-
CENTRES
Progammes & Centres
Location
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षण प्रवासात कौशल्ये, प्रतिष्ठा आणि निवडीचा समावेश करून व्यावसायिक म्हणजेच कौशल्य प्रशिक्षणाची पुनर्कल्पना करते. हे शिक्षण पर्याय म्हणून नव्हे, तर आधार म्हणून आहे.
Image Source: Getty
हा लेख "NEP 2020 ची पाच वर्षे: व्हिजन टू रियॅलिटी" या लेख मालिकेचा भाग आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 चे उद्दिष्ट भारतीय शिक्षण व्यवस्था अधिक सर्वसमावेशक, कौशल्याभिमुख आणि वेगाने बदलणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या गरजांशी सुसंगत बनवणे आहे. यातील सर्वात परिवर्तनकारी प्रस्ताव म्हणजे शालेय तसेच उच्च शिक्षण पातळीवर व्यावसायिक (व्होकेशनल) शिक्षणाचा मुख्य प्रवाहात समावेश करणे. NEP 2020 व्यावसायिक शिक्षणाला पर्यायी किंवा सुधारात्मक मार्ग म्हणून नव्हे, तर सर्वांगीण विकासाचा एक मूलभूत आधारस्तंभ म्हणून ओळखते.
भारतामध्ये पारंपरिक दृष्टिकोनानुसार व्यावसायिक शिक्षणाला शैक्षणिक प्रवाहांपेक्षा कमी दर्जाचे मानले गेले असून, ते विशिष्ट सामाजिक-आर्थिक गटांपुरतेच मर्यादित राहिले आहे. NEP 2020 ही धारणा बदलण्याचा प्रयत्न करते. ते श्रमाची प्रतिष्ठा वाढवते, प्रत्यक्ष कृतीवर आधारित शिक्षण मुख्य अभ्यासक्रमात समाविष्ट करते आणि कौशल्याधारित मार्गांनी पारंपरिक शैक्षणिक पर्यायांइतकीच संधी आणि सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करते. हा दृष्टिकोन केवळ शैक्षणिक समानतेस चालना देणारा नाही, तर भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा पुरेपूर उपयोग करण्यासाठीही अत्यावश्यक आहे.
ह्या धोरण रूपरेषा औपचारिक शालेय शिक्षण संरचनेमध्ये व्यावसायिक शिक्षणाचा समावेश करण्यासाठी एक सर्वसमावेशक, बहुस्तरीय आराखडा मांडतात:
इयत्ता 6 पासून ओळखीची सुरुवात: अनुभवाधारित शिक्षण, अल्पकालीन इंटर्नशिप्स आणि ‘लोकविद्या’सारख्या समुदाय संलग्न उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची सुरुवातीपासूनच ओळख करून दिली जाते.
‘बॅगलेस पीरियड’चा उपक्रम: इयत्ता 6 ते 8 दरम्यान दरवर्षी 10 दिवसांचा ‘बॅगलेस पीरियड’ ठेवण्यात येतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपलीकडील विविध उपक्रमांमध्ये – जसे की कला, हस्तकला व व्यावसायिक कौशल्ये इ. मध्ये सहभागी होता येते.
इयत्ता 9 ते 12 साठी संरचित व्यावसायिक अभ्यासक्रम: हे अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट (NSQF) शी सुसंगत ठेवले जातात, जे मानकीकरण (स्टँडरडायझेशन), विभागणी व क्रेडिट पोर्टेबिलिटी सुनिश्चित करतात.
उच्च शिक्षणात समावेश: व्यावसायिक घटक केवळ बॅचलर ऑफ व्होकेशनल (B.Voc) पदवीपुरते मर्यादित न ठेवता सर्व पदवी अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केले जात आहेत. उद्योग व नागरी संस्थांशी भागीदारी करून त्यांची गुणवत्ता वाढवली जाते.
या धोरण रचनेला काही राष्ट्रीय संस्था बळ देत आहेत – राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग NCVET), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC) आणि PSSCIVE (UNESCO-UNEVOC केंद्र). या संस्था मानके तयार करणे, अभ्यासक्रम डिझाईन करणे, गुणवत्ता नियंत्रण आणि संपूर्ण प्रणालीत समन्वय साधणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
NEP 2020 च्या अंमलबजावणीनंतरच्या पाच वर्षांत व्यावसायिक शिक्षण क्षेत्राला चांगला गतीमान पाठिंबा मिळाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आता इयत्ता 9–10 साठी 22 कौशल्याधारित विषय आणि इयत्ता 11–12 साठी 43 विषय उपलब्ध करून देते, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), शेती, सौंदर्य आणि आरोग्य, डेटा सायन्स इत्यादींचा समावेश आहे. NSQF चा वापर करून शालेय शिक्षण व नोकरीच्या गरजांमध्ये सुसंगती आणली जात आहे. DIKSHA व NISHTHA सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण व शिक्षणसामग्री सहजपणे उपलब्ध होत आहे. काही राज्यांमध्ये हब-अँड-स्पोक मॉडेलचा अवलंब केला जात आहे, जिथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) या मुख्य केंद्र म्हणून कार्य करतात आणि त्यांच्या जवळील शाळांना उपकरणे, प्रयोगशाळा व प्रशिक्षक यांसाठी सहकार्य करतात.
तरीही काही आव्हाने कायम आहेत. भारतातील 6.3 कोटी उद्योजकांपैकी केवळ 25,000 उद्योजकच इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिपच्या संधी देतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याच्या संधी मर्यादित राहतात. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये प्रशिक्षित व्यावसायिक शिक्षकांची कमतरता ही एक मोठी अडचण आहे. अनेक शाळांमध्ये योग्य प्रयोगशाळा किंवा आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नाही, ज्यामुळे कृती-आधारित शिक्षण प्रभावीपणे होऊ शकत नाही. याशिवाय, पुराणमतवादी मानसिकता आणि सामाजिक कलंक यामुळे अनेक विद्यार्थी व पालक व्यावसायिक शिक्षण निवडण्यापासून मागे राहतात. शेवटी, शिक्षण विभाग, प्रशिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वयाचा अभाव यामुळे धोरणांची अंमलबजावणी सुसंगतपणे होण्यात अडथळे येतात आणि प्रगतीचे प्रभावी मूल्यांकन करणे कठीण होते.
NEP 2025 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि व्यावसायिक शिक्षणाला महत्त्वाकांक्षी व प्रभावी बनवण्यासाठी बहुआयामी धोरण आवश्यक आहे:
माहितीपूर्ण करिअर निवडींचे सक्षमीकरण
NEP 2020 इयत्ता 6 पासून व्यावसायिक शिक्षणाची ओळख करून देण्यावर भर देते, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण होईल आणि विविध करिअर पर्यायांविषयी जागरूकता वाढेल. संरचित करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीनिवडी ओळखता येतात आणि त्या भविष्यातील भूमिकांशी जोडता येतात.
काय करता येऊ शकते:
करिअरच्या वाटा: व्हिडिओज आणि भूमिका-अभिनय (रोल प्ले) वापरून व्यावसायिक आणि शैक्षणिक करिअर पर्याय विद्यार्थ्यांसमोर मांडणे, जे NEP च्या क्रेडिट-आधारित फ्रेमवर्कशी सुसंगत असतील.
गेम-आधारित मूल्यमापन: सोप्या आणि रंजक साधनांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना त्यांचे स्वारस्य ओळखण्यास आणि योग्य करिअर पर्याय शोधण्यास मदत करणे.
पालकांचा सहभाग: कार्यशाळा आणि सत्रांद्वारे पालकांना सहभागी करून घेणे, कारण करिअर निवडीत त्यांची भूमिका महत्त्वाची असते.
तंत्रज्ञान-सक्षम मार्गदर्शन: विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी जोडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणे.
2. शाळा आणि उद्योग यांच्यातील संबंध बळकट करणे
अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात काय उपयोग आहे, याबद्दल प्रश्न पडतो. उद्योग क्षेत्राचा शाळांशी संपर्क घडवून आणल्यास शिक्षणाचे उपयुक्तत्व स्पष्ट होते आणि वापरयोग्य ज्ञान निर्माण होते.
काय करता येऊ शकते:
इंटर्नशिप्स: स्थानिक व्यवसायांमध्ये अल्पकालीन इंटर्नशिप संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे. सुरक्षेचे नियम, शिकण्याचे उद्दिष्ट आणि कालावधी याबाबत स्पष्ट धोरण तयार करणे. विद्यार्थ्यांना संधींशी जोडण्यासाठी समन्वयकांची नेमणूक.
हॅकाथॉन्स: विद्यार्थ्यांसमोर उद्योगातील समस्यांचा विचार मांडणे व त्यावर उपाय शोधण्यास प्रोत्साहन देणे, विशेषतः ज्या भागांमध्ये उद्योगांची उपस्थिती कमी आहे तिथे. यामुळे चिंतन, सर्जनशीलता आणि नवप्रवर्तनाला चालना मिळते.
इंडस्ट्री सर्टिफाइड कोर्सेस: डिजिटल कौशल्ये, शाश्वत विकास आणि तांत्रिक विषयांवरील अल्पकालीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी उपलब्ध करून देणे, जे थेट उद्योगांकडून प्रमाणित असतील.
हब-अँड-स्पोक मॉडेल: उद्योगांशी संलग्न, सुसज्ज प्रयोगशाळा असलेल्या संस्था “हब” म्हणून वापरणे, जे जवळच्या शाळांना प्रशिक्षण व साधनसामग्री पुरवतात, प्रत्यक्ष कामाचे शिक्षण मिळवण्यासाठी.
3. रोजगारयोग्यता आणि जीवनकौशल्ये वाढवणे
क्रिटिकल थिंकिंग, आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्ये आणि बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता ही केवळ कामासाठीच नव्हे तर जीवनासाठीही अत्यावश्यक आहेत.
काय करता येऊ शकते:
जीवनकौशल्य सत्रे: कथाकथन, वादविवाद, केस स्टडी यांसारख्या विचारप्रवृत्त पद्धतींनी जीवनकौशल्यांचा अभ्यास.
प्रकल्पाधारित शिक्षण: उदाहरणार्थ, शाळेतील कचरा व्यवस्थापन, वीजबिल कमी करण्याचे उपाय यासारखे सोपे प्रकल्प विद्यार्थ्यांना दिले जावेत.
विषयांमध्ये समाकलन: सर्व शिक्षकांनी त्यांच्या विषयांमध्ये जीवनकौशल्यांचा समावेश करून, शिकवले जात असलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनाशी संबंध स्पष्ट करणे.
4. व्यवस्थेचे बळकटीकरण: शिक्षक व समुदाय शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणारे केंद्रबिंदू आहेत. गुणांवरून कौशल्यांकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, त्यासोबतच समाजाचा सहभागही तितकाच आवश्यक आहे.
काय करता येऊ शकते:
व्यावसायिक शिक्षक संवर्ग: प्रमाणित व्यावसायिक म्हणजेच व्होकेशनल शिक्षकांची टीम तयार करणे, जी सतत व्यावसायिक विकास (कॉन्टिनुअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट CPD) व करिअर वाढीच्या संधींनी समर्थित असेल. प्रशिक्षणात अध्यापनशास्त्र, वर्ग व्यवस्थापन, प्रकल्पाधारित शिक्षण आणि तांत्रिक कौशल्ये यांचा समावेश असावा.
प्रेरणादायी मेसेजिंग: माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, प्रदर्शने, व माध्यमांतून व्यावसायिक शिक्षणाची सकारात्मक प्रतिमा तयार करणे. अनेक पालक व्यावसायिक शिक्षणाकडे ‘शेवटचा उपाय’ म्हणून पाहतात. ही मानसिकता बदलण्यासाठी वास्तवातील यशोगाथा आणि उद्योजकांशी संवाद आवश्यक आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे भारतात व्यावसायिक शिक्षणाची समज आणि अंमलबजावणी यामध्ये मूलभूत बदल घडवून आणण्यासाठीची भक्कम पायाभरणी करते. हे उद्दिष्ट केवळ अभ्यासक्रम बदलून साध्य होणार नाही; त्यासाठी कौशल्याधारित संस्कृतीची गरज आहे, जिथे प्रत्येक प्रकारच्या कामाला सन्मान, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण, आणि करिअरसाठीची तयारी ही शालेय शिक्षणाची मूलभूत तत्त्वे बनतील. योग्य गुंतवणूक आणि सकारात्मक मानसिकतेच्या आधारे, व्यावसायिक शिक्षण भारताच्या बदलत्या शैक्षणिक प्रणालीमध्ये सामाजिक गतिशीलता, आर्थिक लवचिकता आणि युवक सशक्तीकरण यांचे प्रभावी प्रेरक ठरू शकते.
बिजीथा जॉईस या टाटा स्ट्राईव मध्ये इकोसिस्टम स्ट्रेन्थनिंग फंक्शनच्या हेड आहेत.
टोनी जेकब हे टाटा स्ट्राईव मध्ये याच विभागात लीड म्हणून कार्यरत आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Bijitha Joyce heads the Ecosystem Strengthening function at Tata STRIVE. She leads strategy, planning, and governance efforts, driving large-scale skill development initiatives across Government ITIs, ...
Read More +
Tony Jacob serves as a Lead within the Ecosystem Strengthening function at Tata STRIVE. He ensures quality implementation and capacity-building at scale for various skill ...
Read More +