Author : Siddharth Yadav

Expert Speak Raisina Debates
Published on Apr 30, 2025 Updated 0 Hours ago

प्रत्येक परिवर्तन घडवणारे तंत्रज्ञान उत्साह, गुंतवणूक आणि बबलचा धोका निर्माण करते — आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) त्याला अपवाद नाही. AI संदर्भातील स्वप्नं प्रत्यक्षात उतरतील की नाही हे ठरवण्यापूर्वी, भूतकाळातील बबल्स आणि सध्याच्या AI शर्यतीतील साम्य समजून घेणे गरजेचे आहे.

बाइट्स आणि बबल्स: 90च्या दशकातील डॉट-कॉम बबल आणि AI रेसची तुलना

Image Source: Getty

    गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सुरू असलेल्या AI शस्त्रस्पर्धेबाबतचा (आर्मस रेस) संवाद 'संशयात्मक आवाज' आणि AI-मूल्यित समृद्ध युगाच्या भविष्यवाण्यांनी भरलेला आहे. AI चे राष्ट्रीय धोरणांमध्ये आणि भूराजकीय घडामोडींमध्ये वाढते एकत्रीकरण पाहता, AI चे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विकास केवळ अमेरिका यासारख्या आघाडीच्या बाजारपेठांसाठीच नव्हे तर जगभरातील उदयोन्मुख देशांसाठीही महत्त्वाचा आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात एकच प्रश्न पुन्हा उद्भवतो AI कंपन्यांचे मूल्यमापन जास्त आहे का? आणि त्यांच्या उत्पादनांनी अपेक्षांनुसार कामगिरी केली आहे का? याशिवाय, मॅग्निफिसेंट 7’ ही अमेरिकेच्या बाजारपेठेच्या 30 टक्क्यांहून अधिक भागाचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये DeepSeek R1 च्या लाँचसारखे अस्थिरतेचे संकेत जागतिक बाजारपेठ आणि पुरवठा साखळीमध्ये कॅसकेडींग (cascading) परिणाम घडवू शकतात. फ्रंटियर AI मॉडेल्सच्या रिलीज दरम्यान जर नवकल्पनांमध्ये (इनोवेशन) काहीशी मरगळ दिसून आली, तर AI कंपन्या आणि तंत्रज्ञान बाजाराला चालना देण्याच्या त्यांच्या क्षमतेबाबत चिंता निर्माण होते. घटणारे परतावे, अतिमूल्यांकन, आणि OpenAI व Anthropic सारख्या कंपन्यांचे आपल्या उत्पादनांचे प्रभावी व्यावसायीकरण करण्यात अपयश या मुद्द्यांमुळे अनेकदा सध्याच्या AI शर्यतीची 1990 च्या डॉट-कॉम बबलशी तुलना केली जाते. हा लेख तंत्रज्ञान बबल्सच्या स्वरूपाचा अभ्यास करतो तसेच 1990 च्या डॉट-कॉम बबल आणि सध्याच्या AI विकासाच्या मार्गाबाबतच्या तर्कवितर्कांमधील सातत्य आणि विसंगती यांचा सखोल वेध घेतो.

    AI चे राष्ट्रीय धोरणांमध्ये आणि भूराजकीय घडामोडींमध्ये वाढते एकत्रीकरण पाहता, AI चे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विकास केवळ अमेरिका यासारख्या आघाडीच्या बाजारपेठांसाठीच नव्हे तर जगभरातील उदयोन्मुख देशांसाठीही महत्त्वाचा आहे.

    AI वरील संशयवाद

    आर्थिक क्षेत्रांमध्ये बबल तेव्हाच तयार होतो जेव्हा कल्पित मागणी आणि अविवेकी गुंतवणूक यामुळे मालमत्तांची (जसे की शेअर्स) किंमत त्यांच्या वास्तविक मूल्याच्या खूप पटीने वाढते, आणि त्यानंतर भांडवली टंचाई येते, ज्यामुळे बाजार कोसळतो आणि त्याचा परिणाम इतर क्षेत्रांवरही होतो. 1990 च्या डॉट-कॉम बबल दरम्यान, इंटरनेटसारख्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानावर आधारित मालमत्तांमध्ये मोठी मागणी निर्माण झाली होती, ज्यामुळे तंत्रज्ञान कंपन्यांचे मूल्यांकन त्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नाच्या अनेक पटीने वाढले. जरी इंटरनेटने जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलले असले, तरी त्याचा खरा परिणाम 2000 च्या दशकाच्या मध्यापर्यंत जाणवला नाही. ही अपेक्षेपेक्षा अधिक लांबलेली वेळ पाहून 2000 च्या सुरुवातीस तंत्रज्ञान शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली, ज्यामुळे बाजार मूल्यामधून अब्जावधी डॉलर्स नष्ट झाले.

    सध्याचा तंत्रज्ञान बाजार, विशेषतः AI क्षेत्रात, बबल तयार होण्याची काही लक्षणे दर्शवत आहे. Meta, Microsoft आणि Google यांसारख्या प्लॅटफॉर्म्सने मागील दोन वर्षांत त्यांच्या विविध उत्पादनांमुळे नफा कमावला असला, तरी AI-केंद्रित आघाडीच्या कंपन्या जसे की OpenAI आपल्या उत्पादनांच्या यशस्वीतेनंतरही अब्जावधींचा तोटा सहन करत आहेत. चिपनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी NVIDIA, जी जानेवारी 2025 मध्ये थोडक्यात Apple ला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली होती, ती अजूनही नफा कमवत आहे, पण त्या नफ्यात घट होत आहे (श्रिंकिंग मार्जीन). सर्वात मोठी चिंता अशी आहे की, AI विकसकांनी केलेले समाजातील क्रांतिकारी बदलांची आश्वासने प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कमी आहे. ChatGPT यांसारखी AI प्रणाली मजकूर व मीडिया निर्मिती, कोडिंग आणि संशोधन यांसारख्या अनेक बाबींमध्ये सुधारणा करत असली तरी, AI क्रांती अद्याप दूरच वाटते. याशिवाय, अधिकाधिक शक्तिशाली फ्रंटियर AI मॉडेल्सचा विकास होत असताना देखील उत्पादकतेत आणि आर्थिक लाभामध्ये तुलनेने वाढ झालेली नाही. Microsoft चे CEO सत्य नडेला यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “GDP वाढ नसताना जर एखाद्या विकसकाने AGI साध्य केल्याचा दावा केला, तर तो केवळ ‘बेंचमार्क हॅकिंग’ आहे आणि त्यात काही अर्थ नाही.” नडेला यांच्या मते, AI प्रगतीचे खरे मोजमाप म्हणजे व्यापक आर्थिक वाढ, जी AI क्षेत्रात गुंतवणुकीस पुन्हा चालना देऊ शकते.

    राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ शासन सेमिकंडक्टर उत्पादन वाढीला आव्हान देऊ शकते, कारण सेमिकंडक्टर पुरवठा साखळी जगभर पसरलेली आहे.

    बाजारातील अनिश्चितता, विशेषतः सेमिकंडक्टर्ससाठी, वाढत्या भूराजकीय तणावांमुळे आणि अमेरिका आणि चीनमधील स्पर्धा यांमुळे आणखी वाढत आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ शासन सेमिकंडक्टर उत्पादन वाढीला आव्हान देऊ शकते, कारण सेमिकंडक्टर पुरवठा साखळी जगभर पसरलेली आहे. सत्तेतून बाहेर पडणाऱ्या बायडन प्रशासनाचा ‘Framework for Artificial Intelligence Diffusion (FAID)’, जो जानेवारी 2025 मध्ये (DeepSeek R1 च्या लाँचपूर्वी) प्रकाशित झाला, त्याने चीनला पश्चिमी AI मूल्य साखळीपासून आणखी वेगळं करण्यासाठी निर्यात नियंत्रण कडक केले. FAID चा उद्देश प्रगत AI चिप्ससाठी निर्यात परवाने मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करणे आहे; मात्र, हा साचा DeepSeek-R1 सारख्या चिनी AI मॉडेल्सच्या ओपन वेट मॉडेल्सच्या रिलीजपूर्वी तयार करण्यात आला होता, आणि Manus AI एजंट सारख्या नवीन AI एजंट्सना पश्चिमी फ्रंटियर मॉडेल्सशी स्पर्धा करणे शक्य आहे. AI क्षेत्रातील खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकीची सातत्यता चिनचे इनोवेशन, ट्रम्प प्रशासन कश्याप्रकारे FAID अंमलात आणते, किंवा हा आराखडा (2022 च्या CHIPS कायद्यासह) अस्तित्वात राहील की त्याची जागा टॅरिफ आधारित परवाना (लायसनिंग) आराखडा घेईल यासारख्या गुंतागुंतीच्या घटकांवर अवलंबून असणार आहे.

    हळूहळू परंतु स्थिर वाढ

    अती अपेक्षांचा समतोल करणे आवश्यक आहे ज्यामुळे आर्थिक संकट टाळता येईल, परंतु आवश्यक नवकल्पनांना अडथळे न येऊ देण्याकरिता या समतोलाची अंमलबजावणी मापदंडानुसार करणे आवश्यक आहे. जरी AI-संचलित वाढीने डॉट-कॉम बबलशी काही समानता दाखवली असली, तरी ही एक पुनरावृत्ती नाही. डॉट-कॉम क्रॅशचा एक महत्त्वाचा घटक होता नेटवर्क आर्किटेक्चरमध्ये अति-गुंतवणूक (जसे की फायबर-ऑप्टिक केबल्स), जे त्यावेळीच्या मागणीपेक्षा खूप जास्त होते. त्याउलट, फ्रंटियर reasoning AI मॉडेल्सच्या विकासासाठी अडथळा हा आहे की मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे. डेटा आणि स्केलिंग इन्फरन्सचे एनर्जी इंटेंसिव स्वरूप आणि कम्प्युटिंग यामुळे डेटा केंद्रांसाठी मागणी वाढवत आहे. गोल्डमन सॅक्सच्या एका अहवालानुसार, 2030 पर्यंत डेटा केंद्रांची जागतिक बाजार क्षमता दुप्पट होईल, ज्यामुळे डेटा केंद्रांसाठी जागतिक पॉवर डिमांड 165 टक्क्यांनी वाढेल. AI साठीची मागणी स्थिर होईल किंवा कमी होईल असे असलेल्या परिस्थितीत देखील, तंत्रज्ञानाला दिलेले रणनीतिक महत्त्व यामुळे विकसित आणि विकसनशील देशांमध्ये अभूतपूर्व सार्वजनिक क्षेत्राची (पब्लिक सेक्टर) गुंतवणूक शक्य झाली आहे. उदाहरणार्थ, ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या स्टारगेट प्रकल्पाने AI पायाभूत सुविधांसाठी गुंतवणुकीचा मार्ग तयार केला आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी AI ला प्राथमिकता दिली. 2025 च्या पॅरिस AI अ‍ॅक्शन समिट नंतर, ज्याचे सह-आयोजन भारत आणि फ्रान्स यांनी केले, EU ने InvestAI उपक्रमाची घोषणा केली, ज्याद्वारे AI क्षेत्रात 200 अब्ज युरोची गुंतवणूक करणे आणि AI गिगाफॅक्टरीजसाठी 20 अब्ज युरो राखीव ठेवणे अपेक्षित आहे. समिटपूर्वी, संयुक्त अरब अमिराती (UAE) ने फ्रान्ससोबत 30 ते 50 अब्ज युरोची गुंतवणूक करण्यासाठी करार केला, ज्यात देशामध्ये AI कॅम्पस आणि 1 गिगावॅट डेटा केंद्र निर्माण करण्याचा समावेश आहे.

    OpenAI ने ChatGPT Gov सुरू केले आहे जे अमेरिकेच्या सरकारच्या AI मॉडेल्सच्या स्वीकार प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी आहे, तसेच कंपनी एस्टोनियन सरकारसोबत सहकार्य करीत आहे ज्यामध्ये ChatGPT Edu मॉडेलला राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट केले जाईल.

    AI स्वीकार्यता आणि प्रगल्भतेचे (मॅच्युरिटी) प्रमाण 2021 पासून हळूहळू वाढत आहे. बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालानुसार, डेटा-समृद्ध क्षेत्रे जसे की तंत्रज्ञान आणि वित्त या क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्रगल्भता दिसून येते, तर ऐतिहासिकदृष्ट्या मागे पडलेली क्षेत्रे जसे की ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक माल आता ताबडतोब स्वीकार करत आहेत. AI प्रगल्भतेचे प्रमाण जगभर वाढत आहे, विशेषतः उदयोन्मुख बाजारपेठा जसे की भारत आणि UAE या विकसित देशांपेक्षा जास्त वेगाने वाढत आहेत. AI मॉडेल्सचा सार्वजनिक क्षेत्राद्वारे देखील स्वीकार केला जात आहे. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडम (UK) सरकारने Anthropic सोबत एक MOU (करारनामा) साईन केला आहे ज्यामध्ये AI चा समावेश करून सार्वजनिक सेवांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सहकार्य करण्याचे लक्ष ठेवले आहे. OpenAI ने ChatGPT Gov सुरू केले आहे जे अमेरिकेच्या सरकारच्या AI मॉडेल्सच्या स्वीकार प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी आहे, तसेच कंपनी एस्टोनियन सरकारसोबत सहकार्य करीत आहे ज्यामध्ये ChatGPT Edu मॉडेलला राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट केले जाईल. अशा विकासांनी हे स्पष्ट केले आहे की, जरी बाजारात परिस्थिती अस्थिर असू शकते, तरीही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राची AI स्वीकारण्यासाठीची रुची नक्कीच अस्तित्वात आहे. जरी AI स्वीकार्याची गती सध्या व्यापक आर्थिक वाढीत महत्त्वपूर्ण योगदान करत नसली, तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की ChatGPT केवळ दोन वर्षांपूर्वीच लॉन्च झाले होते.

    आर्थिक संकटांदरम्यान जसे की डॉट-कॉम क्रॅश आणि 2008 ची मंदीने, वेदनादायक धडे शिकवले. AI-च्या मागणीच्या वाढीला नक्कीच पाठीमागील गुंतवणुकीच्या उन्मादाचे स्वरूप आहे. तथापि, AI च्या उत्साही प्रचाराच्यामध्ये, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, डॉट-कॉम युगातील नेटवर्क तंत्रज्ञानाने अखेर जागतिक अर्थव्यवस्थेला रूपांतरित केले. क्रॅश घडला कारण इंटरनेटला मुळावर येण्यासाठी गुंतवणूकदार आणि विकासकांना प्रारंभिक अपेक्षांपेक्षा जास्त वेळ लागला. AI-संचलित प्रगती दीर्घकालीन वेळेत घडू शकते, परंतु वेळेचे मापदंड हे संभाव्यतेच्या प्रश्नासोबत गोंधळले जाऊ नयेत.

    शासनाच्या दृष्टीकोनातून, उदयोन्मुख बाजारातील निर्णयकर्ते आणि नियंत्रकांची दीर्घकालिक प्राथमिकता AI च्या पुढील प्रगत मॉडेल्सचा पाठलाग करण्याऐवजी AI च्या प्रगल्भतेच्या प्रमाणावर आणि AI मूल्य साखळीत त्यांचे स्थान अधिक बळकट करण्यावर असावी. UAE आणि भारतासारख्या देशांनी कौशल्य शिक्षणाचे(अपस्कीलिंग) उपक्रम सुरू करून आणि स्थानिक डेटा केंद्रे व चिप उत्पादन क्षमता निर्माण करून आधीच या दिशेने पाऊल टाकले आहे. AI मूल्य साखळीत बदल, भूराजकीय स्पर्धा, धोरणांमध्ये बदल आणि हळू हळू स्वीकार (स्लो अपटेक) अशा विविध बदल घडवणाऱ्या घटकांची उपस्थिती लघु-ते-मध्यम कालावधीत बाजारातील समायोजनाचे कारण ठरू शकते. तरीही, जागतिक सरकारांचा फ्रंटियर तंत्रज्ञानात गुंतवणूकीस प्राथमिकता देण्याचे आदेश या युगातील महासत्तेच्या स्पर्धेतील AI च्या महत्त्वपूर्ण स्थानाचे दाखले दर्शवितात.


    सिद्धार्थ यादव हे ओआरएफ मध्यपूर्वेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.