे, झाडाचे खोड आणि रस संकलनाचे भांडे झाकण्यासाठी बांबू स्कर्ट्सचा वापर करणे यासारख्या उपायाद्वारे वटवाघळांद्वारे होणाऱ्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. कोविड १९ आणि इबोलाच्या उद्रेकावेळेस चुकीची माहिती प्रसारित झाल्यामुळे पारदर्शक संप्रेषणाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती रोखणे गरजेचे आहे. निपाह विषाणूबाबत लोकांमध्ये जागृती झाल्यास या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास लोक सक्रियपणे हातभार लावतील, हे या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

संदर्भानुरूप सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद

जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरणाऱ्या व याच्या स्त्रोताबाबत फार कमी माहिती असलेल्या या साथीला पँडॅमिक एक्स असे संबोधले आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार, निपाह विषाणू संभाव्य जागतिक आरोग्य आणीबाणीसाठी कारणीभुत ठरू शकेल, असा जागतिक आरोग्य संघटनेचा कयास आहे.

लॉकडाऊनसारख्या कठोर उपायांमुळे संसर्गाचा प्रसार आणि मृत्यूदर नियंत्रणात आणण्यास जरी मदत होत असली तरी, अशाप्रकारच्या उपाययोजनांचे नकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येतात. नागरी स्वातंत्र्यांचे उल्लंघन, सामाजिक आणि आर्थिक व्यवहार ठप्प होणे, उपजीविकेच्या साधनांचे नुकसान, घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, मानसिक आरोग्य समस्यांशी संबंधित वाढत्या घटना, यांचा नकारात्मक परिणामांमध्ये समावेश होतो. यातच लस, उपचार किंवा सार्वजनिक आरोग्याच्या नावाखाली पाळत ठेवण्यासारखे प्रकार होऊ शकतात. यामुळे गोपनीयतेचे उल्लंघन होते. दीर्घकाळ आणि वारंवार लॉकडाऊन केल्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास कमी होतो आणि अशा प्रकारच्या संकटांना तोंड देण्याच्या सरकारच्या क्षमतेला बाधा येते, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. यावरून हे सिद्ध होते की आरोग्यासंबंधीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना त्या नैतिकदृष्ट्या योग्य आहेत ना याची खात्री करणे गरजेचे आहे. यासाठी संदर्भानुरूप दृष्टिकोन अधिक फायदेशीर आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त भार येत नाही तसेच तो इतर क्षेत्रांमध्ये पसरत नाही व नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघनही होत नाही.

बदलते हवामान, जमिनीचा अतिरिक्त वापर, विषाणूचा वेगाने होणारा प्रसार यांमुळे भविष्यात निपाहचा उद्रेक होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नैतिकदृष्ट्या योग्य सार्वजनिक आरोग्य उपाययोजना ही काळाची गरज आहे.


लक्ष्मी रामकृष्णन यांनी नुकतेच लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून आंतरराष्ट्रीय संबंधात एमए केले आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.