Author : Vivek Mishra

Expert Speak Raisina Debates
Published on Aug 01, 2024 Updated 0 Hours ago

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात हॅरिस यांनी प्रवेश केल्याने सुरुवातीला ट्रम्प यांच्यासाठी ही फायदेशीर गोष्ट वाटू शकते. मात्र, हॅरिस यांनी अध्यक्षीय निवडणुकीला नवी दिशा दिली आहे.

कमला हॅरिस: दि ॲक्सिडेंटल नॉमिनी

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन पक्षांतील विरोध हा केवळ राजकीय व वैचारिक पातळीवर राहिलेला नसून दोन्ही बाजूंना हव्या असलेल्या परिवर्तनासाठीही दोन्ही पक्ष सिद्ध झाले आहेत. २०२४ ची निवडणूक ही डेमॉक्रॅटिक पक्षासाठी देशाच्या आत्म्यासाठी देण्यात येत असलेला लढा ठरली आहे. रिपब्लिकनांनी २०२५ चे लक्ष्य जाहीर केले आहे. त्यानुसार, २०२५ ची निवडणूक केवळ जिंकून चालणार नाही, तर अमेरिकेला ‘कट्टरवादी डाव्यां’च्या मगरमिठीतून वाचवणेही आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. डेमॉक्रॅटिक विरुद्ध रिपब्लिकन या विभाजनाचे प्रतिनिधित्व अनुक्रमे बायडेन व ट्रम्प हे दोघे करत होते, तेव्हा हे अमेरिकेच्या विभाजनाचे अंतिम प्रतीक आहे, असे वाटत होते; परंतु त्याच वेळी बायडेन यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची उमेदवारीसाठी शिफारस केली. हा निर्णय आश्चर्यचकीत करणारा ठरला. कारण अध्यक्षीय उमेदवारी मागे घेण्यासाठी बायडेन यांच्यावर पक्षाकडून दबाव वाढत असतानाही त्यांनी आपण उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे अवघे काही तास आधी जाहीर केले होते. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बायडेन यांनी आपला निर्णय सार्वजनिकरीत्या जाहीर करण्याच्या केवळ काही मिनिटे आधी आपल्या सरकारसमोर उघड केला होता.  

या निर्णयामुळे उपाध्यक्ष कमला हॅरिस अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे आता अचानकच हॅरिस यांना मदत करण्याची आणि त्यांच्या वतीने डोनाल्ड ट्रम्प यांना पराजित करण्याची जबाबदारी डेमॉक्रॅटिक पक्षावर येऊन पडली आहे. हॅरिस यांचे नाव अध्यक्षीय निवडणुकीसाठी जाहीर होण्याच्या आधी बायडेन यांच्या जागी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. स्थलांतर आणि शस्त्रास्त्र नियंत्रणासारख्या मुद्द्यांवर त्यांच्या भूमिकेवर टीका होत असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत संदिग्धता होती. मात्र, केवळ काही तासांमध्येच सहा गव्हर्नरांसह डेमॉक्रॅटिक पक्षातील महत्त्वाच्या सदस्यांकडून त्यांना पाठिंबा मिळाला.     

या निर्णयामुळे उपाध्यक्ष कमला हॅरिस अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे आता अचानकच हॅरिस यांना मदत करण्याची आणि त्यांच्या वतीने डोनाल्ड ट्रम्प यांना पराजित करण्याची जबाबदारी डेमॉक्रॅटिक पक्षावर येऊन पडली आहे.

कमला हॅरिस यांच्यावर अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची जबाबदारी अचानकच येऊन पडली असली, तरी त्यांनी ती आता ठामपणे स्वीकारल्याचे दिसत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला बायडेन यांच्या वारशाबद्दल आदर व्यक्त केला. आज त्यांच्यासमोर भरपूर आव्हाने उभी आहेत आणि या आव्हानांचा सामना त्या कशा करतात, यावर त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारमोहिमेची आणि निवडणुकीची दिशा अवलंबून आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पुरेसे डेलिगेट्स मिळवून हॅरिस यांनी पहिला अडथळा पार केला आहे. आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा सुमारे दोन दशके लहान असलेल्या हॅरिस यांना कृष्णवर्णीय महिला उमेदवार असल्याचा लाभ मिळू शकतो. अध्यक्षीय निवडणुकांच्या संदर्भात वाद असलेल्या वयाच्या मुद्द्यावर डेमॉक्रॅटिक पक्ष आता रिपब्लिकनांवर अचानकच वरचढ झाला आहे. शिवाय दोन वयोवृद्ध गौरवर्णीय पुरुषांमधील अध्यक्षीय स्पर्धेबाबतचा अमेरिकनांचा आणि जगाचा कंटाळाही संपुष्टात आला आहे.

हॅरिस यांच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील लाभाची बाब म्हणजे त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या फार मागे असणार नाहीत. २७ जूननंतर झालेल्या अध्यक्षीय डिबेटमध्ये त्या ट्रम्प यांच्या जेमतेम पिछाडीवर होत्या. त्यांच्या स्वतःच्या डेमॉक्रॅटिक पक्षातही त्या गाविन न्यूसोम, मिशेल ओबामा आणि पीट बुटीजेज यांच्यासारख्या संभाव्य उमेदवारांच्या तुलनेत आघाडीवर होत्या. पुढील पाऊले उचलण्याच्या दृष्टीने पाहिले, तर त्यांच्या समोरचे तातडीचे आव्हान म्हणजे, त्यांच्या बरोबरीने पुढे जाणाऱ्या सहकाऱ्याचा त्वरेने शोध घेणे. कारण काही राज्यांमध्ये सप्टेंबरपासूनच मतदानाला सुरुवात होणार आहे. या डेमोक्रॅटिक जोडीला केवळ त्यांच्या पक्षातील अंतर्गत स्पर्धा आणि राजकारणावर मात करावी लागणार नाही, तर ट्रम्प-वन्स जोडीच्या क्षमतेशीही स्पर्धा करावी लागेल.

कमला हॅरिस यांची प्रचार मोहीम

कमला हॅरिस यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रचारात नवा उत्साह आणला. बायडेन यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन लांब गेलेल्या मतदारांना पुन्हा वळवून विजयाची शक्यता निर्माण केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेच्या निवडणुकीतील महत्त्वाच्या म्हणजे, गर्भपात, स्थलांतर, वंशवाद, शस्त्रास्त्र नियंत्रण आणि तरुण या मुद्द्यांवर विशेषकरून जोर दिला. संस्कृतींचे संघर्ष होत असलेल्या या काळात होणाऱ्या अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण निवडणुकांमध्ये कृष्णवर्णीय, महिला व तरुणांना एकत्र आणणे ही हॅरिस यांच्या बाजूने फायद्याची गोष्ट आहे.

कमला हॅरिस आपल्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांच्या दुबळ्या बाजुंवर लक्ष केंद्र करतील; तसेच आपल्या बलस्थानांवर म्हणजे डेमॉक्रॅटिक पक्षाने पारंपरिकरीत्या पुरस्कार केलेल्या मूलभूत मुद्द्यांवरही त्या भर देतील. गर्भपाताच्या मुद्द्यावर हॅरिस या ‘प्रो-चॉइस मुवमेंट’ (महिलांना गर्भपाताचा हक्क देणारी राजकीय, सामाजिक व कायदेशीर चळवळ) च्या खंद्या पुरस्कर्त्या मानल्या जातात. या मुद्द्यावर तरुण व महिलांची मते त्या खेचू शकतात. देशभरातील महिलांना गर्भपाताचा हक्क मिळण्याच्या बाजूने त्यांनी ठाम भूमिका घेतली असून रो विरुद्ध वेड या खटल्यातील निकालाची अंमलबाजवणी करावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. हा निकाल २०२२ मध्ये रद्दबातल ठरवण्यात आला होता. जो बायडेन कॅथलिक असल्याने महिलांना हा हक्क देण्याबाबत वैयक्तिकरित्या त्यांची तयारी नव्हती.   

कमला हॅरिस आपल्या निवडणूक प्रचारात ट्रम्प यांच्या दुबळ्या बाजुंवर लक्ष केंद्र करतील; तसेच आपल्या बलस्थानांवर म्हणजे डेमॉक्रॅटिक पक्षाने पारंपरिकरीत्या पुरस्कार केलेल्या मूलभूत मुद्द्यांवरही त्या भर देतील. गर्भपाताच्या मुद्द्यावर हॅरिस या ‘प्रो-चॉइस मुवमेंट’ (महिलांना गर्भपाताचा हक्क देणारी राजकीय, सामाजिक व कायदेशीर चळवळ) च्या खंद्या पुरस्कर्त्या मानल्या जातात.

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाच्या ठरलेल्या हवामान बदलाच्या मुद्द्यावर कमला हॅरिस डोनाल्ड ट्रम्प यांच्या पूर्णतः विरोधात आहेत. हवामान बदलविषयक धोरणात्मक भूमिकेत हॅरिस यांनी पर्यावरणीय न्यायाचा विषय अधोरेखित केला आहे, हवामान, वंशवाद आणि लिंगविषयक मुद्द्यांना चतुराईने एकत्र आणले आहे आणि हवामान बदलाचा विशेषतः गौरेतर महिलांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामावर भर दिला आहे. त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या काळातही त्यांनी अमेरिकेतील मतदानाच्या हक्कासाठीच्या लढ्याला केंद्रस्थानी ठेवले होते. विशेषतः रिपब्लिकनांच्या राज्यांमधील मतदानासंबंधीचे निर्बंध उठवण्यात यावेत, हा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. आता आपल्या निवडणूक प्रचारात त्या वांशिक न्यायाच्या मुद्द्यावर अधिक जोर देतील. २०२२ मध्ये कुप्रसिद्ध जॉर्ज फ्लाइड घटनेनंतर ‘जस्टिस इन पोलिसिंग’ या कायद्यासंबंधात त्यांनी काम केले होते. दुसरीकडे, बायडेन यांच्या अधिपत्याखालील सरकारमध्ये हॅरिस यांनी केलेल्या कामगिरीवर ट्रम्प-व्हान्स प्रचारमोहिमेचा भर राहण्याची शक्यता आहे. शिवाय हॅरिस या नैसर्गिकरीत्या निवडलेल्या उमेदवार नसून अपघाताने उभ्या राहिलेल्या उमेदवार आहेत, हा मुद्दाही लावून धरला जाणे शक्य आहे. शिवाय स्थलांतराच्या मुद्द्यावर बायडेन सरकारमध्ये पडलेली फूट ट्रम्प यांच्या प्रचारातील जमेचा मुद्दा म्हणून उपस्थित होण्याची शक्यता आहे. कारण फुटीमध्ये हॅरिस यांची भूमिका केंद्रस्थानी होती.   

बायडेन यांच्या अधिपत्याखालील सरकारमध्ये हॅरिस यांनी केलेल्या कामगिरीवर ट्रम्प-व्हान्स प्रचारमोहिमेचा भर राहण्याची शक्यता आहे. शिवाय हॅरिस या नैसर्गिकरीत्या निवडलेल्या उमेदवार नसून अपघाताने उभ्या राहिलेल्या उमेदवार आहेत, हा मुद्दाही लावून धरला जाणे शक्य आहे.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाने विजय मिळवला, तर उपाध्यक्षपदावर असतानाच्या तुलनेने मौनी भूमिकेतून बाहेर पडण्याचे आव्हान हॅरिस यांच्यासमोर असेल. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या स्पर्धेत त्या दाखल झाल्याने सुरुवातीच्या काळात ट्रम्प यांच्यासाठी ते अनुकूल ठरणारे वाटत असले, तरी हॅरिस यांनी या स्पर्धेला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वाधिक लक्षवेधक निवडणूक ठरली आहे.


विवेक मिश्रा हे ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनमधील ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रॅम’चे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.