Author : Manoj Joshi

Published on Jun 19, 2020 Commentaries 0 Hours ago

खोटी आणि चुकीची माहिती पसरवणे हे नवे नाही. ते पूर्वापार चालत आले आहे. नवी गोष्ट आहे, ती तंत्रज्ञान. नव्या तंत्रज्ञानामुळे ही खोटी माहिती वेगाने पसरत आहे.

माहितीचा साथरोग घातक वळणावर

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. या युगात एखादी बातमी अनेक आरशांसमोर धरली जाते आणि कोणत्या आरशात दिसणारे बातमीचे प्रतिबिंब खरे, हे समजणे कठीण होते. मात्र, बातमीचे माध्यम फक्त एवढीच समस्या नाही, तर विशिष्ट हेतूंसाठी बनविण्यात येणाऱ्या खोट्या प्रतिमा आणि कल्पना ही खरी समस्या आहे. कोव्हिड-१९ हा आजार आरोग्याच्या प्रश्नासोबत खोटी माहितीची समस्याही घेऊन आला आहे. त्यामध्ये अनेक जण आपलेच घोडे पुढे दामटविण्यासाठी आणि त्यातून स्वार्थ साधण्यासाठी खोटी माहिती पसरत आहेत. याला ‘इन्फोडेमिक’ अशी इंग्रजी संज्ञा वापली जाऊ लागली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर हा चुकीच्या माहितीचा साथरोग, ‘इन्फोडेमिक’ खूप मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. एकीकडे, कोरोनाच्या साथरोगाचे संकट हाताळण्यासंबंधात अमेरिकेच्या क्षमतेविषयी चीन आणि रशियाने संशय पसरविण्यास सुरुवात केली. रशियाच्या समर्थक वेबसाइट भीती पसरविण्यासाठी हेतूपुरस्सर काही गोष्टी परसवत आहेत. दुसरीकडे, चीनसंदर्भात संभ्रमाचे वातावरण तयार करण्यासाठी सरकारी सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यासही मागेपुढे पाहिले जात नाही आहे.

कोव्हिड-१९ संदर्भात खोट्या बातम्या पसरविण्यासाठी, रशिया आणि चीनवर ठपका ठेवणारे एक १६ पानांचे संयुक्त पत्रक युरोपीय आयोगाने प्रसिद्ध केले आहे. कोव्हिड-१९च्या बरोबर ‘माहितीचा साथरोग’ (इन्फोडेमिक) आला आहे, असा अहवाल युरोपीय आयोगाने युरोपीय संसद आणि युरोपीय महासंघाच्या अन्य मंडळांसमोर ठेवला आहे. माहितीच्या साथरोगामुळे खोटी आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. युरोपीय महासंघातील देशांमध्ये कोव्हिड-१९च्या संदर्भाने खोटी आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे स्पष्ट करून रशिया व चीनवर अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे.

युरोपीय आयोगाच्या उपाध्यक्ष व्हेरा जोर्वा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, ‘अहवालात चीनचे नाव नमूद करण्याचे आम्ही या वेळी पहिल्यांदाच ठरवले. आम्ही तसे केले याबद्दल मला आनंदच आहे. कारण आमच्याकडे तसा पुरावा असेल, तर आम्ही तसे सांगायला हवे.’ युरोपीय महासंघ आणि चीनदरम्यानचा संघर्ष हा गनिमी काव्याने केला जात आहे. उदा. अहवालात वर उल्लेखिलेला चीनचा थेट एकमेव संदर्भ. मात्र, जोर्वा यांनी चीनच्या कारवायांसंदर्भात विस्ताराने बोलण्यास नकार दिला.

खरे तर, युरोपीय महासंघाविरोधात रशियाकडून सुरू असलेली मोहीम ‘दी इस्ट स्ट्रॅटकॉमफोर्स’ हे कृती दल स्थापन करण्यास भाग पडली. हे कृती दल म्हणजे युरोपीय महासंघाची खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधातील राजनैतिक सेवा आहे.

‘चीनविरोधात कोणत्याही प्रकारचे शीतयुद्ध खेळण्याचा’ विचार नसल्याचे चीनचे परराष्ट्रमंत्री वाँग यी यांना सांगितले असल्याचे युरोपीय महासंघाचे परराष्ट्र धोरणविषयक प्रमुख जोसेफ बोरेल यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले. या परिषदेआधी एक दिवस आधी बोरेल यांनी वाँग यांच्याशी व्हिडीओवरून संवाद साधला होता. चीन हा युरोपीय महासंघाचा धोरणात्मक शत्रू आहे. मात्र, दोघांमध्ये युद्धसंघर्षात्मक स्थितीची शक्यता नाही, असे वाँग यांना सांगितले असल्याची माहिती बोरेल यांनी दिली. चीन आणि अन्य देशांकडून प्रसृत होत असलेल्या खोट्या माहितीचा उगम शोधून काढण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी युरोपीय महासंघातील सदस्य देशांना केले आहे.

खोटी माहिती केवळ चीनच पसरवतो आहे, असे नाही, तर या खेळातील जो जुना खेळाडू आहे, तो म्हणजे रशिया. तो सोव्हिएत महासंघाचा वारसदार आहे. रशियाने या खेळाला ‘डेझइनफॉर्मिस्टिआ’ हा शब्द शोधला आहे. खरे पाहता, रशियाने युरोपीय महासंघाविरोधात मोहीम सुरू केल्याने महासंघाने‘दी इस्ट स्ट्रॅटकॉमफोर्स’ या कृती दलाची ‘युरोपीय बाह्य कृती सेवे’च्या (ईईएएस) अंतर्गत स्थापना केली. खोट्या माहितीविरोधातील ही राजनैतिक दल आहे. गेले काही महिने हे कृती दल कोव्हिड-१९शी संबंधित खोटी माहिती पसरविणाऱ्या मोहिमेच्या मागावर आहे.

अमेरिकेच्या विरोधात जाणारे अनेक मुद्दे चीनकडून एकामागोमाग पुढे येत आहेत. कोव्हिड-१९चा उगम चीनमध्येच असल्याबाबत संदिग्धता, उगम चीनमधूनच झाला असल्याचा अमेरिकेचा चीनवर आरोप आणि चीनचे त्यांना दिलेले प्रत्युत्तर, हाँगकाँग राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि अमेरिकेतील पोलिसांविरोधातील मोहीम.

अमेरिका-चीनसंदर्भात खोट्या माहितीचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. चीनने साथरोगासंबंधीची माहिती लपवून ठेवली, असा आरोप अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी केला. त्याच वेळी या विषाणूचा उगम प्रयोगशाळेत झाला असावा, असे संकेत दिले. दुसऱ्या बाजूला, विषाणूचा उगम खुद्द अमेरिकेतच झाला आहे, असा दावा चीनचे ‘वुल्फ वॉरिअर’ (चीनच्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करणारे) राजनैतिक अधिकारी करीत आहेत.यांपैकी बहुतेक टिप्पणी या अधिकृत असल्या, तरी त्या देण्याचे माध्यम हे साधारणतः ट्विटरच असते. चीनमधील अधिकारी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांकडून ते वापरण्यात येत असले, तरी चीनमध्ये ट्विटरवर बंदी आहे. ट्रम्प प्रशासन अमेरिकेमध्ये लॉकडाऊन करणार असून, लष्करी कायदा आणार आहेत, असे इशारे देणारे संदेश अमेरिकेमध्ये मार्चच्या मध्यावर मोबाइल फोन आणि सोशल मीडिया अकाउंटवरून अचानक मोठ्या प्रमाणावर पसरू लागले. अखेरीस हे सर्व संदेश खोटे आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा मंडळाला ट्विटरवरून जाहीर करावे लागले.

युरोपात, विशेषतः इटलीमध्ये चीनने कोव्हिड-१९ संदर्भात जनमत बदलण्यासाठी मोहीम सुरू केली. ‘विषाणूचे उगमस्थान असलेला देश’ ते ‘अन्य देशांच्या सुटकेसाठी धावून आलेला देश’ असे सांगणाऱ्या मोहिमेला चीनने सुरुवात केली. तसेही चीन अमेरिकेविरोधात एका मागून एक मुद्दे उकरून काढत आहे. कोव्हिड-१९च्या उगमावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेतच. चीनच्या अधिकाऱ्यांनी रुजवात केल्यावर ‘ईईएएस’ने २४ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात चीनच्या विरोधातील मत मवाळ करण्यात आले.

न्यूयॉर्क टाइम्सच्या विश्लेषणानुसार, चीनचे राजनैतिक अधिकारी आणि काही वृत्तसंस्थांनी केलेली ट्वीट ही रिट्वीट करण्यात काही ट्विटर हँडल मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहेत. त्यातील काही ‘कर्ण्यासारखे काम करीत आहेत. ती एकमेकांशी बोलण्यासाठी तयार केलेली व्यासपीठे नाहीत.’ त्यातील बहुतांश ट्विटर हँडल चीनने अमेरिकेविरोधात माहितीयुद्ध पुकारले, तेव्हापासून म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून सुरू झाली आहेत. ट्विटरने पूर्वी काही अकाउंट, विशेषतः हाँगकाँगच्या आंदोलनासंदर्भातील काही अकाउंट रद्द केली होती.

खोट्या माहितीविरोधात आणि कोव्हिड-१९मुळे युरोपीय नागरिकांचे खचलेले नीतीधैर्य पुन्हा मिळवण्यासाठी मोहीम उभारण्याचे आदेश युरोपीय महासंघाने ‘ईईएएस’ला मार्च २०२०मध्ये दिले होते. त्या आदेशांवर आधारित अहवाल युरोपीय आयोगाने तयार केला आहे. २४ एप्रिलच्या अहवालात चीनच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून चीनवरील टीकेचा सूर बोथट करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर, चीनचे तुष्टीकरण करण्यासाठी अहवाल पातळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर युरोपीय संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीसमोर झालेल्या सुनावणीत बोरेल यांना बचावात्मक खुलासा द्यावा लागला.

रशियासमर्थकांकडून सहेतूक गृहितके मांडणे सुरूच आहे, तर चीनसारखा देश सरकारी व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीत आहे.

युरोपीय महासंघातील देशांमधील आरोग्यासंबंधात खोटी आणि चुकीची माहिती पसरविण्यासाठी सामायिक मोहिमा आखण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यासाठी ‘परदेशातून पुरस्कृत करण्यात येणारी प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया’चा उपयोग करण्यात आला असून या अहवालात रशियाचा आणि काही प्रमाणात चीनचा नामोल्लेख करण्यात आला आहे. युरोपीय देशांमधील साथरोगाच्या उद्रेकाबाबतची जबाबदारी आणि चुकीच्या माहितीमुळे त्यांच्यावर झालेला परिणाम अधोरेखित करणे, हे या देशांची नावे घेण्यामागचे उद्दिष्ट आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘ईईएएस’चा दुसरा अहवाल हा २३ एप्रिल ते १८ मे या दरम्यानच्या काळासंबंधाचा आहे. तो २० मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला. खोटी माहिती पसरविण्यात थोडी घट झाली असली, तरी अशी माहिती अजूनही संपलेली नाही, असे अहवालात म्हटले आहे. रशियासमर्थक स्रोत सहेतूक गृहितके मांडत आहेत, तर चीनकडून आपल्या सरकारचे प्रतिमा उंचावणे सुरू आहे.

मार्चमधील दहा दिवसांच्या काळात करण्यात आलेल्या २६ लाख ट्वीट्सचे विश्लेषण केले असता, सुमारे ३० ग्रुप ट्रम्प यांचे समर्थक; तसेच रिपब्लिकन पार्टी आणि कोव्हिड-१९संबंधात चीनविरोधी प्रचार करणारा ‘क्यूअनॉन’ ग्रुप यांचे  समर्थक असल्याचे दिसले. मात्र, चुकीच्या माहितीची वाट एकेरी नाही.

ऑस्ट्रेलियाच्या ‘जबाबदार तंत्रज्ञानविषयक केंद्रा’ने केलेल्या राजकीय अभ्यासानुसार ट्रम्प समर्थकांनीही कोव्हिड-१९ बाबत चीनविरोधी अफवा पसरविल्या. ट्रम्प यांच्या समर्थकांची जी सोशल मीडिया अकाउंट आढळली, त्यांपैकी बहुतेक अकाउंट स्वयंचलित (ऑटोमेटेड) होती. अमेरिका सरकार त्या संबंधात काय करत आहे, ते अद्याप समजलेले नाही. मात्र, ती चालू आहेत, तोपर्यंत ती चालूच ठेवण्यात सरकारला काही अडचण असणार नाही.

खोटी आणि चुकीची माहिती पसरवणे हे पूर्वापार चालत आले आहे. नवे आहे ते तंत्रज्ञान आणि स्मार्ट फोन व सोशल मीडिया सॉफ्टवेअर. ते सर्वही माहिती जलद गतीने पसरवत आहेत, आपले सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन नकारात्मक दिशेने नेत आहेत. हा प्रश्न हाताळण्यासाठी समाज हा शिक्षणाच्या माध्यमातून, जनजागृती घडवून महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. कोव्हिड-१९ साथरोगाप्रमाणेच ‘माहितीचा साथरोग’ अत्यंत विनाशकारी भूमिका बजावू शकतो. आधीच खचलेल्या आपल्या लोकशाहीची, समाजाची आणि जीवनाची अधिक हानी करू शकतो. आपल्याला आपली पारदर्शक धोरणे, वेगवान, विश्वासार्ह माहितीची प्रतिजैविके तयार करून त्याच्याशी लढा द्यायला हवा. तसे झाले, तर खोट्या माहितीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकणार नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.