Author : Sushant Sareen

Published on Apr 15, 2024 Updated 0 Hours ago

पाकिस्तानने अफगाणी कट्ट्रवाद्यांविरोधातील आपले युद्ध सुरूच ठेवायचे ठरवले, तर हे युद्ध दोन आघाड्यांवर लढावे लागेल. एक म्हणजे, स्वतःच्याच भूभागात आणि दुसरे म्हणजे अफगाणिस्तानात.

अफगाणिस्तानचे वावटळ: आपणचं पेरलेले पीक कापण्याची पाकिस्तानवर वेळ

लढाऊ विमाने आणि ड्रोन यांच्या माध्यमातून गुप्तपणे करण्यात आलेली लक्ष्यकेंद्री बॉम्बफेक आणि अफगाणिस्तानमधील जिहादी तळांवर घालण्यात आलेले छापे निष्फळ ठरले नसते, तर अमेरिकेचा पराजय झाला नसता. त्याच धर्तीवर अफगाणिस्तानातील दहशतवादी तळांवर किंवा अड्ड्यांवर हल्ला करून आपण पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण ठेवू शकू किंवा रोखू शकू, असे जर पाकिस्तानी लष्करातील उच्च अधिकाऱ्यांना आणि तथाकथित नागरी सरकारला वाटत असेल, तर खरेचच त्यांना आपल्या मताचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. दहशतवादाच्या धोक्याशी सामना करण्यासाठीचे धोरण दर दिवशी अधिक धोकादायक बनत चालले आहे, हे पाहता पुनर्विचार आवश्यक बनला आहे; परंतु माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या जनरलनी आखलेले राष्ट्रीय सुरक्षा धोरण नेहमीच हेतुपुरस्सर निष्क्रियता आणि अफगाणिस्तानसंबंधातील आक्रमक धोरण या दोहोंमध्ये हेलकावे घेत असते. हे जनरल एक तर खूप विचार करतात आणि कोणतीही कृती करीत नाहीत किंवा अती प्रमाणात कृती करतात आणि फार विचार करीत नाहीत. असे असले, तरी पाकिस्तानच्या बाजूने विचार करायचा तर त्या देशासमोर फारसे पर्याय नाहीत आणि जे आहेत ते सगळेच वाईट आहेत. त्यामुळे त्यातीलच एक निवडणे त्यांना भाग आहे. सगळ्यांत वाईट गोष्ट म्हणजे, त्यांनी कोणताही पर्याय निव़डू दे, म्हणजे एक तर अफगाणिस्तानमध्ये लढा उभारू दे किंवा बचावात्मक दृष्टिकोन स्वीकारून आपल्या सीमेवर दीर्घ काळ युद्ध चालू ठेवू दे किंवा पाकिस्तान तालिबानशी शांतता प्रस्थापित करू दे अथवा हे तीन पर्याय एकत्र करू दे, अफगाणिस्तानच्या वावटळीत पाकिस्तानला दिलासा मिळणार नाही. कारण याचा कर्ताधर्ता स्वतः पाकिस्तानच आहे.

हल्ले आणि प्रतिहल्ले

पाकिस्तानने १८ मार्चच्या पहाटे हाफिज गुल बहादूरच्या वर्चस्वाखालील सर्वांत धोकादायक व भयंकर जिहादी गटांशी संबंधित पक्तिका व खोस्त प्रांतामधील लक्ष्यांवर हवाई हल्ले केले. मीर अली येथील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवर दोनच दिवसांपूर्वी पूर्ण तयारीनीशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह सात सैनिक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हा हवाई हल्ला करण्यात आला. हाफिज गुल बहादूरच्या दहशतवादी गटाने त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, अफगाणिस्तानात घुसून हल्ला करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानी लष्करावर २०२२ च्या एप्रिल महिन्यात झालेल्या विनाशकारी हल्ल्यांनंतर पाकिस्तानने तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतातील लक्ष्यांवर ड्रोन हल्ले चढवले. पाकिस्तानने तेहरिक ए तालिबान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अन्य जिहादी कमांडरांविरोधात गुप्त मोहिमा पार पाडल्या, ड्रोन हल्ले केले, गुप्तपणे आईडीचे स्फोट घडवून आणले आणि लक्ष्यकेंद्री जीवघेणे हल्ले केले, असे बोलले जाते; परंतु दहशतवादी हल्ले रोखणे किंवा तालिबानला तेहरिक ए तालिबान पाकिस्तान व संबंधित अन्य गटांवर हल्ले करण्यापासून रोखल्यामुळे पाकिस्तानमध्ये सातत्याने कमी-अधिक तीव्रतेचे हल्ले होत आहेत. एका गोष्टीत मात्र बदल झाला आहे. ती म्हणजे, पाकिस्तानमधील अनेक मोठ्या हल्ल्यांची जबाबदारी तेहरिक ए तालिबानऐवजी पाकिस्तानमधील तेहरिक ए जिहाद पाकिस्तान या आघाडीवरील संघटनेने घेतली आहे. बरेचदा पाकिस्तानने संताप व्यक्त केल्यावर तालिबानने पाकिस्तानला आश्वासने दिली आहेत; परंतु तेहरिक ए तालिबान पाकिस्तानवर अंकुश ठेवला नाही.

अफगाणिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याचा निर्णय पाकिस्तानने २०२२ मध्ये जेव्हा पहिल्यांदा घेतला, तेव्हा आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा निषेध अफगाणिस्तानने जाहीररीत्या करूनही पाकिस्तानने या हल्ल्यांची कबुली अधिकृतरीत्या दिली नव्हती. अफगाणिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, असा इशारा तालिबानचे प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद यांनी त्या वेळी दिला होता; परंतु नुकत्याच झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने घेतली होती. आपल्या कारवाईचे स्पष्टीकरण देताना ‘दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी एकत्रित उत्तर शोधण्यासाठी आणि अफगाणिस्तानशी द्विपक्षीय संबंधात आडकाठी आणणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला रोखण्यासाठी’ हा हल्ला केल्याचे सांगून पाकिस्तानने एक मार्ग खुला ठेवला. मात्र, पाकिस्तानी लष्कराने अधिक कठोर भूमिका घेतली. दहशतवाद्यांशी हातमिळवणी केल्यावरून पाकिस्तानने थेट तालिबानला दोषी ठरवले आणि त्याच वेळी भविष्यात अशाच प्रकारे हालचाली होत राहिल्या, तर कठोर दृष्टिकोन स्वीकारला जाईल, असा इशाराही दिला. यावर तालिबान्यांची प्रतिक्रिया संतापाची होती. तालिबानने आक्रमक वक्तव्ये तर केलीच, शिवाय पाकिस्तानच्या सीमेवरील चौक्यांवर तोफा व बॉम्बगोळ्यांचा वर्षाव केला.

तालिबान समर्थक सोशल मीडियाने पाकिस्तानचा उपहास करण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानी लष्कराला बांगलादेशात ज्या पद्धतीने शरणागत व्हावे लागले, त्याची पुनरावृत्ती करावी लागेल, अशी धमकीही देण्यास सुरुवात केली.

परावलंबनाच्या बेड्या तोडणे

तालिबान व पाकिस्तानदरम्यानचे संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन्ही बाजूंमध्ये एकमेकांवरील विश्वासाचा पूर्ण अभाव आहे; तसेच सातत्याने एकमेकांवर दोषारोप करण्यात येत असून शत्रुत्वाची भावनाही अधिक आहे. दोन्ही बाजू एकमेकांवर जसजसे हल्ले चढवत जातील, तसतशी ही भावना अधिकाधिक तीव्र होत जाईल. खुले युद्ध भडकण्याची शक्यता कमी असली, तरी अफगाणिस्तान-पाकिस्तान क्षेत्र भविष्यकाळात अशांत राहण्याची शक्यता आहे. तालिबान रणनीतीसाठी कारवाया करण्याचा प्रयत्न करू शकले किंवा त्यांचे मोजमाप करू शकत असले, तरी तालिबान ‘तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’ सोडणार नाही. पंजाबी वर्चस्व असलेल्या पाकिस्तानी प्रदेशात ‘तेहरिक ए तालिबान पाकिस्तान’ तालिबानचा फायदा उपटू शकतो. पश्तुंच्या दृष्टीने ते विश्वासघातकी व अविश्वासार्ह आहेत. शिवाय त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी वांशिक व वैचारिक संबंधदेखील आहेत. त्याचप्रमाणे अफगाणी व पाकिस्तानी तालिबान सुमारे तीन दशकांपासून शस्त्रास्त्रांमध्ये भागीदार असल्याने हे बंध अधिक बळकट झाले आहेत. यात भर म्हणजे अफगाणिस्तानने पाकिस्तानातील पश्तु प्रदेशावर हक्क सांगितला असून दोन्ही देशादरम्यानची सीमा म्हणून ड्युरांड लाइनला मान्यता देण्यास नकार दिला आहे.

आपण पाकिस्तानचे हस्तक नाही, तर आपण एक स्वतंत्र संघटना आहोत, हे राजकीयदृष्ट्याही दाखवून देणे तालिबानला भाग आहे. पाकिस्तानचा तिरस्कार करणाऱ्या त्यांच्या माणसांनाही त्यांना हे दाखवून देणे भाग आहेच, शिवाय त्यांच्या संभाव्य भागीदारांनाही (उदाहरणार्थ, भारत) दाखवून देणे आवश्यक आहे. कारण या संभाव्य भागीदारांना पाकिस्तानबद्दल प्रेम नाही आणि पाकिस्तानच्या माध्यमातून तालिबान्यांशी व्यवहार करावा लागेल, असे त्यांना वाटते. तालिबान्यांचे धोरण स्पष्ट आहे :  ते दोन टोकाच्या भूमिका घेतील, पाकिस्तानी लोकांना शांत करण्यासाठी ते आपल्या चाली थांबवतील; परंतु पाकिस्तानची कोणतीही मागणी ते मान्य करणार नाहीत, पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या आरोपांचे खंडन करत राहतील आणि पाकिस्तानींना तंबी देत राहतील. तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या कारवाया पाकिस्तानमधूनच केल्या जातात, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात येतो. या आरोपाला संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून अंशतः दुजोरा देण्यात आला आहे. एकीकडे हे सुरू असतानाच दुसरीकडे तालिबान पाकिस्तानचा अनुनय करण्याचाही प्रयत्न करतात. पाकिस्तान अमेरिकेप्रति जसे वर्तन करते, तसेच वर्तन तालिबान पाकिस्तानप्रति करण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, पाकिस्तानवरील अवलंबित्वाच्या ‘बेड्या तोडण्यासाठी’ ते अन्य पर्यायांचा शोध घेत आहेत आणि अन्य गोष्टींचा प्रयोग करूनही पाहात आहेत. पाकिस्तानमधून व्यापारी उलाढाल बंद करण्यासाठी तालिबान इराणमधील चाबहार बंदरामध्ये गुंतवणूक करीत असल्याची वृत्ते येत आहेत. उझबेकिस्तानमध्ये एक रेल्वे मार्गही विकसित केला जात असून हा मार्ग अफगाणिस्तान ते मध्य आशिया व त्या पलीकडच्या प्रदेशाला जोडणार आहे.

पाकिस्तानची दशा

पाकिस्तानचा संयम सुटला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर केवळ काही आठवड्यांमध्येच तालिबान्यांच्या विजयाचा पाकिस्तानला झालेला आनंद ओसरू लागला. पाकिस्तानची पश्चिमेकडील बाजू सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न दूरच, उलट पाकिस्तानला पश्चिमेकडील आघाडीवर दीर्घ काळ युद्ध करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानने संवाद आणि राजनैतिक प्रयत्नांपासून ते धर्माचा आधार व वेगवान मोहिमांपर्यंत सर्व काही केले; परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. पाकिस्तानने आता तालिबान्यांसाठी खर्च वाढवण्यासाठी अमेरिकेवर अधिक अवलंबून राहण्याचा निर्णय घेतल्याचे (भारतातील विश्लेषकांनी हाच सूर आळवला आहे) अलीकडील हवाई हल्ल्यांवरून सूचित झाले आहे. तालिबानला पर्यायच उरू नये, यासाठी जमिनीवरील व हवेतील वेगवान मोहिमांचा वापर करण्यासाठी नवी पद्धत वापरली जाईल. तेहरिक ए तालिबान पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा संवाद नाकारणाऱ्या किमान सध्याच्या पाकिस्तानी लष्कराच्या नेतृत्वाखाली हीच स्थिती पुढेही चालू राहील. माजी काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक ककर यांच्यासारख्या आपल्या पूर्वीच्या निष्ठावंतांना तालिबान म्हणजे ‘दहशवादाला बळ देणारे’ असा शिक्का मारू देण्यासही त्यांनी आडकाठी केली नाही.

दहशतवाद्यांवर हवाई हल्ले करण्यासंबंधातील पाकिस्तानमधील नागरिकांच्या व प्रसारमाध्यमांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया उत्साही होत्या. इस्लामी बंडखोरांना लगाम घालण्यासाठी आखलेल्या या नव्या धोरणाबाबत पाकिस्तानी नागरिक खूपच अनुकूल होते. या धोरणाचा पाकिस्तानी लष्कराला राजकीयदृष्ट्या खूप चांगला उपयोग झाला. कारण या धोरणामुळे पाकिस्तानच्या नावडत्या लष्कराच्या बाजूने तात्पुरते का होईना जनमत तयार झाले. या मुद्द्यावर पाकिस्तानचे नेतृत्व आपला मोठेपणा मिरवून घेत आहे. केवळ लष्करी अधिकाऱ्यांमध्येच नव्हे, तर देशाभिमानी पंजाबी जनमतामध्येही आपली प्रतिमा उजळून टाकण्याची त्यांना आशा आहे. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान हा जागतिक धोका आहे, अशी प्रतिमा उभी करण्यासाठी पाकिस्तानी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला अनुकूल मत तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. शिवाय या माध्यमातून आर्थिक मदत मिळवण्याची आशा पाकिस्तानला आहेच.  

संभ्रमित धोरण

असे असले, तरी पाकिस्तानने आपल्या नव्या धोरणाच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार केला आहे का? देशाची अनिश्चित आर्थिक स्थिती आणि अत्यंत अस्वस्थ, अस्थिर, राजकीय परिस्थिती पाहता हा प्रश्न गंभीर आहे. या स्थितीपासून वेगाने बाजूला होणे अमेरिकेला जसे शक्य होते, तशी सोय पाकिस्तानकडे नाही. कारण ते अफगाणिस्तानचे शेजारी आहेत. त्यांच्याकडे अमेरिकेच्या तुलनेत काही बाबतीत अधिक चांगली गुप्तचर यंत्रणा आहे आणि शिवाय तालिबान्यांची कुटुंबे पाकिस्तानातच राहात असल्याने त्यांना त्याचे काही फायदेही मिळत आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तान लष्करी पाठबळामुळे तालिबानपेक्षा श्रेष्ठ ठरतो. हे युद्ध अतिशय दीर्घ काळ चालणारे असून पाकिस्तानकडे असलेली उरलीसुरली ताकदही त्यात नष्ट होणार आहे. पाकिस्तान आपल्या पूर्वेकडील आघाडीवर गुंतलेला आहे. या आघाडीवर तो भारताशी असलेले शत्रूत्व धगधगते ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. ही गोष्ट त्याच्यासमोरील आव्हान आधिक गुंतागुंतीचे करीत आहे आणि समोर येणाऱ्या धोक्याची गुंतागुंत वाढवत आहे.

अमेरिका अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात आर्थिक व राजनैतिक स्त्रोत आणू शकते; तसेच लष्करी क्षमताही वाढवू शकते. अनेक दहशतवादी लक्ष्यांचा नायनाट करण्यातही ते यशस्वी झाले आहेत. तरीही सातत्याने वीस वर्षे सुरू असलेल्या संघर्षात त्यांना अपमानास्पदरीत्या माघार घ्यावी लागली. पाकिस्तान अमेरिकेकडे असलेल्या स्रोतांच्या आणि त्यांच्या लष्करी, आर्थिक व तंत्रज्ञान क्षमतांच्या पासंगालाही पुरणारा नाही. अमेरिकेच्याच नव्हे, तर रशियाच्याही जवळपास पोहोचण्याची त्याची ताकद नाही. तरीही पाकिस्नाला वाटत असेल, की ते अमेरिकींच्या डावपेचाचा वापर करून तालिबानवर सक्ती करू शकतात, अखेरीस ते स्वतःच्याच हतबलतेचे बळी ठरतील. कदाचित पाकिस्तानातील लष्करी नेतृत्वाने सारासार विचार केला असता, तर त्यांनी तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील तळांवर हवाई हल्ले केले नसते; परंतु पाकिस्तानी लष्कराची रणनीती चांगली असली, तरी ते धोरणात्मकदृष्ट्या मूर्खपणाचे निर्णय घेते, असे आजवर दिसून आले आहे. त्यांच्या करणीने ते स्वतःच स्वतःला विचित्र स्थितीत अडकवत असते.

या स्थितीतून स्वतःला बाहेर काढणे केवळ अवघड नव्हे, तर अशक्य आहे. कारण या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी लष्करी ताकदीचा वापर करणे अपरिहार्य आहे. आणि अफगाणिस्तानविरोधात जर शक्तीचा वापर केला, तर इस्लामी कट्टरवाद्यांना विनाशकारी प्रत्युत्तर देण्याचे आमंत्रण मिळेल.

तालिबान स्वतःला तालिबान म्हणून उभे करणे जोपर्यंत रोखत नाही, तोपर्यंत पाकिस्तानला दोन संलग्न आघाड्यांवर लढावे लागणार आहे. त्या म्हणजे, स्वतःच्या भूभागात आणि दुसरी म्हणजे अफगाणिस्तानात. या लढ्यात सर्वसामान्यपणे केवळ दोनच परिणाम असतात. एक म्हणजे, विजय मिळेल पण खूप काही गमावलेले असेल. किंवा नुकसानदायी पराजय. या दोन्ही गोष्टी पाकिस्तानला परवडणाऱ्या नाहीत.


सुशांत सरीन हे ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sushant Sareen

Sushant Sareen

Sushant Sareen is Senior Fellow at Observer Research Foundation. His published works include: Balochistan: Forgotten War, Forsaken People (Monograph, 2017) Corridor Calculus: China-Pakistan Economic Corridor & China’s comprador   ...

Read More +