-
CENTRES
Progammes & Centres
Location
‘योग’ हा आरोग्यविद्येसोबत एक क्रीडाप्रकार म्हणूनही आज विकसित होत असताना, त्याला ऑलिम्पिकपर्यंत नेता येईल का? याचा विचार भारताने करायला हवा.
आज आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ‘सॉफ्ट पॉवर’ ही महत्त्वाची संकल्पना ठरते आहे. भारतासाठी ‘योग’ ही प्रचंड मोठी ‘सॉफ्ट पॉवर’ आहे, याची जाणीव सर्वांना आहे. म्हणूनच भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना बळकटी देण्यासाठी या ‘योग’सामर्थ्याचा पुरेपूर वापर आपण करायला हवा. ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ ही त्यातूनच आलेली संकल्पना आज जगभर स्वीकारली गेली आहे. ‘योग’ या भारतीय जीवनशैलीचा ‘योगा’पर्यंत झालेला प्रवास, भारताला एक राष्ट्र म्हणून बळ देणारा आहे. यामागे असलेले अनेक सामाजिक-राजकीय संदर्भ दूर ठेवूनही, या नव्या बदलांकडे सकारात्मकरित्या पाहता यायला हवे. आज ‘योग’ हा आरोग्यविद्येसोबत एक क्रीडाप्रकार म्हणूनही विकसित होत असताना, त्याला ऑलिम्पिकपर्यंत नेता येईल का? याचा विचार भारताने करायला हवा.
एनडीए सरकारने भारतात व भारताबाहेर योगप्रसार करण्यासाठी उचललेली पावले सर्वांनाच माहिती आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सारे उद्योगविश्व, समाजविश्व या मोहीमेच्या पाठीशी उभे असलेले दिसते. ‘योग’क्षेत्रासाठी ही फार मोठी संधी आहे. या संधीचा पूरपूर फायदा एक देश म्हणून भारताला होईलच पण ही जीवनदृष्टी स्वीकारली गेल्यास साऱ्या जगाचेही त्यात कल्याण आहे.
आज जगभर वाढलेल्या ताणतणावाला उत्तर म्हणून योगविद्या शिकण्याकडे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी आहे म्हणून पुरवठा करणारा व्यापार त्यातून उभा राहणे स्वाभाविकच आहे. या व्यापारात आज भारतापेक्षा पाश्चिमात्य देश आघाडीवर आहेत. एकट्या अमेरिकेत योगाचे व्यापारी मूल्य १६.८ अब्ज डॉलर्स आहे. अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये योगाचा आरोग्य सेवा क्षेत्रातील महत्वाचा घटक म्हणून विकास होत आहे. दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंका हे त्यातील आघाडीचे देश आहेत. योग शिबिरे, योगवर्ग या सोबत योगासनांसाठी लागणाऱ्या वस्तुंचाही (उदाहणार्थ चटया, कपडे, पुस्तके, आहार) बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारताना दिसतो.
परदेशातील योगाशी निगडित संस्थांमध्ये भारतीय लोकांचा मोठा वाटा आहे, परंतु भारताला त्याचा फारसा फायदा होत नाही. कारण त्या संस्थांचे मूळ भारतीय नाही. स्वामी विवेकानंद, के. पट्टाभी जॉईस, बी. के. एस. अय्यंगार यांसारख्या योगगुरूंची समृद्ध परंपरा भारताला लाभलेली आहे. या योगगुरूंनी जगभर प्रवास करून योगाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी जगभर आपले शिष्य निर्माण केले आणि त्यांना योगाची शिकवण दिली, परंतु जगभरात आपल्या नावाने लाभदायक संस्था सुरु केल्या नाहीत. अध्यात्मिक मार्गाचे पालन करणाऱ्या त्या योगींना भौतिक लाभाची अपेक्षा नसणे स्वाभाविक होते. परंतु २० व्या शतकात, भारताला योगाच्या क्षमतेचा राजनैतिक आणि आर्थिक लाभ करून घेण्याची गरज आहे. भारताला हे सहज शक्य आहे कारण आपल्या भारतातच योगाचा जन्म झाला आणि भारतातच पंतांजली ऋषींनी योगसूत्र विकसित केली.
लोकप्रिय योगगुरू म्हणून ओळखले जाणारे बाबा रामदेव यांनी २००६ मध्ये पतंजली आयुर्वेद लि. नावाची कंपनी सुरु केली. २०१६-१७ मध्ये या कंपनीने १०५६१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पतंजली आयुर्वेद लि. कंपनीचा प्रसार करण्यासाठी बाबा रामदेव यांनी योगाच्या प्रतिष्ठेचा फायदा करून घेतला. पतंजली आयुर्वेद लि. कंपनीला मिळालेल्या यशामुळे आपल्याला योगाची आरोग्य सेवा व्यापारात असलेली क्षमता लक्षात येते.
भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असेलेला देश म्हणून जगभर प्रख्यात आहे. तरीही भारताचे नाव २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘सॉफ्ट पॉवर ३०’ या अहवालामध्ये नाही. या रिपोर्टमध्ये पहिल्या तीन क्रमांकांवर अनुक्रमे युनाइटेड किंग्डम, फ्रान्स आणि जर्मनी ही राष्ट्रे आहेत. अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे. पहिले तीनही देश वसाहतवादी राज्ये होती आणि त्यांचे साम्राज्य अनेक देशांमध्ये पसरले होते. ते सर्व देश आता स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असली तरी, त्या देशांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांवर पूर्वीच्या वसाहतवादी साम्राज्याचा प्रभाव आहे. भारत देखील स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता. आता भारत अशा अनेक राष्ट्रांसोबत स्पर्धेत आहे. त्यामुळे भारताला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर भारताने आपल्या सॉफ्ट पॉवरची क्षमता ओळखावी लागेल. त्यासाठी ‘योग’ हे भारताच्या हातात असलेले सर्वात प्रभावी साधन आहे.
२०१४ मध्ये, आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांचा अभ्यास आणि संशोधनासाठी आयुष मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. १९९८ मध्ये मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ योगाची (MDNIY) स्थापना आयुष खात्याने केली होती. योगा संस्कृतीचे पुनर्रुत्थान आणि योग तत्त्वज्ञानाचा देशभरात प्रसार हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे. इन्स्टिट्युशनमध्ये योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा शिकण्यासाठी विविध अभ्यासक्रम आहेत. तसेच प्रशिक्षक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहेत. प्रशिक्षक अभ्यास पूर्ण केलेले प्रशिक्षक योगाच्या प्रसारासाठी काम करू शकतात. शाळांमध्ये अजून योगाचे प्रशिक्षण अनिवार्य नसले, तरी बऱ्याच शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्यात आला आहे.
‘स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ च्या अंतर्गत २०१६ मध्ये योगाला खेळाचा दर्जा मिळाला होता आणि योगाची सर्व जबाबदारी खेळ मंत्रालयाकडे सोपवण्यात आली होती. योगाचा समावेश प्राधान्य यादीत देखील करण्यात आला होता. कुठल्याही खेळाचा समावेश प्राधान्य यादीत करण्यासाठी तो खेळ ऑलिम्पिक किंवा आशियाई खेळ महोत्सवाचा भाग असावा लागतो. परंतु, योग या नियमाचा अपवाद ठरला होता. भारतात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर योगासनांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा होत नाहीत. या बदलामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाच्या स्पर्धा आयोजित करून अधिकाधिक खेळाडूंचा त्यात समावेश करून घेण्यास प्रोत्साहन मिळाले असते. परंतु, या घोषणेच्या नंतर १४ महिन्यातच हा निर्णय बदलण्यात आला आणि योगाची जबाबदारी पुन्हा आयुष मंत्रालयाकडे सोपवण्यात आली. येथे मात्र सरकारने योगाची आंतरराष्ट्रीय ओळख वाढवण्याची एक आयती संधी गमावली.
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत देखील एक योजना अमलात आणता येऊ शकते. भारताचे ‘सांस्कृतिक राजदूत’ १०० वेगवेगळ्या देशांमध्ये पाठविण्यात आले आहेत. काही राजदूत विशेषतः ‘योग-दूत’ म्हणून नियुक्त केले गेले आहेत. कार्यशाळा आणि व्याख्याने आयोजित करून योगा, वेद आणि भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार करणे हे त्यांचे प्राथमिक कार्य आहे. आयुष मंत्रालयाने जर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेसोबत (ICCR) संलग्न काम करून या योगदूतांच्या मतदीने जगभरात देशांमध्ये सुसज्ज योगकेंद्र उभारली, तर या योगकेंद्रांच्या माध्यमातून योगाचा ‘भारतीय ब्रँड’ लोकांपर्यंत पोहचवणे सोपे होईल. जे योगाचे शिक्षण खाजगी योगकेंद्रांमध्ये हजारो डॉलर्स घेऊन दिले जाते ते या योगकेंद्रांमध्ये उपलब्ध करून दिले जाऊ शकते. या देशांमध्ये योगासनांच्या स्पर्धा देखील आयोजित करता येतील आणि जर सर्व योजनेप्रमाणे झाले तर एक दिवस ऑलिम्पिकमध्ये योगाचा समावेश होण्याचे उद्दिष्ट देखिल साध्य होऊ शकते.
योग ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्थातच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची संस्था उभारणे, नियम ठरविणे, खेळ म्हणून लोकप्रिय करणे हे सारे करावे लागेल. पण आज भारताने योगाची लोकप्रियता ज्या टप्प्यावर नेऊन ठेवली आहे, ती पाहता हे होणे अवघड वाटत नाही. भारताने हे केल्यास एक सॉफ्ट पॉवर म्हणून भारताचे नाव होईलच, पण जगालाही हसतखेळत आरोग्याची गुरूकिल्ली सापडेल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.