Author : Abhijit Singh

Published on Jan 12, 2024 Updated 0 Hours ago

 भारत आणि हिंदी महासागरातील इतर देशांनी एकत्र येऊन या क्षेत्रातली आपली ताकद वाढवणे हाच एकमेव वास्तववादी पर्याय आहे. 

व्यापारी जहाजांवर हौथींचे ड्रोन हल्ले

अरबी समुद्रात एमव्ही केम प्लूटो या लाइबेरियन ध्वज असलेल्या रासायनिक टँकरवर 23 डिसेंबर रोजी ड्रोन हल्ला झाल्याचा संशय आहे. यानंतर एकाच दिवसात येमेनमधल्या हौथी अतिरेक्यांनी गॅबॉन ध्वज असलेल्या क्रूड ऑइल टँकरवरही हल्ला केला, असे म्हटले जाते. साई बाबा, केम प्लुटो हे टँकर भारताच्या दिशेने जात असताना सशस्त्र ड्रोनने त्यांना धडक दिली. अलीकडच्या काळात व्यावसायिक जहाजांवर हौथी अतिरेक्यांनी केलेला हा 15 वा हल्ला आहे. 

या दुहेरी हल्ल्यांमुळे हिंदी महासागराच्या क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. हिंदी महासागरातील सागरी दले ही समुद्री चाचांशी लढण्यात पारंगत असली तरी नागरी जहाजावरील ड्रोन हल्ल्यांना सामोरे जाण्याचा त्यांना फारसा अनुभव नाही. या ड्रोन हल्ल्यांमध्ये हौथी अतिरेक्यांनी वापरलेले डावपेच बऱ्याच जणांसाठी नवे आहेत. त्यातच या हल्ल्यांची जबाबदारी न घेणे हा मुद्दाही चिंताजनक आहे. केम प्लुटोवरील हल्ल्याची जबाबदारी हौथी किंवा इतर कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. हा हल्ला भारताजवळील जलक्षेत्रात झालेला असल्याने चिंता वाढली आहे. 

केम प्लुटोवरील हल्ल्याची जबाबदारी हौथी किंवा इतर कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. हा हल्ला भारताजवळील जलक्षेत्रात झालेला असल्याने चिंता वाढली आहे. 

भारतीय नौदल नेहमीच अशा ड्रोन हल्ल्यांवर नजर ठेवून असते. हे हल्ले नेमके कुठून होतात यावरही त्यांचे लक्ष असते. केम प्लूटोमधून जप्त केलेल्या ढिगाऱ्याच्या प्राथमिक तपासणीत इराणी शाहेद 136 लॉइटिंग दारूगोळा वापरल्याचे संकेत मिळाले आहेत. शाहेद 136 हा रशियन गेरान-2 एक्सपेंडेबल ड्रोनचाच एक प्रकार आहे. त्याची रेंज 2,500 किमी आणि 50 किलो वॉरहेड इतकी आहे. 2020 मध्ये येमेनी गृहयुद्धात हौथींनी या ड्रोनचा वापर केल्याचा संशय आहे. केम प्लूटोवरील हल्ला इराणमधून झाला असावा असे म्हणणाऱ्या अमेरिकेला मात्र तपासणीमधले निष्कर्ष पटतीलच असे नाही. इराण नियमितपणे त्याच्या किनारपट्टीपासून शेकडो मैल दूर असलेल्या व्यावसायिक जहाजांवर हल्ले करतो आहे, असा अमेरिकेचा दावा आहे. पण याला इतर तज्ज्ञांचा दुजोरा नाही.  इराणला अनुकूल देश असलेल्या भारताजवळील केम प्लुटोच्या पाण्यावर हल्ला करून इराण काही साध्य करण्याची शक्यता नाही, असे अनेक भारतीय निरीक्षकांना वाटते. 

म्हणूनच या हल्ल्याचा स्रोत शोधताना भारताचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व अतिशय सावध राहिले. अलीकडेच INS इंफाळ ही भारताची नवीनतम मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक नौका कार्यान्वित करण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संभाव्य गुन्हेगारांचे नाव न घेता हल्लेखोरांना शोधण्याचा सरकारचा संकल्प अधोरेखित केला. आम्ही त्यांना समुद्राच्या तळातून शोधून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असे राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले.

संरक्षण मंत्र्यांच्या या विधानाने भारतीय जहाजांना थोडासा आत्मविश्वास मिळू शकतो परंतु यामुळे समुद्रात ड्रोनचा सामना करण्याच्या अडचणी मात्र कमी होत नाहीत. यातली मुख्य गुंतागुंत म्हणजे रणनीतीच्या दृष्टीने प्रतिकार करण्याची अपुरी क्षमता. हवाई ड्रोन हल्ल्यांपासून बचावासाठी जॅमिंग आणि स्पूफिंग हे एकमेव तंत्रज्ञान आहे. पण व्यापारी जहाजे या तंत्रज्ञानाचा वापर करू शकत नाहीत. अनेक अँटी-ड्रोन तंत्रे विशिष्ट हवामान परिस्थितीत चांगले काम करू शकत नाहीत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. जॅमिंग तंत्रज्ञानात विशेष समस्या आहेत कारण त्यात मैत्रीपूर्ण संप्रेषण प्रणालींमध्ये हस्तक्षेप करण्याची क्षमता आहे. ड्रोन कंट्रोल सिस्टीमला गोंधळात टाकण्यासाठी स्पूफिंग तंत्रज्ञान उपयुक्त आहे पण तेदेखील काहीवेळा चुकीच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते.  लेसर प्रणाली आणि उच्च-शक्तीची मायक्रोवेव्ह शस्त्रे यासारखी ऊर्जा शस्त्रे सशस्त्र ड्रोनचा सामना करण्यासाठी अधिक प्रभावी आहेत. परंतु हे तंत्रज्ञान महाग आहे आणि अनेक प्रादेशिक नौदले ते मिळवू शकत नाहीत. 

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सागरी दलामध्ये सामील होणे हा भारत आणि इतर देशांसाठी एकमात्र व्यवहार्य पर्याय आहे, असे काहीजणांचे मत आहे. भारत अलीकडेच संयुक्त सागरी दलांचा सदस्य झाला आहे आणि भारताच्या नौदलाने पश्चिम हिंदी महासागरात या संयुक्त नौदलांसोबत सरावही केला आहे. हे संयुक्त सागरी दल चालवणाऱ्या पाच कृतीदलांपैकी संयुक्त कृती दल 153 हे लाल समुद्रातील सुरक्षेचे प्रभारी आहे. हे दल समृद्धी संरक्षक मोहिमेचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. भारताचे नौदल हे या संयुक्त दलांना स्वतंत्र गस्तीवर असलेल्या युद्धनौकांसह एक सुरक्षित ट्रान्झिट कॉरिडॉर तयार करण्यात मदत करू शकते आणि आतील पाण्याचे निर्जंतुकीकरणही करू शकते. या प्रयत्नाचे यश दक्षिणी लाल समुद्रापासून एडनच्या आखातापर्यंत आणि पलीकडे पसरलेले सुरक्षित क्षेत्र तयार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल.

हौथी अतिरेकी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या जटिल भौगोलिक राजकारणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. हेच अतिरेकी आता जागतिक शक्तींमधील मतभेदांचा फायदा घेऊन हिंदी महासागरातील अरबी समुद्रासारख्या असुरक्षित भागात आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे. हौथी अतिरेक्यांचे हल्ले इस्रायलशी संबंधित व्यावसायिक जहाजांपुरते मर्यादित नाहीत हेही आता समोर आले आहे. लाल समुद्रात अतिरेक्यांनी लक्ष्य केलेल्या एमव्ही साईबाबा टँकरचा इस्रायलशी उघडपणे काहीच संबंध नव्हता.

या अतिरेकी हल्ल्यांमुळे जागतिक व्यापार अडचणीत आला आहे. त्यामुळे हौथींच्या धोक्याला वेळीच आवर घालण्याची गरज आहे हे जागतिक शक्ती ओळखून आहेत.  हॅपग-लॉयड, मार्स्क, सीएमए सीएमजी आणि एमएससी यासह टॉप जागतिक शिपिंग कंपन्यांपैकी दहा कंपन्यांनी लाल समुद्रातील त्यांच्या सेवा निलंबित केल्या आहेत, त्याचप्राणे आणखीही काही कंपन्यांनी त्यांचे अनुकरण करण्याचे ठरवले आहे. प्रादेशिक जहाज व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी नौदलांची युती बनवून जागतिक जहाजांना आश्वस्त करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न अद्याप योग्यरित्या पूर्ण झालेला नाही. समृद्धी संरक्षक या मोहिमेला सुरुवातीला 20 हून अधिक देशांनी पाठिंबा दिला. पण फ्रान्स, इटली आणि स्पेनने यातून माघार घेतल्याने या युतीला मोठा धक्का बसला आहे.

प्रमुख सागरी शक्तींमध्ये राजकीय मतभेद असले तरी एका मुद्द्यावर एकमत आहे ते म्हणजे हौथी धोक्याचा सामना करण्यासाठी देशांची सामूहिक तयारी करणे. समुद्रात ड्रोनविरोधी युद्धाची रणनीती अजूनही विकसित होत आहे आणि ड्रोनला लक्ष्य करण्याच्या काही पद्धती वाटतात तितक्या प्रभावी नाहीत, असे नौदल तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात लाल समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौकांनी 14 सशस्त्र ड्रोन पाडल्याचा दावा केला होता. यासाठी कोणती शस्त्रे वापरली गेली हे कळू शकले नाही परंतु क्षेपणास्त्रांच्या संयोजनात लांब पल्ल्याच्या तोफा वापरण्यात आल्या असण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरातील नौदलांकडे हौथींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक समन्वय आणि आंतरकार्यक्षमता नाही हे इथले देश जाणून आहेत.

प्रमुख सागरी शक्तींमध्ये राजकीय मतभेद असले तरी एका मुद्द्यावर एकमत आहे ते म्हणजे हौथी धोक्याचा सामना करण्यासाठी देशांची सामूहिक तयारी करणे.

आणि तरीही पश्चिम हिंदी महासागर हे ड्रोनच्या धोक्यावरचे संभाव्य उत्तर आहे. सुधारित परिस्थितीजन्य जागरूकता आणि उत्तम साधनांसह हे सागरी सैन्य हौथी अतिरेक्यांच्या ड्रोनचा सामना करू शकते. हौथी अतिरेक्यांचा सामना करायचा असेल तर प्रादेशिक नौदलाने त्यांच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडणे आणि त्यांच्या रणनीतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. य़ा क्षेत्रात भारत आणि इतर हिंद महासागरातील देशांनी अधिक सक्षम आणि इच्छुक भागीदारांसोबत काम केले तरच जागतिक व्यापार सुरक्षित होऊ शकेल. 

 

अभिजीत सिंग हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.