Expert Speak Health Express
Published on Aug 13, 2024 Updated 0 Hours ago

झूनॉटिक आजारांचा सामना करण्यासाठी आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंध, संयुक्त कार्य आणि कल्पकता यांवर भर देणारा समग्र ‘वन हेल्थ’ दृष्टिकोन अत्यंत गरजेचा आहे.  

आरोग्य सुरक्षेत हवा ‘वन हेल्थ’ दृष्टिकोन

प्राणघातक निपाह विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे भारताला अतिदक्षतेचा इशारा मिळाला आहे; तसेच आरोग्य सुरक्षेची स्थिती पर्यावरणीय दृष्टिकोनातून समजावून घेण्याची तातडीची गरज असल्याची सूचनाही मिळाली आहे. ‘वन हेल्थ’ धोरण ‘मानवाच्या, प्राण्यांच्या व पर्यावरणाच्या आरोग्याचा शाश्वत समतोल राखण्यासाठी आणि ते इष्टतम अवस्थेला नेण्यासाठी एकात्मिक, एकत्रित दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. ते मानवाचे, पाळीव व वन्य प्राण्यांचे, वनस्पतींचे आणि व्यापक पर्यावरणाचे (परिसंस्थेसह) आरोग्य एकमेकांशी जोडलेले व एकमेकांवर अवलंबून असते, हे स्पष्ट करते.’ मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्यातील परस्परावलंबन व परस्परसंबंध यावर मुख्य भर देऊन आरोग्य सुरक्षेला बहुशाखीय आयाम देणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. धोरणकर्ते व संघटनांकडून ‘वन हेल्थ’चा पुरस्कार केला जात असला, तरी वास्तवात तात्विक मीमांसा आणि अंमलबजावणी या दोहोंत अंतर आहे.

‘वन हेल्थ’ धोरण

कोव्हिड-१९ साथीच्या आजाराच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, की जागतिक आरोग्य स्तरावर सुरक्षित वावर (सोशल डिस्टन्सिंग) व मास्कचा वापर करण्याच्या स्वरूपात विषाणू प्रतिबंधक धोरणांना प्राधान्य दिले आहे आणि लस व विषाणूप्रतिबंधक औषधांच्या उत्पादनासाठी स्रोतांचे वाटप वाढवले आहे. या उपाययोजना लाभदायक असल्या, तरी मानव-प्राणी-पर्यावरण यांच्या मिलाफ बिंदूच्या केंद्रस्थानी असलेल्या साथीच्या रोगाचे कारक घटक निश्चित करण्यात प्रतिबंधात्मक धोरणे व उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत. उदहरणार्थ, धोक्याची सूचना लवकर दिली गेली असती तर आणि बहुशाखीय घटकांनी सहकार्याने काम केले असते, तर सार्स-सीओव्ही २ उद्भवण्याच्या स्थितीबद्दल स्पष्टता आली असती आणि कोव्हिड-१९ च्या उत्पत्तीबाबत विश्लेषणात्मक अंदाज बांधता आला असता. त्यानुसार, भविष्यातील संभाव्य झूनॉटिक (प्राण्यांपासून माणसाला होणारे आजार) आजारांचा फैलाव रोखायला हवा आणि आजारांचे प्रमाण मर्यादित राखायला हवे. त्यासाठी आरोग्य सुरक्षा कार्यक्रमाने, आजारास कारक ठरणाऱ्या विषाणूंना प्रजातींचा अडथळा ओलांडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित करून ‘वन हेल्थ’ धोरणाची अंमलबजावणी करायला हवी. हे ‘साथरोग निधी’च्या (पँडेमिक फंड) माध्यमातून साध्य होऊ शकते. साथरोगाशी सामना करण्यास सज्ज राहण्यासाठी देशाची प्राणी आरोग्य सुरक्षा मजबूत करून ‘वन हेल्थ’ दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया या साथरोग निधीमुळे साध्य होऊ शकते. यामुळे वेगवेगळ्या प्रजातींच्या संक्रमणाच्या धोक्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या उपायांची जाण व अंमलबजावणी करणे शक्य होईल. अशा प्रकारे पुढील काळात येणाऱ्या संभाव्य साथरोगांशी सामना करण्यास सज्जतेकडे जाणारे हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.   

कोव्हिड-१९ साथीच्या आजाराच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे, की जागतिक आरोग्य स्तरावर सुरक्षित वावर (सोशल डिस्टन्सिंग) व मास्कचा वापर करण्याच्या स्वरूपात विषाणू प्रतिबंधक धोरणांना प्राधान्य दिले आहे आणि लस व विषाणूप्रतिबंधक औषधांच्या उत्पादनासाठी स्रोतांचे वाटप वाढवले आहे.

निपाहचा मागोवा

निपाह विषाणूचा सध्या केरळमध्ये झालेला उद्रेक हे जागतिक स्थितीच्या परिणामांमुळे निर्माण झालेल्या विनाशकारी झूनॉटिक रोगप्रसाराचे उत्तम उदाहरण आहे. यामुळे आरोग्य सुरक्षेसाठी ‘वन हेल्थ’ दृष्टिकोनाची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. निपाह विषाणू हा तीव्र रोगकारक झूनॉटिक विषाणू असून तो साथरोगाची क्षमता असलेला जागतिक धोका आहे, असा इशारा ‘डब्ल्यूएचओ’ने दिला आहे. हा विषाणू मानवासाठी प्राणघातक असून सध्या त्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. या विषाणूचा उद्रेक प्रथम १९९८ मध्ये मलेशियामध्ये नोंदवण्यात आला. त्यानंतर दक्षिण व आग्नेय आशिया हे प्रदेश निपाहसाठी उद्रेकप्रवण क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले. सन २००१ नंतर भारतामध्ये सहापेक्षाही अधिक वेळा निपाहचा उद्रेक झाला. त्यांतील बहुतांश उद्रेक केरळमध्ये नोंदवण्यात आले. सामान्यतः निपाह विषाणूच्या नैसर्गिक स्रावाच्या थेट संपर्कातून फ्रूट बॅट (जीनस टेरोपॉस) सेवनातून किंवा विषाणूजन्य फळांपासून बनलेल्या उत्पादनांमुळे अथवा मानव ते मानव असा संपर्क आल्यास मानवाला या विषाणूचा संसर्ग होतो. मलेशिया व सिंगापूरमध्ये नोंदवण्यात आलेल्या रुग्णांच्या विश्लेषणातून निपाह विषाणूचा संसर्ग डुकरांमधून झाल्याचे लक्षात आले.  

या विषाणूचा उद्रेक प्रथम १९९८ मध्ये मलेशियामध्ये नोंदवण्यात आला. त्यानंतर दक्षिण व आग्नेय आशिया हे प्रदेश निपाहसाठी उद्रेकप्रवण क्षेत्र असल्याचे स्पष्ट झाले.

डब्ल्यूएचओकडून मिळालेली तांत्रिक माहिती आणि निधी यांमुळे केरळला सोशल डिस्टन्सिंग, मास्कची सक्ती, प्रतिबंधक धोरणे आणि संचारबंदी यांसारख्या कठोर उपाययोजना करून निपाहशी सामना करणे शक्य झाले आहे. या उपाययोजना मानव ते मानव संभाव्य संक्रमण रोखण्यास सक्षम आहेत आणि विषाणूचा फैलाव झाला, तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठीही उपयुक्त आहेत. याशिवाय निपाह विषाणू आणि बहुसंख्य झूनॉटिक रोगांसाठी असलेल्या वैद्यकीय उपचारांना मर्यादा आहे. कारण हे उपचार आणीबाणीच्या परिस्थितीत अवलंबण्यापुरतेच मर्यादित आहेत किंवा काही उपचारांचा सर्वसामान्यपणे अवलंब करण्याची परवानगी नाही. लस व उपचारांचा अभाव, कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निपाहची साथरोगाची क्षमता यांचे भान ठेवून उद्रेक होण्याआधीच बचावात्मक धोरणे आखणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वसमावेशक धोरण

संभाव्य उद्रेकांविषयी माहिती देण्याची क्षमता असलेल्या आदर्श दक्षता यंत्रणेमध्ये निपाह विषाणूवर त्याच्या परिसंस्थेमध्ये लक्ष ठेवणे व माग घेणे, फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या संभाव्य माध्यमाची पारख आणि एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीत संक्रमण (व्हायरल स्पिलओव्हर) होण्यास कारण असलेल्या घटकांचा शोध घेणे यांचा समावेश आहे. एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीत संक्रमण होणे किंवा प्राण्यांमधून मानवात संक्रमण होणे (व्हायरल पॅथोजेन) हे रोगाच्या फैलावाचे प्रमुख कारण आहे; परंतु कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा शोध घेणाऱ्या धोरणांचा समावेश आरोग्य सुरक्षा आराखड्यामध्ये क्वचितच केला जातो.      

एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीत संक्रमण होणे किंवा प्राण्यांमधून मानवात संक्रमण होणे (व्हायरल पॅथोजेन) हे रोगाच्या फैलावाचे प्रमुख कारण आहे; परंतु कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा शोध घेणाऱ्या धोरणांचा समावेश आरोग्य सुरक्षा आराखड्यामध्ये क्वचितच केला जातो.

निपाह विषाणूच्या बाबतीत केलेल्या अभ्यासांनुसार, असे दिसून आले, की मानववंशजन्य घडामोडी वटवाघळांच्या परिसंस्थेत बदल घडवून आणतात आणि एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत जाण्याचे प्रकार वाढू लागतात. मानवाकडून होणाऱ्या या घडामोडींमध्ये जंगलतोड, वटवाघळांच्या अधिवासाजवळ दाट लोकवस्ती आणि शहरीकरण यांचा समावेश होतो. अशा घटना वटवाघळांच्या परिसंस्थेत बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात. याचा परिणाम म्हणजे, वटवाघळांचे अधिवास आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होतो आणि व्हायरल शेडिंग (प्रजननाशी संबंधित घटना) सवयींमध्येही बदल होतो. उदाहरणार्थ, जमिनीचा ऱ्हास झाल्याने व जंगलतोडीमुळे मानवाची वसतीस्थाने वाढली. त्यामुळे वटवाघळांचा मानवाशी सातत्याने संपर्क येऊ लागला. दुसरी गोष्ट म्हणजे, या घटनांच्या ताणामुळे व्हायरल शेडिंग प्रक्रियेवर परिणाम झाला आणि मानवबहुल क्षेत्रांमध्ये शेडिंगचे (अशा प्रकारे संसर्गाची शक्यता) प्रमाण खूप वाढले असावे. याच संदर्भाने बोलायचे, तर एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीमध्ये जाण्याच्या घटनांना मानवासंबंधाचे किंवा काही अन्य उत्क्रांतीसंबंधीचे घटकही कारणीभूत ठरू शकतात. ‘वन हेल्थ’ कार्यक्रमामध्ये रिमोट सेन्सिंग, भौगोलिक माहिती पद्धती (GIS) आणि कृत्रिम प्रज्ञा (AI) साधनांचा वापर करून वटवाघळांची संख्या अधिवासाच्या प्राधान्यांच्या निरीक्षणाचा समावेश आहे. हे निष्कर्ष एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमण होण्याच्या प्रकारांचे उत्तम विश्लेषण करू शकतात. या घटकांचा शोध घेतल्याने वर्तनात्मक कृती करता येऊ शकतात. उदाहरणार्थ, एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमणाची शक्यता टाळण्यासाठी परिसंस्थांमध्ये बदल करणे, विशिष्ट ऋतूंमध्ये वटवाघळांशी संपर्क येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलणे आणि पर्यायी शेती पद्धती अंगीकारणे अशा गोष्टींमुळे संभाव्य उद्रेकांपासून बचाव करता येऊ शकतो.

सध्याचा ‘वन हेल्थ’ कार्यक्रम

संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना (FAO), संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम (UNEP), जागतिक आरोग्य संघटना (WOH), प्राण्यांच्या आरोग्यावरील जागतिक आरोग्य संघटना (WOAH) या चार संघटनांच्या धोरणात्मक सहकार्याने ‘वन हेल्थ’ कार्यक्रमाची आगेकूच सुरू असून ‘वन हेल्थ संयुक्त कृती योजना’ सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील नव्या आव्हानांना तोंड देण्याची यंत्रणा तयार करण्यास चालना देते. त्याचप्रमाणे, अमेरिका आणि ब्रिटन यांनी अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राबाबतीत (CDC) ‘वन हेल्थ’ दृष्टिकोन ठेवला आहे. या अंतर्गत जागतिक भागीदारांना दक्ष राहण्यासाठी एकत्रितरीत्या मदत करण्याच्या माध्यमातून जागतिक आरोग्य सुरक्षा कार्यक्रम पुढे नेण्यात येईल; तसेच ब्रिटनच्या ‘वन हेल्थ’ कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी प्रतिजैविकांना प्रतिकार (अँटिमायक्रोबिअल रेझिस्टन्स) आणि त्याचा अन्न, मानव, प्राणी आणि पर्यावरणातील फैलाव हा विषय आहे. चीन आणि ब्राझील या शेजारी देशांनी आपला ‘वन हेल्थ’ कार्यक्रम अनुक्रमे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याकडे आणि कीटकांमुळे होणाऱ्या आजारांविषयी दक्षता बाळगण्याकडे वळवला आहे. भारताच्या राष्ट्रीय ‘वन हेल्थ’ अभियानांतर्गत अलीकडेच कार्यकारी समितीची बैठक बोलावली होती आणि या बैठकीत ‘एकात्मिक रोग नियंत्रणा’वर भर दिला होता, तर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांतर्गत ‘वन हेल्थ सेंटर’ने झूनॉटिक रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व भागीदारांना सक्रीयपणे एकत्र आणले होते.

पुढील दिशा

नव्या झूनॉटिक संसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी मानव-प्राणी-परिसंस्था बदलांचा विचार करणारा एक समग्र दृष्टिकोन गरजेचा आहे. प्रतिबंधात्मक धोरणांचा अवलंब करणे, हे रोगाला आळा घालण्याचे आपल्या हाती असलेले एक मोठे हत्यार आहे; परंतु विषाणूंच्या फैलावासाठी कारणीभूत ठरणारे घटक निर्धारित करण्यासाठी आरोग्य सुरक्षा कार्यक्रमात वन हेल्थ दृष्टिकोनाचा अंतर्भाव असायला हवा. वर उल्लेखिलेल्या चार आंतरराष्ट्रीय संस्था, भौगोलिक शेजारी देश आणि राष्ट्रीय योजना यांमुळे नव्या साथरोगांशी मुकाबला करण्यास बळ मिळेल. वास्तव माहिती व स्रोतांची देवाणघेवाण आणि देखरेख व नियंत्रणासाठी कल्पक तंत्रज्ञानाचा विकास महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आरोग्य सुरक्षेसाठी व्यावहारिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा दृष्टिकोनात सार्वजनिक आरोग्यावरील संकटाशी सामना करण्यासाठी सक्रीयपणे काम करणारी यंत्रणा अस्तित्वात असेलच, शिवाय संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी व्यापक प्रयत्नांना प्राधान्य देण्याची आवश्यकताही असेल. भविष्यकाळातील आरोग्यविषयक संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘वन हेल्थ’ कार्यक्रमाचे एकात्मिकरण करण्यासाठी आघाडीवर राहण्याची भारतासाठी ही एक संधी आहे, हे निश्चित.


लक्ष्मी रामकृष्णन या ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनच्या असोसिएट फेलो आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.