Author : Sushant Sareen

Published on Feb 12, 2024 Updated 3 Days ago

इराण आणि पाकिस्तान यांनी 'जशास तसं' करून दाखवण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही बाजूंनी संघर्ष नकोय किंबहुना तो दोघांनाही परवडणारा नाहीये.

इराण आणि पाकिस्तान : आधीच अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानसमोर आणखीन एक आव्हान

इराण-पाकिस्तान सीमारेषेला लागून असलेल्या सीमावर्ती भागात अनेक वर्षांपासून तस्करी, मानवी तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अर्थातच बंडखोरी आणि दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू असतात. हे प्रदेश त्यासाठीच कुप्रसिद्ध आहेत. इथे चकमकी, उथळ घुसखोरी, छापे आणि अधूनमधून तोफांचा मारा हा अगदी नित्याचा खेळ झालाय. पण दोन्ही देशांनी या सगळ्या गोष्टी नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यात यश मिळवलंय. ते सर्व पातळ्यांवर एकमेकांशी संलग्न राहिले आहेत आणि सीमेवर नियमितपणे होणाऱ्या संकटांवर तोडगा काढण्यासाठीच नव्हे तर दहशतवादाच्या समस्येवरही तोडगा काढण्यासाठी त्यांनी यंत्रणा उभारली आहे.

इराण-पाकिस्तान हल्ले : वार आणि पलटवार

16 जानेवारी रोजी इराणने पाकिस्तानस्थित सुन्नी दहशतवादी गट जैश अल-अदलवर हल्ला करण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या भूमीवर क्षेपणास्त्र डागली आणि ड्रोन हल्ले केले. इराणच्या बाजूने ही एक गंभीर कृती होती, कारण कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी हा हल्ला चढविला होता. मात्र पाकिस्तानने त्याकडे अकारण केलेला हल्ला म्हणून पाहिलं. पाकिस्तानने प्रत्युत्तरात राजनैतिक संबंध कमी केले,  सर्व द्विपक्षीय भेटी रद्द केल्या. पण 18 जानेवारी रोजी पाकिस्तानने इराणमध्ये बलुच फुटीरतावाद्यांच्या कथित छावण्यांवर काउंटर स्ट्राइक सुरू केला. आता चेंडू परत इराणच्या कोर्टात परतला आहे. आता या हल्ल्यांच्या दुसऱ्या फेरीत गेल्यावर कोण शिरजोर ठरणार हे पाहण्यासाठी प्रत्येकजण वाट पाहत आहे.

इराणच्या सोशल मीडियावर पाकिस्तानच्या सीमेवरील भाग रिकामे करणे, पाकिस्तानच्या सीमेकडे सैन्य हलवणे आणि काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बॅटरी तैनात करणे अशा काही अस्पष्ट बातम्या येत आहेत. हे निव्वळ शक्तीप्रदर्शन असल्याचं दिसतंय. इराण देखील पाकिस्तानच्या सीमेजवळ एक मोठा हवाई संरक्षण सराव करत आहे. मात्र इराण यापुढे जाणार नाही कर. 1998 मध्ये तालिबानने मजार-ए-शरीफ येथे इराणी मुत्सद्दींना ठार मारल्यानंतर, इराण चांगलाच संतापला होता. त्यांनी अफगाण सीमेवर आपले सैन्य जमा केले आणि युद्धाची धमकी दिली परंतु कधीही पुढे सरकले नाही. इराण आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याची तू तू मैं मैं कशी संपेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दोन्ही बाजूंना संघर्ष नकोय. किंबहुना तो परवडणार नाही. पाकिस्तान सार्वजनिक ठिकाणी आपली कठोरता दाखवेल पण सोबत सलोखा निर्माण केला पाहिजे यावर भर देईल. त्यामुळे दोन्ही बाजूंची परिस्थिती बघता यापुढे काही जाईल असं वाटत नाही.

पण परिस्थिती चिघळू शकते हे वास्तव देखील नाकारता येत नाही. कदाचित, इराणच्या चुकीच्या हिशोबामुळे त्याने त्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध आपले हात पिळवटले असते. मात्र इराणने पाकिस्तानला सॉफ्ट टार्गेट करत तुलनेने कमी खर्चिक पर्याय म्हणून पाहिले. पाकिस्तान स्वतःच्या अस्तित्वाच्या संकटात इतका गुंतलाय की तो प्रत्युत्तर देऊ शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही. पाकिस्तान आधीच तीन आघाड्यांवर गुंतलाय. यात भारत, अफगाणिस्तानातून येणारी इस्लामी बंडखोरी आणि इम्रान खानविरुद्ध देशांतर्गत आघाडी यांचा समावेश आहे. इराणबरोबर चौथी आघाडी उघडण पाकिस्तान टाळेल असं वाटून इराणने हल्ला चढवला. पाकिस्तानी लष्करही युद्ध लढण्याच्या स्थितीत नाही. माजी लष्करप्रमुखांनी तसे संकेत दिले होते. आर्थिकदृष्ट्या, देश धुरात चालला असताना नवा संघर्ष परवडणारा नव्हता. यात सर्वात चांगलं म्हणजे, पाकिस्तान काही राजनैतिक पावले उचलेल ज्यामुळे इराणला काहीही किंमत मोजावी लागणार नाही. पाकिस्तानमधील जैश अल-अदल दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याने इराणमधील जनमत समाधानी होईल. मागील काही आठवड्यात अत्यंत अस्वस्थ सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात हल्ले झाले होते. इराण आपल्या भूभागाचा वापर इराणविरुद्ध होऊ देणार नाही असा संदेश त्यांना या कृतीतून द्यायचा होता.

पाकिस्तान आधीच तीन आघाड्यांवर गुंतलाय. यात भारत, अफगाणिस्तानातून येणारी इस्लामी बंडखोरी आणि इम्रान खानविरुद्ध देशांतर्गत आघाडी यांचा समावेश आहे.

इराणने पाकिस्तानच्या कमकुवतपणाचं केलेलं विश्लेषण चुकीचं नव्हतं. त्यांनी खरं तर पाकिस्तानच्या प्रतिक्रियेचे मूल्यांकन केलं होतं. पाकिस्तान कमकुवत आहे आणि गंभीर आर्थिक, राजकीय, सुरक्षा, सामाजिक आणि संस्थात्मक तणावाखाली आहे. या वस्तुस्थितीमुळेच पाकिस्तान प्रत्युत्तरादाखल हल्ला करणार नाही असा त्यांचा विश्वास होता. पण पाकिस्तानने केवळ मुत्सद्दीपणानेच नव्हे तर लष्करी दृष्ट्याही प्रत्युत्तर देणं ही सामरिकदृष्ट्या टिकून राहण्याची बाब होती.  पाकिस्तानी लष्कराने देशांतर्गत चालवलेल्या हायब्रीड राजवटीला इराणला प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नव्हता. लष्कर अत्यंत लोकप्रिय आहे असं नाही आणि इराणच्या हल्ल्यानंतर ती लोकप्रियता कमी होण्याची शक्यता होती. पाकिस्तानच्या प्रादेशिक आणि वैचारिक सीमांचे संरक्षक म्हणून त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ट्रोल्स विचारत होते की पाकिस्तानी लष्कर केवळ इम्रान खानच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात टाकण्यासाठीच आहे का?  पाकिस्तानचं परकीय शक्तीपासून संरक्षण करण्यास ते असमर्थ आहेत का? त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराला योग्य आणि प्रमाणबद्ध लष्करी प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि नंतर एक-एक फेऱ्यांच्या हल्ल्यानंतर गोष्टी मिटतील असं जरी वाटलं असलं तरी हाही पाकिस्तानच्या राजकीय अस्तित्वाचा विषय बनला.

परिस्थितीच अशी बनली की पाकिस्तानला याचा फायदा झाला. पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यावर त्याच्या शेजाऱ्यांना (विशेषत: अफगाणिस्तान आणि भारत) असा संदेश जाईल की, हल्ला झाला तर पाकिस्तान मागे हटणार नाही आणि त्याला चोख प्रत्युत्तर देईल. शिवाय तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण लोकांमध्ये सरकारची प्रतिमा पुनर्संचयित होईल. जर पाकिस्तान नशीबवान असेल, तर तो केवळ अरब जगतातील त्याच्या हितकारकांनाच नव्हे तर अमेरिकेलाही त्याची उपयुक्तता दाखवून देण्यासाठी या स्टँडऑफचा फायदा घेऊ शकेल. इराणला त्रास देण्यासाठी पाकिस्तान कधीही जाणार नाही ही वस्तुस्थिती वेगळी आहे. पाकिस्तानला हे माहीत आहे की इराणकडे  लक्षणीय संपत्ती आहे आणि त्यांची बरीच गुंतवणू पाकिस्तानमध्ये आहे. ज्याला धक्का बसल्यास ते विनाशकारी ठरू शकते. मात्र, पाकिस्तानला अमेरिका आणि अरब राष्ट्रांना आपल्या सोबत ठेवायचं आहे. पाकिस्तानने आज अफगाणिस्तान, भारत आणि इराण या तिन्ही शेजारी देशांसोबतचे राजनैतिक संबंध कमी केले आहेत. अशा वेळी पाकिस्तानची सत्ता गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा आणि पाकिस्तानला दहशतवादाचे नव्हे तर व्यापाराचे केंद्र बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. अशावेळी त्यांचे इराण सोबतचे संबंध गोष्टी बिघडवणारे ठरू शकतात.

पाकिस्तानला हे माहीत आहे की इराणकडे लक्षणीय संपत्ती आहे आणि त्यांची बरीच गुंतवणू पाकिस्तानमध्ये आहे. ज्याला धक्का बसल्यास ते विनाशकारी ठरू शकते.

इराणसाठी, पाकिस्तानी सूडबुद्धीने पेच निर्माण केला आहे. इराणने हा तिढा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना स्वत:साठी आणखी एक आघाडी उघडावी लागेल. दुसरीकडे, जर इराणने माघार घेतली तर या प्रदेशातील इतर देशांना संदेश जाईल की इराणचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्याच्यावर थेट हल्ला केला पाहिजे. "सापाच्या डोक्यावर" (इराण) मारल्याशिवाय मध्य पूर्वेतील स्थिरता शक्य होणार नाही अशी देखील चर्चा सुरू आहे. इराणने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर मग इराणचे प्रतिस्पर्धी देश या प्रदेशात समस्या निर्माण झालीय यासाठी इराणला जबाबदार धरत त्याच्यावर हल्ले करतील. इतकंच नाही तर इराणच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानस्थित सुन्नी दहशतवादी गट इराणवर आणखी हल्ले करतील.

मध्य पूर्वेत गोंधळलेली परिस्थिती

जर इराण आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाला नाही, तर काही आठवड्यांनंतर, कदाचित दोन महिन्यांनंतर दोन्ही बाजूंनी जुंपण्याची शक्यता आहे. पण जर या तणावामुळे उघड शत्रुत्व निर्माण झालं तर मध्यपूर्वेतील आधीच गोंधळलेल्या स्थितीत भर पडेल. याचा भारतावर परिणाम होईल कारण यामुळे भारत आणि अरब आखाती राज्यांमधील ऊर्जा पुरवठा मार्ग आणि व्यापार मार्ग यात व्यत्यय येऊ शकतो. त्याचसोबत या प्रकरणात चीन मध्यस्थी करून आपलं वजन वाढवण्याच्या तयारीत आहे. अमेरिका या प्रदेशात मध्यस्थाची भूमिका बजावण्याच्या स्थितीत नाही. ती भूमिका वठवण्यासाठी चीन अगदीच तयार आहे आणि यातून चीनची प्रादेशिक भुकेची लालसा दिसून येते.

सुशांत सरीन हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो आहेत.    

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sushant Sareen

Sushant Sareen

Sushant Sareen is Senior Fellow at Observer Research Foundation. His published works include: Balochistan: Forgotten War, Forsaken People (Monograph, 2017) Corridor Calculus: China-Pakistan Economic Corridor & China’s comprador   ...

Read More +