Author : Sunil Tambe

Published on Aug 05, 2020 Commentaries 0 Hours ago

हिंदी महासागरावरून वाहणारे मोसमी वारे भारतीय उपखंडाला एकत्र बांधून ठेवतात. म्हणूनच भारतीयत्वाची व्याख्या राज्यसंस्थेने नाही, तर मान्सूनने घडवली आहे.

भारत घडविणारा मान्सून

भूगोल आणि हवामान हे कोणत्याही भूभागाच्या अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणावर फार मोठा प्रभाव पाडत असते. भारतासंदर्भात बोलायचे तर मोसमी पाऊस किंवा मान्सून यांचे आपल्या आयुष्याशी असलेले गणित खूप महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणानंतच्या जगात आपण जेव्हा अनेक गोष्टींसाठी विविध देशांवर अवलंबून आहोत, त्यावेळी तर हे हवानामाचे गणित आपण समजून घेणे, अत्यंत आवश्यक आहे.

भूगोलाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, भारतीय उपखंडाचे स्थान युरेशियन भूस्तर आणि हिंदी महासागर यांच्या मध्यात आहे. त्यामुळे भारतीय उपखंडाला सुलेमान, साफीद, हिंदुकुश आणि हिमालय यांसारख्या पर्वतराजींची तटबंदी लाभली आहे. उत्तर दिशेला जमिनीची बंदिस्ती असलेला हिंदी महासागर (अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या हिंदी महासागराच्याच शाखा आहेत) हा एकमेव महासागर आहे. अशा प्रकारची भौगोलिक रचना असल्यामुळे, भारतीय उपखंडाला नैऋत्य आणि ईशान्य असे दोन प्रकारचे मोसमी पाऊस लाभले आहेत. वर्षातून तब्बल चार महिने पडणारा पाऊस, हे भारतीय उपखंडाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य!

भूप्रदेशाच्या प्रकारानुसार वार्षिक मोसमी पाऊस म्हणजे मान्सून हा भारतीय उपखंडातील जलचक्र, पीक चक्र, पीक पद्धती, मासेमारीचे चक्र, गुरे चरण्याचे मार्ग, व्यापारी मार्ग इत्यादींची निश्चिती करतो. याचाच दुसरा अर्थ असा की, या उपखंडातील सारे जीवनमान या मान्सूनवर अवलंबून आहे. म्हणूनच इथली अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्थाही मान्सूनच्या गणिताशी जोडलेली आहे.

युरोपमधील अर्थकारणाचा आलेख

युरोपमधील व्यापाराची पद्धत आणि आपल्याकडील पद्धत यात मूळातून काही भेद आहेत. ते समजल्याखेरीज आपल्याला मान्सूनचे महत्व कळणार नाही.

औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या युरोपात बहुतांश उद्योग-व्यवसाय हे समूहावर आधारित होते. एकाच धंद्यात असलेल्या कारागिरांची वा व्यापा-यांची एखादी संघटना- गिल्ड, त्या विशिष्ट भागातील हस्तकलावस्तू व व्यापाराचे व्यवहार पाहात असे. बहुतेकदा या संघटनेवर त्या प्रदेशातील ख्रिश्चन मठाचा वा राजाचा वरदहस्त असे. त्यांच्याकडून या संघटनेला निधीही मिळत असे. आपल्या कारागिरांचा, स्वयंरोजगारित सभासदांचा व्यवहार-व्यापार सुरळीत राहावा, आपल्याकडील साहित्याची मालकी टिकून राहावी आणि मालाचा पुरवठा नीट राहावा, यासाठी असे केले जात असे. परंतु एरवी या संघटनेवर नगर प्रशासनाचाच अंमल असे. या संघटनेचे सदस्यत्व हे पूर्णतः ऐच्छिक असे. साधारणतः ज्यांना या संघटनेचे सभासद व्हावयाचे असते ते कुटुंब आपल्या मुलांना शिकाऊ उमेदवार म्हणून संघटनेत दाखल करून घ्यावे, अशी विनंती गिल्डच्या मुख्य कारागीराला करत असे. या मार्गाने नव्याने दाखल झालेला सदस्य कलाकुसरीचे प्रशिक्षण घेऊन कालातरांने कुशल कारागीर होऊन स्वतःचे दुकान थाटत असे. अशा प्रकारच्या संघटन व्यवस्थेमुळे व्यापा-यांच्या तसेच कारागिरांच्या परस्परांमधील स्पर्धेचा प्रश्नच उद्भवत नसे.

गिल्ड ही व्यवस्था बहुधा धर्मयुद्धाचा (क्रुसेड) परिपाक असावी. कारण क्रुसेडच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूदासांची भरती केली जात असे. या भूदासांना क्रुसेडच्या निमित्ताने  अरब जगताची ओळख झाली. त्या काळी युरोपपेक्षा अरब जगत कैकपटींनी वैभवशाली होते. हे भूदास युद्धावरून परतल्यावर त्यांनी हस्तकलावस्तूंचे कारखाने काढायला सुरुवात केली. गिल्डच्या माध्यमातून जसजसा व्यापारउदीम वाढीस लागला तसा युरोपातील मागासलेपणा सरायला सुरुवात झाली. या प्रक्रियेचं सविस्तर विश्लेषण मॅक्स वेबर यांनी त्यांच्या ‘द प्रोटेस्टंट एथिक्स अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम’या पुस्तकात केले आहे.

भारतातील परिस्थिती

युरोपसारखी परिस्थिती भारत आणि चीन या दोन अतिप्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या देशांमध्ये नव्हती. या दोन्ही देशांमध्ये व्यापार-उदिम केवळ फुलला नव्हता तर मोठ्या प्रमाणात बहरलाही होता. याचे काही श्रेय जाते तिबेटच्या पठाराला! या पठाराला आशियाचा जल मनोरा असेही संबोधले जाते. सिंधु, गंगा, ब्रह्मपुत्रा, यांगत्से, हांगहो, मेकाँग या चार महत्त्वाच्या नद्यांचे उगम तिबेटच्या पठरावरील हजारो हिमनद्यांमध्ये आहेत. या चार प्रमुख नद्यांचे बारमाही पाणी आणि त्यांच्या काठाला असलेल्या सुपीक जमिनी यांमुळे भारत आणि चीन हे दोन्ही देश सुजलाम सुफलाम झाले. या ठिकाणची शेती संपन्न झाली. त्यातून विविध पिके- धान्य, डाळी, तेलबिया आणि मसाले यांच्या भरघोस उत्पादनाव्यतिरिक्त रेशीम, कापूस, वस्त्रोद्योग, सिरॅमिक्स, साखर इत्यादी विविध कृषी आधारित उद्योगांची निर्मिती झाली.

चीनबद्दल ठोस सांगता येत नसले, तरी भारतात युरोपसारखी गिल्ड पद्धती नव्हती. भारतात जातीआधारित उद्योग-व्यवसाय अस्तित्वात होते. ज्येष्ठ पर्यारणतज्ज्ञ माधव गाडगीळ आणि के. सी. मल्होत्रा यांच्या मते जात म्हणजे नैसर्गिक स्रोतांचे योग्यरित्या व्यस्थापन करण्यासाठी सोईस्कर असलेल्या व्यवसायाची जागा निर्माण करणारा अंतर्विवाह संबंधांनी जोडलेला–  इंग्रजी संज्ञा- एन्डोगामस, सामाजिक गट होय.

मोसमी पाऊस आणि व्यापार

भारतीय मोसमी पावसाने व्यापारालाही चालना दिली. सागरी मार्गाने होणारा व्यापार मोसमी वाऱ्यांवर अवलंबून होता. हिंदी महासागरावरून विषुववृत्ताकडे वाहणारे मोसमी वारे हे अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे अगदी चोख चालतात. ते सतत ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. सहा महिन्यानंतर म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर या काळात हे वारे अगदी विरुद्ध दिशेला, म्हणजे नैऋत्येकडून ईशान्येकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे, वाहतात. या वा-यांचा अभ्यास करून प्राचीन काळी हिंदी महासागरातील व्यापार चालत असे. कारण या वा-यांमुळे जहाजांना लांबचे अंतर कापणे सहज शक्य होत असे. किंवा एखाद्या लांबच्या बंदरात माल पोहोचवून घरी परतणा-या जहाजांना तर हा मार्ग अगदी सोयीचा ठरत असे कारण जलप्रवास तुलनेने कमी वेळात पार पडे.

दक्षिण भारतातून किंवा सिलोनकडून अतिपूर्वेपर्यंत वा-यांची दिशा मोसमी पावसाप्रमाणे अगदी सरळ असे. पर्शियाच्या आखातापासून इंडोनोशिया द्वीपसमूहातील सुमात्रापर्यंतचा प्रवास ७० दिवसांत पूर्ण होतो. प्रवासाचा हा वेग भूमध्य समुद्रातून केल्या जाणा-या प्रवासापेक्षा दुप्पट आहे. याचे श्रेय पुन्हा एकदा मोसमी वा-यांनाच द्यावे लागेल. तुलनेने नैऋत्येकडून पूर्व आफ्रिकेकडे होणारा येमेन ते ओमान हा प्रवास कमी अंतराचा आणि सोपा आहे. रॉबर्ट डी काल्पान यांच्या पुस्तकात यासंबंधात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

माझा कच्चा सिद्धांत असा आहे की, अंतर्विवाह संबंधाच्या सामाजिक गटांच्या निर्मितीत मोसमी पावसाने मुख्य भूमिका निभावली असावी. कारण मोसमी पाऊस हाच भारतीय उपखंडातील पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. आपल्याकडे वर्षातले तब्बल चार महिने पाऊस पडतो आणि त्यावर आपल्याला १२ महिने शेती करावी लागते. मासेमारी आणि पशुपालन यांचाही त्यामध्ये समावेश होतो.

जातिव्यवस्थेच्या उतरंडीची कल्पना बहुधा उच्चजातींच्या सुपीक डोक्यातून उगवली असावी, जेणेकरून भारतीय उपखंडात त्यांचे वर्चस्व अबाधित राहावे. जातिव्यवस्थेचा उच्छेद झाला पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र यासंबंधात ब्रिटिशांनी केलेल्या विदा दस्तऐवजावर (डेटा डॉक्युमेंटेशन) एक दृष्टिक्षेप टाकायला हवा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७६७-१७७४ मध्ये तामिळनाडूमधील चेंगलपट्टू या जिल्ह्याचा डेटा गोळा केला. त्याचं डॉक्युमेंटेशन धरमपाल यांनी केले आहे. यातून खूप महत्त्वाची आणि दिशादर्शक माहिती मिळते.

चेंगलपट्टू जिल्ह्यात १७७० मध्ये सुमारे २२०० परिसरांचा समावेश होता. त्यातील १९१० परिसरांचा डेटा उपलब्ध आहे. त्यापैकी १३३४ परिसरांमध्ये मानवी वस्ती होती, तर ३५६ परिसर निर्मनुष्य होते. या १५५४ परिसरांमध्ये एकूण ६२ हजार ५२९ घरे होती. तसेच मंदिरे, प्रार्थनागृहे, शिष्यवृत्तीची केंद्रे, प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेली विश्रामगृहे आणि तत्सम बांधकामेही होती. जिल्ह्यातील मंदिरे आणि प्रार्थनागृहांची संख्या तीन ते चार हजारांपर्यंत होती. त्यातील काहींची स्थापना तर, अगदी सातव्या शतकांतही झाली होती. औद्योगिक वा तत्सम उद्योगांत गुंतलेल्या कुटुंबांची संख्या १५ हजार म्हणजे चेंगलपट्टू जिल्ह्यातील एकूण घरांच्या संख्येच्या २३ टक्के एवढी होती. ४० हजार कुटुंबे विणकरांना गरजेचे असणारे सूत कातण्याच्या कामात गुंतलेली होती.

चेंगलपट्टू जिल्ह्यातील २३३ परिसरांमध्ये राहणारे विणकर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे उद्योजक होते. एकूण ४०३१ कुटुंबांमध्ये विणकामाचा व्यवसाय चालत असे. मच्छिमार, सुतार, पाथरवट, कुंभार, वनस्पती तेलाचे उत्पादन करणारे अशा सगळ्यांची मिळून ३० टक्के वस्ती होती. बँकिंग, वाणिज्य, व्यापार, दुकानदारी इत्यादी व्यवसायांमध्ये गुंतलेल्यांची संख्या ३० टक्के होते. १७७० मध्ये चेंगलपट्टू जिल्ह्यात असा गोतावळा करून राहणा-यांच्या संख्येत ब्राह्मणही आघाडीवर होते. धरमपाल यांच्या मते १७७० मधील डेटा केवळ उच्च प्रतीच्या कृषी उत्पादकतेचीच साक्ष देत नाही तर औद्योगिक उपक्रम आणि सेवांचे वैविध्यही दर्शवतो. त्याचबरोबर नैसर्गिक स्रोतांचीही निगुतीने जपणूक त्या काळात झाल्याचे दिसते. प्रदेशातील उत्पन्नाचे वाटप करण्याच्या व्यवस्थेतून आर्थिक-सांस्कृतिक समृद्धीचें न्याय्य वाटप होत असल्याचे दिसते.

या प्रकारच्या प्रदेशातील राजकीय व्यवस्था केंद्रीय नसावी. अंतर्विवाहाने बांधलेले सामाजिक गट आणि त्यांचा गोतावळा यांना विशिष्ट पातळीवरची स्वायत्तता बहाल करण्यात आली होती. विशेषतः मंदिरे, प्रार्थनागृहे आणि जलस्त्रोतांच्या बाबतीत. डेटामध्ये अशा शेकडो गटांचा उल्लेख असून या गटांना या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी एका वा इतर गटांकडून आर्थिक मदत पुरवली जात असे.

असे विविध परिसरातील लोकांचे सहजीवन हे बहुधा प्रदेशापुरते मर्यादित असावे आणि ते प्रदेश मोसमी पाऊस व वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश यांच्या माध्यमातून ओळखले जात असावेत. शेती, पीक, उद्योग, विविध सेवांची आवश्यकता तसेच व्यापाराचे मार्ग मोसमी पावसाचे जलचक्र निश्चित करत होते.

हवामान खात्याचे विभाग आणि मान्सून

भारतीय हवामान खात्याने भारताचे ३६ उपविभाग केले आहेत. ते पुढीलप्रमाणे – जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, अरुणाचल प्रदेश, बिहार, झारकंड, ओडिशा, तेलंगण, तामिळनाडू, केरळ, हरयाणा-दिल्ली, आसाम-मेघालय, नागालँड-मणिपूर-मिझोराम-त्रिपुरा, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र, गंगेच्या खो-यातील पश्चिम बंगाल आणि उप-हिमालयीन बंगाल आणि सिक्कीम, आणि महाराष्ट्र – त्यातही चार उपविभाग आहेत – कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. मोसमी पावसाच्या काळात त्या त्या भूप्रदेशात पडणा-या पावसाच्या प्रमाणावरून तसेच भौगोलिक रचनेवरून या उपविभागांची निर्मिती करण्यात आली आहे.

भू-सांस्कृतिक मूल्ये आणि संस्कृती यांसह त्या प्रदेशाची ओळख निश्चित करण्याते हे दोन घटक– पावसाचे प्रमाण आणि भौगोलिक रचना – मुख्य भूमिका निभावतात. हवामानानुसार एकसंघ विभाग हे शेती, नैसर्गिक स्रोत, भाषा, संपत्ती, लोकसंख्या—स्त्री-पुरुषांचे प्रमाण, व्यवसाय, इत्यादी, आणि अखेरीस राजकीय विचारांची—म्हणजे प्रादेशिक राजकारणाची, निश्चिती करत असतात. म्हणूनच ७०च्या दशकानंतर नव्या राज्यांची निर्मिती ही भारतीय हवामान खात्याने निर्माण केलेल्या उपविभागांच्या आधारावरच करण्यात आली.

मोसमी पाऊस नद्यांना उत्साहित करतो. सर्व पर्वतराजींना, गवताळ प्रदेशांना, पठारांना, वाळवंटाला, किना-यांना आणि भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य असलेल्या सर्व घटकांना मान्सून कवेत घेतो. विविध प्रदेशांचे आर्थिक व्यवहार, भाषा, धर्मश्रद्धा आणि संस्कृती यांना घडवतो. या मान्सूनच्या या सामाजिक मितींचे अपकेंद्री बल काही वेळा अधिक बलवत्तर ठरते.

हिंदी महासागरावरून वाहणारे मोसमी वारे भारतीय उपखंडाला एकत्र बांधून ठेवतात. त्यामुळेच गतकालातील विविध संस्थाने आणि वसाहतींच्या विलयातून भारतीय राष्ट्र-राज्याची निर्मिती शक्य झाली. भारतीयत्वाची व्याख्या राज्यसंस्थेने केलेली नाही तर मान्सूनने घडवली आहे.

१९९० साली मी पत्रकारिता करू लागलो. त्यावेळी मी ‘मराठवाडा’ या दैनिकाचा मुंबई प्रतिनिधी होतो. कालांतराने मी इंग्रजी पत्रकारितेकडे वळलो. २००६ मध्ये मी रॉयटर्स या वृत्तसंस्थेत दाखल झालो. रॉयटर्समध्ये मी कमोडिटी मार्केटचे वृत्तांकन करायचो. मान्सूनमुळे विविध पिकांच्या पेरणीच्या आणि काढणीच्या तारखा निश्चित होतात. प्रत्येक टप्प्यावरचा उत्पादनाचा अंदाज वेगळा असतो. त्यामुळे शेतमालाच्या किंमती आणि वाहतूक यावर परिणाम होतो. मोसमी पाऊस भारतीय अर्थकारणात कळीची भूमिका निभावतो ही बाब कमोडिटी मार्केटचा वेध घेताना मला लख्खपणे समजली. केवळ अर्थकारणच नाही तर आजीविका, सामाजिक चालिरिती, मूल्ये यांच्यावर आजही मान्सूनचा प्रभाव आहे.

मान्सूनमुळे या उपखंडातील बहुसंख्य लोकांची जीवनशैली स्थानासक्त म्हणजेच जमिनीशी जोडलेली राहिली आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.