Author : Aditya Bhan

Published on Oct 31, 2023 Updated 0 Hours ago

दैनंदिन चढ-उतार असूनही कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त असण्याऐवजी प्रति बॅरल ९० डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

ओपेककडून उत्पादनात कपात, तरीही कच्चे तेल १०० डॉलरच्या खालीच

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सलग वाढ होत आहे. ब्रेंट कच्च्या तेलाच्या किंमतीत तर गेल्या वर्षभरात (आकृती १) विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. सौदी अरेबिया आणि रशियाने उत्पादनावरील निर्बंध कायम राखल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये शेल उत्पादन व पुरवठा यांसंबंधीच्या चिंतांमुळे वाढीला पाठिंबाच मिळाला आहे. पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज प्लस (ओपेक प्लस) गटाचा भाग म्हणून या दोन देशांनी २०२३ च्या अखेरीपर्यंत दर दिवशी तेरा लाख बॅरलची एकूण उत्पादनातील कपात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या शेल कंपनीचे उत्पादन २०२३ च्या मे महिन्यापासून नीचांकी पातळीकडे जात असताना सध्याच्या कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढ थांबणे शक्य नाही, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. दुसरीकडे, तेलाच्या सध्याच्या किंमती गगनाला भिडणार असल्याची भू-राजकीय व भू-आर्थिक कारणेही स्पष्ट आहेत. त्यात चीनमधील तेलाची मागणी कमी होत आहे आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत इराणचा पुन्हा प्रवेश या कारणांचाही समावेश होतो.

Figure 1: Price of Brent crude in US$

SourceInvesting.com

मागणी

तेलाच्या किंमतीत मंदीला चालना देत चीनमधील कच्च्या तेलाच्या आयातीचे प्रमाण जुलै महिन्यात सहा महिन्यांमधील सर्वांत नीचांकी पातळीवर घसरले. त्याच वेळी चीनमधील राखीव बॅरलचे प्रमाण विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले. मुळातच अडचणीत असलेले चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्र संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे चालू २०२३ या वर्षातील उरलेल्या कालावधीत कच्च्या तेलाची मागणी बरीच कमी होणार आहे. ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने व्याजदारात केलेली कपातही नजीकच्या काळात चीनचा आर्थिक दृष्टिकोन बदलण्यासाठी अपुरी आहे. (आकृती २ पाहा).

Figure 2: China’s one-year loan prime rate (LPR)—the medium-term lending facility used for corporate and household loans—was maintained at a record low of 3.45 percent.

SourceTrading Economics

अमेरिकेच्या  फेडरल रिझर्व्हने अलीकडेच व्याजदर वाढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने तेल बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदर कायम ठेवले असले, तरी २०२४ मध्ये अपेक्षेपेक्षा कमी घट होऊन (आकृती ३ पहा) चालू वर्षाच्या उर्वरित कालावधीत कर्जाचे दर उच्च पातळीवर जाण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला. बँक ऑफ इंग्लंड आणि युरोपीय सेंट्रल बँकेने याच प्रकारचे सूतोवाच केले असताना, या इशाऱ्याने नजीकच्या काळात आर्थिक घडामोडी आणि तेलाच्या मागणीस बाधा आणणाऱ्या व्याज दरांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे भाववाढ झाल्यानंतर तेलाच्या बाजारपेठेत नफा वसूल करण्यास चालना मिळाली. सप्टेंबरच्या सुरुवातीस किंमतींनी दहा महिन्यांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर हे पाहावयास मिळाले.

Figure 3: The US federal funds rate

 SourceTrading Economics

सौदी अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासिर आणि सौदी अरेबियाचे उर्जा मंत्री युवराज अब्दुल अझिझ बिन सलमान यांनी दि. १८ सप्टेंबर २०२३ रोजी केलेल्या भाषणांमध्ये या असुरक्षिततेचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे बाजारपेठेत सुधारणा होण्याची शक्यता वाढली आहे. अरामको तेल कंपनीने २०३० पर्यंत जगभरातील कच्च्या तेलाच्या मागणीसंबंधात वर्तवलेला दीर्घकालीन अंदाज कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कमी करून प्रति दिन ११ कोटी बॅरल इतका वर्तवला आहे. यापूर्वी त्यांनी हा अंदाज प्रति दिन १२ कोटी ५० लाख वर्तवला होता. जागतिक इंधन बाजारपेठेतील अस्थिरता, चीनचा मागणीविषयक अस्थिर दृष्टिकोन, युरोपातील आर्थिक वाढ आणि जगभरातील केंद्रीय बँकांच्या चलनवाढविरोधी धोरणांची अंमलबजावणी रोखण्यासाठी कठोर नियमनाची आवश्यकता आहे, असे युवराज अब्दुल अझिझ बिन सलमान यांनी नमूद केले.

भारतातील तेल प्रकल्पांच्या देखभालीच्या कामामुळे आणि रशियाकडून येणाऱ्या मालात घट झाल्याने (आकृती ४ पहा) भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत ऑगस्टमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली. खरे पाहता, देखभालीच्या कामामुळे भारताचा रशिया व इराकनंतरचा सर्वांत तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश असलेल्या सौदी अरेबियातून भारताच्या तेल आयातीत घट झाली आहे. चालू वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ही घट प्रति दिन सुमारे पाच लाख बॅरल एवढी नीचांकी पातळीवर पोहोचली होती. याचा संदर्भ पाहिला, तर २०२२ च्या जानेवारी महिन्यापासून ते २०२३ च्या ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या कालावधीतील आयातीचे प्रमाण सरासरी प्रति दिन ७.५ लाख बॅरलपेक्षाही अधिक होते.

Figure 4: India’s crude oil imports in million tonnes

SourceTrading Economics

पुरवठा

पुरवठ्याच्या बाजूने पाहिले, तर ‘एक्सॉन मोबिल कॉर्पोरेशन’ने नायजेरियात नव्या गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी त्या देशात प्रति दिन ४० हजार बॅरलच्या वाढीव तेल पुरवठ्यासाठी करार केला. (आकृती ५ पहा). इराणमधील कच्च्या तेलाच्या निर्यातीतील वाढही एकूण पुरवठ्याला बळच देत आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत मंदी आली आहे. कच्च्या तेलाच्या वाहतुकीची माहिती सरकारला पुरवणाऱ्या ‘टँकरट्रँक्टर्स डॉट कॉम’ कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, इराणच्या कच्च्या तेलाची निर्यात २०२३ च्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीस दिवसांतच प्रति दिन २२ लाख बॅरलवर म्हणजे गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली. इराणमधील बहुतेक तेलाची बॅरल चीनकडे रवाना झाली होती.

Figure 5: Nigeria’s crude oil output rose to 1,181 BBL/D/1K (bpd in thousands) in August 2023, from 1,081 BBL/D/1K in July 2023

SourceTrading Economics

इराण व अमेरिकेच्या संबंधांमध्ये झालेल्या सुधारणेमुळे तेलाच्या किंमतीत मंदी आली आहे. त्यामुळे इराणमधून तेलाच्या निर्यातीत वाढ होऊ शकते. इराणने केलेल्या दाव्यानुसार, कैद्यांची सुटका आणि इराणची संपत्ती न गोठवण्याबाबत अमेरिकेशी अलीकडेच झालेला करार हा त्याच्या अणुकार्यक्रमासह अन्य क्षेत्रांतील वाटाघाटींचा पुढाकार म्हणून पाहिला जाऊ शकतो. या करारामुळे इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर लादण्यात आलेले निर्बंध हटवण्यासाठी अमेरिका व त्याच्या मित्रदेशांचे मन वळवता येणे शक्य होऊ शकेल आणि पर्यायाने जगभरातील तेलाचा पुरवठाही वाढू शकेल. खरे पाहता, २०१८ पासून इराणने आपल्या कच्च्या तेलाचे उत्पादन आपल्या उच्चांकी पातळीपर्यंत वाढवले आहे. (आकृती ६ पहा).

Figure 6: Iran’s crude oil production rose to 3,000 BBL/D/1K in August 2023, from 2,857 BBL/D/1K in July 2023

SourceTrading Economics

नायजेरिया आणि इराण हे दोन्ही देश कच्च्या तेलाचे सर्वांत मोठे उत्पादक नसले, तरी ‘ओपेक’ने ऑगस्टमधील प्रति दिन १ लाख २० हजार बॅरलच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात प्रति दिन २ कोटी ७७३ लाख उत्पादन केले. त्यानंतरच्या महिन्यात फेब्रुवारीपासून प्रथमच उत्पादनात वाढ झाली.

दृष्टिकोन

चालू वर्षाच्या म्हणजे २०२३ च्या अखेरीस आणि पुढील वर्षाच्या म्हणजे २०२४ च्या अखेरीपर्यंत कच्च्या तेलाचा व्यापार शंभरपेक्षा अधिक प्रति बॅरल पातळीवर पातळीवर पोहोचेल, असा अंदाज अनेकांनी केला असला, तरी गेल्या अनेक महिन्यांच्या हंगामी उच्चांकी मागणीमुळे सध्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. निर्बंध असलेल्या या बाजारपेठेत मात्र, मागणी उच्चांकी पातळीपर्यंत आलेली दिसते. पण पुढचा विचार केला, तर मागणी प्रति दिन ३० लाख बॅरलने कमी होऊ शकते. त्याचा परिणाम म्हणजे, २०२३ च्या अखेरीस आणि २०२४ च्या प्रारंभी मंदीची शक्यता असू शकते.

‘ओपेक’ने उत्पादनात केलेली कपात त्यांच्या स्वतःच्या बाबतीत प्रभावी ठरली आहे, हे निश्चित आहे; परंतु पर्यायी प्राधान्य असलेली काही बडी धेंडे सोडून बिगरओपेक उत्पादक जास्तीतजास्त क्षमतेने उत्पादन करून त्यांचा प्रभाव कमी करतील. त्यामुळे दैनंदिन चढ-उतार असूनही कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त असण्याऐवजी प्रति बॅरल ९० डॉलरच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

आदित्य भान हे ‘ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशन’चे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.