Author : ANUBHA GUPTA

Published on Apr 13, 2023 Updated 0 Hours ago

इंडो-पॅसिफिक क्षेत्रामुळे या शतकाला आकार येणार आहे, असे अलीकडेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत इंडो-पॅसिफिक हा सर्वात वेगाने वाढणारा प्रदेश बनला आहे. 

ऑकस इंडो-पॅसिफिकमधील नवीन आसियान आहे का?

जागतिक आर्थिक वाढीमध्ये या प्रदेशाचा दोन तृतीयांश वाटा आहे तसेच चीनच्या वाढत्या प्रभावामुळे हे सुरक्षा स्पर्धेचे क्षेत्र देखील ठरत आहे. पॅसिफिक किनारपट्टीला हिंदी महासागराशी जोडणारा दोर असलेल्या आसियानसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. आशिया-पॅसिफिकमधील राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा समस्यांविषयी सल्लामसलत (मुस्यवराह) आणि चर्चा (मुफाकत) करण्याच्या उद्देशाने १० आग्नेय आशियाई राष्ट्रांचा समूह म्हणून आसियान उदयाला आलेला आहे. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर, आसियानने या प्रदेशातील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय शक्ती म्हणून काम करून या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचे काम केले आहे.

चीनच्या वाढत्या आक्रमकतेमुळे क्वाड, ऑकससारख्या समविचारी संघटना आणि देशांशी जोडून घेऊन स्टेटस को राखण्याच्या अमेरिकेचा प्रयत्न आहे. परिणामी प्रादेशिक समतोलातील बदलामुळे आज आसियनला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आसियानमधील अशांतता हे अमेरिका-चीन यांच्यातील परस्पर शत्रुत्व आणि आसियानच्या अंतर्गत कमकुवतपणाचे लक्षण आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये, जेव्हा त्रिपक्षीय सुरक्षा (लष्करी आणि तंत्रज्ञान) करार, म्हणजेच ऑकसची घोषणा करण्यात आली, तेव्हा आसियान सदस्य राष्ट्रांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

एकीकडे, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांनी या प्रदेशात सुरू असलेल्या शस्त्रास्त्रांची शर्यत आणि शक्तीच्या अंदाजाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असतानाच दुसरीकडे, सिंगापूर, व्हिएतनाम, फिलीपिन्स इत्यादी देशांनी सावधपणे ऑकसचे स्वागत केले आहे.

सुवर्णयुगाच्या शिखरावर असताना, ते या प्रदेशातील विकासामधील महत्त्वाचा घटक आहेत असा आसियानला विश्वास होता. तथापि ऑकसच्या उदयाने इंडो-पॅसिफिकमध्ये आसियानच्या स्थानातील तडे उघड झाले आहेत.

आसियानची मध्यवर्ती भूमिका समजून घेताना

इंडो-पॅसिफिक प्रदेशात आसियानच्या मध्यवर्ती भूमिकेला समजून घेण्यासाठी, प्रथमतः असियानची निर्मिती आणि वाढ होण्यासाठीची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मजबूत नेतृत्व (ली कुआन यू, सुहार्तो, महाथिर इ.), साम्यवादाचा धोका, आर्थिक प्रगती (आसियान पीटीए, आसियान एफटीए, इ.), प्रादेशिक नेटवर्कचे मॉडेल (आसियान प्रादेशिक मंच, आसियान प्लस सिक्स, पूर्व आशिया शिखर परिषद, इ.) यांचा परिणाम म्हणून आसियनचे महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे. आणि अर्थात हे आसियान चार्टरमध्ये मुख्य उद्देश आणि तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व म्हणून कोरलेले आहे. या लेखातून आर्थिक वाढ आणि प्रादेशिक प्लॅटफॉर्मची रचना यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

 आसियानची आर्थिक वाढ

२०१९ मध्ये ३.२ अमेरिकन ट्रिलियन डॉलरच्या एकत्रित जीडीपीसह, आसियानने गेल्या पाच दशकात प्रभावी आर्थिक प्रगती साधली आहे. आसियानने युद्धाच्या ऐवजी आर्थिक विकास आणि वाढीला केंद्रस्थान दिलेले आहे. आज, आसियान जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि २०३० मध्ये चौथी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज आहे.

गेल्या ५० वर्षांत, आसियानने मानवी आणि शाश्वत विकास या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे तसेच शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांमध्ये सुधारणा केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आसियान चीन आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक स्पर्धेची एक जागा म्हणून उदयास आलेला आहे तसेच या पार्श्वभूमीवर चीन स्पष्टपणे विजेता म्हणून उदयास येत आहे. आतापर्यंत, या प्रदेशासाठी लागणार्‍या सुसंगत आर्थिक दृष्टीचा अमेरिकेकडे अभाव असल्याचे दिसून आले आहे. २०२० मध्ये, असियान व अमेरिकेतील वस्तू आणि सेवा व्यापार सुमारे ३६२ अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता आणि परकीय थेट गुंतवणुकीच्या संदर्भात तो ३२९ अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. हा व्यापार २०१९ च्या तुलनेत ३.२ टक्क्यांनी वाढला आहे. आसियान व चीन यांच्यातील व्यापार १९९१ मध्ये ९ अब्ज अमेरिकन डॉलर पासून २०२० मध्ये ६८५ अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत अभूतपूर्व प्रमाणात वाढला आहे. २०२० मध्ये ईयूला मागे टाकत आसियान चीनचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. अमेरिका या प्रदेशातील चीनच्या आर्थिक घोडदौडीची भरपाई समविचारी भागीदारांशी अधिक मजबूत संरक्षण आणि सुरक्षा संबंधांसह करत आहे.

प्रादेशिक सुरक्षा संस्थांची रचना

आसियानने आपल्या संवाद मंचांद्वारे प्रमुख शक्तींशी संलग्न होऊन आपली स्थिती मजबूत केली आहे. आसियन रिजनल फोरम (एआरएफ), आसियान प्लस सिक्स, ईस्ट एशिया समिट (ईएएस) इत्यादींनी आसियानला सत्ता संघर्षापासून दूर राहण्यास आणि प्रदेशात आपले मध्यवर्ती स्थान प्रस्थापित करण्यास मदत केली आहे. १९९४ मध्ये स्थापन झाल्यापासून एआरएफ हे परराष्ट्र मंत्रालयांसाठी समान हिताच्या विविध राजकीय आणि सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा करण्याचे एक व्यासपीठ बनले आहे, यामुळे परस्पर विश्वास आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. तसेच २००४ पासून ईएएसने ऊर्जा, वित्त, आसियान कनेक्टिव्हिटी इत्यादी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.

आसियानने अर्थव्यवस्थेपासून ते भू-राजकारणापर्यंतच्या सुरक्षेपर्यंतच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी एक संवादात्मक सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, तरीही, दक्षिण चीन समुद्रातील चीनची ठाम भूमिका, म्यानमारचे सत्तापालट इत्यादीसारख्या मुख्य प्रादेशिक सुरक्षा समस्यांचे निराकरण करण्यात ते सक्षम ठरलेले नाहीत. एकेकाळी आसियानच्या केंद्रस्थानाचा कणा असलेल्या देशांना धोरणात्मक पक्षाघाताचा सामना करावा लागत आहे. इंडो-पॅसिफिकमधील नवीन भागीदारीची मालिका म्हणजे २१व्या शतकातील सुरक्षा आव्हानांच्या संदर्भात आसियानच्या असंगततेचे प्रकटीकरण आहे. काही आसियन देश चीनसोबत बँडवॅगनिंगची रणनीती अवलंबत आहेत. आसियान आज एकसंध सामूहिक भूमिका घेण्यासाठी संघर्ष करत आहे. इंडो-पॅसिफिकमधील सुरक्षेच्या चिंतेच्या तुलनेत आसियानच्या कमकुवत स्थितीमुळे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना प्रादेशिक पुनर्संरचनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

इंडो-पॅसिफिकमध्ये ऑकस आसियानला मागे टाकेल का?

यूएस-आधारित द्विपक्षीय करारांपासून बहुपक्षीय आसियान-नेतृत्वातील सहकार्यापर्यंत इंडो-पॅसिफिकमधील सुरक्षा संबंध विस्तारलेले आहेत. वर्षानुवर्षे हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकांना पूरक ठरत आहेत. पण जसजसे आसियान कमकुवत होत जाणार आहे तसतसे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युती अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आसियान सध्या अमेरिकेच्या आशिया केंद्रित रणनीतीपासून सावध आहे.

ऑकसमध्ये आसियानच्या स्थानाला धोका निर्माण करण्याची क्षमता आहे. ऑकस हा एक सुरक्षा करार आहे ज्याचा उद्देश ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडी तंत्रज्ञान प्रदान करणे आहे हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे.

या पाणबुड्या जलद, वेगवान आणि लांब पल्ल्याच्या आहेत परिणामी ऑस्ट्रेलियाला चीनवर आक्रमण करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. संरक्षण आणि सुरक्षा क्षमतांना बळकट करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सखोल सामायिकरणाला प्रोत्साहन देणे हे ऑकसचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आसियानने अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांच्या सुरक्षेच्या प्रश्नांबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्यास ऑकस  दिवसेंदिवस अधिक मजबूत होणार आहे.

निष्कर्ष

यापूर्वीचे स्थान पुन्हा स्थापित करण्यासाठी व  २१ व्या शतकातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी आसियानला अंतर्गत आणि बाह्य पुनर्रचना करावी लागणार आहे. तसेच प्रदेशातील बदलत्या सुरक्षा वातावरणाला सामोरे जाण्यासाठी आसियानला समविचारी बहुपक्षीय संघटनांचा नव्याने शोध घ्यावा लागणार आहे. या पुढील वाटचालीत केवळ चीनच्या नेतृत्वाखालील पुढाकारांवर अवलंबून न राहता आसियानला आपल्या आर्थिक एकात्मतेमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. अमिताव आचार्य यांनी म्हटल्याप्रमाणे आसियान हे पूर्व आशियातील प्रादेशिक बहुपक्षीय मंचांचे केंद्र म्हणून काम केले पाहिजे, आसियानच्या मर्यादा स्पष्ट असल्या तरीही  इतर कोणतीही संघटना प्रादेशिक बहुपक्षीय मुत्सद्देगिरीचे केंद्र म्हणून त्यांच्या भूमिकेला आव्हान देऊ शकत नाही. आसियानने या प्रदेशातील शत्रुत्व, अविश्वास, काउंटर अलायंस आणि सुरक्षा कोंडी सोडवली पाहिजे. आसियानबाबतचा विश्वास आणि प्रतिबद्धतेला ऑकस हा पर्याय ठरू शकत नाही. तर ती काळाची गरज असायला हवी.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.