हा लेख विश्व जल दिवस 2024: शांततेसाठी पाणी, जीवनासाठी पाणी या लेख मालिकेचा भाग आहे.
पाणी हा मूलभूत मानवी हक्क आहे, परंतु सध्या जगातील 2.2 अब्ज लोकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आफ्रिकेत, दर 3 पैकी 1 व्यक्ती पाणी टंचाईने त्रस्त आहे आणि 13 आफ्रिकी देश गंभीर पाणी असुरक्षिततेचा सामना करीत आहेत. बहुतेक आफ्रिकी देश पाण्याशी संबंधित एसडीजी (Sustainable Development Goals) करण्याच्या मार्गावर नाहीत. आफ्रिकेच्या सुमारे 85.5 टक्के लोकसंख्येला स्वच्छ आणि योग्यरित्या व्यवस्थापित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही आणि 82 टक्के लोकांना स्वच्छ आणि योग्यरित्या व्यवस्थापित स्वच्छता सेवा उपलब्ध नाही. 'ग्लोबल वॉटर सिक्योरिटी 2023 असेसमेंट' च्या म्हणण्यानुसार, सहेल प्रदेश (सेनेगल, मॉरिटानिया, माली, बुर्किना फासो, नायजर, नायजेरिया, चाड, सुदान, इरिट्रिया आणि दक्षिण अल्जेरियाचा एक छोटासा भाग), हॉर्न ऑफ आफ्रिका ( इथिओपिया, सोमालिया, इरिट्रिया, जिबुती या देशांचा समावेश असलेला) आणि पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात असलेला आफ्रिका हा जगातील सर्वात कमी पाणी-सुरक्षित प्रदेश आहे.
वातावरणीय बदल हा पाणी तणावाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. बर्फाचे वितळणं, वाढती समुद्रसपाटी, अनपेक्षित पाऊस, दुष्काळ आणि पूर यांसारख्या मार्गांनी ते जगातील जलस्रोतांवर गुंतागुंतीच्या पद्धतीने परिणाम करते. आफ्रिका जागतिक हरितगृह उत्सर्जनात कमी योगदान देत असेल (4 टक्क्यांहून कमी), तरीही हा खंड वातावरणीय बदलांमुळे अनाहूतपणे त्रस्त होत आहे. 'स्टेट ऑफ द क्लायमेट इन आफ्रिका 2022 रिपोर्ट' च्या म्हणण्यानुसार, आफ्रिकन खंड जागतिक सरासरीपेक्षा वेगाने उष्ण होत आहे. 2019 हा खंडासाठी रेकॉर्ड केलेल्या सर्वात उष्ण तीन वर्षांपैकी एक होता. 1901 पासून आफ्रिकेचा बहुतांश भाग आधीच 1°C पेक्षा जास्त गरम झाला आहे आणि येत्या काही दशकांत वातावरणीय बदलांमुळे दुष्काळ आणि हवामान घटना तीव्र होण्याची शक्यता आहे.
हॉर्न ऑफ आफ्रिका सध्या 40 वर्षांतील सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना करत आहे. गेल्या पाच पावसाळ्यांमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 2020 पासून हॉर्नमध्ये झालेल्या वाढत्या दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर आणि अन्नधान्य असुरक्षा निर्माण झाली आहे. सुमारे 2.7 दशलक्ष लोक दुष्काळामुळे विस्थापित झाले आहेत आणि जवळपास 2.3 दशलक्ष लोक अत्यंत अन्नधान्य असुरक्षित बनले आहेत, त्यापैकी 5.1 दशलक्ष मुले दुष्काळामुळे गंभीर कुपोषित आहेत. 2018 ते 2022 या कालावधीत मादागास्कर या देशालाही कमी पावसाळ्यामुळे गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागला. यामुळे देशाच्या अनेक भागात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. साहेल प्रदेशातही (सहारा वाळवंटाच्या दक्षिणेचा भाग) दुष्काळाचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही वर्षांत, हा प्रदेश वारंवार येणाऱ्या पुरांमुळेही त्रस्त झाला आहे. या पुरांमुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे जीवन विस्कळीत झाले आहे तसेच तेथील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
हवामान बदल आणि दुष्काळाचा आफ्रिकेतील संघर्षांवर देखील मोठा प्रभाव पडतो. आफ्रिकेतील गंभीर दुष्काळ हे पावसाळ्यावर अवलंबून असणाऱ्या शेती करणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांच्या अस्तित्वासाठी धोका आहेत. साहेल प्रदेशात पाण्याच्या उपलब्धतेवर आणि जमिनीच्या वापरावरून शेतकरी आणि पशुपालक यांच्यात अनेकदा संघर्ष निर्माण होतात. आफ्रिकेतील शेतकरी-पशुपालक संघर्ष हा संसाधनांच्या स्पर्धेने, चर ( Grazing Land) कमी होण्याने आणि शेतीसाठी पाणी आणि जमीन वाटणी करण्यामुळे निर्माण होतो. अनेक तज्ज्ञ दारफूर संघर्षाला जगातील पहिला हवामान बदलांमुळे झालेला संघर्ष मानतात. समाजशास्त्रज्ञ युनेस अबुयुब यांचे असे मत आहे की 1980 पासून आफ्रिकेच्या साहेल प्रदेशातील संघर्ष जातीय तणावांसह जटिल घटकांमुळे वेगवेगळ्या स्वरूपात जिवंत राहिला आहे, परंतु पाणी आणि जमीन यावरील संघर्ष हा या संघर्षाचा प्रमुख कारणीभूत होता. त्याचप्रमाणे, हवामान बदल हा हॉर्न ऑफ आफ्रिकेत अन्नधान्य असुरक्षा, पाणीटंचाई आणि संसाधनांची स्पर्धा वाढवत आहे. हा प्रदेश जगातील सर्वात असुरक्षित प्रदेशांपैकी एक आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोरडवाहू प्रदेश आहेत, सीमा ओलांडून असलेल्या पाण्याच्या हक्कावरील अनिर्णित प्रश्न आहेत आणि येथे जातीय संघर्ष आणि दुष्काळाचा दीर्घ इतिहास आहे. दुष्काळाचे सामाजिक परिणाम देखील गंभीर असतात. उदाहरणार्थ, दक्षिण मादागास्करमध्ये गंभीर दुष्काळामुळे फक्त दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली नाही तर सामाजिक असंतोषही वाढला.
मादागास्करमध्ये "दहालो" (डाकु) म्हणून ओळखल्या जाणारे सशस्त्र गट खाद्यपदार्थ आणि आवश्यक साहित्य लुटतात, लोकांची हत्या करतात. पाणी आणण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिला आणि तरुणींसोबत हिंसा होण्याचा धोका जास्त असतो.
आफ्रिकेतील बहुतेक देशांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने येत्या काही दशकांत पाण्याची गरज वाढेल आणि हवामान बदलामुळे पाणीटंचाईही वाढेल. त्यामुळे, पाणी आणि जमीन यावरील संघर्षही येत्या काही वर्षांत तीव्र होण्याची शक्यता आहे. म्हणून, आफ्रिकेतील हवामान बदल-पाणी तणाव-दुष्काळ-संघर्ष यांचे चक्र थांबवणे आवश्यक आहे. यासाठी आफ्रिकेत हवामान अनुकूलनाला पाठिंबा देणारा आणि (एसडीजी 6) आवश्यक पाणी पायाभूत सुविधा उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. दीर्घकालीन अनुकूलन निधीची आफ्रिकेला अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने, सर्वात असुरक्षित खंडाला अनुकूलन निधी मिळवणे कठीण झाले आहे. आफ्रिका तज्ञ मिशेल गॅव्हिन यांचे म्हणणे आहे की, हवामान असुरक्षेतेच्या निर्देशांकांमध्ये आफ्रिकेतील देश अग्रेसर असूनही, हॉर्न ऑफ आफ्रिकेच्या देशांना 2010 ते 2018 दरम्यान गरीबी असलेल्या इतर देशांच्या तुलनेत प्रति व्यक्ती हवामान अनुकूलन निधीची सरासरी रक्कमही कमी मिळाली. हवामान बदलांच्या सर्वात मोठ्या बळी पडणाऱ्या देशांपैकी अनेक देश हे कमकुवत अर्थव्यवस्था असलेले आहेत जिथे अतिशय गरीबीत असलेली अतिशय असुरक्षित लोकसंख्या आहे. या देशांकडे हवामान संशोधन आणि क्षमता निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याची क्षमता नाही. रशिया-युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेल्या महामारी आणि अन्नधान्य संकटानंतर आफ्रिकन खंड सध्या गंभीर कर्ज संकटाला सामोरे जात आहे. त्यामुळे, देशाची क्षमता आणखी खालावली आहे.
आफ्रिकेत अनुकूलन निधीचा प्रवाह वाढला नाही तर, तेथील लोकसंख्या पाणी तणावाच्या, भुकबळीच्या आणि गरिबीच्या जाळ्यातच अडकून राहील.
मलंचा चक्रवर्ती या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये वरिष्ठ फेलो आणि उपसंचालक (संशोधन) आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.