Author : Kabir Taneja

Published on Dec 22, 2021 Commentaries 0 Hours ago

पाकमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा आयएस प्रयत्न करतेय. दक्षिण आशियात आत्तापर्यंत झालेले हल्ले हे आयएसशी संलग्न आहेत, हे विसरता कामा नये.

तालिबान-आयएस संघर्ष आणि दक्षिण आशिया

२० वर्षांच्या प्रदीर्घ युद्धानंतर तालिबानने अफगाणिस्तानवरील आपली पकड मजबूत केल्याच्या बातम्या संपूर्ण जगभरात प्रसिद्घ झाल्या आहेत. देशातील संघर्ष आणि त्याभोवतीच्या घडामोडींनी प्रचंड वेग घेतल्यामुळे दक्षिण आशियातील दहशतवादाचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. राजकीयदृष्ट्या इस्लामी बंडखोर असलेल्या तालिबानवर मुत्सद्दीपणा, सुरक्षा राखण्यासोबतच दहशतवाद रोखण्याचीही जबाबदारी आली आहे.

तालिबानच्या विजयाभोवती इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आय एस के पी) आणि इस्लामिक स्टेट (आय एस) चा स्थिर उदय होणे ही बाब अगदीच अनपेक्षित नाही. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात वाटाघाटी पार पडल्या, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, अमेरिकेशी वाटाघाटी केल्याबद्दल व जिहादचा मार्ग सोडून शत्रूशी (अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी) हात मिळवणी केल्यामुळे आय एसकडून ऑनलाईन माध्यमातून तालिबानवर सडकून टीका करण्यात आली. अर्थात आयएसने केलेली ही काही पहिली टीका नव्हे.

आयएसच्या भूमिकेचे समर्थन आणि प्रचार करणार्‍या सावत-अल-हिंदने भारतीय उपखंडावर निशाणा साधून तालिबानवर प्रचंड टीका केली आहे. त्यांच्या लेखात त्यांनी तालिबानचा जिहादकडे पाहण्याचा बदललेला दृष्टीकोन व इस्लाम आणि संघर्षाच्या मुद्द्यावरून तालिबानने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उमटवले आहे. तालिबानचा जिहादकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून आता त्यांचे लक्ष फक्त एका विशिष्ट राष्ट्राइतकेच संकुचित झाले आहे, अशीही या लेखात टीका करतानाच मुल्ला ओमरनंतरच्या काळातील तालिबानच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

तसेच याही पुढे जाऊन या लेखात मुजाहिद्दीनने सोविएत युनियन विरुद्ध दिलेल्या लढ्याची आठवण करून देण्यात आली आहे. याचाच संदर्भ वापरून कम्यूनिस्टांविरुद्ध लढ्यात मुजाहिद्दीनने इस्लामिक उम्माच्या सर्वव्यापी छत्राबाहेर जाऊन राष्ट्रीयत्त्व व ट्रायबलीझम यांना प्रोत्साहन देत त्यांचे संस्थात्मिकीकरण करण्याच्या भूमिकेवरही टीका करण्यात आली आहे.

अफगाण अभ्यासक आणि मुत्सद्दी मोहम्मद मोहेक यांनी तालिबान आणि आयएस यांच्यातील फरक हा रणनैतिक असण्यापेक्षा तो अधिक धोरणात्मक आणि सांस्कृतिक असल्याचे अधोरेखित केले आहे. मोहेक यांच्या मते, इस्लामचा अर्थ, भीती आणि हिंसेचा माध्यम म्हणून वापर, आधुनिक जगाशी संघर्ष अशा काही गोष्टी दोनही गटांमध्ये समान आहेत. परंतु आयएसच्या तुलनेत तालिबानचा राजकीय अजेंडा अफगाणिस्तानचा भूगोल आणि स्थान यांच्या विचारामुळे अधिक वास्तववादी बनला आहे, पारंपरिक इस्लामिक राज्यांच्या संकल्पनेत वावरताना तालिबानचे पाश्चिमात्य देशांशी यशस्वी संबंध प्रस्थापित झाले आहेत याकडे मेहेक यांनी लक्ष वेधले आहे. दुर्दैवाने, रीयलपोलिटिकला विरोध करणार्‍या आयएसकडे पुढील काळात तालिबानसह इतरही इस्लामिक घटक आकर्षित होऊ शकतील अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

आयएसचा मूळ कल सीमांचे बंधन ओलांडून संपूर्ण खंडात आणि पर्यायाने जगात आपला दबदबा वाढवण्याकडे आहे तर तालिबान दक्षिण आशियापुरताच मर्यादित राहिला आहे. अर्थात हा टेंड काही नवीन नाही, उलट बदलत्या काळानुसार तो वाढतच चालला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आयएस आणि त्यांच्या भारतातील कथित आयएस हिंद प्रांत यांनी काश्मीरमधील एकेका ठिकाणाला लक्ष्य केल्याच्या घटनांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.

गेल्या ऑक्टोबरमध्ये आयएसने श्रीनगरमध्ये एका काश्मिरी नसलेल्या विक्रेत्याच्या हत्येचा दावा केला होता. लष्कर-ए-तोयबाची शाखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या द रेझिस्टन्स फ्रंटने देखील तत्सम लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला होता. काश्मीरमधील अशाच प्रकारच्या हल्ल्याचा दावा आयएस २०१४ पासून करत आली आहे. काश्मीरमधील संघर्षाची व्याख्या बदलत असताना राष्ट्रीय सुरक्षा दलांना आव्हान निर्माण करण्यासाठी एकध्रुवीय अजेंड्यावर या दहशतवादी संघटनांकडून काम केले जात आहे, ही बाब या नवीन गटांच्या कारवायांमधून हे शिकण्यासारखे आहे.

अफगाणिस्तानात तालिबान हे आयएसच्या विरोधात एक शस्त्र बनू शकते, परिणामी अमेरिका आणि तालिबान यांच्यातील सहकार्य वाढणे गरजेचे आहे असे मत पाश्चिमात्य देशांमध्ये व्यक्त केले जात आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील पाचव्या हिंदी महासागर परिषदेत बोलताना, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रथमच अधोरेखित केले की अफगाणिस्तानातून अमेरिकेने घेतलेल्या माघारीमुळे अफगाणिस्तान आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाला दहशतवाद, संघर्ष, अस्थैर्य, नार्को ट्रॅफिकिंग आणि सरकारी ढिलाई सारख्या आव्हानांनी ग्रासले आहे. याचे गंभीर परिणाम लगतच्या प्रदेशांनाही भोगावे लागत आहेत.

अफगाणिस्तानमधील घडामोडींबाबत पाकिस्तानामध्ये आनंद व्यक्त करण्यात आला याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या दुसर्‍या सीमेवर असलेल्या भारतावरही कुरघोडी करण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच आहेत. पाकिस्तानमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा आयएस प्रयत्न करत आहे याच पार्श्वभूमीवर दक्षिण आशियात आत्तापर्यंत झालेले हल्ले हे आयएसशी संलग्न आहेत हे विसरता कामा नये. आतापर्यंत बंडखोरीसाठी ओळखल्या जाणार्‍या तालिबानला बंडखोरीविरुद्ध पावले उचलावी लागत आहेत म्हणून सध्या तालिबान विचित्र कात्रीत अडकलेला आहे. अर्थात पुढील काळात दक्षिण आशियात हे वेगळे प्रयोग बघायला मिळतील हे निश्चित आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Kabir Taneja

Kabir Taneja

Kabir Taneja is a Deputy Director and Fellow, Middle East, with the Strategic Studies programme. His research focuses on India’s relations with the Middle East ...

Read More +