Author : Kabir Taneja

Published on Jan 02, 2024 Updated 0 Hours ago

सध्या सुरू असलेल्या इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षामुळे आधीपासूनच तीव्र असलेल्या इस्रायल-इराणच्या शत्रूत्वात भर पडली आहे. कारण इराणने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून भरती करणाऱ्या ‘प्रतिकाराचा अक्ष’चा स्पष्ट प्रचार केला आहे.

इराणची ‘प्रतिकार आघाडी’ आणि दक्षिण आशियाशी संबंध

गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाला आता पच्चावन्नपेक्षाही अधिक दिवस झाले आहेत. दरम्यानच्या काळात काही ओलिसांची देवाण-घेवाण यशस्वी झाली असली, तरी संघर्ष थांबेल, अशी प्रगती अद्याप झालेली दिसत नाही. हमासने सात ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या लष्कराकडून होत असलेल्या आक्रमणाला गाझामधील पॅलेस्टिनींना तोंड द्यावे लागत आहे. या संघर्षामुळे दोन्ही बाजूंचा तणाव वाढत आहे. विशेषतः इराणचा पाठिंबा असलेल्या आक्रमकांकडून होणाऱ्या ‘प्रतिकारा’च्या कथनासंबंधात अनेक घटक एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत.

सुएझ कालव्याच्या माध्यमातून युरोपला आशियाशी जोडणारी जागतिक व्यापाराची महत्त्वाची वाहिनी असलेल्या ‘रेड सी’मधून प्रवास करणाऱ्या व्यापारी तत्त्वावरील जहाजांवर इराणच्या पाठिंब्याने हौथी अतिरेक्यांनी केलेले हल्ले पाहता सध्या सुरू असलेल्या संघर्षांची व्याप्ती किती मोठी आहे, हे लक्षात येते. ही व्याप्ती इस्रायल-पॅलेस्टाइनच्याही पलीकडे असून ती इराणच्या ‘प्रतिकाराचा अक्ष’च्या मौखिक जाहिरातबाजीच्याही पुढे म्हणजे इस्रायल-इराणच्या शत्रूत्वापर्यंत पोहोचते. इराणच्या ‘काड्स फोर्स’चे कमांडर इस्माईल कानी यांनी ‘प्रतिकाराच्या अक्षातील तुमचे बंधू तुमच्यासमवेत एकत्र उभे आहेत. गाझा व पॅलेस्टाइनसंबंधातील शत्रूचे उद्दिष्ट प्रतिकार कदापीही साध्य करू देणार नाही,’ याचा गेल्या महिन्यात हमासला पाठिंबा देताना पुनरुच्चार केला होता. कानी यांची २०२० च्या जानेवारी महिन्यात अमेरिकेत झालेल्या ड्रोन हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या जागी इराणचे प्रसिद्ध कमांडर कासीम सुलेमानी यांची काडच्या प्रमुखपदावर नियुक्ती करण्यात आली. 

सुएझ कालव्याच्या माध्यमातून युरोपला आशियाशी जोडणारी जागतिक व्यापाराची महत्त्वाची वाहिनी असलेल्या ‘रेड सी’मधून प्रवास करणाऱ्या व्यापारी तत्त्वावरील जहाजांवर इराणच्या पाठिंब्याने हौथी अतिरेक्यांनी केलेले हल्ले पाहता सध्या सुरू असलेल्या संघर्षांची व्याप्ती किती मोठी आहे, हे लक्षात येते.

येमेनमधील हौथी, लेबनॉनमधील हिजबुल्लाह, इराकमधील कातीब हिजबुल्लाह आणि गाझामधील हमास यांसारखे दहशतवादी गट इराणच्या पाठिंब्याने होणाऱ्या प्रतिकाराचा एक भाग म्हणून नेहमीच या बद्दल बोलत असतात. हा संघर्ष वाढला तर, अशा लहान लहान कमी माहिती असलेल्या प्रदेशांचा इराणकडून फायदा घेतला जाऊ शकतो. अफगाणिस्तानातील फातेमीयून ब्रिगेड आणि पाकिस्तानमधील झैनाबीयून ब्रिगेड हे ‘शिया मिलिशिया’ आहेत. या संघटना सीरियातील यादवी युद्धादरम्यान आणि त्या संबंधाने स्थापन झाल्या. त्यामध्ये इस्लामिक स्टेट (आयएसआयएस किंवा अरेबिकमध्ये डाइश) विरोधातील लढ्याचा समावेश होतो. झैनाबियूनच्या स्थापनेचा मागोवा घेतला, तर २०१५ मध्ये दमास्कस येथे झालेल्या सय्यदा झैनाब मशिदीवरील हल्ल्यापर्यंत मागे जावे लागते. हा हल्ला सुन्नी अतिरेक्यांनी केला होता. त्या वेळी इराणने प्रथमच पाकिस्तानी शिया मुस्लिमांना लढण्यासाठी भरती केले होते. शिया मुस्लिम हे पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ दहा ते पंधरा टक्के आहेत. झैनाबियूनचा लोगो (प्रतीक) हा हिजबुल्लाहशी साधर्म्य दर्शवतो. मात्र २०१८ मध्ये १६०० अतिरेक्यांची मोठी भरती केल्यापासून तो वापरात येत नव्हता. अमेरिकेने २०१९ पासून झैनाबियूनला अर्थविषयक काळ्या यादीत टाकले होते. इराण व पाकिस्तानमधील विशेषतः बलुचिस्तानासारख्या विषयावर असलेल्या मूलभूत मतभेदाच्या दृष्टिकोनातून झैनाबियूनकडे पाहिले जाऊ शकते. बलुचिस्तान हा बंडखोरीने ग्रस्त प्रदेश असून येथे पाकिस्तान व इराण दोन्ही देश नेहमीच एकमेकांवर सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करतात.

आपल्या लढाऊ गटाला बळ देण्यासाठी इराणने अफगाणिस्तानातील शिया लोकांचा वापर केला. असे करणारा इराणसाठी हा दुसरा देश आहे. सीरियायाचे अध्यक्ष बशर अल-असाद यांना लढण्यास ताकद देण्यासाठी मदत करणाऱ्या फतेमीयून ब्रिगेडची २०१४ मध्ये स्थापना झाली. या ब्रिगेडमध्येही अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील आपल्या ‘सिस्टर एजन्सी’सारखेच अफगाणिस्तानातील शिया निर्वासितांचा समावेश आहे. ती सुरक्षेसाठी इराणमध्ये स्थलांतरित झाली आहे. या ब्रिगेडमध्ये अफगाणिस्तानातील शिया हाजरा समाजातूनही भरती करण्यात येते. हाजरांची लोकसंख्या अफगाणिस्तानच्या लोकसंख्येच्या दहा टक्के आहे आणि विशेषतः तालिबान सत्तेवर आल्यानंतर या समाजाला लक्ष्य करण्यात आले. २०१८ पासून दोन हजारांपेक्षाही अधिक अफगाणी शिया मुस्लिम सीरियामध्ये लढताना मृत्युमुखी पडले आहेत. सध्या वीस हजारांपेक्षाही अधिक शिया एका प्रदेशात सक्रिय असल्याचे समजते. मात्र इराणच्या प्रमुख इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)कडून पुरेसा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार अफगाणिस्तानातील शिया मुस्लिमांनी केली आहे. शियांचे सुन्नीवादापासून व सलाफीवादापासून रक्षण करण्याच्या विचारसरणीवर आधारित इराणने दाखवलेल्या उद्दिष्टांसाठी काही जण संघटनेत दाखल झाले, तर विशेषतः अफगाणिस्तानातील अनेक जण आर्थिक प्राप्तीसाठी संघटनेत सामील झाले. विचारसरणी व दारिद्र्य या दोन्हींमुळे परदेशी सैनिकांच्या भरतीसाठी अफगाणिस्तान ही एक सुपीक भूमी बनली. सीरियामध्ये संघर्ष करताना मारल्या गेलेल्या अफगाणी शियांच्या कबरींच्या दर्शनासाठी सुलेमानी पूर्वी गेले होते. ते केवळ प्रशंसा  मिळवण्यासाठी केलेले प्रदर्शन होतेच, शिवाय हे शिया पंथीय केवळ लढ्यात कामी आले नव्हते, तर शियांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हुतात्मा झाले होते, असेही त्यांना दाखवून द्यायचे होते.

हाजरांची लोकसंख्या अफगाणिस्तानच्या लोकसंख्येच्या दहा टक्के आहे आणि विशेषतः तालिबान सत्तेवर आल्यानंतर या समाजाला लक्ष्य करण्यात आले.

तालिबान्यांनी २०२१ मध्ये अफगाणिस्तानची सत्ता मिळवली, तेव्हा फतेमीयून हा प्रशिक्षित गट असल्याचे मानण्यात आले होते. हा गट इराणच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी गरज पडेल, तेव्हा तालिबान्यांशी दोन हात करील; तसेच आखातात लढण्यासाठी जास्तीच्या सैनिकांची गरज लागली, तर पैशाच्या मोबदल्यात केव्हाही वापरला जाऊ शकेल, असा साठा असेल, असेही गृहित धरण्यात आले होते. काबूलच्या पतनापूर्वी अमेरिकेने इराणसाठीचे ‘सामरिक अंतर’ या दृष्टिकोनातून फतेमीयूनकडे पाहिले होते. इराणकडून या लढाऊ सैन्याचा वापर अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी आणि अफगाणिस्तानात हल्ला करण्यासाठी केला जाईल, अशी भीती अमेरिकेला वाटत होती. काही महिन्यांनंतर तालिबानलाही सुरक्षेची चिंता वाटू लागली. फतेमीयून हा गट अफगाणिस्तानातील एकसंध ताकदवान गट असल्याचे दिसले नाही, तर पैशासाठी लढायला तयार असलेले निम्नस्तरीय लोक एकत्र आले आहेत, असे चित्र दिसत होते.

झैनाबियून व फतेमीयून या दोन्ही संघटनांची अफगाणिस्तान व पाकिस्तानातील रोजगार देण्याची क्षमता मर्यादित असली, तरीही ते केवळ नजीकच्या मध्य पूर्वेतीलच नव्हे, तर त्याच्या ‘अन्य’ सीमेवरदेखील शिया समाजाला प्रेरित करण्याचे इराणचे सामर्थ्य या संघटनांच्या माध्यमातून दिसून येते. भारतात अशा प्रकारची कोणतीही जमवाजमव झाली नसली, तरी भारतात शियांचे प्रमाण एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या सुमारे तेरा-चौदा टक्के आहे. तरी ती जगातील शिया लोकसंख्येत इराणनंतर दुसऱ्या क्रमांकाची आहे. काश्मीरमध्ये त्यांचा अधिक टक्का आहे. काश्मीरमधील शियांनी अमेरिकेत सुलेमानीची हत्या झाल्यानंतर अमेरिकेच्या विरोधात निदर्शनेही केली होती. विशेष म्हणजे, भारतातील शिया मुस्लिम निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल मानले जातात. कारण भाजपने सलाफीवादाच्या (सुन्नी इस्लाममध्ये हा दिसून येतो) विरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

इस्रायलविरुद्धच्या युद्धात हमासचे एक मोठे यश म्हणजे, हमासने ‘दहशतवाद’ व ‘प्रतिकार’ या दोन संकल्पनांमधील अन्वयार्थ सौम्य केला आहे. पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या विरोधात असलेले इराणचे प्रमुख हिजबुल्लाह, हमास आणि अगदी फतेहच्या गटांच्या प्रमुखांना खुलेआम भेटत आहेत. यावरून जागतिक स्तरावर काहीही बोलले जात असले, तरी इराण पॅलेस्टाइनचा वापर करून इस्रायलविरोधी आणि अमेरिकाविरोधी मतप्रवाह उघडपणे व सार्वजनिकरीत्या पसरवत असल्याचे ध्यानात येत आहे. इराण गाझा युद्धाच्या जीवावर आपली अधिक प्रादेशिक आणि तात्विक उद्दिष्टे जागतिक स्तरावर जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. याची प्रचिती अमेरिकेतील महाविद्यालयांच्या वसतिगृहांपासून ते युरोपातील संसदीय चर्चांपर्यंत सर्वत्र येत आहे.

पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या विरोधात असलेले इराणचे प्रमुख हिजबुल्लाह, हमास आणि अगदी फतेहच्या गटांच्या प्रमुखांना खुलेआम भेटत आहेत. यावरून जागतिक स्तरावर काहीही बोलले जात असले, तरी इराण पॅलेस्टाइनचा वापर करून इस्रायलविरोधी आणि अमेरिकाविरोधी मतप्रवाह उघडपणे व सार्वजनिकरीत्या पसरवत असल्याचे ध्यानात येत आहे.

मात्र ‘प्रतिकार’ हा मुद्दाही विविधांगी आहे. इराणचे समर्थक इराणचीच तळी उचलत असताना अल कायदा व इस्लामिक स्टेटशी संबंधितांसह अन्यही आपापल्या हितसंबंधांना व प्रतिमेला बळ देण्याची संधी म्हणून याकडे पाहात आहेत. उदाहरणार्थ, पाकिस्तानातील जमात ए इस्लामीचा अमीर, सिराजुल हक याने या आठवड्याच्या शेवटी पॅलेस्टाइनच्या मुद्द्याबरोबरच काश्मीरच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. त्याने नेत्यांना किंवा देशांना नव्हे, तर सर्व मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ‘कणा नसलेल्या नेत्यांमुळे उम्मा (धर्माच्या एकाच धाग्याने बांधलेला मुस्लिम समाज) ला सध्याच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मुजफ्फराबादच्या मातीतून मी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आणि इतर सर्व मुस्लिम देशांना आवाहन करतो, की इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) नेहमीच्याच ठरावांवर अवलंबून न राहता व्यवहार्य पावले उचला (काश्मीर व पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्यासाठी),’ असे आवाहन पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या एका मेळाव्यात हक याने केले. या संघटनांमधील काही गट इराणचे हितसंबंध राखणारे नाहीत. याच पार्श्वभूमीवर इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी गाझासंबंधात चर्चेसाठी नोव्हेंबर महिन्यात सौदी अरेबियाला गेले होते.

अखेरीस, सध्याचा संघर्ष हा जेवढा अपरिपक्व भू-राजकीय व भू-सामरिक आहे, तेवढाच तो आदर्श विचारप्रणालीचा आहे. इराणसाठी सध्याच्या राजवटीचे संरक्षण व स्थैर्य हे सर्वाधिक महत्त्वाचे धोरणात्मक उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे ते त्याच्या प्रादेशिक अरब शेजाऱ्याविषयी आणि स्वतःच्या राजेशाही आणि ईश्वरसत्ताक राजकीय परिसंस्थेविषयीही आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान यांसारखे देश अयशस्वी अथवा जवळजवळ अयशस्वी देशांच्या वास्तवाशी जोडलेल्या सुपीक भूमी उपलब्ध करून देतात. या भूमी झैनाबियून आणि फतेमीयून ब्रिगेडने दाखवून दिल्याप्रमाणे इतरांचे किंवा त्यांच्या स्वतःचे हितसंबंध साधण्यासाठी उपयुक्त ठरतात. ही विकृती काही एकमेव नव्हे. सध्याच्या वाढत्या अनागोंदीच्या जागतिक व्यवस्थेत सामरिक योजनांच्या अपारंपरिक पद्धती संबंधित सर्वांसाठी धोकादायक असल्या, तरी त्यांना बळ मिळत राहील.

कबीर तनेजा हे ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’च्या धोरणात्मक अभ्यास कार्यक्रमाचे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.