Expert Speak Health Express
Published on Apr 12, 2024 Updated 0 Hours ago

आरोग्य आणि इतर लिंग-संवेदनशील शाश्वत विकास उद्दिष्टांकडे लक्ष पुरवताना त्यांच्यातील परस्परसंबंध लक्षात घेऊन, सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारणे हे सर्वांकरता समान आणि शाश्वत आरोग्यविषयक परिणाम साध्य करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

हवामान बदल, आरोग्याचा अधिकार आणि स्त्री-पुरुष समानता यांच्यात समतोल साधण्याचा संघर्ष

हा लेख ‘जागतिक आरोग्य दिन २०२४: माझे आरोग्य, माझा हक्क’ या लेखमालिकेचा भाग आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या उत्सवाची संकल्पना ‘माझे आरोग्य, माझे हक्क’ आहे, ज्याचा उद्देश भौगोलिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक स्थानांचा विचार न करता सर्व व्यक्तींकरता सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवांचा, शिक्षणाचा आणि माहितीचा पुरस्कार करणे हा आहे. आज, 'आरोग्य हक्का'त, एखाद्याचे आरोग्य, शारीरिक एकात्मिकता व सूचित संमती यांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्याचा अधिकार समाविष्ट आहे; आरोग्य-संबंधित बाबींमध्ये सक्रिय निर्णय घेणे आणि छळ, वाईट वागणूक किंवा हानिकारक पद्धतींपासून संरक्षण हे जगभरातील किमान १४० देशांमध्ये घटनात्मकदृष्ट्या अनिवार्य ठरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेची घटना (१९४८), मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा (१९४८) आणि अनेक जागतिक व प्रादेशिक मानवाधिकार करारांसह विविध आंतरराष्ट्रीय दस्तावेजांमध्ये जन्मजात मानवी हक्क म्हणून आरोग्याला मान्यता मिळाली आहे.

विशेषतः कमी विकसित राष्ट्रांमधील सर्वात असुरक्षित समुदायांकरता ‘धोका वाढवणाऱ्या’ हवामान विषयक बदलांमुळे महिलांचे आरोग्य विषयक अधिकार धोक्यात येतात.

या वारंवार पुनरावृत्ती केलेल्या वचनबद्धतेनंतरही, जगभरातील ४.५ अब्जाहून अधिक लोकांना अद्यापही अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि संरक्षण लाभत नाही. 'उद्दिष्ट पूर्तीकरता योग्य' अशा जागतिक आरोग्य विषयक रचनेचा सामना करणाऱ्या विविध आव्हानांपैकी, येऊ घातलेल्या हवामानाच्या संकटाला आणि त्याच्याशी संबंधित आरोग्य विषयक धोक्यांना लवचिक असलेल्या आरोग्य व्यवस्थेची पुनर्रचना करण्याची तातडीची गरज आहे, ज्यामध्ये लिंग समानतेचा विचार हा एक महत्त्वाचा पैलू बनला आहे. विशेषतः कमी विकसित राष्ट्रांमधील सर्वात असुरक्षित समुदायांचा ‘धोका वाढवणाऱ्या’ हवामान विषयक बदलांमुळे महिलांचे आरोग्य विषयक अधिकार धोक्यात येतात. जागतिक संवादामध्ये हवामान-आरोग्य-लिंगसापेक्ष संबंध मुख्य प्रवाहात आणण्याची गरज ओळखून, संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या- कॉप २८ परिषदेने, जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच आरोग्य दिन आणि हवामान-आरोग्य मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या लेखात हवामान बदल-प्रेरित आरोग्य संकटांचा लिंग समानतेवर होणाऱ्या परिमाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो हवामानाला साजेशी आरोग्य व्यवस्थेची रचना करताना अधोरेखित होणे आवश्यक आहे.

सार्वजनिक आरोग्यावर हवामान बदलांचा होणारा परिणाम

हवामानातील बदल मानवी आरोग्याकरता विविध माध्यमांद्वारे महत्त्वाचे धोके निर्माण करतात. समुद्राच्या वाढत्या पातळीपासून बदललेल्या पर्जन्यवृष्टीच्या नमुन्यांपर्यंत आणि तीव्र हवामानाच्या घटनांपर्यंत, पर्यावरणीय परिणामांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. थेट परिणामांमध्ये तीव्र तापमानाचा समावेश होतो, जसे की उष्णतेची अथवा थंडीची लाट येणे, श्वासोच्छवासाच्या आजारासारखा आधीपासून जडलेला विकार बळावणे. या व्यतिरिक्त, चक्रीवादळासारख्या टोकाच्या हवामानाच्या घटनांमुळे इजा होऊ शकते आणि सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अप्रत्यक्षपणे, हवामानातील विसंगती मलेरिया, डेंग्यू, मेंदूज्वर आणि कॉलरा यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. हवामान आणि आरोग्य यांच्यातील संबंध ऐतिहासिक काळापासून मान्य केले गेले असले तरी, संशोधन, विकास आणि धोरण-निश्चिती करताना त्याकडे मर्यादित लक्ष पुरवले गेले आहे. मात्र, अतिसंवेदनशील लोकांना हवामानाच्या तीव्रतेचा बसलेला फटका लक्षात घेता, हवामान बदलामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक आव्हानांना कसे सामोरे जाता येईल, याबाबत पुन्हा विचार सुरू झाला आहे. पर्यावरण, आरोग्य आणि विकास क्षेत्रांनी परस्परांशी नव्याने संवाद साधणे आणि समन्वित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

थेट परिणामांमध्ये तीव्र तापमानाचा समावेश होतो, जसे की उष्णतेची अथवा थंडीची लाट येणे, श्वासोच्छवासाच्या आजारासारखा आधीपासून जडलेला विकार बळावणे.

हवामान बदलाचे सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम कमी करणे अवघड आहे, कारण पर्यावरणीय घटक आणि वैयक्तिक निर्णयक्षमता असे दोन्हीही आरोग्यावर परिणाम करणारे ठरतात. उदाहरणार्थ, हवामान बदलामुळे प्रादेशिक उष्णतेच्या लाटांमध्ये अपेक्षित वाढ होऊन, व्यापक प्रमाणात आरोग्याला धोके निर्माण होऊ शकतात. मात्र, महिला, मुले आणि वृद्ध यांसारख्या असुरक्षित गटांना ओळखून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासारख्या सक्रिय उपाययोजना केल्याने आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम कमी होऊ शकतात. जैविक संवेदनशीलता, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि सांस्कृतिक संदर्भासह इतर अनेक घटक या असुरक्षिततेत योगदान देतात.

२००८ सालच्या जागतिक आरोग्य दिनी ‘हवामान बदलापासून आरोग्याचे संरक्षण’ या मोहिमेसह योजलेले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम हे आरोग्य सेवा विषयक धोरणांत हवामानातील बदलांना अनुरूप उपाय समाविष्ट करण्यासाठी योजलेल्या जागतिक प्रयत्नांचे उदाहरण आहे. ‘हवामान बदलापासून आरोग्याचे संरक्षण: जगातील संशोधनाचे प्राधान्यक्रम’ या अहवालात जागतिक आरोग्य विषयक समानता वाढवण्याच्या व्यापक प्रयत्नांमध्ये हवामान बदलांमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांना अंतर्भूत करण्याच्या अत्यावश्यकतेवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या संदर्भात, विशिष्ट हवामान बदल कमी करण्याच्या आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या रणनीतींच्या जमा-खर्चाचे मूल्यांकन करणे आणि आरोग्यविषयक जोखीमांमध्ये हळूहळू होणारे बदल हवामानातील परिवर्तनशीलतेशी नीटपणे जोडण्याकरता धोरणाशी संबंधित जोखीम मूल्यांकन वाढविण्यावर भर देणे अत्यावश्यक आहे.

हवामान धोरणातील आरोग्याच्या २०२३च्या पुनरावलोकनात, सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देणे आणि हवामान बदलाचा सामना करण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांत ते एकात्मिक करण्याची आवश्यकता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. अलिकडच्या वर्षांत हवामान बदलाचे आरोग्यावर होणारे प्रतिकूल परिणाम स्पष्टपणे दिसून येत असताना, राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान (एनडीसीज्) व दीर्घकालीन कमी उत्सर्जन आणि विकास धोरणांमध्ये आरोग्यविषयक विचारांचा समावेश करण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे. सध्या, उपलब्ध ‘राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदाना’पैकी ९१ टक्के आरोग्य विषयक पैलू आहेत, ज्यात २०१९ मधील ७० टक्क्यांवरून लक्षणीय वाढ दिसून येते. याशिवाय, विविध क्षेत्रांत आरोग्याला प्रोत्साहन देणारी हवामान विषयक उद्दिष्टे आणि धोरणे विकसित करण्याकडे कल वाढत आहे, ज्यामध्ये हवामान बदल कमी करणे, हवामान बदलांशी जुळवून घेणे, अंमलबजावणीची साधने, हानी व नुकसान आणि दीर्घकालीन शाश्वत विकास धोरणांचा समावेश आहे.

हवामान धोरणात लिंगसमानता अद्यापही गायब आहे का?

‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’ मान्य करते की, स्त्रियांना उच्च जोखीमांचा सामना करावा लागतो आणि हवामान बदलाच्या परिणामांचा मोठा भार त्यांना सहन करावा लागतो. हे विशेषतः आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांच्या बाबतीत दिसून आले आहे. त्यामुळे लिंग-संबंधित आरोग्य असमानता आणि विषमता वाढते. विशेषत: ज्या देशांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे अथवा त्या गरिबीत लोटले जाण्याची जिथे शक्यता अधिक असते, अशा जगभरातील १४१ पेक्षा जास्त देशांत, नैसर्गिक आपत्तींत पुरुषांपेक्षा सरासरी जास्त महिलांचा मृत्यू ओढवतो. आपत्तींची तीव्रता ही तफावत अधिक वाढवते, ज्यामुळे हवामान-संबंधित घटनांचा लिंगानुसार होणारा परिणाम अधोरेखित होतो.

विकसित देशांतील शहरी भागात, कमाल तापमानामुळे हवामानात मोठे बदल झाल्याने मृत्यूदर वाढल्याचे दिसून आले आहे. तापमान वाढल्याने हिवाळ्यातील मृत्यू कमी होऊ शकतात, परंतु उन्हाळ्यातील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते, यांत स्त्रियांची असुरक्षितता लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते. वाढत्या तापमानामुळे मलेरियाचा प्रसार होण्यासही हातभार लागतो, ज्यामुळे गर्भवती महिलांना अचानक गर्भपात, अकाली प्रसूती, मृत जन्म आणि कमी वजनाचे बाळ यांसारख्या गुंतागुंतीच्या जोखीमांना सामोरे जावे लागते. वादळ आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या दरम्यान, सापेक्ष अस्थिरतेचा महिलांवर पुरुषांपेक्षा अधिक विपरीत परिणाम होतो. उदाहरणार्थ- बांगलादेशातील १९९१च्या चक्रीवादळाच्या आपत्तीत बळी पडलेल्यांमध्ये ९० टक्के बळी महिला होत्या, असे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे, अनेक विकसनशील देशांतील दुष्काळी प्रदेशांत, महिलांना पाणीटंचाईचा जास्त भार सहन करावा लागतो, दूषित स्त्रोतांकडून पाणी आणताना त्यांना आरोग्य विषयक धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे अतिसारसारखे जलजन्य रोग होतात, हे बालमृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे.

याशिवाय, विकसित राष्ट्रे आणि कमी विकसित राष्ट्रांमधील लिंग-आधारित आरोग्य विषयक असमानतेची सूक्ष्म समज विकसित करणे आवश्यक आहे. हे हवामानाशी संबंधित आरोग्य धोरणातील महिलांच्या वाढत्या भूमिकेला मुख्य प्रवाहात आणण्याकरता महत्त्वाचे ठरते. कमी विकसित राष्ट्रांमध्ये, महिलांकडे अनेकदा पर्यावरणीय ऱ्हासाचा निष्क्रीय बळी म्हणून पाहिले जाते, ज्यामध्ये आरोग्याच्या समस्या जसे की विषारीपणा, नैसर्गिक आपत्ती अथवा सामाजिक-आर्थिक बदल हे शेतीचे आधुनिकीकरण आणि जमीन वापरातील बदल यांमुळे उद्भवतात. याउलट, विकसित राष्ट्रांमधील महिलांकडे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जागरूक आणि त्यांच्या कल्याणाबाबत सक्रिय असलेल्या सहभागी या दृष्टिकोनातून पाहिले जाते. मात्र, जितेजागते अनुभव अनेकदा या सोप्या कथनांना नकार देतात. परिणामी, या गुंतागुंतीची जाणीव करून देणाऱ्या नियमावलीची तातडीने गरज आहे.

वाढत्या तापमानामुळे मलेरियाचा प्रसार होण्यासही हातभार लागतो, ज्यामुळे गर्भवती महिलांना अचानक गर्भपात, अकाली प्रसूती, मृत जन्म आणि कमी वजनाचे बाळ यांसारख्या गुंतागुंतीच्या जोखीमांना सामोरे जावे लागते.

हवामान बदल-प्रेरित आव्हानांच्या दरम्यान, जागतिक आरोग्य विषयक विषमता समजून घेत त्याकडे लक्ष पुरवताना हे अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, हवामान, आरोग्य आणि लिंग समानता यांचा परस्परांशी संबंध आहे. आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क असल्याचे ओळखून, विशेषत: कमी विकसित राष्ट्रांतील असुरक्षित प्रदेशांतील हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी लिंग-संवेदनशील दृष्टिकोन हवामान विषयक आणि आरोग्य विषयक धोरणांत समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. लिंग समानता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने केलेले प्रयत्न लवचिकता निर्माण करण्यासाठी आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक न्यायाला आणि कल्याणाला चालना देण्यासाठी अत्यावश्यक ठरतात. आरोग्य आणि इतर लिंग-संवेदनशील शाश्वत विकास उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी परस्परसंबंधांना संबोधित करणारे सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारणे हे सर्वांकरता समान व शाश्वत आरोग्य विषयक परिणाम साध्य करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. हवामान, विकास आणि आपत्तींचा धोका कमी करण्याच्या सद्य धोरण विषयक चौकटीत लिंग-संवेदनशील दृष्टिकोन अंतर्भूत केल्याने हे परिणाम संभाव्यतः कमी होऊ शकतात. अशा प्रकारे, अनेक आर्थिक क्षेत्रांमध्ये सहकार्य करणे, डेटा संकलन आणि देखरेख वाढवणे, लिंग-विशिष्ट उद्दिष्टांचा मागोवा घेणे आणि सर्व प्रमुख भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या हवामान विषयक धोरणात महिलांचे सक्षमीकरण करून महिलांवर हवामान बदलांचा होणारा विपरित परिणाम कमी करायला हवा. हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या धोरणांचा अवलंब केल्यास धोरणांची परिणामकारकता वाढू शकते.


देबोस्मिता सरकार ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये कनिष्ठ फेलो आहेत.

रिया शर्मा ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Debosmita Sarkar

Debosmita Sarkar

Debosmita Sarkar is a Junior Fellow with the SDGs and Inclusive Growth programme at the Centre for New Economic Diplomacy at Observer Research Foundation, India. ...

Read More +
Rhea Sharma

Rhea Sharma

Rhea Sharma is a Research Intern at the Observer Research Foundation ...

Read More +