Author : Abhishree Pandey

Expert Speak Raisina Debates
Published on Sep 28, 2025 Updated 0 Hours ago

कौशल्यांची कमतरता भरून काढणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून सागरी अर्थव्यवस्थेतील वाढ किनारपट्टीवरील समुदायांसाठी दीर्घकाळ असणारी, उच्च मूल्याची आणि समतोल रोजगार संधी निर्माण करू शकेल.

किनारपट्टीवरील रोजगारासाठी कौशल्य विकासाची गरज

Image Source: Pexels

    जसजशी ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजेच सागरी अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक वाढत आहे, तसतसे किनारपट्टी भागात आर्थिक पुनरुज्जीवनाचे आश्वासन अधिक दृढ होत आहे. दरवर्षी सागर आधारित अर्थव्यवस्थेचा अंदाजित वार्षिक व्यवहार US$ 3 ते 6 ट्रिलियन दरम्यान आहे, ज्यामध्ये रोजगार, परिसंस्था सेवा आणि सांस्कृतिक सेवा यांचा समावेश होतो. केवळ मासेमारी आणि मत्स्यपालन या क्षेत्रांतून दरवर्षी सुमारे US$100 अब्ज उत्पन्न मिळते आणि जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे 260 दशलक्ष नोकऱ्या तयार होतात.

    सागरी अर्थव्यवस्थेमधील कामगारांची मागणी सर्वात वेगाने त्या क्षेत्रांमध्ये वाढत आहे जिथे तांत्रिक कौशल्य, डिजिटल ज्ञान आणि बहुविषयक अनुभवाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, केवळ युरोपियन युनियनमधील पवन ऊर्जा क्षेत्रात 2030 पर्यंत 1.5 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. हिंद महासागर क्षेत्रात, भारताच्या ‘सागरमाला’ कार्यक्रमासारख्या उपक्रमांतर्गत बंदर-आधारित विकास आणि पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे तसेच इंडोनेशियाच्या पर्यटन विकास प्रकल्पामुळे लाखो रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. तथापि, सतत असलेली कौशल्यांची विसंगती या वाढीवर मर्यादा घालू शकते. अनेक किनारपट्टीवरील समुदायांना नव्याने उदयास येणाऱ्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध नाही. योग्य हस्तक्षेपांशिवाय, सागरी अर्थव्यवस्था अशीच असमानता वाढवू शकते, जिथे उच्च-मूल्याच्या नोकऱ्या बाह्य कामगारांपर्यंतच मर्यादित राहतात. या उच्च-वाढीच्या क्षेत्रांचा लाभ किनारपट्टी भागातील समुदायांना मिळावा यासाठी स्थानिक आणि उद्दिष्टित कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे हे अत्यंत प्रभावी साधन ठरते. समाधानकारक बाब म्हणजे अनेक ठिकाणी सरकार, उद्योग, आणि प्रशिक्षण संस्था यांनी एकत्र येऊन समुद्री क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये किनारपट्टीवरील तरुणांमध्ये विकसित करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत.

    आंतरराष्ट्रीय अनुभव आणि शिकवण

    १. डेन्मार्क: पवनऊर्जा क्षेत्रासाठी कौशल्य विकास साखळीची उभारणी 

    डेन्मार्कच्या पवनऊर्जा उद्योगाचा देशाच्या एकूण वीज निर्मितीमध्ये सुमारे 53.4 टक्के वाटा आहे, आणि ही यशस्विता दीर्घकालीन कौशल्य विकास कार्यक्रमांतील सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे साध्य झाली आहे. या क्षेत्रात 33,000 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ऑनशोर (भूमिगत) आणि ऑफशोर (समुद्रात) पवनऊर्जा क्षेत्रासाठी दशकांपासून प्रशिक्षण व अप्रेंटिसशिप कार्यक्रम राबवले गेले आहेत. याशिवाय, स्थानिक सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर पवनऊर्जेच्या उत्पादनात भाग घेतात, ज्यामुळे स्थानिक लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळतो आणि अधिक महत्त्वाकांक्षी धोरणांसाठी जनसमर्थनही वाढते. अशा प्रकारे, डेन्मार्कमध्ये खालून सुरू होणाऱ्या (बॉटम अप) उपक्रमांनी स्थानिक गरजांनुसार तंत्रज्ञानाचे रूपांतर केले आहे, तर शासन पातळीवरील रणनीतींनी बाजारातील स्पर्धात्मकता सुनिश्चित केली आहे.

    धोरणात्मक शिफारस:

    ज्या देशांमध्ये सागरी अर्थव्यवस्थेतील नव्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जात आहे, त्यांनी संस्थात्मक व्यावसायिक प्रशिक्षण साखळ्या निर्माण करणे आवश्यक आहे. या अंतर्गत पवनऊर्जा, मत्स्यपालन, बंदर व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात करता येऊ शकतो. याशिवाय, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील भागीदारीसाठी प्रोत्साहन योजना तयार केल्यास प्रशिक्षण आणि रोजगार यातील तफावत कमी करता येऊ शकते.

    २. इंडोनेशिया: समुदायाधारित प्रशिक्षणाद्वारे किनारी पर्यटनाचा विस्तार

    2024 मध्ये, इंडोनेशियाच्या पर्यटन क्षेत्राचा GDP मध्ये अंदाजे 4.1 टक्के वाटा होता, आणि पुढील दशकात हे क्षेत्र 5 दशलक्षांहून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण करेल असा अंदाज आहे. ही वाढ प्रामुख्याने किनारी व सागरी पर्यटनामध्ये केंद्रित असून, ते इंडोनेशियाच्या ब्लू इकॉनॉमी रोडमॅप 2023–2045 च्या केंद्रस्थानी आहे. या विस्ताराचा लाभ स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचवण्यासाठी, इंडोनेशिया सरकारने स्थानिक प्रशिक्षण कार्यक्रमांचा प्रभावी वापर केला आहे. उदाहरणार्थ, वेस्ट जावा प्रांतात हातमाग उत्पादन, अतिथी सेवा व्यवस्थापन, वाहतूक भाडे सेवा आणि टूर गाइडिंग यांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात, ज्यामुळे लघु व्यवसाय आणि सहकारी संस्था पर्यटन मूल्यसाखळीत समाविष्ट होतात. ग्रीन फिन्स इंडोनेशिया या संस्थेचा “ट्रेन द ट्रेनर” कार्यक्रम स्थानिक स्कूबा डायव्हिंग ऑपरेटरना पर्यावरणीय उत्तम पद्धती आणि समुदायाशी संवाद कौशल्ये शिकवतो.

    धोरणात्मक शिफारस:

    इंडोनेशियाचा अनुभव दर्शवतो की पर्यटन-केंद्रित ब्ल्यू म्हणजेच सागरी अर्थव्यवस्थेचा विकास केवळ नोकऱ्या निर्माण करून थांबू नये, तर स्थानिक समुदायांना उच्च-मूल्याच्या भूमिकांमध्ये सामील होण्याची संधी मिळायला हवी., जर स्थानिक लोक केवळ कमी-कौशल्य व कमी-उत्पन्नाच्या नोकऱ्यांमध्येच अडकून राहिले, तर केवळ प्रशिक्षण पुरेसे ठरत नाही. त्याऐवजी, सरकारने सहकारी संस्थांमार्फत प्रशिक्षण योजना वाढवाव्यात, व्यवसाय आणि डिजिटल कौशल्यांचा समावेश करावा, तसेच मायक्रोक्रेडिट, सवलतीचे कर्ज, ब्लेन्डेड फायनान्स यांसारख्या आर्थिक साधनांचा वापर लोकांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून स्थानिक समुदाय आपले उद्योग वाढवू शकतील. अशा प्रकारे, राष्ट्रीय पर्यटन विकास कार्यक्रम स्थानिक समुदायांसाठी सुरक्षित आणि उच्च-गुणवत्तेच्या नोकऱ्या निर्माण करू शकतील आणि बाह्य अवलंबन टाळले जाईल.

    ३. दक्षिण आफ्रिका: ऑपरेशन फकिसा आणि मोठ्या प्रमाणातील रोजगार निर्मिती

    2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन फकिसा (phakisa) या उपक्रमाचा उद्देश समुद्री क्षेत्रांमध्ये वेगाने वाढ व रोजगार निर्मिती साध्य करणे हा होता. या कार्यक्रमाने समुद्री वाहतूक व उत्पादन, लहान बंदरांचा विकास आणि किनारी व सागरी पर्यटन यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. हा उपक्रम काही अंशी यशस्वी ठरला आहे. विशेषतः डर्बन आणि केप टाउन यांसारख्या बंदर शहरांमध्ये जहाज दुरुस्ती व देखभाल यामध्ये गुंतवणूक आकर्षित झाली आहे. मत्स्यपालन क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. केवळ पाच वर्षांत (2014 ते 2019) उत्पन्न R 0.67 अब्ज वरून R 3 अब्ज  पर्यंत वाढले. तथापि, काही अडचणीमुळे या प्रगतीचा वेग सुसंगत राहिलेला नाही. नियामक मंजुरीस विलंब आणि पर्यावरणीय चिंतेमुळे अनेक प्रकल्प अडकले. याशिवाय, या उपक्रमाने महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली असली तरी, कौशल्यांतील तफावत मोठी अडथळा ठरली. अभियंते आणि समुद्री तंत्रज्ञ यांसाठी लागणारे प्रगत प्रशिक्षण अनेक किनारी समुदायांना उपलब्ध नव्हते.

    धोरणात्मक शिफारस: 

    ऑपरेशन फकिसा दर्शवते की फक्त नोकऱ्यांवर अती निर्भर असून यश मिळत नाही, तर त्यासोबत कपॅसिटी म्हणजेच क्षमता विकासात गुंतवणूक असली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर राबवले जाणारे सागरी अर्थव्यवस्थेतील उपक्रम आखताना, सरकारांनी सुरुवातीच्या टप्प्यावरच वास्तववादी कौशल्य विकास उद्दिष्टे निश्चित करावीत. हे अत्यधिक आशावादी अंदाज टाळण्यास आणि शाश्वत रोजगारात परिणत होणाऱ्या धोरणात्मक उद्दिष्टांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास मदत करू शकते.

    ४. फिजी: मत्स्य व किनारी नोकऱ्यांसाठी ब्लू बॉण्ड्सचा वापर

    2022 मध्ये, फिजीने US$50 मिलियन मूल्याचा सार्वभौम ब्लू बॉण्ड जारी केला, ज्याचा उद्देश शाश्वत समुद्री व मत्स्य प्रकल्पांना पाठबळ देणे हा होता. या उपक्रमाचा मुख्य भर शाश्वत मत्स्य व्यवस्थापनावर आहे, ज्याचा थेट फायदा लघु स्तरावरील मच्छीमारांना होतो. या कार्यक्रमांतर्गत औपचारिक व अनौपचारिक रोजगार संधी निर्माण केल्या जातात, विशेषतः महिलांसाठी आणि युवकांसाठी, जे किनारी भागांमध्ये राहतात. हा बॉण्ड मत्स्य मूल्यसाखळीत खासगी गुंतवणूक आकर्षित करतो, ज्यामुळे पारंपरिक अनुदानांवर असलेले अवलंबन कमी होते आणि उत्पन्नाचे स्रोत अधिक वैविध्यपूर्ण होतात.

    धोरणात्मक शिफारस:

    फिजीच्या उदाहरणातून हे स्पष्ट होते की सार्वभौम आर्थिक संस्था अशा प्रकारे रचना केल्या जाऊ शकतात की त्या एकाच वेळी स्रोत संरक्षण आणि किनारी रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करू शकतात. जे देश व खासगी क्षेत्र अशा नवकल्पनात्मक आर्थिक साधनांचा (जसे की ब्लू बॉण्ड्स) विचार करत आहेत, त्यांनी हे सुनिश्चित करणारी ठोस यंत्रणा तयार केली पाहिजे की जमा झालेले वित्तीय साधन सर्वात जास्त सागरी उपजीविकेवर अवलंबून असलेल्या समुदायांपर्यंत पोहोचते की नाही. याशिवाय, स्थानिक सहकारी संस्था, महिला गट आणि कामगार संघटनांशी भागीदारी  केल्यास लाभांचे समतोल वितरण सुनिश्चित करता येते. 

    निष्कर्ष:

    शाश्वत महासागर अर्थव्यवस्थेच्या परिदृश्यानुसार, 2050 पर्यंत जागतिक स्तरावर 5.1 कोटी नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे एकूण रोजगारांची संख्या 2019 च्या तुलनेत 18.4 कोटींवर पोहोचू शकते. ही संधी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, देशांनी कौशल्यांतील दरी भरून काढणे अत्यावश्यक आहे, अन्यथा किनारी समुदाय उच्च-मूल्याच्या संधींपासून वंचित राहू शकतात. प्रदीर्ध चालणाऱ्या आणि समतोल सागरी अर्थव्यवस्थेचा विकास हा उद्दिष्टित प्रशिक्षण, समावेशक वित्तपुरवठा, आणि वास्तववादी कार्यबल विकास योजनांवर अवलंबून आहे.


    अभिश्री पांडे या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मधील सेंटर फॉर इकॉनॉमी अँड ग्रोथ येथे रिसर्च असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.