Author : Jainaba Sowe

Expert Speak Raisina Debates
Published on Mar 15, 2024 Updated 0 Hours ago

तरुणांच्या क्षमतेचा योग्य वापर करून घेऊन आपण त्यांच्यासाठी, देशासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक समृद्ध निरोगी आणि सशक्त भविष्य घडवू शकतो. 

हरित संक्रमणाला गती देण्यासाठी तरुणांचा सहभाग

हा लेख ‘रायसीना एडिट २०२४’ या मालिकेचा भाग आहे. 


अलिकडच्या काळात वाढत्या जागतिक हवामान संकटाने अनेक देशांना पर्यावरणास अनुकूल बदल करण्यास प्रवृत्त केले आहे. मात्र शाश्वततेकडे वळण्यासाठी तरुणांसह सर्वांचाच सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हवामान बदलाचे परिणाम भोगत असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील गाम्बियासारख्या लहान देशासाठी तर हे फारच आवश्यक आहे. यासाठी देशातील 2 कोटी 8 लाख एवढ्य़ा तरुण नागरिकांची क्षमता योग्य प्रकारे वापरून घेऊन देशाला हरित भविष्याकडे नेणे गरजेचे आहे. महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टे आणि आर्थिक विकास यांच्यात सामंजस्याने संतुलन शोधणे हे गाम्बियासमोरचे मोठे आव्हान आहे. या लेखामध्ये गाम्बियातील शाश्वत विकासामध्ये तरुणांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व मांडले आहे. त्यांच्यासमोर असलेली आव्हाने आणि देशासाठी अधिक पर्यावरण-सजग दृष्टी निर्माण करण्याच्या हेतूने तरुणांचा सर्वसमावेशक सहभाग कसा मिळवता येईल याचा उहापोह या लेखात केला आहे. 

हिरवाईवर भर का?

सध्याच्या काळात आपण जीवाश्म आणि पर्यायी अशा दोन्ही नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर करत आहोत. यामुळे हवामान आणि पर्यावरणाचे संकट आणखी वाढले आहे. म्हणूनच हरित संक्रमण आवश्यक आहे. आपल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याच्या पद्धतीमध्ये व्यापक बदल करणे ही काळाची गरज आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आणि संसाधनांचा वापर मर्यादित करणे आणि त्याच वेळी अर्थव्यवस्थेची चाके फिरवणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. जीवाश्म इंधनांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून या संकटाचे संधीत रूपांतर करता येऊ शकते. यामुळे पर्यावरणाच्या संकटाचे आव्हानही कमी होईल आणि त्याचवेळी नव्या संधी निर्माण  निर्माण होतील. हरित संक्रमणामुळे नवीन वाढीला गती मिळते आणि व्यवसाय व शाश्वत अर्थव्यवस्थेचा पाया घातला जातो. उत्पादने आणि सेवांची अधिक व्यापक श्रेणी उपलब्ध करून, ग्राहकांवरचे उत्सर्जनाचे दडपण कमी करण्याच्या चांगल्या संधी निर्माण करता येतील.

आपल्या देशाची लोकसंख्या आणि संसाधनांचा वापर मर्यादित करणे आणि त्याच वेळी अर्थव्यवस्थेची चाके फिरवणे हे महत्त्वाचे आव्हान आहे.

हरित संक्रमणामध्ये तरुणांना सहभागी करून घेणे महत्त्वाचे आहे. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे हरित संक्रमण परिषदांमध्ये तरुणांना सामावून घेणे. संघर्षांतून मार्ग काढणे आणि संभाव्य खर्च आणि फायद्यांसह विविध पर्यायांवर चर्चा करणे हाही एक मार्ग असू शकतो. ज्या क्षेत्रात पर्यावरणपूरक भविष्य घडवण्याची क्षमता आहे ती क्षेत्रे अजून व्यापक झालेली नाहीत. यासाठीच सेंद्रिय शेती आणि उपजिविका मिळवून देणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न किंवा संगणकीकरण श्रमिक बाजारपेठेला आकार देतील. यामध्ये गमावलेल्या नोकऱ्यांपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी धोरणे आवश्यक आहेत. यासाठी वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि पर्यायी ऊर्जा या क्षेत्रांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. हवामानपूरक अर्थव्यवस्थेकडे वळल्यामुळे कामाचे स्वरूप बदलेल. तसेच यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे लागेल. म्हणूनच शिक्षण, कौशल्यविकास या क्षेत्रांत गुंतवणूक करणे आणि शेतीक्षेत्रातल्या तरुणांना नवे रोजगार मिळवून देणे महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेत जे मागे राहण्याचा धोका आहे त्यांच्यासाठी एक सुरक्षा-जाळे तयार करावे लागेल. यासाठी कल्याणकारी धोरणे आणि कार्यक्रमांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

गाम्बियासमोरील आव्हाने

गाम्बियामध्ये हरित संक्रमणाला प्रोत्साहन देण्यात तरुणांना गुंतवून ठेवण्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. शाश्वत आणि प्रभावी परिणाम साध्य करण्यासाठी यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. या आव्हानांचे तीन मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय.

बऱ्याच तरुणांना हरित अर्थव्यवस्थेकडे जाण्याचे महत्त्व पूर्णपणे समजू शकत नाही किंवा त्यामध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. 

गाम्बियन हरित संक्रमणामध्ये तरुणांना गुंतवून ठेवण्यातील प्रमुख सामाजिक आव्हानांपैकी एक म्हणजे पर्यावरणीय समस्या आणि त्यांच्या संभाव्य उपायांबद्दल ज्ञानाचा अभाव. बऱ्याच तरुणांना हरित अर्थव्यवस्थेकडे जाण्याचे महत्त्व पूर्णपणे समजू शकत नाही किंवा त्यामध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच या  पर्यावरणीय कृतीच्या फायद्यांबद्दलही त्यांना अवगत केले पाहिजे. 

गाम्बियन समाजात प्रचलित असलेले सांस्कृतिक नियम आणि पारंपारिक लैंगिक भूमिका यामुळेही तरुणांच्या सहभागामध्ये  सामाजिक आव्हान उभे राहते. विशेषतः महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळत नाहीत. त्यामुळे हरित उपक्रमांमध्ये त्यांना सक्रियपणे सहभागी होता येत नाही. या लैंगिक विषमतेचे निराकरण करणे आणि पर्यावरणाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांना सामावून घेणे महत्त्वाचे ठरेल.  

गाम्बियातील हरित संक्रमणामध्ये तरुणांना गुंतवून ठेवण्यासाठी आर्थिक संसाधनांची कमतरता आणि वित्तपुरवठ्याची उपलब्धता हे आणखी एक महत्त्वाचे आव्हान आहे. अनेक तरुणांकडे इको-फ्रेंडली व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा हरित तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक आर्थिक साधने नसतात. याशिवाय हरित क्षेत्रात शाश्वत नोकरीच्या संधींचा अभाव तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्यापासून परावृत्त करू शकतो. हे अडथळे दूर करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे आणि तरुणांसाठी हरित नोकऱ्या निर्माण करणे या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे.

अनेक तरुणांकडे इको-फ्रेंडली व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा हरित तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक आर्थिक साधने नसतात. याशिवाय हरित क्षेत्रात शाश्वत नोकरीच्या संधींचा अभाव तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्यापासून परावृत्त करू शकतो.

गाम्बियातील तरुणांना गुंतवून ठेवण्यात राजकीय आव्हानेही आहेत. त्यामुळे राजकीय प्रक्रियेत तरुणांचे प्रतिनिधित्व आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग यावर लक्ष देण्याची गरज आहे. तरुणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि धोरणे तयार करण्यात तसेच त्याच्या अमलबजावणीमध्ये त्यांच्या मतांना पुरेसे स्थान दिले जात नाही. यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्याची तातडीची गरज आहे. अशा मंचामुळे तरुणांना पर्यावरणाच्या धोरणांमध्ये सक्रिय सहभाग घेता येईल. तरुणांच्या नेतृत्वाखालील संघटना, युवा परिषद तसेच धोरणकर्ते आणि तरुण यांच्यातील संवादाद्वारे हे साध्य केले जाऊ शकते. राजकीय अस्थिरता आणि कमकुवत प्रशासन तरुणांना हरित संक्रमणामध्ये सहभागी करून घेण्यामध्ये अडचणीचे ठरू शकते. ही अडचण दूर करणेही आवश्यक आहे.

सरकारी धोरणांमधील अस्थिरता आणि विसंगती तरुणांना दीर्घकालीन पर्यावरणीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करू शकते. त्यामुळे तरुणांच्या नेतृत्वाखालील हरित उपक्रमांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने राजकीय स्थैर्य, सुशासन आणि धोरणातील सातत्य राखणे गरजेचे आहे.  

पुढचा मार्ग

गाम्बियामधील हरित संक्रमणामध्ये तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी नवकल्पना, उपाय आणि शिफारसी यावर लक्ष दिले पाहिजे. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया मोहिमेशी संबंधित असलेला पहिला उपक्रम राबवणे आवश्यक आहे.

तरुणांना शाश्वत विकास, हरित उपक्रम आणि त्यात सहभागी होण्याच्या संधी याबद्दल माहिती आणि संसाधने पुरवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि मोहिमांवर लक्ष दिले पाहिजे. हे प्लॅटफॉर्म गाम्बियामधील तरुणांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण, सहयोग आणि नेटवर्किंगसाठी केंद्र म्हणून काम करू शकतात.

तरुणांना शाश्वत विकास, हरित उपक्रम आणि त्यात सहभागी होण्याच्या संधी याबद्दल माहिती आणि संसाधने पुरवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि मोहिमांवर लक्ष दिले पाहिजे.  

तरुणांच्या नेतृत्वाखालील ग्रीन स्टार्टअप्स हा आणखी एक आशादायी मार्ग आहे. गाम्बियातील तरुण उद्योजकांना हरित स्टार्टअप तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. हे  स्टार्टअप पर्यायी ऊर्जा, शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि इको-टूरिझम यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात. या स्टार्टअप्सच्या भरभराटीसाठी मार्गदर्शन, निधी आणि संबंधित नेटवर्कमध्ये प्रवेश देण्यासाठी संरचना तयार केल्या पाहिजेत.

हरित शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण तर आवश्यक आहेच पण हरित संक्रमणामध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यात योगदान देण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान तरुणांसाठी गरजेचे आहे. त्यासाठी शाळा आणि समुदायांमध्ये पर्यावरणीय शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये शाश्वत शेती तंत्र, पर्यायी ऊर्जा, कचरा कमी करणे, पुनर्वापर याबद्दलच्या व्यावहारिक प्रशिक्षणाचा अंतर्भाव जरुरीचा आहे. यामुळे शाश्वतता हा सामूहिक युवाशक्तीचा मूलभूत भाग बनेल आणि तशी संस्कृती वाढीस लागेल. 

निर्णय प्रक्रियेत तरुणांचे प्रतिनिधित्व हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तरुणांना अशा निर्णय प्रक्रियेच्या मंचावर प्रतिनिधित्व द्यावे लागेल. तरच ते शाश्वतता आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित धोरण प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊ शकतील. यासाठी युवा सल्लागार समित्या किंवा परिषदा स्थापन केल्या पाहिजेत. या माध्यमातून सरकार आणि इतर संबंधित भागधारकांमध्ये संवाद होईल, समस्यांवर चर्चा होईल आणि त्यावरचे उपायही सुचवले जातील.  

गाम्बियाच्या हरित संक्रमणामध्ये तरुणांना गुंतवण्याच्या प्रयत्नांना वित्तपुरवठा करणेही आवश्यक आहे. यासाठी तरुणांच्या नेतृत्वाखालील हरित प्रकल्प आणि उपक्रमांना आर्थिक साह्य देण्याच्या उद्देशाने समर्पित वित्तपुरवठा योजना किंवा निधी यंत्रणांच्या स्थापनेची गरज आहे. याव्यतिरिक्त तरुण नवोन्मेषक आणि उद्योजकांना निधी मिळण्यासाठी अर्जाची प्रक्रिया सुलभ करावी लागेल. तरच ज्यांच्याकडे मर्यादित संसाधने आहेत असे तरुणही त्यात सहभागी होऊ शकतील.  

यासाठी युवा सल्लागार समित्या किंवा परिषदा स्थापन केल्या पाहिजेत. या माध्यमातून सरकार आणि इतर संबंधित भागधारकांमध्ये संवाद होईल, समस्यांवर चर्चा होईल आणि त्यावरचे उपायही सुचवले जातील.  

यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.   जागतिक संस्था आणि यंत्रणांसोबत भागिदारी वाढवून आपण  त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग करून घेऊ शकतो. तरुणांचा सहभाग आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये याची आवश्यकता आहे. संयुक्त सहयोग प्रकल्प, ज्ञानाची देवाणघेवाण आणि विशेषत: गाम्बियातील तरुणांसाठी तयार केलेल्या क्षमता-निर्मिती कार्यक्रमांची यासाठी आवश्यकता आहे.   

गाम्बियामध्ये हरित संक्रमण चालवण्यात सक्रियपणे गुंतलेल्या तरुणांच्या प्रयत्नांना मान्यता देणे आणि त्यांना पुरस्कृत करणे हा एक प्रभावी दृष्टिकोन आहे. तरुणांचे वैयक्तिक योगदान ठळक करण्यासाठी पुरस्कार किंवा ओळख कार्यक्रम सुरू केले तर इतर तरुणांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या हातून योग्य ती कृती घडेल.

जागरुकता मोहिमा चालवणे, शहरी तसेच ग्रामीण समुदायांना लक्ष्य करणे हे गाम्बियातील तरुणांना गुंतवून ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. स्थानिकांशी चर्चा, नवनवीन कल्पना आणि सहयोगी उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेण्यासाठी सामुदायिक कार्यक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन करायला हवे.  

गाम्बियामध्ये हरित संक्रमण चालवण्यात सक्रियपणे गुंतलेल्या तरुणांच्या प्रयत्नांना मान्यता देणे आणि त्यांना पुरस्कृत करणे हा एक प्रभावी दृष्टिकोन आहे.

या नवकल्पना, उपाय आणि शिफारसींची अमलबजावणी करून  गाम्बियाच्या भविष्यात तरुणांचा सक्रिय सहभाग मिळवता येईल. त्यांच्या सर्जनशीलतेचा, उर्जेचा आणि उत्साहाचा उपयोग करून देशात शाश्वत विकास घडवून आणता येईल.

निष्कर्ष

जो गाम्बिया सूर्यप्रकाशात न्हाऊन निघेल, स्वतःच्या पवन आणि सौर ऊर्जेवर चालेल अशा गाम्बियाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. इथली हिरवीगार खारफुटी नैसर्गिकरित्या पाणी शुद्ध करते आणि एक समृद्ध पर्यावरणव्यवस्था म्हणून उभी राहते हे चित्रही सुखद आहे. हे फक्त एक स्वप्न नाही. गाम्बियाच्या तरुणाईच्या अमर्याद उर्जेने आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी असे भविष्य घडवता येऊ शकेल. जेव्हा तरुणांची क्षमता ओळखून त्यांना शिक्षण, संधी आणि निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात तेव्हा फक्त त्यांचेच भविष्य घडते असे नाही तर त्या देशाचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य अधिक समृद्ध, निरोगी आणि सशक्त बनते. आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची. गाम्बियामधल्या तरुणांच्या उमेदीने इथे एक हरितक्रांती आकार घेऊ शकते.

आपल्या सर्वांचे हिरवे, लवचिक आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्यासाठी अशी क्रांती नक्कीच प्रेरणादायी ठरेल.  

जैनाबा सोवे या गाम्बिया विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील पदवीधर विद्यार्थिनी आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.