Expert Speak Raisina Debates
Published on Apr 01, 2025 Updated 0 Hours ago

खलील हक्कानी यांच्या हत्येमुळे तालिबानमधील अंतर्गत फूट आणि आयएसकेपीच्या वाढत्या धोक्याला अधोरेखित करण्यात आले आहे, ज्यामुळे संघटनेच्या स्थैर्य आणि नियंत्रणाबाबत शंका निर्माण झाली आहे.

अंतर्गत मतभेद आणि बाह्य धोक्यांचे आव्हान: तालिबानचे वाढते संकट

Image Source: Getty

    11 डिसेंबर 2024 रोजी काबूलमध्ये इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान (IEA) चे निर्वासित आणि प्रत्यार्पण मंत्री खलील उर रहमान हक्कानी यांची हत्या करण्यात आली. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यानंतर तालिबानच्या अधिकाऱ्याची झालेली ही पहिलीच उच्च-प्रोफाइल हत्या होती. हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेता दुपारची नमाज अदा करून कार्यालयातून बाहेर पडत असताना मंत्रालयाच्या आवारात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ठार झाले. इस्लामिक स्टेट खुरासान प्रांताने (ISKP) आपल्या टेलिग्राम चॅनेलद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्याने तालिबानच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्याची आयएसकेपीची क्षमता अधोरेखित केली आहे. तसेच, या घटनेमुळे आयएसकेपीकडून निर्माण होणाऱ्या वाढत्या सुरक्षाविषयक धोक्यांवर प्रकाश पडला आहे आणि तालिबानची अंतर्गत स्थैर्य व सुरक्षा राखण्याची क्षमता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

    तालिबानच्या मंत्र्यांनी अमीरच्या धोरणांना वारंवार विरोध दर्शवल्याने संघटनेतील अंतर्गत बिघाड आहे हे स्पष्ट झालं आहे, ज्यामुळे इतर गटांना या फुटाफुटीचा फायदा घेण्याची संधी मिळाली आहे.

    तालिबान सत्तेत आल्यानंतर अमीर मुल्ला हैबतुल्लाह अखुंदजादा यांनी संघटनेवरील आपले नियंत्रण अधिक दृढ करण्यासाठी आणि सरकारमधील सत्ता मजबूत करण्यासाठी सातत्याने हुकूम जारी केले आहेत. मात्र, तालिबान मंत्र्यांनी त्यांच्या धोरणांना विरोध दर्शविल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे संघटनेतील अंतर्गत मतभेद वाढले आहेत आणि त्याचा फायदा इतर गटांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हक्कानी यांच्या मृत्यूला तालिबानने अधिकृतपणे 'शहादत' म्हणून शोक व्यक्त केला असला, तरी हैबतुल्लाह शोकप्रार्थनेला अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. कंदाहारस्थित नेतृत्व आणि काबूलस्थित हक्कानी गट यांच्यातील अंतर्गत संघर्ष समजून घेण्यासाठी ही हत्या अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

    हक्कानी नेटवर्क

    सोव्हिएतविरोधी जिहादच्या काळात जलालुद्दीन हक्कानी यांनी स्थापन केलेले हक्कानी नेटवर्क हे तालिबानच्या लष्करी आणि राजकीय यंत्रणेचा एक महत्त्वाचा घटक मानले जाते. जलालुद्दीन हक्कानी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि 2021 मध्ये इस्लामिक अमिरातीचे गृहमंत्री बनले. मुख्यतः झादरान जमातीच्या सदस्यांनी बनलेले हे नेटवर्क, अफगाणिस्तानातील जिहाददरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि बंडखोरीच्या रणनीतींसाठी कुप्रसिद्ध आहे. बंडखोरांच्या डावपेचांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या नेटवर्कला 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले.

    तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यातील संबंध मुख्यतः व्यवहारप्रधान राहिले आहेत. निर्णयक्षमता तालिबानकडे असली तरी हक्कानींना मंत्रिमंडळात नेहमीच नाममात्र स्थान मिळाले आहे आणि त्यांनी आपल्या अजेंड्यानुसार स्वतंत्रपणे कार्य केले आहे. हक्कानी नेटवर्ककडे तालिबानपासून स्वतंत्र आर्थिक स्रोत उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांचे अस्तित्व आणि विस्तार तालिबानी पदानुक्रमाचा "स्वायत्त पण अविभाज्य" भाग मानले जाते.

    कतार, तुर्किये, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या देशांनीही खलील हक्कानी यांच्या हत्येचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझई यांनीही या हल्ल्याचा निषेध करत हक्कानी यांचा उल्लेख 'एका प्रमुख जिहादी कुटुंबातील सदस्य' असा केला आहे.

    हक्कानी नेटवर्कने सातत्याने असंतोष व्यक्त केला असून, सिराजुद्दीन हक्कानी अमीरच्या अधिकाराला आव्हान देत त्यांच्या धोरणांवर आणि कारभारावर उघडपणे टीका करत आहेत.

    हक्कानी यांच्या मृत्यूनंतर एआरजी पॅलेसमध्ये तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शोकप्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. सिराजुद्दीन हक्कानी यांनीही स्वतंत्रपणे शोकसभा आयोजित केली होती, ज्यामध्ये सुमारे दोन आठवड्यांच्या कालावधीत हजारो लोक विविध देशांतून सहभागी झाले. या शोकसभेदरम्यान, सिराजुद्दीन हक्कानी यांचे विविध देशांच्या अधिकाऱ्यांशी असलेले विस्तृत संबंध स्पष्ट झाले, तसेच त्यांची मुत्सद्दी पोहोच आणि प्रभावही अधोरेखित झाला.

    या हल्ल्यासाठी संभाव्य घुसखोरी किंवा अंतर्गत पाठिंब्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत, ज्याचा परिणाम तालिबानप्रणित प्रशासनातील वैचारिक फूट आणि सत्तासंघर्षातून होण्याची शक्यता आहे. हक्कानी नेटवर्कने सातत्याने असंतोष व्यक्त केला असून, सिराजुद्दीन हक्कानी अमीरच्या अधिकाराला आव्हान देत त्यांच्या धोरणांवर आणि कारभारावर उघडपणे टीका करत आहे. स्त्रियांचे शिक्षण, तसेच आग्नेय बालेकिल्ल्यांमध्ये काही आदेशांची सक्तीने अंमलबजावणी यासारख्या मुद्द्यांवर प्रशासनातील वरिष्ठ सदस्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. हा विरोध व्यक्तिगत सुधारणांपेक्षा अधिक, व्यावहारिक राजकारणाशी संबंधित आहे, कारण त्याद्वारे पाश्चिमात्य देशांचे समर्थन आकर्षित करण्याची संधी निर्माण होऊ शकते. अलीकडेच, हैबतुल्लाहने लष्करी उपकरणांचे वितरण आणि वापर थेट आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्याच्या अधीनस्थांमधील अविश्वास अधिकच वाढला आहे. या निर्णयामुळे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी, परराष्ट्र उपमंत्री ए. के. स्टानेकझाई आणि संरक्षणमंत्री मुल्ला याकूब यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्रिमंडळ सदस्य नाराज झाले आहेत.

    ISKP चा वाढता धोका

    खलील हक्कानी यांच्या मृत्यूनंतर आयएसकेपीने आपल्या टेलिग्राम चॅनेलद्वारे या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. अफगाणिस्तानातील हल्ल्यांच्या यादीत ही सर्वात महत्त्वाची भर पडली आहे. 2014 मध्ये स्थापन झालेल्या आयएसकेपीने सातत्याने तालिबान सरकारची वैधता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), अल-कायदा आणि तालिबानशी संलग्न गटांमधून पक्षांतर केलेल्या लढाऊंमधून हा गट निर्माण झाला आहे. आयएसकेपीचे उद्दीष्ट कठोर इस्लामी न्यायशास्त्राद्वारे शासित आंतरराष्ट्रीय खिलाफत स्थापन करण्याचे आहे. तालिबान आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात इस्लामी तत्त्वांपासून विचलित होत असल्याचा आरोप आयएसकेपीकडून वारंवार केला जात आहे. त्यामुळे तालिबान तडजोड करत असल्याचे चित्रण या कथानकात करण्यात आले आहे.

    अफगाणिस्तान आणि मध्य आशियात आयएसकेपीच्या वाढत्या प्रभावामुळे प्रादेशिक स्थैर्याला थेट धोका निर्माण झाला आहे. या संघटनेची महत्त्वाकांक्षा अफगाणिस्तानपुरती मर्यादित न राहता मध्य आणि दक्षिण आशियात आपला प्रभाव प्रस्थापित करण्याची आहे. प्रमुख व्यक्तींना लक्ष्य करून आणि हल्ले वाढवून आयएसकेपी स्वतःचा ऑपरेशनल प्रभाव वाढवत आहे. यासोबतच तालिबानला एक अकार्यक्षम नेतृत्व म्हणून दाखवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून आपल्या कथानकाला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काही तालिबानी लढाऊ गट सोडून आयएसकेपीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. तालिबानने वांशिक अल्पसंख्याकांबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आयएसकेपीच्या भरती मोहिमेला चालना मिळाली आहे. याशिवाय, अफगाणिस्तानच्या सच्छिद्र सीमा आणि तालिबानच्या मर्यादित प्रशासकीय क्षमतेमुळे आयएसकेपी भरती, प्रशिक्षण आणि हल्ले अधिक सुलभपणे करू शकतो. यामुळे गंभीर प्रादेशिक परिणाम संभवतात.

    प्रमुख व्यक्तींना लक्ष्य करून आयएसकेपी स्वतःचा ऑपरेशनल प्रभाव वाढवत आहे. यासोबतच, तालिबानला अकार्यक्षम नेतृत्व असल्याचे दाखवण्याच्या आपल्या कथनाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे.

    खलील हक्कानी यांच्या हत्येमुळे अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारमधील सदस्यांसमोरील सुरक्षेची वाढती आव्हानेच स्पष्ट होत नाहीत, तर तालिबानच्या अंतर्गत असंतोषामुळे त्यांची वाढती असुरक्षितता देखील समोर येते. याचा फायदा आयएसकेपीसारख्या संघटनांना होऊ शकतो. ही हत्या आयएसकेपीच्या धोरणात्मक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. त्यांनी तालिबानमधील विभाजनाचा फायदा घेत सत्तेवरील त्यांची कमकुवत पकड आणि शासन करण्यातील असमर्थता अधोरेखित केली आहे. याशिवाय, या घटनेमुळे संभाव्य अंतर्गत सहभागाचा इशारा मिळतो. मोठ्या प्रमाणात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सरकारी सुविधांमध्ये घडलेले सुरक्षेचे उल्लंघनही याची साक्ष देते.

    जसजसे हल्ले वाढत आहेत, तसतसे अफगाणिस्तान आणि त्यापलीकडे अस्थिरता आणि हिंसाचार रोखण्याचे आव्हान अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर, तालिबानचे नेतृत्व देशाच्या विकासात्मक धोरणांवर विभागलेले दिसत असल्याने, ते आपले वर्चस्व किती काळ टिकवून ठेवू शकतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हैबतुल्लाहची आपल्या अधीनस्थांवर असलेली मजबूत पकड आणि गटातील अधिकृत प्रतिमा लक्षात घेता, नजीकच्या भविष्यात त्यांच्या विरोधात अंतर्गत उठाव होण्याची शक्यता कमी वाटते.


    शिवम शेखावत ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामच्या ज्युनियर फेलो आहेत.

    पुस्पा कुमारी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममध्ये रिसर्च इंटर्न आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

    Authors

    Shivam Shekhawat

    Shivam Shekhawat

    Shivam Shekhawat is a Junior Fellow with ORF’s Strategic Studies Programme. Her research focuses primarily on India’s neighbourhood- particularly tracking the security, political and economic ...

    Read More +
    Puspa Kumari

    Puspa Kumari

    Puspa Kumari is a Research Intern at the Observer Research Foundation. ...

    Read More +