इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथग्रहण सोहळ्याला भारत आणि अनेक अरब राष्ट्रांच्या प्रतिनिधींसह अनेक प्रादेशिक नेत्यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यानंतर काही तास उलटले असतानाच, हमासच्या पॉलिटीकल ब्युरोचा प्रमुख इस्माइल हानियेह याची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली आहे. या हत्येची बातमी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) द्वारे घोषित करण्यात आल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला सुरू झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून हानियेह हा गाझामधील इस्रायल-हमास युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून प्रतिबंधित केलेल्या हमासने इस्रायली नागरिकांना कैदेत ठेवल्यामुळे इस्रायल आणि पॅलेस्टिनी गट यांच्यात मोठ्या प्रमाणावर संघर्ष उद्भवला होता. कतार व इजिप्त यांसारख्या प्रदेशातील राष्ट्रांनी तसेच अमेरिकेने ओलिस ठेवण्यात आलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी करार करण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या बांधणीमध्ये हानियेह हा हमासपर्यंत पोहोचण्याचा एक महत्त्वाचा दुवा होता. एका व्यापक चौकटीमध्ये 'ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स'चा एक भाग म्हणून हमासला इराणकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. अशा प्रकारचा पाठिंबा लेबनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हौथी (ज्यांना अन्सरल्लाह म्हणूनही ओळखले जाते) तसेच सीरिया आणि इराकमधील राजकीय अराजकतेसाठी कारणीभूत असलेल्या लहान गटांना देण्यात आला आहे.
हानियेहचा प्रभाव समजून घेताना
हानियेहच्या हत्येची वेळ आणि त्याच्या ठिकाणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपल्या भूमीवरील हितसंबंध असलेल्या व्यक्तींना संपवण्याच्या किंवा त्यांना रोखण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतींसाठी इराण सर्वज्ञात आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये, इराणमधील वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसेन फखरीजादेह यांची तेहरानच्या बाहेर एआय-सहाय्यित स्वयंचलित शस्त्र प्रणालीद्वारे हत्या करण्यात आली होती. २०१८ मध्ये इराणच्या आण्विक सुविधांवर करण्यात आलेल्या छाप्यामध्ये देशाचे आण्विक हेतू आणि डिझाईन्स उघड करणाऱ्या फाइल्स इस्रायलच्या हाती लागल्या होत्या. इस्माईल हनियाच्या हत्येवरून हे दिसून येते की एकमेकांचे शत्रू इराण आणि इस्रायल यांच्यात मांजर-उंदराचा खेळ खूप दिवसांपासून सुरू आहे.
हानियेहच्या हत्येची वेळ आणि त्याच्या ठिकाणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपल्या भूमीवरील हितसंबंध असलेल्या व्यक्तींना संपवण्याच्या किंवा त्यांना रोखण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतींसाठी इराण सर्वज्ञात आहे.
७ ऑक्टोबर आधी हानियेह याला लक्ष्य करण्यात आले होते. पुढे त्याची तीव्रता अधिकच वाढली. ओलिस ठेवण्यात आलेल्या नागरिकांसंबंधीच्या वाटाघाटींमधील त्याच्या स्थानामुळे हमासची बाजू मांडण्याची एक महत्त्वाची संधी हानियेहला मिळाली. हमासवर असलेल्या दहशतवादी गट या शिक्क्यापासून ते एक क्रांतीकारी गट अशी हमासची वाटचाल राहिली आहे. हानियेह हा गाझामधील संघर्षमय वातावरणापासून दूर असलेल्या दोहामधील चकाकणाऱ्या टॉवर्सच्या सापेक्ष सुरक्षिततेमध्ये राहत होता. जूनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले होते. तसेच, एप्रिलमध्ये उत्तर गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला होता.
पुढे काय?
हमासच्या नेतृत्वाचे पुढे काय आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे गाझामधील युद्धाचे पुढे काय होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच्याही पुढे जात, वाढत्या प्रादेशिक संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. हानियेहच्या हत्येला इराणकडून वेगळा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता नाही. सर्वप्रथम हमाससारख्या गटांच्या नेतृत्वाला डेमिगॉडसारख्या फिगरहेडची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यायला हवे. एखाद्या नेत्याला कथित लोकप्रियतेची एक विशिष्ट पातळी गाठता आली असली तरी पदानुक्रमाचा विचार करता, नेत्यांना त्यांच्या पदावरून काढले किंवा बदलले जाऊ शकते. यालाच अनुसरून, पुढील काळामध्ये खालेद मशालसारख्या हमास पॉलिटीकल ब्युरोच्या वरिष्ठ सदस्याला हानियेहच्या जागी नियुक्त केले जाईल. मशाल यांच्या पुढे जात, हमासमधील अनेक नेते गाझामध्ये सुरू असलेल्या विनाशावर तोडगा काढण्यासाठी आणि ओलिस ठेवण्यात आलेल्या नागरिकांबाबत वाटाघाटीं करण्यासाठी अनुकूल आहेत. याह्या सिनवारच्या नेतृत्वाखालील अल कासम ब्रिगेड्सकडे निर्णय घेण्याची शक्ती एकवटली आहे, हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. ७ ऑक्टोबरचा हल्ला आणि त्यानंतर ब्रिगेड्सने इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अंतर्गत तणावामुळे निर्णय घेणे अधिक कठीण झाले आहे. भुतकाळातील अनेक घटनांवरून हे स्पष्टही झाले आहे.
सर्व स्तरांमधील विविध संकटांच्या पार्श्वभुमीवर हमासला त्याच्या राजकीय भविष्याबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. संसदीय क्षमता प्राप्त करण्यासह हिजबुल्लाहने लेबनीज राजकारणात स्वतःला अंतर्भूत केले आहे, त्याचप्रमाणे २००६ मध्ये निवडणुका जिंकल्यानंतर हमासने समांतरपणे आपली मुळे लष्करी उपायांच्या बाजूने असल्याचे लक्षात घेऊन अधिक राजकीय भुमिका जोपासली आहे. या अंतर्गत बदलांचे संरक्षण करणे हे गटाच्या भविष्यासाठी देखील महत्त्वाचे असणार आहे. अतिरेकी कारवाया घडवून आणल्यास हमासचा अंत केवळ इस्रायलच्या हातूनच नव्हे, तर त्याच्या शेजारील अरब राष्ट्रांकडूनही होण्याचा संभव आहे.
तर इस्रायलच्या दृष्टीने विचार करता, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे सध्या गंभीर राजकीय परिस्थितीत अडकलेले असताना यांच्या लोकप्रियतेमध्ये या घटनेमुळे वाढ होण्याची शक्यता आहे. (हा लेख लिहीत असताना इस्रायलकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यात आलेले नाही). हमासशी करार करण्यास नेत्यन्याहू यांची असमर्थता इस्रायलच्या रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या निदर्शनामधून स्पष्ट झाली आहे. इस्रायली सरकारचा प्रमुख असणे आणि हमासला सवलती देणे अशा प्रकारचा वारसा मागे ठेवणे नेतन्याहू किंवा इतर कोणत्याही इस्रायली पंतप्रधानांना मान्य असणार नाही हे स्पष्ट आहे आणि नेतन्याहू यांच्यासाठी राजकीय वारसा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
निष्कर्ष
सरतेशेवटी प्रादेशिक संघर्षाचा प्रश्न दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. २०२० मध्ये कासेम सुलेमानी याच्या हत्येला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण विशिष्ट मुद्द्याच्या पलिकडे गेलेला नाही. त्यामुळे हानियेह याच्या बाबत इराण काही व्यापक कार्यवाही करेल याची शाश्वती देता येणार नाही. परंतु या वर्षाच्या सुरुवातीला सीरियातील डिप्लोमॅटिक (राजनैतिक) मिशनवर झालेल्या इस्त्रायली हल्ल्याला प्रतिउत्तर दिले जाण्याची दाट शक्यता आहे. हानियेहचा मृत्यू ही तेहरानसाठी या घडीची मोठी समस्या असू शकत नाही. परंतू तेहरानमध्ये हमासच्या नेत्याला मारण्यात आले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कबीर तनेजा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.