Expert Speak Health Express
Published on Apr 03, 2024 Updated 0 Hours ago

आरोग्यविषयक जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व क्षेत्रांमधील सहकार्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर आणि स्थानिक संदर्भांची सखोल जाण महत्त्वपूर्ण आहे.

सर्वसमावेशक आरोग्यासाठी उपाययोजना: रायसीना 2024 मधून शिकलेले धडे

परिचय: रायसीना डायलॉग 2024 – बदलाचा संगम

सामायिक तंत्रज्ञान, धोरणनिर्मिती आणि सर्वसमावेशक आरोग्य उपाययोजना साध्य करण्यासाठी तळागाळाच्या स्तरावर उपक्रम या घटकाची चर्चा करण्यासाठी ‘रायसीना डायलॉग २०२४’ने एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आरोग्य सुविधांची उपलब्धता, परवडणाऱ्या आरोग्य सेवा आणि उपचारांचा दर्जा या संबंधात असमानता असलेल्या जगात आरोग्य सुविधांमधील तफावत दूर करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये एकत्रित प्रयत्नांची गरज ‘रायसीना डायलॉग’ने अधोरेखित केली आहे.

कोव्हिड-१९ साथरोगामुळे जागतिक आरोग्य सुविधा यंत्रणेतील कच्चे दुवे प्रकाशात आले आहेत; तसेच सेवा क्षेत्रातील व्याप्ती, कार्यक्षमता आणि अचूकता यांमधील असमानता उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘रायसीना डायलॉग २०२४’ ने ‘आरोग्य क्षेत्राच्या भविष्याची दिशा : बदलत्या जगातील समानता व समावेशकता’ या शीर्षकाखाली एक चर्चासत्र आयोजिले होते. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी समाजाच्या वेगवेगळ्या गरजा भागविण्यासाठी आरोग्यासाठी सर्वसमावेशक उपायांची गरज केंद्रस्थानी ठेवून या आव्हानांवर विचारविनिमय केला. या कार्यक्रमातच ‘दि लँडमार्क हेल्थ इक्विटी अँड इन्क्लुजन इन ॲक्शन रिपोर्ट’ प्रकाशित करण्यात आला. या अहवालात आफ्रिका आणि दक्षिण व आग्नेय आशियाच्या संदर्भाने आरोग्य समानता व समावेशकतेतील वृद्धीसाठी कल्पक दृष्टिकोन मांडला आहे.

समान, सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशी लवचिक आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चेचे महत्त्व अधिक आहे.

या लेखात तज्ज्ञ गटाच्या चर्चेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले असून स्थानिक संदर्भाने ते समजावून घेण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा जबाबदार लाभ; तसेच आरोग्य सुविधांमधील प्रगती सर्वसमावेशक व सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असेल, याची खात्री करण्यासाठी सर्व स्तरावरील संयुक्त प्रयत्न या घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. समान, सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशा लवचिक आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चेचे महत्त्व अधिक आहे.

तज्ज्ञ गटाच्या चर्चेमधील काही ठळक विषय : आरोग्य सेवा सर्वसमावेशक, समाजाच्या सर्व स्तरातील विविध गरजांची पूर्तता करणाऱ्या आहेत, याची खात्री कशी करता येईल? सर्वसमावेशकतेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आरोग्य यंत्रणांनी स्थानिक संस्कृतीशी कसे जुळवून घेतले आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा जबाबदार अवलंब कसा करीत आहेत याची खात्री कशी करावी? आरोग्य समानता आणि समावेशकता उपक्रमांचा प्रभाव वाढवण्यासाठी सर्व स्तरांवरील एकत्रित प्रयत्न कितपत उपयुक्त ठरतील?

सर्वसमावेशक आरोग्य उपायांची गरज

सर्वसमावेशक आरोग्य उपाययोजना या समाजातील सर्व घटकांना विशेषतः उपेक्षित व वंचित समुदायांना सेवा देण्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. आरोग्य सेवा यंत्रणांमधील असुरक्षितता या घटकांवर कसा परिणाम करतात, हे कोव्हिड साथरोगाने उजेडात आणले आहे; तसेच त्यामुळे केवळ कल्पकच नव्हेत, तर विविध सांस्कृतिक संदर्भाने उपलब्ध व प्रतिसादात्मक उपाययोजनांची आवश्यकताही त्यातून समोर आली आहे. सर्वसमावेशकता ही एक नैतिक आवश्यकता आहे; परंतु सर्वसमावेशकतेमुळे समाजातील सर्व स्तरांना भरीव लाभ मिळू शकतात. कारण सर्वसमावेशक आरोग्य सेवा शाश्वत विकासाला गती देऊ शकतात आणि आर्थिक वृद्धीत जास्तीत जास्त वाढ करू शकतात.

समान आरोग्य सेवेसाठी तंत्रज्ञानाचा वापर

डिजिटल औषधे, लस तंत्रज्ञान आणि लक्ष्यकेंद्री उपचारपद्धतींमुळे आरोग्यसेवेतील असमानता दूर होण्यासाठी आशादायक मार्ग दिसू शकतो. मात्र, या तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करण्यासाठी आरोग्य उपाययोजनांचा ज्या ठिकाणी अवलंब केला आहे, तेथील स्थानिक संदर्भांचे सूक्ष्म आकलन असणेही गरजेचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि टेलिमेडिसीनच्या वापरासह आरोग्यसेवेच्या गुणवत्ता सुधारणेसाठी तंत्रज्ञानाची क्षमता या ‘डायलॉग’ने अधोरेखित केली. त्याचप्रमाणे सध्याच्या असमानतेत वाढ होऊ नये म्हणून जबाबदार वापराच्या महत्त्वपूर्णतेवर भर देण्यात आला.

असे असले, तरी सर्वसमावेशक आरोग्यसेवेसंबंधीच्या नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्यासाठी केवळ प्रयत्न पुरेसे नाहीत. नवकल्पना त्यांच्या उद्दिष्टांप्रत पोहोचल्या तरच सार्वजनिक आरोग्यसेवेत सुधारणा होऊ शकतात. कल्पकतेची गरज निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक आणि बहुआयामी धोरणांची आवश्यकता आहे, हे स्पष्ट आहे. ही धोरणे प्रभावी आणि सर्वसमावेशक असण्यासाठी प्रवाहाबाहेरील गटांवर लक्ष केंद्रित करून त्यांची विशिष्ट पुनर्रचना करायला हवी. तसे करताना प्रवाहाबाहेरील गटातील लोक ज्या वातावरणात वाढतात, जगतात आणि काम करतात ते विचारात घ्यायला हवे. त्यासाठी आरोग्यसेवा संस्थांमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज असून चुकीची माहिती पसरू नये यासाठी समूदाय व प्रसारमाध्यमांशी अर्थपूर्ण संवाद असायला हवा.

सर्व स्तरांवरील सहकार्याची ताकद

आरोग्यसेवांची समता आणि सर्वसमावेशक उपक्रमांचा प्रभाव वाढवण्यासाठी सरकार, सार्वजनिक आरोग्य संस्था, नवतंत्रज्ञानाचे निर्माते आणि जैवशास्त्रीय नवकल्पक यांच्यात सर्वस्तरीय एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. आपण पौष्टिक अन्नाचा पुरस्कार करीत असू, लिंगाधारित हिंसाचाराचा प्रश्न हाताळत असू किंवा असुरक्षित गटांमधील मानसिक आरोग्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करीत असू आरोग्य संवर्धनाच्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांमध्ये सर्वस्तरातील घटकांची सहकार्याची भूमिका हवी. अशा प्रकारच्या भागीदारींमुळे स्रोत, ज्ञान व कौशल्ये एकत्र आणणे सुलभ होते; तसेच अधिक सर्वसमावेशक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत उपाययोजना करणे शक्य होते. ‘रायसीना डायलॉग’मध्ये यशस्वी संयुक्त उपक्रमांची काही उदाहरणे सांगण्यात आली. या उदाहरणांत दक्षिण आफ्रिकेतील आरोग्यसेवेतील सर्व कामांचे योग्य प्रमाणात वाटप करणे, प्रगतिशील सरकारी धोरणांचे महत्त्व आणि लांबच्या व दुर्गम भागांतील समाजापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी भारतात मोबाइल तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर यांचा समावेश होतो.

जागतिक व स्थानिक संदर्भांची जाण

आरोग्यसेवाविषयक उपाययोजनांचा ज्या भागात अवलंब करायचा आहे, त्या भागातील स्थानिक संस्कृती व संदर्भांशी त्या निगडीत असतील, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनामुळे आरोग्य सेवा परिणामकारक होतीलच, शिवाय त्या शाश्वत असतील आणि ज्या समुदायांसाठी अवलंबण्याचे उद्दिष्ट असेल, त्या समुदायाकडून स्वीकारल्याही जातील. स्थानिक गरजा व प्राधान्यक्रमाची जाण आणि एकत्रीकरणामुळे आरोग्यसेवेची समान उपलब्धता निर्माण होईल, याचे एक प्रारूप थायलंडमधील वैश्विक आरोग्य सेवा (यूएचसी)वरील चर्चेने दाखवले आहे.

भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या व वैविध्यपूर्ण व्यावसायिक पार्श्वभूमीतून आलेल्या तज्ज्ञांच्या गटांतील सदस्यांनी व्यक्त केलेल्या विचारांमुळे या आव्हानांवर मात करण्यासाठी एक बहुआयामी दृष्टिकोन मिळाला.

 आरोग्यसेवाविषयक असमानतेवर मात

आरोग्यसेवाविषयक असमानता दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीपलीकडे जाणाऱ्या कल्पक धोरणांची गरज आहे. आरोग्यसेवाविषयक समान उपलब्धतेसाठी, डिजिटल उपलब्धतेमधील रुंदावलेली दरी कमी करण्यासाठी आणि सेवांचा लाभ मिळत नसलेल्या समुदायांच्या सामाजिक-आर्थिक वास्तवासंबंधात संवेदनशील असलेल्या धोरणांवर व उपाययोजनांच्या गरजेवर या चर्चेत अधिक भर देण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या व वैविध्यपूर्ण व्यावसायिक पार्श्वभूमीतून आलेल्या तज्ज्ञांच्या गटांतील सदस्यांनी व्यक्त केलेल्या विचारांमुळे या आव्हानांवर मात करण्यासाठी एक बहुआयामी दृष्टिकोन मिळाला.

निष्कर्ष : कृतीसाठी आवाहन : भविष्यासाठी लवचिक, सर्वसमावेशक आरोग्य यंत्रणेची उभारणी

कोव्हिड साथरोगोत्तर काळातील जगात सर्वसमावेशक आरोग्य उपाययोजनांची गरज असल्याचा मुद्दा ‘रायसीना डायलॉग २०२४’ ने अधोरेखित केला आहे. जागतिक आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये एकत्रित प्रयत्न, तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर आणि स्थानिक संदर्भांची सखोल जाण हे घटक महत्त्वाचे आहेत, हे या चर्चेने स्पष्ट झाले आहे. एकविसाव्या शतकातील जगाने आरोग्यसेवेतील गुंतागुंत दूर करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘रायसीना डायलॉग’मध्ये व्यक्त झालेले विचार समान, सर्वसमावेशक आणि भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम आरोग्य उपाययोजना विकसित करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करू शकतात.


नित्या मोहन खेमका या ‘पाथ’च्या ‘यूके अँड ग्लोबल अलायन्स’च्या संचालक आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.